वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w04 ६/१५ पृ. १४-१९
  • जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनाबद्दल आदर दाखवा
  • रक्‍त—त्याचा उचित उपयोग?
  • जीवनदात्याने योजलेला उपाय
  • जीवन खरेपणाने वाचविणारे रक्‍त
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन
    बायबल नेमके काय शिकवते?
  • जीवनाच्या देणगीचा आदर करा
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • रक्‍त–जीवनासाठी अत्यावश्‍यक
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
w04 ६/१५ पृ. १४-१९

जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा

“ख्रिस्ताचे रक्‍त आपली सद्‌सद्विवेकबुद्धि जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून . . . शुद्ध करील.”—इब्री लोकांस ९:१४.

१. जीवन अमूल्य आहे असे आपण समजतो याचा कोणता पुरावा आहे?

तुमच्या जीवनाची किंमत लावायला सांगितल्यास तुम्ही त्याची किती किंमत लावाल? खरोखर, जीवन अमूल्य आहे—आपले आणि इतरांचेही. म्हणूनच तर आपण आजारी पडताच उपचाराकरता डॉक्टरकडे जातो किंवा वेळोवेळी तपासणी करवून घेतो. आपल्याला जिवंत व निरोगी राहण्याची इच्छा असते. जे अगदी वयोवृद्ध किंवा अपंग आहेत त्यांनाही मरण्याची नव्हे तर जगण्याची इच्छा असते.

२, ३. (अ) नीतिसूत्रे २३:२२ कोणत्या कर्तव्यावर प्रकाश टाकते? (ब) नीतिसूत्रे २३:२२ येथे उल्लेख केलेल्या कर्तव्यात देव कशाप्रकारे गोवलेला आहे?

२ तुम्ही जीवनाची कितपत कदर बाळगता याचा प्रभाव तुमच्या इतरांशी असलेल्या संबंधांवरही पडतो. उदाहरणार्थ, देवाचे वचन सांगते: “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” (नीतिसूत्रे २३:२२) ‘ऐकणे’ म्हणजे केवळ शब्द कानावर पडणे नव्हे; या नीतिसूत्रात ऐकण्याचा अर्थ, ऐकून पालन करणे असा आहे. (निर्गम १५:२६; अनुवाद ७:१२; १३:१८; १५:५; यहोशवा २२:२; स्तोत्र ८१:१३) देवाचे वचन कोणत्या कारणामुळे ऐकण्याचे प्रोत्साहन देते? आईवडील आपल्यापेक्षा वयाने व अनुभवाने मोठे आहेत इतकेच यामागचे कारण नाही. तर ते ‘जन्मदाते’ आहेत, हे कारण तेथे दिले आहे. काही भाषांतरांत हे वचन याप्रकारे भाषांतरीत केलेले आढळते: “तुला जीवन देणाऱ्‍या पित्याचे ऐक.” जर तुम्हाला आपल्या जीवनाची कदर असेल तर ते ज्यांच्याकडून तुम्हाला मिळाले त्यांच्याविषयी तुम्हाला कर्तव्याची भावना वाटणे साहजिक आहे.

३ अर्थात, जर तुम्ही खरे ख्रिस्ती असाल तर जीवनाचा मूळ उगम यहोवा आहे हे तुम्ही ओळखाल. त्याच्यामुळेच तुम्ही ‘जगता,’ जाणतेपणाने ‘वागता’ आणि त्याच्यामुळेच तुम्ही अस्तित्वात ‘आहात’ व भविष्याबाबत इतकेच काय तर कायमच्या जीवनाबद्दल विचार व योजना करू शकता. (प्रेषितांची कृत्ये १७:२८; स्तोत्र ३६:९; उपदेशक ३:११) नीतिसूत्रे २३:२२ यानुसार जीवनाविषयी इतर कोणते मूल्यमापन स्वीकारण्यापेक्षा देवाचा दृष्टिकोन स्वीकारण्याच्या व त्यानुसार वागण्याच्या इच्छेने आज्ञाधारकपणे त्याचे ‘ऐकणे’ हे योग्यच आहे.

जीवनाबद्दल आदर दाखवा

४. मानवाच्या इतिहासात बऱ्‍याच आधी, जीवनाबद्दल आदर दाखवण्याचा प्रश्‍न का उपस्थित झाला?

४ मानवाच्या इतिहासात सुरवातीपासूनच यहोवाने हे स्पष्ट केले की कोणत्याही कारणासाठी का होईना, पण जीवनाचा उपयोग (अथवा दुरुपयोग) करण्याचे स्वातंत्र्य त्याने मानवाला दिलेले नव्हते. मत्सराने पेटलेल्या काईनाने एका निर्दोष व्यक्‍तीचा, अर्थात आपल्या भावाचा जीव घेतला. जीवनासंबंधाने असा निर्णय घेण्याचा काईनाला अधिकार होता असे तुम्हाला वाटते का? निदान देवाला असे वाटले नाही. त्याने काईनाला जाब विचारला: “तू हे काय केले? ऐक! तुझ्या भावाचे रक्‍त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे.” (उत्पत्ति ४:१०) भूमीवर सांडलेले हाबेलचे रक्‍त त्याच्या जीवनाचे प्रतीक होते, जे निर्दयतेने अकालीच संपुष्टात आणले गेले होते; त्यामुळे त्याचे रक्‍त देवाकडे न्यायाची मागणी करत होते.—इब्री लोकांस १२:२४.

५. (अ) नोहाच्या काळात देवाने कोणता निर्बंध लावला आणि तो कोणाला लागू होत होता? (ब) हा निर्बंध लावला जाण्याचे पाऊल महत्त्वाचे का होते?

५ जलप्रलयानंतर, मानवजातीने नव्याने सुरवात केली. तेव्हा केवळ आठ मनुष्ये होती. सर्व मानवांकरता केलेल्या एका घोषणेत देवाने जीवन व रक्‍त यांचे आपल्या नजरेत किती मोल आहे यासंदर्भात आणखी माहिती प्रकट केली. त्याने मानवांना प्राण्यांचे मांस खाण्याची परवानगी दिली पण त्यासोबत त्याने हा निर्बंध लावला: “सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्‍न होतील; वनस्पति ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो. तथापि मांसाचे जीवन रक्‍त आहे म्हणून रक्‍तासकट मांस खाऊ नका.” (उत्पत्ति ९:३, ४) काही यहूद्यांनी याचा असा अर्थ लावला की मानवांनी अद्याप जिवंत असलेल्या कोणत्याही प्राण्याचे मांस किंवा रक्‍त खाऊ नये. पण या आज्ञेद्वारे देवाने जीवनाच्या रक्षणाकरता रक्‍त खाण्यास मनाई केली होती हे कालांतराने स्पष्ट होणार होते. शिवाय, नोहाद्वारे देवाने दिलेली ही आज्ञा म्हणजे रक्‍ताशीच संबंधित असलेल्या त्याच्या उद्देशाच्या पूर्ततेत एक महत्त्वाचे पाऊल होते; हा त्याचा उद्देश मानवांना सार्वकालिक जीवन मिळवून देणार होता.

६. नोहाद्वारे, देवाने जीवनाविषयी आपल्या दृष्टिकोनावर कशाप्रकारे प्रकाश टाकला?

६ देवाने पुढे म्हटले: “मी तुमच्या रक्‍ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्‍तपात करील त्याचा रक्‍तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्‍न केला आहे.” (उत्पत्ति ९:५, ६) सबंध मानवजातीला केलेल्या या घोषणेवरून दिसून येते की देवाच्या लेखी मनुष्याचे रक्‍त म्हणजे त्याचे जीवन होय. निर्माणकर्ता प्रत्येक व्यक्‍तीला जीवन देतो आणि हे जीवन, ज्याचे प्रतीक रक्‍त आहे ते कोणीही त्या व्यक्‍तीपासून घेऊ नये. काईनाप्रमाणे कोणी मनुष्यहत्या केल्यास निर्माणकर्त्याला त्याच्या जिवाबद्दल “झडती” घेण्याचा, अर्थात, हत्या करणाऱ्‍याचे जीवन परत मागण्याचा हक्क आहे.

७. देवाने रक्‍तासंबंधी नोहाला जे मार्गदर्शन केले त्याविषयी जाणून घेण्यास आपण का उत्सुक असावे?

७ या घोषणेकरवी देवाने मानवांना रक्‍ताचा दुरुपयोग न करण्याची आज्ञा दिली. त्याने असे का केले याचा तुम्ही विचार केला आहे का? रक्‍तासंबंधी देवाच्या दृष्टिकोनामागे कोणती कारणे असावीत? या प्रश्‍नाच्या उत्तराचा संबंध बायबलमधील सर्वात महत्त्वाच्या शिकवणुकींपैकी एकीशी आहे. किंबहुना ही शिकवणूक म्हणजे ख्रिस्ती विश्‍वासाचा गाभा आहे. पण अनेक धार्मिक संघटना याकडे दुर्लक्ष करण्याचे पसंत करतात. ही शिकवणूक कोणती? आणि तिचा तुमच्या जीवनावर, निर्णयांवर आणि कृतींवर कसा प्रभाव होतो?

रक्‍त—त्याचा उचित उपयोग?

८. नियमशास्त्रात यहोवाने रक्‍ताच्या उपयोगासंबंधाने कोणता निर्बंध लावला?

८ इस्राएल राष्ट्राला यहोवाने नियमशास्त्र दिले तेव्हा त्याने जीवन व रक्‍ताबद्दल आणखी सविस्तर मार्गदर्शन केले. असे करताना, त्याने आपल्या उद्देशाच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक प्रगमनशील पाऊल उचलले. नियमशास्त्रात देवाला धान्य, तेल व द्राक्षारस यांसारखी अर्पणे देण्याची आज्ञा होती हे तुम्हाला माहीत असेल. (लेवीय २:१-४; २३:१३; गणना १५:१-५) यासोबत प्राण्यांचे बली देखील होते. यांविषयी देवाने म्हटले: “शरीराचे जीवन तर रक्‍तात असते, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्‍चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे; कारण रक्‍तात जीव असल्याकारणाने रक्‍तानेच प्रायश्‍चित्त होते. म्हणून मी इस्राएल लोकांना म्हटले आहे की, ‘तुमच्यातील कोणी रक्‍त सेवन करू नये.’” यहोवाने पुढे असेही म्हटले की जर कोणी, उदाहरणार्थ, शिकाऱ्‍याने अथवा शेतकऱ्‍याने खाण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार केली तर त्याने त्या प्राण्याचे रक्‍त जमिनीवर ओतून मातीने झाकून टाकावे. पृथ्वी ही देवाचे पादासन आहे, त्याअर्थी जमिनीवर रक्‍त ओतण्याद्वारे ती व्यक्‍ती कबूल करायची की रक्‍ताच्या रूपात तिने जीवन, जीवनदात्याला परत केले आहे.—लेवीय १७:११-१३; यशया ६६:१.

९. नियमशास्त्राधीन रक्‍ताचा कोणत्या एकमात्र प्रकारे उपयोग करावयाचा होता आणि यामागचा उद्देश काय होता?

९ हा नियम आपल्यासाठी कसलीही सूचकता नसलेली, निव्वळ एक धार्मिक प्रथा नव्हती. इस्राएलांना रक्‍त का वर्ज्य करायचे होते याकडे तुम्ही लक्ष दिले का? देवाने म्हटले: “म्हणून मी इस्राएल लोकांना म्हटले आहे की, ‘तुमच्यातील कोणी रक्‍त सेवन करू नये.’” कारण काय होते? “तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्‍चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे.” यावरून, मानवांनी रक्‍त सेवन करू नये अशी आज्ञा देवाने नोहाला का दिली याविषयी अधिक सुस्पष्ट बोध आपल्याला होत नाही का? रक्‍ताला ही श्रेष्ठ अर्थसूचकता देण्याचा व अनेकांच्या जिवाचे तारण करण्याकरता त्याचा खास उपयोग करण्याचा निर्णय निर्माणकर्त्याचा होता. पाप झाकण्याकरता (प्रायश्‍चित्त) रक्‍ताची महत्त्वाची भूमिका असणार होती. होय, नियमशास्त्राधीन देवाने रक्‍ताचा केवळ एका उद्देशासाठी वापर करण्यास अनुमती दिली होती; यहोवाच्या क्षमेची अपेक्षा करणाऱ्‍या इस्राएली लोकांच्या जिवांकरता प्रायश्‍चित्त करण्याकरता वेदीवर केवळ त्याचा वापर करावयाचा होता.

१०. प्राण्यांच्या रक्‍ताने पूर्ण क्षमा मिळणे शक्य का नव्हते पण नियमशास्त्राधीन असणाऱ्‍या बलिदानांनी कशाची आठवण करून दिली?

१० ख्रिस्ती विश्‍वासाशी, रक्‍ताद्वारे पापमोचनाची संकल्पना विसंगत नाही. नियमशास्त्रात देवाने योजलेल्या या तरतुदीविषयी ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: “नियमशास्त्राप्रमाणे रक्‍ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, आणि रक्‍त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.” (इब्री लोकांस ९:२२) पौलाने हे स्पष्ट केले की नियमशास्त्रात आज्ञापिलेल्या बलिदानांमुळे इस्राएल लोक परिपूर्ण, पापरहित मानव बनणार नव्हते. त्याने लिहिले: “ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.” (इब्री लोकांस १०:१-४) तरीपण या बलिदानांमुळे एक फायदा झाला. त्यांनी इस्राएलांना याची आठवण करून दिली की ते पापी होते आणि संपूर्ण क्षमा होण्याकरता त्यांना आणखी कशाची तरी गरज होती. पण जर प्राण्यांच्या जीवनाचे प्रतीक असणारे रक्‍त मानवांच्या पापांना पूर्णपणे झाकू शकले नाही तर मग कोणाचे रक्‍त असे करू शकत होते?

जीवनदात्याने योजलेला उपाय

११. प्राण्यांच्या रक्‍ताची बलिदाने एका विशिष्ट गोष्टीकडे संकेत करत होती हे आपल्याला कसे समजते?

११ वास्तविक पाहता, नियमशास्त्र अशा एका गोष्टीकडे संकेत करत होते, जी देवाची इच्छा कितीतरी पटीने अधिक परिणामकारकरित्या साध्य करणार होती. पौलाने विचारले: “तर मग नियमशास्त्र कशासाठी?” त्याने स्वतःच उत्तर दिले: “ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले; ते मध्यस्थाच्या [मोशेच्या] हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले.” (गलतीकर ३:१९) तसेच पौलाने असेही लिहिले: “ज्या पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही.”—इब्री लोकांस १०:१.

१२. रक्‍ताच्या संदर्भात, देवाचा उद्देश कशाप्रकारे उलगडत गेला?

१२ सारांशात, नोहाच्या दिवसांत देवाने आज्ञा दिली की मानव, जीवनाच्या पोषणाकरता प्राण्यांचे मांस खाऊ शकतात पण त्यांनी त्यांचे रक्‍त सेवन करू नये. कालांतराने देवाने दर्शवले की “शरीराचे जीवन . . . रक्‍तात असते.” तर खुद्द देवाने रक्‍त हे जीवनाचे प्रतीक असल्याचे ठरवले आणि म्हटले: “तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्‍चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे.” पण देवाच्या उद्देशाचा अद्‌भुतरित्या उलगडा अद्याप व्हायचा होता. नियमशास्त्रात पुढे होणार असलेल्या चांगल्या गोष्टींची छाया होती. कोणत्या चांगल्या गोष्टी?

१३. येशूचा मृत्यू महत्त्वाचा का होता?

१३ वास्तविक स्वरूप हे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूशी निगडीत होते. येशूला अनेक यातना देऊन वधस्तंभावर खिळण्यात आले हे तुम्हाला माहीत आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याला मृत्यू आला. पौलाने लिहिले: “आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्‍तांसाठी मरण पावला. . . . देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:६, ८) आपल्यासाठी ख्रिस्ताने त्याचा जीव दिला आणि अशाप्रकारे आपली पापे झाकू शकतील अशी खंडणी पुरवली. ही खंडणी म्हणजेच ख्रिस्ती संदेशाचा गाभा आहे. (मत्तय २०:२८; योहान ३:१६; १ करिंथकर १५:३; १ तीमथ्य २:६) याचा रक्‍त व जीवनाशी काय संबंध आहे आणि तुमच्या जीवनाशी या सर्वाचा काय संबंध आहे?

१४, १५. (अ) काही भाषांतरांत इफिसकर १:७ या वचनात कशाप्रकारे येशूच्या मृत्यूवर अधिक भर देण्यात आला आहे? (ब) इफिसकर १:७ यातील कोणत्या मुद्द्‌याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे?

१४ काही चर्चेसमध्ये येशूचा मृत्यू ही एक महत्त्वाची शिकवण आहे आणि त्यांचे सदस्य देखील “ख्रिस्ताने माझ्याकरता आपला प्राण दिला” या आशयाची विधाने करतात. इफिसकर १:७ या वचनाचे काही बायबल अनुवादांत कशाप्रकारे भाषांतर केले आहे याकडे लक्ष द्या: “त्याच्याकरवी व त्याच्या मृत्यूद्वारेच आपली सुटका आहे, अर्थात त्याद्वारेच आपली पापे नाहीशी केली जातात.” (दी अमेरिकन बायबल, फ्रँक शायल बॅलनटाईन, १९०२) “ख्रिस्ताच्या मृत्यूनेच आपली सुटका आणि आपल्या पापांची क्षमा केली जाते.” (टुडेज इंग्लिश व्हर्शन, १९६६) “ख्रिस्त व त्याच्या जिवाच्या बलिदानाद्वारेच आपल्याला सुटका मिळाली आहे, ज्या सुटकेने आपल्या पापांची क्षमा होते.” (द न्यू टेस्टमेंट, विल्यम बार्कले, १९६९) “ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारेच आपल्या पापांची क्षमा होते व आपण मुक्‍त होतो.” (द ट्रान्स्लेटर्स न्यू टेस्टमेंट, १९७३) यांसारख्या भाषांतरांत येशूच्या मृत्यूवर भर दिलेला आढळतो. काहीजण म्हणतील, ‘पण यात गैर काय, येशूचा मृत्यू महत्त्वाचा नव्हे का? मग या भाषांतरांत काय कमी आहे?’

१५ खरोखर, जर तुमच्याजवळ केवळ अशा भाषांतरांपैकी एखादे असेल, तर तुमचे एक फार महत्त्वाच्या मुद्द्‌याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे आणि यामुळे बायबल संदेशाची तुमची समज अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. या भाषांतरांत, मूळ ग्रीक भाषेत इफिसकर १:७ मध्ये असलेला “रक्‍त” या अर्थाचा एक शब्द गाळून टाकला आहे. पण नवे जग भाषांतर यासारख्या बऱ्‍याच बायबलमध्ये मूळ ग्रीकशी मिळतेजुळते भाषांतर आढळते: “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”

१६. “त्याच्या रक्‍ताच्या द्वारे” या भाषांतरामुळे आपल्याला कोणत्या गोष्टींची आठवण झाली पाहिजे?

१६ “त्याच्या रक्‍ताच्या द्वारे” हे भाषांतर अतिशय अर्थसूचक असून, ते वाचताच आपल्या मनात अनेक समर्पक गोष्टी आल्या पाहिजेत. केवळ मृत्यू, मग तो येशूसारख्या परिपूर्ण व्यक्‍तीचा मृत्यू असला तरीही तो पुरेसा नव्हता. येशूने नियमशास्त्रातील सांकेतिक गोष्टींची पूर्तता केली, खासकरून प्रायश्‍चित्ताच्या दिवशी घडणाऱ्‍या घटनांची. त्या विशेष दिनी, आज्ञा दिल्यानुसार विशिष्ट पशूंची बलिदाने दिली जात. यानंतर मुख्य याजक त्यांचे थोडे रक्‍त घेऊन ते निवासमंडपाच्या अथवा मंदिराच्या परम पवित्र स्थानी नेऊन ते देवासमोर, जणू त्याच्या सान्‍निध्यात अर्पण करत असे.—निर्गम २५:२२; लेवीय १६:२-१९.

१७. प्रायश्‍चित्ताच्या दिवसाने ज्या गोष्टींची पूर्वछाया दाखवली त्यांची येशूने कशाप्रकारे पूर्तता केली?

१७ प्रायश्‍चित्ताच्या दिवसाने ज्या गोष्टींची पूर्वछाया दाखवली त्यांची येशूने पूर्तता केली. पौलाने याविषयी स्पष्टीकरण दिले. सर्वप्रथम त्याने सांगितले की इस्राएलचा मुख्य याजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानी “स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल” रक्‍त अर्पण करण्यासाठी प्रवेश करतो. (इब्री लोकांस ९:६, ७) या नमुन्यानुसार, येशूचे आत्मिक पुनरुत्थान झाल्यावर तो स्वर्गात गेला. रक्‍त व मांसाचे शरीर नसलेला आत्मा असल्यामुळे तो “आपल्यासाठी देवासमोर” जाऊ शकला. त्याने देवासमोर काय अर्पण केले? शारीरिक स्वरूपाचे नव्हे तर अतिशय अर्थपूर्ण असे काहीतरी त्याने अर्पण केले. पौल पुढे म्हणतो: “ख्रिस्त हा . . . प्रमुख याजक होऊन आला . . . आणि बकरे व वासरे ह्‍यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्‍त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्‍ति मिळविली. कारण बकऱ्‍याचे व बैलाचे रक्‍त . . . जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करितात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्‍त आपली सद्‌सद्विवेकबुद्धि जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषकरून शुद्ध करील?” होय, येशूने देवाला स्वतःच्या रक्‍ताचे मोल अर्पण केले.—इब्री लोकांस ९:११-१४, २४, २८; १०:११-१४; १ पेत्र ३:१८.

१८. रक्‍तासंबंधी बायबलमधील विधाने ख्रिश्‍चनांकरता महत्त्वाची का आहेत?

१८ हे ईश्‍वरी सत्य, आपल्याला बायबलमध्ये रक्‍तासंबंधी दिलेल्या सर्व अद्‌भुत पैलूंचे आकलन करण्यास मदत करते. अर्थात, देवाचा त्याविषयी विशिष्ट दृष्टिकोन असण्याचे कारण, त्याविषयी आपला कसा दृष्टिकोन असावा आणि रक्‍ताच्या उपयोगासंबंधी देवाने लावून दिलेल्या निर्बंधांचा आपण आदर का केला पाहिजे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पुस्तके वाचताना तुम्हाला अनेक संदर्भांत ख्रिस्ताचे रक्‍त असा उल्लेख आढळेल. (चौकट पाहावी.) यावरून स्पष्ट होते की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने ‘येशूच्या रक्‍तावर’ विश्‍वास ठेवला पाहिजे. (रोमकर ३:२५) केवळ “त्याच्या [येशूच्या] रक्‍ताच्या द्वारे” पापांची क्षमा व देवाबरोबर समेट होणे शक्य आहे. (तिरपे वळण आमचे.) (कलस्सैकर १:२०) खासकरून हे त्यांना लागू होते, ज्यांच्यासोबत येशूने स्वर्गात त्याच्यासह राज्य करण्याकरता एक विशेष करार केला आहे. (लूक २२:२०, २८-३०; १ करिंथकर ११:२५; इब्री लोकांस १३:२०) तसेच हे ‘मोठ्या लोकसमुदायालाही’ लागू होते जे येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ बचावतील व परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटतील. सांकेतिक अर्थाने ते ‘आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुतात.’—प्रकटीकरण ७:९, १४.

१९, २०. (अ) देवाने रक्‍ताच्या उपयोगावर निर्बंध लावण्याचे का ठरवले आणि याविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा? (ब) आपण काय जाणून घेण्यास उत्सुक असले पाहिजे?

१९ स्पष्टपणे देवाच्या लेखी रक्‍त अतिशय अर्थपूर्ण आहे. आपल्याकरताही ते तितकेच अर्थपूर्ण असावयास हवे. निर्माणकर्त्या देवाला जीवनाबद्दल काळजी असल्यामुळे मानवांनी रक्‍ताचा कसा उपयोग करावा यासंबंधी निर्बंध लावण्याचा त्याला अधिकार आहे. आपल्या जीवनाबद्दलही त्याला काळजी असल्यामुळे त्याने रक्‍ताचा उपयोग केवळ एका अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने करण्याचे ठरवले, आणि केवळ या मार्गाने सार्वकालिक जीवन मिळणे शक्य आहे. अर्थात, येशू ख्रिस्ताच्या मोलवान रक्‍ताच्याद्वारे. यहोवा देवाने त्याचे रक्‍त—येशूचे रक्‍त—आपल्या जीवनाच्या तारणाकरता वापरले आणि अशारितीने आपल्या परम हिताकरता कार्य केले याबद्दल आपण किती कृतज्ञ असायला पाहिजे! आणि येशूने स्वतःचे बलिदान देऊन त्याचे रक्‍त आपल्याकरता सांडले याबद्दल आपण त्याचेही किती उपकार मानले पाहिजेत! खरोखर प्रेषित योहानाने व्यक्‍त केलेल्या भावनांचा अर्थ आपण समजू शकतो: “ज्याने आपल्या रक्‍ताने तुम्हाआम्हाला पातकातून मुक्‍त केले, आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्‍याच्यासाठी याजक असे केले; त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.”—प्रकटीकरण १:५, ६.

२० ही जीवन रक्षक भूमिका घेण्याचे आपल्या परम बुद्धिमान, जीवनदात्या देवाच्या मनात बऱ्‍याच काळापासून होते. तेव्हा आपण स्वतःला विचारू शकतो, ‘यामुळे आपल्या निर्णयांवर व कार्यांवर कसा परिणाम झाला पाहिजे?’ पुढील लेख या प्रश्‍नाचे उत्तर देईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• हाबेल व नोहा यांच्याशी संबंधित असलेल्या घटनांवरून देवाच्या रक्‍तासंबंधी असलेल्या दृष्टिकोनाविषयी आपण काय शिकू शकतो?

• नियमशास्त्रात देवाने रक्‍ताच्या उपयोगासंबंधी कोणता निर्बंध लावला व का?

• प्रायश्‍चित्ताच्या दिवसाने ज्या गोष्टींची पूर्वछाया दाखवली त्यांची येशूने कशाप्रकारे पूर्तता केली?

• येशूचे रक्‍त कशाप्रकारे आपले जीवन वाचवू शकते?

[१८ पानांवरील चौकट]

कोणते रक्‍त जीवन वाचवू शकते?

“तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या पुत्राच्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.”—प्रेषितांची कृत्ये २०:२८, NW.

“तर आता त्याच्या रक्‍ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो.”—रोमकर ५:९.

“तुम्ही . . . आशाहीन व देवविरहित असे जगात होता, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्‍ताच्या योगे जवळचे झाला आहा.”—इफिसकर २:१२, १३.

“त्याच्याठायी सर्व पूर्णता वसावी, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्‍ताच्या द्वारे शांति करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे . . . त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.”—कलस्सैकर १:१९, २०.

“म्हणून बंधुजनहो, . . . परम पवित्रस्थानात येशूच्या रक्‍ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे.”—इब्री लोकांस १०:१९.

“वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, . . . नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्‍ताने तुम्ही मुक्‍त झाला आहा.”—१ पेत्र १:१८, १९.

“जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्‍याचे रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते.”—१ योहान १:७.

“तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस; कारण तू वधिला गेला होतास आणि तू आपल्या रक्‍ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत.”—प्रकटीकरण ५:९.

“आमच्या बंधूंना दोष देणारा . . . खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले.”—प्रकटीकरण १२:१०, ११.

[१६ पानांवरील चित्र]

नियमशास्त्राद्वारे देवाने स्पष्ट केले की रक्‍ताद्वारे पापांची क्षमा होऊ शकते

[१७ पानांवरील चित्र]

येशूच्या रक्‍ताच्या योगे अनेकांच्या जिवाचे तारण शक्य होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा