मृतांबद्दलचा देवाचा दृष्टिकोन
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू खरोखरच अतिशय दुःखदायक असतो. त्यामुळे, आपल्याला जाणवणारा रिक्तपणा, एकटेपणा आणि प्रिय व्यक्तीला गमावल्याची भावना तीव्र असते. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे पैशावाल्या, सत्ताधारी, प्रभावशाली व्यक्तीला देखील असहाय वाटू लागते; आज पृथ्वीवर असा कोणीही नाही जो मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करू शकेल.
परंतु आपल्या सृष्टिकर्त्याचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे. पहिल्या मनुष्याला त्याने मातीपासून बनवल्यामुळे, मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य देखील त्याच्याजवळ आहे. म्हणूनच, मृत व्यक्ती जणू जिवंतच आहे, असा दृष्टिकोन देव बाळगतो. मरण पावलेल्या प्राचीन काळच्या विश्वासू सेवकांबद्दल येशूने म्हटले: “[देवाला] सर्वच जिवंत आहेत.”—लूक २०:३८.
पृथ्वीवर असताना, येशूला मृतांचे पुनरुत्थान करण्याचे सामर्थ्य दिले होते. (योहान ५:२१) त्यामुळे, मृत्यूपर्यंत विश्वासू राहिलेल्यांबद्दल त्याचाही आपल्या पित्यासारखाच दृष्टिकोन आहे. उदाहरणार्थ, येशूचा मित्र लाजर मरण पावला तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” (योहान ११:११) मानवी दृष्टिकोनातून, लाजर मरण पावला होता; पण यहोवा आणि येशूच्या दृष्टिकोनातून लाजर झोपलेल्या अवस्थेत होता.
येशूच्या राज्य शासनादरम्यान “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) कालांतराने, पुनरुत्थित लोकांना देवाकडून प्रशिक्षण मिळेल आणि त्यानंतर पृथ्वीवरील परादीसात सार्वकालिक जीवनाची आशा त्यांना असेल.—योहान ५:२८, २९.
होय, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला पुष्कळ वर्षांपर्यंत अतीव दुःख आणि पीडा होते. पण, मृतांविषयी देवाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला पुष्कळ सांत्वन व आशा मिळू शकते.—२ करिंथकर १:३, ४.