तुमची आध्यात्मिक गरज तुम्ही कशी भागवू शकता
“गेल्या दशकात, कामाच्या ठिकाणी आध्यात्माची भूमिका या विषयावर पुस्तकांची दुकाने, जीझस सीईओ पासून द टाओ ऑफ लिडरशीप पर्यंतच्या पुस्तकांनी भरली आहेत,” असे यु.एस. न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते. नव्यानेच सुरू झालेली ही वहिवाट केवळ हेच दर्शवते की, अनेक संपन्न राष्ट्रांमध्ये लोक आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी उत्सुक आहेत. या विषयावर, ट्रेनिंग ॲण्ड डेव्हलप्मेंट ही व्यापारविषयक पत्रिका म्हणते: “आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर तंत्रज्ञानाचा प्रभाव पडत असताना, आपण जीवनामध्ये गहिरा अर्थ, उद्देश आणि अधिक व्यक्तिगत समाधान मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत.”
पण समाधानकारक आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला कोठे मिळू शकेल? पूर्वी, जीवनामध्ये “गहिरा अर्थ” आणि “उद्देश” मिळवण्याकरता लोक प्रस्थापित धर्माकडे वळत. आज, अनेकांनी प्रस्थापित धर्म त्यागला आहे. मॅनेजर व एक्झेक्यूटिव्ह अशा उच्च पदांवर असलेल्या ९० जणांचा सर्व्हे घेतल्यावर असे दिसून आले की, “धर्म आणि आध्यात्मिकता यांच्यात लोक अगदी स्पष्ट फरक करतात,” असे ट्रेनिंग ॲण्ड डेव्हलप्मेंट यात म्हटले आहे. सर्व्हेत भाग घेतलेल्यांच्या मते, धर्म म्हणजे “असहिष्णुता पसरवणारा आणि फूट पाडणारा” तर आध्यात्म “विश्वव्यापी आणि सर्वांना सामावून घेणारे” होते.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन आणि युरोपसारख्या धर्मनिरपेक्ष समाजांमधील अनेक तरुणांना देखील धर्म आणि आध्यात्म यांच्यात फरक दिसू लागला आहे. युथ स्टडीज ऑस्ट्रेलिया यातील लेखिका, रूथ वेबर असा दावा करतात: “बहुतेक तरुण लोक देवावर विश्वास करतात किंवा एक महान शक्ती आहे असा विश्वास करतात पण आपली आध्यात्मिकता व्यक्त करण्यात चर्च महत्त्वाचे आहे किंवा मदतदायी आहे असे त्यांना वाटत नाही.”
खरा धर्म आध्यात्मिकतेला बढावा देतो
धर्माविषयी अशी शंकेखोर वृत्ती समजण्याजोगी आहे. बहुतेक धार्मिक संघटना राजकारणात पूर्णपणे गोवलेल्या असतात, नैतिकतेचा आव आणतात आणि असंख्य धार्मिक युद्धांत बळी पडणाऱ्या निष्पाप लोकांच्या रक्ताने माखलेल्या असतात. परंतु, दांभिकपणा आणि फसवेगिरीने कलंकित झालेल्या धार्मिक संघटना झिडकारताना काहींनी बायबललाही झिडकारण्याची चूक केली आहे कारण बायबल अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते असा ते विचार करतात.
वास्तविक पाहता, बायबल दांभिकपणा आणि अधर्माचा धिक्कार करते. येशूने आपल्या काळातील धार्मिक पुढाऱ्यांना म्हटले: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत; तसे तुम्हीहि बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहा.”—मत्तय २३:२७, २८.
शिवाय, बायबल ख्रिश्चनांना राजनैतिक मामल्यांमध्ये तटस्थ राहण्यास उत्तेजन देते. ख्रिश्चनांनी एकमेकांना ठार मारावे असे उत्तेजन देण्याऐवजी त्यांनी एकमेकांसाठी प्राण देण्यास तयार असावे अशी आज्ञा ते देते. (योहान १५:१२, १३; १८:३६; १ योहान ३:१०-१२) बायबलवर आधारित असलेला खरा धर्म “असहिष्णुता पसरवणारा आणि फूट पाडणारा” नाही तर ‘सर्वांना सामावून घेणारा’ आहे. प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
बायबल—आध्यात्मिक आरोग्याचे विश्वसनीय मार्गदर्शक
बायबल आपल्याला सांगते की, मानवांना देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२६, २७) याचा अर्थ, मानव देवासमान दिसतात असे नाही तर देवाच्या व्यक्तिमत्त्वातील गुण प्रदर्शित करण्याची त्यांना क्षमता आहे, त्याचप्रमाणे आध्यात्मिक गोष्टी किंवा आध्यात्मिकता समजण्याची, जाणण्याची शक्ती त्यांच्याजवळ आहे.
असे असल्यामुळे, देवाने देखील आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याचा मार्ग आपल्याला पुरवला आहे त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक हिताची आणि हानीची गोष्ट ओळखण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले आहे असा विचार करणे तर्कशुद्ध आहे. ज्याप्रमाणे देवाने आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करणारी आणि आपल्याला निरोगी ठेवणारी बेजोड प्रतिकारशक्ती दिली आहे त्याचप्रमाणे योग्य निर्णय घेण्यात आणि आपल्या शरीराला व आध्यात्मिकतेला नुकसानदायी ठरणाऱ्या सवयी टाळण्यात मदत करण्यासाठी एक विवेक किंवा आंतरिक आवाज देखील दिला आहे. (रोमकर २:१४, १५) आणि आपल्याला माहीतच आहे की, आपली प्रतिकारशक्ती प्रभावी असण्यासाठी तिला योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे, आपला विवेक प्रभावी असण्यासाठी देखील पोषक आध्यात्मिक अन्न मिळण्याची आवश्यकता आहे.
आपल्या आध्यात्मिक प्रकृतीला पोषक असलेल्या अन्नाविषयी येशू म्हणाला: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४) यहोवाचे शब्द त्याच्या वचनात, अर्थात बायबलमध्ये नमूद केले आहेत आणि ते “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक . . . ह्यांकरता उपयोगी” आहेत. (२ तीमथ्य ३:१६) त्यामुळे, ते आध्यात्मिकरित्या पोषक अन्न घेण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी आपली आहे. बायबलचे आपण जितके अधिक ज्ञान घेऊ आणि त्यातील तत्त्वे आपल्या जीवनात लागू करू तितकाच आपल्या शरीराला आणि आध्यात्मिकतेला फायदा होईल.—यशया ४८:१७, १८.
प्रयत्नांचे चीज होईल का?
हे खरे आहे की, बायबलचा अभ्यास करून आपले आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यास वेळ लागतो; आणि वेळ अधिकाधिक कमी होत चालला आहे. पण मिळणाऱ्या प्रतिफळांमुळे आपल्या प्रयत्नांचे चीज होते! आपल्या पेशात पूर्णपणे व्यस्त असलेल्या काही लोकांना, स्वतःच्या आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे महत्त्वाचे का वाटते याविषयी त्यांची मते ऐका.
मरीना, डॉक्टर आहेत, त्या म्हणतात: “मी माझ्या आध्यात्मिकतेचा फारसा विचार कधी केलाच नाही, पण जेव्हा मी दवाखान्यात जाऊ लागले आणि मला पीडित लोकांची अवस्था पाहून फार वाईट वाटू लागले तेव्हा मला जाणीव झाली की, मला समाधान आणि शांत मन हवे असेल तर माझी आध्यात्मिक गरज तृप्त करणे आवश्यक आहे हे मला मान्य करावेच लागेल. कारण माझ्यासारखा पेशा असलेली कोणीही व्यक्ती, धकाधकीच्या जीवनाच्या आणि पीडित लोकांची काळजी घेण्याच्या भाराखाली दबून जाऊ शकते.
“मी सध्या यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत आहे. हा अभ्यास, मला माझ्या कृतींचे व हेतूंचे उभारणीकारक ठरेल अशा पद्धतीने परीक्षण करण्यास मदत करते आणि माझे विचार सकारात्मक ठेवण्यास शिकवते ज्यामुळे मला जीवनात समतोल राखता येतो. मला माझ्या ऐहिक कामात खूप समाधान मिळते यात शंका नाही. पण माझी भावनिक स्थिती बायबलच्या अभ्यासामुळे सुधारली आहे; मला आता नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येते, तणाव कमी करता येतो आणि लोकांसोबत अधिक सहनशीलतेने आणि कनवाळुपणाने वागता येते. बायबल तत्त्वांचे पालन केल्याने मला माझ्या वैवाहिक जीवनातही फायदा झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी यहोवाला जाणू शकले आहे आणि लहान प्रमाणात मला त्याच्या आत्म्याचे कार्य माझ्यावर होत असल्याचा अनुभव झाला आहे ज्यामुळे माझे जीवन आणखी अर्थपूर्ण बनले आहे.”
निकलस, वास्तुशिल्पकार आहेत, ते म्हणतात: “यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्याआधी मला आध्यात्मिक गोष्टींबद्दल काहीच रुची नव्हती. माझ्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवणे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. माझ्या बायबल अभ्यासाने मला शिकवले आहे की, जीवनात आणखी पुष्कळसे आहे आणि यहोवाची इच्छा केल्याने खरा व दीर्घकाळ टिकणारा आनंद मिळतो.
“माझ्या कामामुळे मला समाधान निश्चितच मिळते पण बायबलने मला माझे जीवन साधे ठेवून आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचे महत्त्व शिकवले आहे. असे केल्याने, मला व माझ्या पत्नीला भौतिक जीवनशैलीने निर्माण होणारे ताणतणाव टाळता आले आहेत. जीवनामध्ये आमच्यासारखाच आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अनेकांसोबत सहवास ठेवल्याने आम्ही खरी मैत्री देखील केली आहे.”
विन्सेंट, एक वकील आहेत, ते म्हणतात: “चांगले ऐहिक काम असले की, बरेच समाधान मिळते. परंतु, मला हे कळाले आहे की, एवढ्यानेच आनंद आणि समाधान लाभत नाही. याविषयी बायबल काय शिकवते हे जाणण्याआधी, मला आठवते की मला एकदा अचानक अशी जाणीव झाली की, जीवन किती निरर्थक आहे—जन्माला येणे, मोठे होणे, लग्न करणे, मुलांचे पालनपोषण करण्यासाठी कामावर जाणे, मग त्यांनाही हेच जीवनचक्र अनुसरण्याचे प्रशिक्षण देणे आणि शेवटी म्हातारे होणे व मरणे.
“मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केल्यावरच जीवनाच्या उद्देशाविषयी माझ्या मनात असलेल्या प्रश्नांना मला समाधानकारक उत्तरे मिळाली. माझ्या बायबल अभ्यासामुळे मला यहोवाची एक व्यक्ती म्हणून ओळख पटली आणि त्याच्याविषयी माझ्या मनात गहिरे प्रेम निर्माण झाले. यामुळे, त्याच्या उद्देशानुरूप जगण्याचा मी प्रयत्न करत असताना चांगला आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगण्यास मला आधार मिळाला आहे. आता, माझ्या पत्नीला आणि मलाही याचे समाधान वाटते की, आमचे जीवन खरोखरच अर्थपूर्ण आहे.”
तुम्ही देखील बायबलचा अभ्यास करून जीवनाचा उद्देश व अर्थ जाणू शकता. यहोवाचे साक्षीदार अगदी आनंदाने तुमची याबाबतीत मदत करतील. मरीना, निकलस आणि विन्सेंट यांच्याप्रमाणे तुम्हाला देखील यहोवाविषयी आणि मानवजातीकरता व तुमच्याकरता त्याच्या उद्देशांविषयी जाणून समाधान मिळू शकेल. अशाने तुम्ही सध्या आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करू शकाल पण त्यासोबतच परिपूर्ण शारीरिक आरोग्याचे अंतहीन जीवन प्राप्त करण्याची आशा देखील तुम्हाला लाभेल—ही आशा केवळ जे ‘आध्यात्मिक गरजेची जाणीव राखतात’ त्यांच्याकरताच आहे.—मत्तय ५:३.
आपली आध्यात्मिकता वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे प्रार्थना. येशूने वेळात वेळ काढून आपल्या शिष्यांना, जिला सामान्यतः प्रभूची प्रार्थना म्हणतात ती देऊन, प्रार्थना करायला शिकवले. या प्रार्थनेचा तुमच्याकरता आज काय अर्थ होतो? त्यापासून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? पुढील दोन लेखांत तुम्हाला याची उत्तरे मिळतील.
[६ पानांवरील चित्रे]
मरीना
[७ पानांवरील चित्रे]
निकलस
[७ पानांवरील चित्रे]
विन्सेंट