स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व एकत्र करणे
“त्याने स्वत:च्या इच्छेनुरुप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावतांना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.”—इफिसकर १:९, १०.
१. स्वर्ग व पृथ्वीबद्दल यहोवाची काय ‘इच्छा’ आहे?
सबंध विश्वात शांतीचे साम्राज्य! ‘शांतीचा देव’ यहोवा याचा हाच अद्भुत उद्देश आहे. (इब्री लोकांस १३:२०) त्याने प्रेषित पौलाला असे लिहिण्यास प्रेरित केले की “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे” हे त्याच्या “इच्छेनुरूप” आहे. (इफिसकर १:९, १०) पण या वचनात, “एकत्र करावे” असे भाषांतर केलेल्या संज्ञेचा काय अर्थ आहे? बायबल विद्वान जे. बी. लाइटफुट सांगतात: “ही संज्ञा अशा एका संयुक्त विश्वाला सूचित करते की ज्यात कोणतेही विसंगत किंवा विरोधी घटक नसतील तर ज्याचे सर्व घटक एकजूट असतील व त्यांना एकजूट करणारा केंद्रबिंदू ख्रिस्त असेल. पाप व मृत्यू, दुःख, अपयश व सर्व प्रकारच्या पीडा कायमच्या नाहीशा होतील.”
‘स्वर्गात जे आहे’
२. ‘स्वर्गात जे आहे’ ही संज्ञा कोणाला सूचित करते?
२ प्रेषित पेत्राने खऱ्या ख्रिश्चनांना असलेल्या अद्भुत आशेविषयी पुढील शब्दांत वर्णन केले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) येथे अभिवचन दिलेले “नवे आकाश” किंवा स्वर्ग एका नव्या शासनास, अर्थात मशीही राज्यास सूचित करते. इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात पौलाने म्हटले, की ‘स्वर्गात जे आहे’ ते “ख्रिस्तामध्ये” एकत्र केले जाईल. ‘स्वर्गात जे आहे’ ही संज्ञा ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याकरता निवडलेल्या मर्यादित संख्येच्या मनुष्यांना सूचित करते. (१ पेत्र १:३, ४) हे अभिषिक्त १,४४,००० ख्रिस्ती, येशू ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गातील राज्यात सहवारस म्हणून राज्य करण्याकरता, “पृथ्वीवरून विकत घेतलेले,” “माणसातून विकत घेतलेले आहेत.”—प्रकटीकरण ५:९, १०; १४:३, ४; २ करिंथकर १:२१; इफिसकर १:११; ३:६.
३. अभिषिक्त ख्रिस्ती पृथ्वीवर असतानाही, त्यांना ‘स्वर्गात बसविले’ आहे असे कसे म्हणता येते?
३ अभिषिक्त ख्रिस्ती पवित्र आत्म्याकरवी नव्याने जन्मतात व यहोवाचे आत्मिक पुत्र बनतात. (योहान १:१२, १३; ३:५-७) आपले “पुत्र” या नात्याने यहोवाने त्यांना दत्तक घेतल्यामुळे ते येशूचे बंधू बनतात. (रोमकर ८:१५; इफिसकर १:५) याच कारणामुळे, पृथ्वीवर असतानाही त्यांच्याविषयी असे म्हटले जाते की ते “ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले” गेले आहेत. (इफिसकर १:३; २:६) ते या उदात्त आध्यात्मिक स्थितीत येतात कारण त्यांच्यावर ‘पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला आहे. हा पवित्र आत्मा त्यांच्या [स्वर्गीय] वतनाचा विसार आहे.’ (इफिसकर १:१३, १४; कलस्सैकर १:५) तर ‘जे स्वर्गात आहे’ ते या अभिषिक्त ख्रिश्चनांना सूचित करते, ज्यांची एकूण संख्या यहोवाने पूर्वीच नेमली होती व त्यांना एकत्र केले जाणार होते.
एकत्र करण्यास सुरुवात
४. ‘जे स्वर्गात आहे’ त्यांचे एकत्र केले जाणे केव्हा सुरू झाले?
४ यहोवाच्या ‘व्यवस्थेनुसार,’ ‘जे स्वर्गात आहे’ त्यांचे एकत्र केले जाणे ‘कालखंडाची पूर्णता’ झाली तेव्हा सुरू होणार होते. (इफिसकर १:१०) ही नियुक्त वेळ सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी आली. त्या दिवशी प्रेषितांवर व स्त्रीपुरुषांचा समावेश असलेल्या शिष्यांच्या एका गटावर पवित्र आत्मा ओतण्यात आला. (प्रेषितांची कृत्ये १:१३-१५; २:१-४) हा या गोष्टीचा पुरावा होता की नवा करार अंमलात आला असून, ख्रिस्ती मंडळीचा व आत्मिक इस्राएल, अर्थात ‘देवाचे इस्राएल’ या नव्या राष्ट्राचा जन्म झाला आहे.—गलतीकर ६:१६; इब्री लोकांस ९:१५; १२:२३, २४.
५. यहोवाने शारीरिक इस्राएलची जागा घेण्याकरता एक नवे “राष्ट्र” का निर्माण केले?
५ शारीरिक इस्राएलसोबत करण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या करारामुळे स्वर्गात सर्वकाळ सेवा करण्यासाठी “याजकराज्य, पवित्र राष्ट्र” निर्माण होऊ शकले नाही. (निर्गम १९:५, ६) येशूने यहुदी धर्मपुढाऱ्यांना असे सांगितले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४३) हे राष्ट्र म्हणजेच आत्मिक इस्राएल, ते नव्या करारात समाविष्ट करण्यात आलेल्या अभिषिक्त ख्रिश्चनांचे बनले आहे. यांना प्रेषित पेत्राने असे लिहिले: “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांस अंधकारांतून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे; ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर देवाचे लोक आहा.” (१ पेत्र २:९, १०) शारीरिक इस्राएल आता यहोवाचे करारबद्ध लोक राहिले नाहीत. (इब्री लोकांस ८:७-१३) येशूने भाकीत केल्याप्रमाणे मशीही राज्याचे भाग असण्याचा विशेषाधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला व आध्यात्मिक इस्राएलच्या १,४४,००० जणांना देण्यात आला.—प्रकटीकरण ७:४-८.
राज्याच्या करारात सामील केलेले
६, ७. येशूने आपल्या आत्म्याने अभिषिक्त असलेल्या बंधूंसोबत कोणता विशेष करार केला व त्यांच्याकरता याचा काय अर्थ होतो?
६ येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना केली, त्या रात्री त्याने आपल्या विश्वासू प्रेषितांना सांगितले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो. ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.” (लूक २२:२८-३०) येशूचे १,४४,००० आत्म्याने अभिषिक्त केलेले बंधू, जे ‘मरेपर्यंत विश्वासू राहून’ ‘विजय मिळवतील’ त्यांच्यासोबत केलेल्या एका विशेष कराराच्या संदर्भात येशू त्या प्रसंगी बोलत होता.—प्रकटीकरण २:१०; ३:२१.
७ या मर्यादित संख्येच्या गटातील सदस्य पृथ्वीवर रक्तामांसाचे मानव या नात्याने सर्वकाळ जगण्याच्या सर्व आशांचा त्याग करतात. ते ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील व राजासनांवर बसून मानवजातीचा न्याय करतील. (प्रकटीकरण २०:४, ६) आता आपण आणखी काही शास्त्रवचनांचे परीक्षण करू या, जे खासकरून अभिषिक्तांच्या संदर्भात आहेत. ही शास्त्रवचने दाखवतात की ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्य स्मारकविधीची प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस का खात किंवा पीत नाहीत.—योहान १०:१६.
८. भाकरी खाण्याद्वारे अभिषिक्त जन काय दर्शवतात? (पृष्ठ २३ वरील चौकोन पाहा.)
८ अभिषिक्त जन ख्रिस्ताच्या दुःखात सामील होतात व त्याच्यासारखाच मृत्यू सहन करण्यास ते तयार आहेत. त्या गटाचा एक सदस्य या नात्याने पौलाने म्हटले की, तो कोणताही त्याग करण्यास तयार होता, जेणेकरून “ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा, हे अशासाठी . . . की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून द्यावी.” होय, पौल “त्याच्या मरणाला अनुरूप” होण्यास, अर्थात तशाच प्रकारच्या मृत्यूला तोंड देण्यास तयार होता. (फिलिप्पैकर ३:८, १०) कित्येक अभिषिक्त ख्रिश्चनांनी आपल्या शारीरिक अवस्थेत, “येशूचा वध” सहन केला आहे.—२ करिंथकर ४:१०.
९. स्मारकविधीची भाकरी कोणत्या शरीराचे प्रतीक आहे?
९ प्रभूच्या सांज भोजनाचा विधी स्थापन करताना येशूने म्हटले: “हे माझे शरीर आहे.” (मार्क १४:२२) तो आपल्या शरीराविषयी बोलत होता, जे लवकरच मारहाण करून रक्तबंबाळ केले जाणार होते. खमीर नसलेली भाकरी त्या शरीराचे अगदी योग्य प्रतीक होती. का? कारण बायबलमध्ये खमीर हे पाप किंवा दुष्टाई यास सूचित करते. (मत्तय १६:४, ११, १२; १ करिंथकर ५:६-८) येशू परिपूर्ण होता व त्याचे मानवी शरीर पापापासून मुक्त होते. तो आपले हे परिपूर्ण शरीर समतुल्य बलिदान म्हणून अर्पण करणार होता. (इब्री लोकांस ७:२६; १ योहान २:२) त्याच्या या बलिदानामुळे, सर्व विश्वासू ख्रिश्चनांना, मग त्यांची आशा स्वर्गीय जीवनाची असो किंवा पृथ्वीवरील परादिसात सार्वकालिक जीवनाची असो, त्या सर्वांना लाभ होणार होता.—योहान ६:५१.
१०. स्मारकविधीत जे द्राक्षारस घेतात ते कशाप्रकारे ‘ख्रिस्ताच्या रक्ताचे सहभागी’ होतात?
१० स्मारकविधीत अभिषिक्त ख्रिस्ती जो द्राक्षारस पितात त्याविषयी पौलाने लिहिले: “जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करितो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही?” (१ करिंथकर १०:१६) जे तो द्राक्षारस घेतात, ते ‘ख्रिस्ताच्या रक्ताचे सहभागी’ कशाप्रकारे होतात? अर्थात, ते खंडणी बलिदान पुरवण्यात सहभागी होत नाहीत कारण त्यांना स्वतःलाच पापापासून मुक्ततेची गरज आहे. ख्रिस्ताच्या रक्तात पापापासून मुक्तता देण्याचे सामर्थ्य आहे, यावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या पापांची त्यांना क्षमा मिळते आणि स्वर्गातील जीवनाकरता त्यांना नीतिमान घोषित केले जाते. (रोमकर ५:८, ९; तीत ३:४-७) ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्ताच्याच द्वारे त्याचे १,४४,००० सहवारस ‘पवित्र होतात,’ अर्थात “पवित्र जन” होण्याकरता त्यांची पापे धुतली जातात व त्यांना खास या सेवेसाठी राखून ठेवले जाते. (इब्री लोकांस १०:२९; दानीएल ७:१८, २७; इफिसकर २:१९) होय, ख्रिस्ताने जे रक्त वाहिले त्याच्या माध्यमानेच “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.”—प्रकटीकरण ५:९, १०.
११. स्मारकविधीचा द्राक्षारस घेण्याद्वारे अभिषिक्त जन काय दर्शवतात?
११ येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना केली तेव्हा त्याने आपल्या विश्वासू प्रेषितांच्या हाती द्राक्षारसाचा प्याला देऊन म्हटले: “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.” (मत्तय २६:२७, २८) ज्याप्रकारे देव व इस्राएल राष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या नियमशास्त्राच्या कराराला बकऱ्यांच्या व बैलांच्या रक्ताने कायदेशीर रूप दिले त्याचप्रकारे येशूच्या रक्ताने नव्या कराराला कायदेशीर रूप दिले. हा नवा करार यहोवाने सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून आत्मिक इस्राएलासोबत केला होता. (निर्गम २४:५-८; लूक २२:२०; इब्री लोकांस ९:१४, १५) तर या ‘कराराच्या रक्ताचे’ प्रतीक असणाऱ्या द्राक्षारसाचा घोट घेऊन अभिषिक्त जन हे दर्शवतात की त्यांना नव्या करारात सामील करण्यात आले आहे व ते या कराराचे लाभ अनुभवत आहेत.
१२. अभिषिक्त जनांचा कशाप्रकारे ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा होतो?
१२ अभिषिक्त जनांना आणखी एका गोष्टीची आठवण करून दिली जाते. येशूने आपल्या विश्वासू शिष्यांना सांगितले होते: “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल.” (मार्क १०:३८, ३९) प्रेषित पौलानेही नंतर ख्रिश्चनांच्या संदर्भात लिहिताना, ते “[ख्रिस्ताच्या] मरणात बाप्तिस्मा” घेतात असे लिहिले. (रोमकर ६:३) अभिषिक्तांचे जीवन आत्मबलिदानाचे जीवन आहे. त्यांचा मृत्यूही बलिदानरूपी मृत्यू आहे कारण ते पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा कायमची त्यागतात. हे अभिषिक्त ख्रिस्ती मृत्यूपर्यंत विश्वासू राहतात व ख्रिस्तासोबत स्वर्गात ‘राज्य करण्याकरता’ आत्मिक प्राण्यांच्या रूपात पुनरुत्थित केले जातात, त्यावेळी ख्रिस्ताच्या मरणात त्यांचा बाप्तिस्मा पूर्ण होतो.—२ तीमथ्य २:१०-१२; रोमकर ६:५; १ करिंथकर १५:४२-४४, ५०.
प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस घेणे
१३. ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे ते स्मारकविधीची प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस का घेत नाहीत पण ते स्मारकविधीला का उपस्थित राहतात?
१३ स्मारकविधीत फिरवली जाणारी भाकरी व द्राक्षारस घेण्यात या सर्व गोष्टींचा समावेश असल्यामुळे, ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे त्यांनी ही भाकरी खाणे किंवा द्राक्षारस पिणे अर्थातच अनुचित ठरेल. ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे ते ओळखतात की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अभिषिक्त सदस्य नाही तसेच जे येशू ख्रिस्तासोबत राज्य करतील त्यांच्यासोबत यहोवाने केलेल्या नव्या करारातही आपण सामील नाही. द्राक्षारसाचा “प्याला” नव्या कराराचे प्रतीक असल्यामुळे, केवळ जे नव्या करारात सामील आहेत तेच ही प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस घेऊ शकतात. जे देवाच्या राज्यशासनाखाली पृथ्वीवर मानव या नात्याने परिपूर्ण अवस्थेत सार्वकालीक जीवनाचा उपभोग घेण्याची आशा बाळगतात त्यांचा येशूच्या मरणात बाप्तिस्मा होत नाही व त्यांना स्वर्गात त्याच्यासोबत राज्य करण्याकरता निवडण्यात आलेले नाही. त्यांनी प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस घेतल्यास, हा अशा गोष्टींचा संकेत असेल की ज्या गोष्टी त्यांच्याबाबतीत खऱ्या नाहीत. म्हणूनच ते स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेत नाहीत पण ते केवळ आदरशील प्रेक्षक म्हणून स्मारकविधीला उपस्थित राहतात. यहोवाने आपल्या पुत्राच्याद्वारे त्यांना जे अनेक आशीर्वाद दिले आहेत, तसेच ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्ताच्या आधारावर त्यांच्या पापांची जी क्षमा त्यांना मिळू शकली आहे त्याबद्दल ते अत्यंत कृतज्ञ आहेत.
१४. भाकरी व द्राक्षारस घेतल्यामुळे अभिषिक्त ख्रिश्चनांना कशाप्रकारे आध्यात्मिक बळ मिळते?
१४ ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याकरता निवडलेल्यांवर अंतिम शिक्का मारणे आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. पृथ्वीवरील आत्मबलिदानाचे जीवन पूर्ण होईपर्यंत, अभिषिक्त जनांना स्मारकविधीची प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस घेतल्यामुळे आध्यात्मिक बळ मिळत राहते. ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य असलेल्या बंधू व भगिनींसोबत एकतेचे बंधन असल्याचे त्यांना जाणवते. प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस घेताना त्यांना मृत्यूपर्यंत विश्वासू राहण्याच्या त्यांच्या जबाबदारीचीही आठवण होते.—२ पेत्र १:१०, ११.
“पृथ्वीवर जे आहे” ते सर्व एकत्र करणे
१५. अभिषिक्त ख्रिश्चनांना कोण येऊन मिळाले आहेत?
१५ एकोणीसशे तीसच्या दशकाच्या मध्यापासून ‘लहान कळपात’ सामील नसलेली व पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा बाळगणारी “दुसरी मेंढरे” वाढत्या संख्येने अभिषिक्त जनांना येऊन मिळू लागली आहेत. (योहान १०:१६; लूक १२:३२; जखऱ्या ८:२३) ते ख्रिस्ताच्या बंधूंचे एकनिष्ठ साथीदार बनले आहेत व त्यांनी साक्षीसाठी म्हणून ‘राज्याची सुवार्ता’ सर्व राष्ट्रांत घोषित करण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. (मत्तय २४:१४; २५:४०) असे केल्यामुळे, ख्रिस्त जेव्हा राष्ट्रांचा न्याय करायला येईल तेव्हा तो ‘मेंढरांत’ त्यांची गणना करेल व त्यांना आपल्या “उजवीकडे” ठेवून आशीर्वादित करेल अशी आशा ते बाळगू शकतात. (मत्तय २५:३३-३६, ४६) ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवण्याद्वारे ते “मोठ्या संकटातून” जिवंत बचावणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ सदस्य बनतात.—प्रकटीकरण ७:९-१४.
१६. “पृथ्वीवर जे आहे” ही संज्ञा कोणास सूचित करते आणि या सर्वांना ‘देवाची मुले’ होण्याची संधी कशी मिळेल?
१६ एक लाख चव्वेचाळीस हजार जणांवर अंतिम शिक्का मारण्याचे काम पूर्ण झाल्यावर पृथ्वीवरील सैतानाच्या दुष्ट जगाविरुद्ध नाशाचे “वारे” सोडण्याचा मार्ग मोकळा होईल. (प्रकटीकरण ७:१-४) ख्रिस्त व त्याच्याबरोबर राज्य करणारे राजे व याजक यांच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान मोठ्या लोकसमुदायात असंख्य पुनरुत्थित जनांची भर पडेल. (प्रकटीकरण २०:१२, १३) यांना मशीही राजा, ख्रिस्त येशू याच्या पृथ्वीवरील प्रजेतील कायमचे सदस्य बनण्याची संधी मिळेल. हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी, “पृथ्वीवर जे आहे” ते सर्व एका अंतिम परीक्षेला तोंड देतील. जे विश्वासू निघतील त्यांना पृथ्वीवरील ‘देवाची मुले’ म्हणून यहोवा स्वीकारील.—इफिसकर १:१०; रोमकर ८:२१; प्रकटीकरण २०:७, ८.
१७. यहोवाचा उद्देश कशाप्रकारे पूर्ण होईल?
१७ अशारितीने, अपरंपार सुज्ञतेने केलेल्या ‘व्यवस्थेकरवी,’ यहोवाने ‘स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करण्याचा’ आपला उद्देश पूर्ण केलेला असेल. सबंध विश्वात असलेल्या शांतीच्या साम्राज्यात स्वर्ग व पृथ्वीवरील सर्व बुद्धिमान प्राण्यांना एकत्र करण्यात आलेले असेल; व ते सर्व मिळून यहोवाच्या, अर्थात आपले सर्व उद्देश पूर्ण करणाऱ्या महान देवाच्या नीतिमान सार्वभौमत्वाला आनंदाने अधीन होतील.
१८. स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे, अभिषिक्त जनांना व त्यांच्या साथीदारांनाही कोणता फायदा होईल?
१८ लहानशा संख्येचे अभिषिक्त जन, दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या आपल्या लाखो साथीदारांसोबत १२ एप्रिल २००६ रोजी एकत्र होतील तेव्हा त्या सर्वांच्या विश्वासाला केवढी उभारणी मिळेल! “माझ्या स्मरणार्थ हे करा,” या येशूने दिलेल्या आज्ञेनुसार ते ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळतील. (लूक २२:१९) यहोवाने आपला प्रिय पुत्र, ख्रिस्त येशू याच्याद्वारे आपल्यासाठी काय काय केले आहे याचे, या प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी स्मरण करावे. (w०६ २/१५)
उजळणी
• स्वर्ग व पृथ्वीवर जे आहे त्या सर्वांकरता यहोवाचा काय उद्देश आहे?
• ‘स्वर्गात जे आहे’ ही संज्ञा कोणाला सूचित करते आणि त्यांना कशाप्रकारे एकत्र करण्यात आले आहे?
• “पृथ्वीवर जे आहे,” ही संज्ञा कोणास सूचित करते आणि त्यांना कोणती आशा आहे?
[१३ पानांवरील चौकट]
‘ख्रिस्ताचे शरीर’
पौलाने १ करिंथकर १०:१६, १७ यांत विशेषतः ख्रिस्ताच्या अभिषिक्त बंधूंच्या संदर्भात भाकरीचा अर्थ समजावून सांगताना ‘शरीर’ या शब्दाचा एका खास अर्थाने उल्लेख केला. त्याने म्हटले: “जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर, असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो.” अभिषिक्त ख्रिस्ती स्मारकविधीची भाकरी खाण्यात सहभागी होतात तेव्हा ते अभिषिक्त जनांच्या मंडळीत आपणही इतर अभिषिक्त जनांसोबत एकतेत आहोत हे दर्शवतात. ही मंडळी एका शरीरासारखी असून तिचे मस्तक ख्रिस्त आहे.—मत्तय २३:१०; १ करिंथकर १२:१२, १३, १८.
[१३ पानांवरील चित्रे]
भाकरी व द्राक्षारस केवळ अभिषिक्त जन का घेतात?
[१५ पानांवरील चित्र]
यहोवाने केलेल्या व्यवस्थेकरवी स्वर्ग व पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना एकत्र केले जाईल