हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळाला!
स्ट्रॉसबर्ग, फ्रांस येथील मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने ३ मे, २००७ रोजी जॉर्जियाच्या प्रजासत्ताकातील यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने एकमताने निर्णय दिला. जॉर्जिया येथील यहोवाच्या साक्षीदारांशी अमानुष व्यवहार करण्यात आला आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचेही उल्लंघन करण्यात आले असे या न्यायालयाला दिसून आले. शिवाय, या गुन्ह्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याबद्दल या न्यायालयाने जॉर्जियाच्या भूतपूर्व प्रशासनाला खडसावले. सदर न्यायालयाने असा निर्णय का दिला?
जॉर्जियाची राजधानी, तिबिलिसी येथे १७ ऑक्टोबर, १९९९ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या ग्लदानी मंडळीचे जवळजवळ १२० सदस्य उपासनेकरता एकत्र जमले होते. त्यांची सभा शांतपणे चालली असताना, अचानक एक मोठा जमाव सभागृहात जबरदस्तीने घुसला. त्या जमावाचा म्होरक्या वासीली मखालावीशवीली हा आपल्या पदावरून काढून टाकण्यात आलेला एक ऑर्थोडॉक्स पंथाचा पादरी होता. हातात लाकडी सोटे आणि लोखंडी क्रूस असलेल्या या जमावाने सभागृहात जमलेल्या लोकांना निर्दयपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. बऱ्याच जणांना यामुळे गंभीर दुखापती झाल्या. एका स्त्रीच्या डोळ्याला या हल्ल्यामुळे कायमचे नुकसान झाले. कमीतकमी १६ जणांना तातडीने इस्पितळात न्यावे लागले. काही जण मदतीसाठी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्याने, मी तर तुमचा याहून चांगला समाचार घेतला असता, असे उर्मट उत्तर दिले! जमावातल्या एकाने हल्ल्याचे व्हिडिओ कॅमेऱ्याने चित्रीकरण केले आणि नंतर तो व्हिडिओ राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आला. हल्ला करणारे कोण आहेत हे या व्हिडिओत अगदी स्पष्टपणे दिसत होते.a
ग्लदानी मंडळीच्या ज्या सदस्यांना मारहाण करण्यात आली त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पण हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या घटनेचा तपास करण्याकरता नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने, आपण स्वतः ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य असल्यामुळे या प्रकरणात आपल्याला निःपक्ष राहता येणार नाही असे सांगून टाकले. सरकारी अधिकाऱ्यांच्या अशा हलगर्जीपणामुळे या धर्मांध लोकांना आणखीनच चेव आला आणि त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांवर अशाच प्रकारचे शंभरच्यावर हल्ले केले.
शेवटी, २९ जून, २००१ रोजी यहोवाच्या साक्षीदारांनी मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयात आपली फिर्याद दाखल केली.b न्यायालयाने ३ मे, २००७ रोजी अंतिम निकाल जाहीर केला. यात यहोवाच्या साक्षीदारांवर झालेल्या हल्ल्याचे सविस्तर वर्णन करण्यात आले व सरकारी प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा निषेध करण्यात आला. न्यायालयाने म्हटले, की या हल्ल्याबद्दल “चौकशी करून लगेच कारवाई करण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. अधिकाऱ्यांनी अशा घटना खपवून घेतल्यामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरून आणि सरकारी न्याययंत्रणेवरून विश्वास उडू शकतो.”
न्यायालयाने दिलेल्या निकालात असे म्हणण्यात आले: “फिर्यादींवर १७ ऑक्टोबर १९९९ रोजी झालेला हल्ला हा यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध करण्यात आलेला इतक्या मोठ्या स्वरूपाचा पहिलाच हल्ला होता. पण, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हल्ला करणाऱ्या या गटाला सबंध जॉर्जियात धार्मिक हिंसाचार करण्याची सूट मिळाली.”
अशा रितीने, हिंसाचाराला बळी पडलेल्यांना शेवटी न्याय मिळाला. जॉर्जियाच्या प्रशासनाला ग्लदानी मंडळीच्या सदस्यांना नुकसानभरपाई व न्यायालयाचा खर्चही देण्याचा आदेश देण्यात आला. क्रूर हिंसाचाराच्या घटना आता जवळजवळ थांबल्या आहेत याबद्दल जॉर्जियातील यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटतो. पण मुख्य म्हणजे, न्यायालयाच्या निर्णयामुळे उपासनेकरता एकत्र जमण्याच्या त्यांच्या हक्काचे समर्थन करण्यात आले याबद्दल त्यांना विशेष आनंद वाटतो. या कठीण परीक्षेच्या काळात पदोपदी मार्गदर्शन व संरक्षण केल्याबद्दल, ते आपला स्वर्गीय पिता, यहोवा देव याचे मनापासून आभारी आहेत.—स्तोत्र २३:४. (w०८ ३/१)
[तळटीपा]
a अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सावध राहा! जानेवारी २२, २००२ इंग्रजी अंकातील पृष्ठे १८-२४ पाहा.
b मानवी हक्कांचे युरोपियन न्यायालय हे कौंसिल ऑफ युरोपचे एक अंग आहे. मानवी हक्कांच्या व मूलभूत स्वातंत्र्यांच्या संरक्षणाकरता ठरवण्यात आलेल्या कराराचा भंग झाल्याचा आरोप केला जातो अशा प्रकरणांत हे न्यायालय निकाल देते. जॉर्जियाने २० मे, १९९९ रोजी या कराराचा स्वीकार केला होता. त्याअर्थी त्यातील कलमांचे पालन करण्यास ते वचनबद्ध होते.