वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 ११/१५ पृ. २८-३१
  • विश्‍वासाद्वारे, बाराकने शक्‍तिशाली सैन्य पराजित केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासाद्वारे, बाराकने शक्‍तिशाली सैन्य पराजित केले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इस्राएल यहोवाचा धावा करते
  • यहोवा नेता नियुक्‍त करतो
  • विश्‍वासाने ते बाराकबरोबर जातात
  • जुलूम करणारा “स्त्रीच्या हाती” सापडतो
  • आपण कोणता धडा शिकतो?
  • एक नवीन मार्गदर्शक आणि दोन धाडसी स्त्रिया
    बायबलमधून शिकू या!
  • “मी तुमच्यासोबत नक्की येईन”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • दोन शूर स्त्रिया
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 ११/१५ पृ. २८-३१

विश्‍वासाद्वारे, बाराकने शक्‍तिशाली सैन्य पराजित केले

कल्पना करा! शत्रू सैन्य आणि तुम्ही आमने-सामने आहात. त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्रास्त्रे आहेत आणि ते त्यांचा वापर करण्याच्या तयारीतच आहेत. त्यांच्यापुढे, तुम्ही आणि तुमचे सोबती खरे तर निःशस्त्र आहात.

इस्राएलच्या शास्त्यांच्या काळांत, बाराक, दबोरा आणि १०,००० सहइस्राएलीयांना काहीसा असाच अनुभव आला. शत्रू सैन्य कनानी होते आणि त्यांचा लष्करी अधिकारी सीसरा होता. त्यांच्या शस्रास्त्रात रथांचा समावेश होता ज्यांच्या चाकांना धारदार लोखंडी आऱ्‍या होत्या. स्थळ होते, ताबोर डोंगर आणि कीशोन नदीचे खोरे. तेथे जे घडले त्यावरून बाराक हा असामान्य विश्‍वास असलेला मनुष्य होता हे सिद्ध झाले. ही लढाई होईपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या त्यांचा आपण जरा विचार करू या.

इस्राएल यहोवाचा धावा करते

बायबलमधल्या शास्ते नावाच्या पुस्तकात, इस्राएलने शुद्ध उपासना करण्याचे वारंवार सोडून दिल्यामुळे त्यांना भोगाव्या लागलेल्या विनाशकारक परिणामांचा अहवाल दिला आहे. प्रत्येक वेळा, जेव्हा जेव्हा इस्राएलांनी देवाच्या दयेची भीक मागितली तेव्हा तेव्हा देवाने एका तारणकर्त्याला नियुक्‍त करून त्यांना सोडवले—पण पुनःपुन्हा इस्राएलांनी देवाविरुद्ध बंड केले. अशाप्रकारे “एहूद [मवाबी जुलूमापासून सुटका करणारा एक शास्ता] मृत्यु पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले.” एवढेच नव्हे तर त्यांनी “नवे नवे देव निवडले.” याचा परिणाम काय झाला? “परमेश्‍वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापति सीसरा [होता] . . . त्याच्यापाशी नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्‍वराचा धावा केला.”—शास्ते ४:१-३; ५:८.

इस्राएलमधील जीवनाविषयी शास्त्रवचने म्हणतात, की त्या “काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत. . . . इस्राएलात कोणी नेते उरले नव्हते.” (शास्ते ५:६, ७) रथांतून येणाऱ्‍या लुटारूंची लोकांना भीती वाटत असे. एक विद्वान म्हणतात: “इस्राएलमधील लोकांवर भीतीचे सावट पसरले होते. अख्खा समाज गर्भगळीत व असाहाय झाला होता.” त्यामुळे, या नाउमेद इस्राएली लोकांनी पूर्वीप्रमाणेच यहोवाकडे मदतीसाठी याचना केली.

यहोवा नेता नियुक्‍त करतो

कनान्यांचा जुलूम संपूर्ण इस्राएली राष्ट्राकरता एक पीडा होता. देवाने संदेष्ट्री दबोरा हिच्याद्वारे आपले न्यायदंड आणि आपल्या सूचना व्यक्‍त केल्या. अशाप्रकारे यहोवाने तिला इस्राएलमध्ये एक लाक्षणिक माता होण्याचा सुहक्क दिला.—शास्ते ४:४; ५:७.

दबोराने बाराकला बोलावून आणले आणि त्याला म्हटले: “तू नफताली व जबुलून ह्‍यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलचा देव परमेश्‍वर ह्‍याने तुला केली आहे ना? तो म्हणतो, ‘याबीनाचा सेनापति सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.’” (शास्ते ४:६, ७) ‘यहोवाने अशी आज्ञा केली आहे’ असे म्हणण्याद्वारे दबोराने हे स्पष्ट केले की ती बाराकवर कसलाही अधिकार गाजवत नव्हती. तिने केवळ देवाची आज्ञा जाहीर करण्याचे एक माध्यम म्हणून कार्य केले. बाराकची प्रतिक्रिया काय होती?

बाराक तिला म्हणाला: “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.” (शास्ते ४:८) देवाकडून आलेली ही जबाबदारी घेण्यास बाराक कुचराई का करत होता? तो भितरटाप्रमाणे कार्य करत होता का? देवाच्या अभिवचनांवर त्याचा विश्‍वास नव्हता का? नाही. बाराकने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी झटकली नाही किंवा त्याने यहोवाची आज्ञा मोडली नाही. तर देवाची आज्ञा स्वतःहून पूर्ण करण्यास आपण अपुरे आहोत ही भावना त्याच्या प्रतिक्रियेवरून सूचित होते. देवाचा प्रतिनिधी सोबत असला तर देवाचे मार्गदर्शन आपल्याला खात्रीने मिळेल आणि त्याच्याठायी व त्याच्याबरोबरच्या लोकांमध्ये भरवसा निर्माण होईल हे त्याला माहीत होते. यास्तव, बाराकची ही मनोवृत्ती कमजोरीचे नव्हे तर भक्कम विश्‍वासाचे चिन्ह होती.

बाराकच्या प्रतिक्रियेची तुलना, मोशे, गिदोन आणि यिर्मया यांनी दाखवलेल्या प्रतिक्रियेशी करता येईल. देवाने दिलेली नियुक्‍ती आपण पार पाडू शकतो असा आत्मविश्‍वास या लोकांमध्येही नव्हता. पण म्हणून त्यांना कमी विश्‍वासू लेखण्यात आले नाही. (निर्गम ३:११–४:१७; ३३:१२-१७; शास्ते ६:११-२२, ३६-४०; यिर्मया १:४-१०) आणि दबोराच्या मनोवृत्तीविषयी काय म्हणता येईल? तिने सर्व गोष्टींवर स्वतःचाच अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. तर ती यहोवाची नम्र सेविका राहिली. तिने बाराकला म्हटले: “मी तुझ्याबरोबर अवश्‍य येईन.” (शास्ते ४:९) सर्वात सुरक्षित ठिकाण असलेले आपले घर सोडून अगदी तोंडावर आलेल्या युद्धात बाराकबरोबर जाण्यास ती तयार झाली. दबोरानेसुद्धा विश्‍वास आणि धैर्याचे अतिउत्तम उदाहरण मांडले आहे.

विश्‍वासाने ते बाराकबरोबर जातात

इस्राएली सैन्याला ताबोर डोंगरावर भेटायचे होते. हे ठिकाण अतिशय उत्तम होते. जवळपास राहणाऱ्‍या नफताली व जबुलून कुळातल्या लोकांसाठी हे भेटण्याचे नैसर्गिक ठिकाण होते. यास्तव, देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे दहा हजार स्वयंसेवक आणि दबोरा बाराकबरोबर या डोंगरावर गेले.

बाराकबरोबर गेलेल्या सर्वांना विश्‍वास दाखवण्याची गरज होती. यहोवाने तर बाराकला कनान्यांवर विजय मिळेल असे वचन दिले होते, पण या इस्राएलीयांजवळ कोणती शस्त्रास्रे होती? शास्ते ५:८ मध्ये म्हटले आहे: “इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला” नाही. म्हणजे, इस्राएली लोकांजवळ फार कमी शस्त्रे होती. लोखंडी आऱ्‍यांची चाके असलेल्या रथांच्या सैन्यापुढे ढाली आणि भालेसुद्धा कमीच वाटली असती. बाराक ताबोर डोंगर चढून आला आहे हे सीसरा याला कळल्याबरोबर त्याने आपल्या एकंदर लोखंडी रथांना व सैन्यदलाला कीशोन नदीवर येण्याचा हुकूम दिला. (शास्ते ४:१२, १३) पण सीसरा हे विसरून गेला होता, की तो सर्वसमर्थ देवाविरुद्ध लढायला चालला होता.

बाराक सीसराच्या सैन्याची दाणादाण करतो

शत्रूच्या समोर आल्यावर दबोरा बाराकला म्हणते: “ऊठ, आजच परमेश्‍वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्‍वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” बाराकला आणि त्याच्या सैन्याला ताबोर डोंगराच्या उतारावरून खोऱ्‍याच्या पठारात उतरायचे होते; अशा वेळी सीसराच्या रथांना आपल्या शत्रूंचा नाश करण्याची चांगली संधी मिळणार होती. तुम्ही जर बाराकच्या सैन्यदलात असता तर तुम्हाला कसे वाटले असते? यहोवाकडून सूचना मिळाली आहे ही गोष्ट आठवणीत ठेवून तुम्ही मिळालेली आज्ञा पाळली असती का? बाराक आणि त्याच्या दहा हजार वीरांनी आज्ञेचे पालन केले. आणि “परमेश्‍वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्‍यांचा बाराकासमोर तरवारीने धुव्वा उडविला.”—शास्ते ४:१४, १५.

यहोवा पाठीशी असल्यामुळे बाराकने सीसराच्या सैन्याचा पराभव केला. युद्धाविषयीच्या अहवालात जे घडले त्याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले नाही. पण, बाराक आणि दबोराने गायिलेल्या विजय गीतात असे म्हटले होते, की ‘आकाशाने व मेघांनी जलबिंदू गाळले.’ कदाचित, तेथे जोराचा पाऊस झाला असेल ज्यामुळे सीसराची रथे चिखलात रूतून बसली व याचा बाराकने फायदा घेतला. अशाप्रकारे कनान्यांचे मुख्य आक्रमक शस्त्रच अर्थात त्यांची रथेच निकामी ठरली. सीसराच्या सैनिकांच्या शवांविषयी गीतात असे म्हटले होते, की “कीशोन नदीने त्यांना वाहून नेले.”—शास्ते ५:४, २१.

पण हे विश्‍वसनीय आहे का? कीशोन नदीचे खोरे म्हणजे एक लहानसे ओहळ होते जेथून खूप कमी पाणी वाहत होते. पण वादळ आणि खूप वेळ मुसळधार पाऊस पडत राहिला तर असे ओहळ वाढून पाण्याचे जलद व भयानक लोट बनण्याची शक्यता असते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी याच भागातील कडक मातीवर केवळ १५ मिनिटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोणत्याही लष्करी कारवाया करणे मुश्‍किल झाले होते. एप्रिल १६, १७९९ रोजी ताबोर डोंगरावर नेपोलियन आणि तुर्क लोकांमधील युद्धाच्या अहवालात असे म्हटले होते, की “पठाराच्या एका भागावरून फुगलेली कीशोन नदी पार करण्याचा प्रयत्न करताना पुष्कळ तुर्की लोक बुडून मरण पावले.”

यहुदी इतिहासकार फ्लेवियस जोसिफस असा दावा करतो, की सीसरा आणि बाराकच्या सैन्यांची अमोरासमोर भेट होणार इतक्यात “आकाशातून मुसळधार पाऊस आणि गारांच्या वर्षावासहित एक मोठे वादळ आले, कनान्यांच्या दिशेने वारा आणि पाऊस पडत होता ज्यामुळे त्यांना समोरचे काहीच दिसेनासे झाले, त्यांच्या बाणांचा आणि त्यांच्या गोफांचा काहीच उपयोग झाला नाही.”

शास्ते ५:२० मध्ये म्हटले आहे, की “आकाशांतून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.” तारे सीसराशी कसे लढले? या वाक्यावरून देवाकडून साहाय्य मिळाल्याचे सूचित होते, असे काहींचे म्हणणे आहे. इतर काहींचे म्हणणे आहे, की हे देवदूतांकडून मिळालेल्या साहाय्याला, उल्कापाताला किंवा सीसरा ज्यांच्यावर अवलंबून होता त्या खोट्या ठरलेल्या फलज्योतिष भविष्यांना सूचित करते. तारे हे युद्ध कसे लढले याविषयी बायबलमध्ये कसलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्यामुळे, इस्राएलच्या सैन्याला देवाकडून कोणत्यातरी प्रकारे साहाय्य मिळाले असे आपण त्या वरील वाक्याचा अर्थ समजू शकतो. इस्राएलांनी मात्र परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला हे खरे आहे. “बाराकाने . . . रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तरवारीने पडली; त्यातला एकहि वाचला नाही.” (शास्ते ४:१६) लष्करी अधिकारी सीसराचे काय झाले?

जुलूम करणारा “स्त्रीच्या हाती” सापडतो

बायबल म्हणते: “सीसरा मात्र [युद्ध सोडून] केनी हेबेर ह्‍याची बायको याएल हिच्या डेऱ्‍याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्‍यांचे सख्य होते.” याएलने थकून आलेल्या सीसराला डेऱ्‍यात बोलवले, त्याला दूध प्यायला दिले आणि त्याने झोपून जावे म्हणून त्याच्या अंगावर कांबळी टाकली. याएलने मग, डेऱ्‍यात राहणारे लोक सहसा वापरत असलेली “डेऱ्‍याची मेख आणि हातोडा हाती” घेतला. “आणि पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती; अशा प्रकारे तो मेला.”—शास्ते ४:१७-२१.

सीसराचा पाठलाग करीत आलेल्या बाराकला नंतर याएल भेटायला बाहेर आली आणि त्याला म्हणाली: “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” अहवालात पुढे म्हटले आहे: “तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.” बाराकसाठी किती हा विश्‍वास मजबूत करणारा अनुभव ठरला असावा! पूर्वी संदेष्ट्री दबोराने त्याला सांगितले होते: “ह्‍या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्‍वर सीसरा ह्‍याला एका स्रीच्या हाती देणार आहे.”—शास्ते ४:९, २२.

पण याएलने जे केले त्याला विश्‍वासघात म्हणता येईल का? यहोवाच्या नजरेत तो विश्‍वासघात नव्हता. बाराक आणि दबोराच्या विजय गीतात म्हटले आहे, की “डेऱ्‍यांत राहणाऱ्‍या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!” या गीताद्वारे आपल्याला सीसराच्या मृत्यूविषयीचा उचित दृष्टिकोन बाळगण्यास मदत होते. या गीतात असे दर्शवण्यात आले आहे, की सीसराची आई युद्धातून त्याच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ती विचारते: “त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला?” तिच्या मनात होणारी घालमेल पाहून ‘तिच्या चतुर सख्या’ तिला शांत करण्याचा प्रयत्न करून म्हणतात की, सीसरा कदाचित युद्धात मिळालेल्या लुटीची—भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे आणि वीरांसाठी कुमारिका—यांची वाटणी करत असल्यामुळे त्याला उशीर होत आहे. या सख्या विचारतात: “त्यांना लूट मिळाली की नाही? त्यांनी लूट वाटून घेतली की नाही? शूरांतल्या प्रत्येकाला एक मुलगी दोन मुली मिळाल्या की नाहीत? सीसराला रंगीत वस्रांची लूट, . . . दोहींकडून काढलेल्या कशिद्याच्या रंगीत वस्रांची लूट मिळाली; ती लुटणाऱ्‍यांची आपल्या मानांवर घातली आहे की नाही?”—शास्ते ५:२४, २८-३०, पं.र.भा.

आपण कोणता धडा शिकतो?

बाराकचा अहवाल आपल्याला महत्त्वपूर्ण धडे शिकवतो. जे लोक यहोवाला आपल्या जीवनातून वेगळे करतात त्यांना समस्यांचा व निराशेचा हमखास सामना करावा लागतो. परंतु जे पश्‍चात्तापबुद्धीने यहोवाकडे पुन्हा वळतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांची विविध प्रकारच्या जुलूमांपासून सुटका होते. तेव्हा आपण आज्ञाधारकतेचा आत्मा विकसित करू नये का? देवाच्या अपेक्षा मानवी तर्काच्या विरुद्ध जातात तेव्हाही आपण ही खात्री बाळगू शकतो, की देवाच्या सूचना या नेहमी आपल्याच भल्यासाठी आहेत. (यशया ४८:१७, १८) यहोवावर विश्‍वास ठेवल्यामुळे आणि त्याच्याकडून येणाऱ्‍या सूचनांचे पालन केल्यामुळेच बाराकने “परक्यांची सैन्ये पळविली.”—इब्री ११:३२-३४.

दबोरा आणि बाराकच्या गीताचा हृदयस्पर्शी शेवट असा आहे: “हे परमेश्‍वरा, तुझे सर्व शत्रु असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्‍या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:३१) यहोवा जेव्हा सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करेल तेव्हा हे शब्द किती खरे ठरतील!

[२९ पानांवरील चित्र]

यहोवाने बाराकला हुकूम देण्यासाठी दबोराचा उपयोग केला

[३१ पानांवरील चित्र]

कीशोन नदी दुथडी भरून वाहते

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[३१ पानांवरील चित्र]

ताबोर डोंगर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा