त्यांनी आवडीने दया दाखवली
मिल्टन जी. हेन्शल, या यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे अनेक काळापासून सदस्य असलेल्या बांधवाची शनिवार, मार्च २२, २००३ रोजी पृथ्वीवरील सेवा समाप्त झाली. ते ८२ वर्षांचे होते.
तरुण असतानाच, मिल्टन हेन्शल यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात आपल्या सेवेचा आरंभ करून तेथे ६० पेक्षा अधिक वर्षे विश्वासूपणे सेवा केली. त्यांची निर्णयक्षमता आणि राज्य प्रचाराच्या कार्यासाठी मनापासूनची आस्था या गुणांबद्दल लोक लगेच त्यांना ओळखू लागले. १९३९ साली ते, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या छापखान्याचे पर्यवेक्षक असलेले एन. एच. नॉर यांचे सचिव बनले. १९४२ साली बंधू नॉर संपूर्ण जगभरातील साक्षीदारांमध्ये पुढाकार घेऊ लागले तेव्हा त्यांनी बंधू हेन्शल यांना आपला सहायक म्हणून नेमले. बंधू हेन्शल यांनी १९५६ साली लुसेल बेनेट हिच्याशी विवाह केला आणि दोघांनीही जीवनातील उतार-चढाव एकत्र अनुभवले.
बंधू हेन्शल यांनी १९७७ साली बंधू नॉर यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्या निकट सहवासात राहून काम केले. बंधू नॉर यांच्याबरोबरच सहसा बंधू हेन्शल यांनी १५० पेक्षा अधिक राष्ट्रांची सफर केली; संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना खासकरून मिशनऱ्यांना व शाखा दफ्तरांतील बंधूभगिनींना उत्तेजन दिले. या सफरी शिणवणाऱ्या तर कधीकधी धोकेदायक असायच्या. १९६३ साली, लायबेरियातील एका अधिवेशनाला भेट द्यायला गेल्यावर, बंधू हेन्शल यांचा, एका राष्ट्रीय सोहळ्यात भाग न घेतल्याबद्दल क्रूर छळ करण्यात आला.a तरीसुद्धा बंधू हेन्शल घाबरले नाहीत; लायबेरियातील यहोवाच्या साक्षीदारांना उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून काही महिन्यांनंतर ते पुन्हा लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेले.
सर्वांना माहीत होते, की कठीण समस्या आणि आव्हाने हाताळताना, बंधू हेन्शल व्यवहारी, लवचीक आणि समजंस असायचे. त्यांच्या सहकर्मींना, त्यांचा सुव्यवस्थितपणा, त्यांचा सभ्यपणा आणि त्यांची विनोदबुद्धी जास्त आवडायची. स्मरणशक्तीचे विशेष दान असल्यामुळे, जगातील अनेक मिशनऱ्यांना त्यांना भेटल्यावर खूप आश्चर्य वाटायचे कारण त्यांना त्यांची नावे पटकन आठवायची आणि स्थानीय भाषेतील एखाद-दोन वाक्य ते लगेच बोलून दाखवायचे; मग डोळे मिचकावत काहीतरी मजेशीर बोलायचे.
आपण ‘आवडीने दया करावी’ अशी यहोवाची इच्छा आहे याची आठवण आपल्याला मीखा ६:८ मध्ये करून देण्यात आली आहे. याबाबतीत बंधू मिल्टन हेन्शल यांनी मांडलेले उत्तम उदाहरण आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्यावर कामाचा इतका बोजा असतानासुद्धा त्यांचा स्वभावच असा होता, की कोणीही सहज त्यांना भेटायला जाऊ शकत होते; ते सौम्य व दयाळू होते. ते नेहमी असे म्हणायचे: “एखादी परिस्थिती कशी हाताळायची याबाबतीत शंका असताना, एक गोष्ट लक्षात ठेवा, की दयाळू कार्य सर्वात उत्तम कार्य आहे.” अशा प्रिय बांधवाचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, याची आपल्याला खंत वाटते, परंतु, “जीवनाचा मुगूट” प्राप्त करण्याच्या आशेसह ते शेवटपर्यंत विश्वासू राहिले याचा आपल्याला आनंद वाटतो.—प्रकटीकरण २:१०.
[तळटीप]
a १९७७ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक, पृष्ठे १७१-७ (इंग्रजी) पाहा.
[३१ पानांवरील चित्र]
एन. एच. नॉर यांच्यासमवेत एम. जी. हेन्शल
[३१ पानांवरील चित्र]
पत्नी लुसेल हिच्याबरोबर