वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 ८/१५ पृ. ९-१३
  • यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ओझरती नजर
  • सार्वभौम प्रभू यहोवा बोलतो
  • दुष्ट चालीरितींची भरभराट
  • आपल्या काळातील उल्लेखनीय समांतर
  • आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—मीखा
    आमची राज्य सेवा—२०१४
  • यहोवाचा न्याय व त्याचे नाव उंचावले जाते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 ८/१५ पृ. ९-१३

यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे

“जसे परमेश्‍वरापासून दहिवर येते, [ते] . . . मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.”—मीखा ५:७.

१. आत्मिक इस्राएल आत्मिक चैतन्याचा स्रोत कशाप्रकारे आहे?

यहोवा पर्जन्याचा व दहिवराचा महान कर्ता आहे. मनुष्य हे पुरवू शकतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. संदेष्टा मीखा याने लिहिले: “जसे परमेश्‍वरापासून दहिवर येते, व पर्जन्य गवतावर वर्षतो आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही, किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.” (मीखा ५:७) सध्याच्या काळात “याकोबाचे अवशिष्ट लोक” कोण आहेत? ते आत्मिक इस्राएली आहेत अर्थात ‘देवाच्या इस्राएलांतील’ शेषजन. (गलतीकर ६:१६) पृथ्वीवरील “बहुत लोकांत” ते ‘परमेश्‍वरापासून येणाऱ्‍या दहिवराप्रमाणे’ व ‘गवतावर वर्षणाऱ्‍या पर्जन्याप्रमाणे’ आहेत. होय, अभिषिक्‍त ख्रिस्ती आज लोकांकरता देवाकडील आशीर्वादाप्रमाणे आहेत. राज्याचे प्रचारक या नात्याने लोकांना खऱ्‍या आशेचा संदेश देण्याकरता यहोवा त्यांचा उपयोग करत आहे.

२. या संकटमय जगात राहत असतानाही आपल्याजवळ एक वास्तविक आशा का आहे?

२ या जगात खरी आशा नाही यात आश्‍चर्य काहीच नाही. दियाबल सैतानाच्या प्रभुत्वाखालील जगात, राजकीय अस्थिरता, नैतिक ऱ्‍हास, अपराध, आर्थिक संकटे, दहशतवाद, युद्धे यांसारख्या गोष्टी तर अपेक्षितच आहेत. (१ योहान ५:१९) भविष्यात काय होईल याची अनेकांना चिंता लागून आहे. पण यहोवाचे उपासक या नात्याने आपल्याला भीती नाही कारण भविष्याकरता आपल्याजवळ एक निश्‍चित आशा आहे. ही एक वास्तविक आशा आहे कारण ती देवाच्या वचनावर आधारित आहे. यहोवा व त्याचे वचन यावर आपला विश्‍वास आहे कारण तो जे सांगतो ते नेहमी खरे ठरते.

३. (अ) यहोवा इस्राएल व यहुदा यांच्याविरुद्ध कारवाई का करणार होता? (ब) मीखाचे शब्द आपल्या काळाला का लागू होतात?

३ देवाने प्रेरित केलेली मीखाची भविष्यवाणी आपल्याला यहोवाच्या नावाने चालण्याचे उत्तेजन आणि एक वास्तविक आशा बाळगण्याचा आधार देते. मीखा भविष्यवक्‍त्‌याचे काम करत होता तेव्हा, अर्थात, सा.यु.पू. आठव्या शतकात देवाचे करारबद्ध लोक, इस्राएल व यहुदा अशा दोन राष्ट्रांत विभाजित होते आणि ही दोन्ही राष्ट्रे देवाच्या कराराकडे दुर्लक्ष करत होती. परिणामस्वरूप, नैतिक ऱ्‍हास, धर्मत्याग आणि बेसुमार भौतिकवाद पसरला. त्यामुळे यहोवाने ताकीद दिली की तो त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल. अर्थात देवाच्या या इशारेवजा सूचना मीखाच्या काळात राहणाऱ्‍या लोकांना उद्देशून होत्या. पण सध्याच्या काळातील परिस्थिती मीखाच्या काळाशी इतकी मिळतीजुळती आहे की त्याचे शब्द आज देखील लागू होतात. मीखाच्या पुस्तकातील सात अध्यायांतील काही ठळक मुद्दे विचारात घेतल्यास ही गोष्ट स्पष्ट होईल.

ओझरती नजर

४. मीखा अध्याय १ ते ३ यांत कोणती माहिती पुरवण्यात आली आहे?

४ मीखाच्या पुस्तकातील माहितीवर एक ओझरती नजर टाकू या. पहिल्या अध्यायात यहोवा, इस्राएल व यहुदाच्या बंडखोरीचे बिंग उघडकीस आणतो. त्यांच्या विद्रोहामुळे इस्राएलचा नाश होईल आणि यहुदाचा दंड जेरूसलेमच्या वेशीपर्यंत पोचेल. दुसऱ्‍या अध्यायात सांगितले आहे की श्रीमंत व सत्ताधारी लोक, दुर्बल व असहाय लोकांवर अत्याचार करत आहेत. पण या अध्यायात देवाची एक प्रतिज्ञा देखील आहे. देवाच्या लोकांना एकत्रित केले जाईल. तिसऱ्‍या अध्यायात राष्ट्राचे नेते व विद्रोही संदेष्टे यांच्याविरुद्ध यहोवाचे न्यायसंदेश आढळतात. नेते अन्याय करत आहेत आणि संदेष्टे खोट्या भविष्यवाण्या करत आहेत. हे सारे घडत असूनही मीखाला यहोवाच्या येणाऱ्‍या न्यायाचा संदेश घोषित करण्याकरता पवित्र आत्म्याद्वारे समर्थ केले जाते.

५. मीखा अध्याय ४ व ५ यांचा सारांश काय आहे?

५ चवथा अध्याय असे भाकीत करतो की अंतसमयात सर्व राष्ट्रे यहोवाकडून शिक्षण घेण्याकरता त्याच्या अत्युच्च पर्वतावर येतील. त्याआधी, यहुदाच्या रहिवाशांना बॅबिलोन येथे बंदिवान करून नेण्यात येईल, पण यहोवा त्यांना सोडवेल. पाचव्या अध्यायात आपण वाचतो की यहुदाच्या बेथलेहेम शहरात मशीहाचा जन्म होईल. तो आपल्या लोकांची देखभाल करेल व त्यांना अत्याचारी राष्ट्रांपासून सोडवेल.

६, ७. मीखाच्या भविष्यवाणीच्या ६ व ७ अध्यायांत कोणते मुद्दे आढळतात?

६ मीखा अध्याय ६ यात एका कायदेशीर सुनावणीच्या रूपात यहोवा आपल्या लोकांवर आरोप लावतो. त्यांनी बंड करावे असे त्याने काय केले आहे? काहीही नाही. खरे तर त्याच्या अपेक्षा अत्यंत वाजवी आहेत. त्याची इच्छा आहे की त्याच्या उपासकांनी न्यायाने वागावे आणि त्याच्या समागमे राहून नम्रभावाने चालावे. पण असे करण्याऐवजी इस्राएल व यहुदा यांनी बंडखोरीचा मार्ग निवडला आणि त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागेल.

७ आपल्या भविष्यवाणीच्या शेवटल्या अध्यायात मीखा त्याच्या काळातील लोकांच्या दुष्टपणाचा धिक्कार करतो. पण तो निराश होत नाही, कारण यहोवाची ‘वाट पाहात राहण्याचा’ त्याचा निर्धार आहे. (मीखा ७:७) पुस्तकाच्या शेवटल्या भागात, यहोवा त्याच्या लोकांवर दया दाखवील असा भरवसा व्यक्‍त करण्यात आला आहे. इतिहास दाखवतो की ही आशा पूर्ण झाली. सा.यु.पू. ५३७ साली यहोवाचे त्याच्या लोकांना शिक्षा देणे संपुष्टात आले तेव्हा त्याने दयाळुपणे काही शेषजनांना त्यांच्या मायदेशात पुनःस्थापित केले.

८. मीखाच्या पुस्तकातील माहितीचा तुम्ही कसा सारांश द्याल?

८ यहोवा मीखाद्वारे किती उत्तम माहिती सादर करतो! जे देवाची सेवा करण्याचा दावा करतात पण त्याला विश्‍वासू राहत नाहीत त्यांच्याशी देव कसा व्यवहार करतो, हे मीखाच्या प्रेरित पुस्तकात इशारेवजा उदाहरणांसहित स्पष्ट केले आहे. हे पुस्तक आज घडत असलेल्या घटनांविषयी भाकीत करते. आणि या कठीण काळात आपली आशा दृढ करण्याकरता आपण कशाप्रकारे वागावे यासंबंधी देवाचे मार्गदर्शन ते पुरवते.

सार्वभौम प्रभू यहोवा बोलतो

९. मीखा १:२ या वचनानुसार यहोवा काय करणार होता?

९ आता आपण मीखाच्या पुस्तकाचे आणखी सविस्तर परीक्षण करू या. मीखा १:२ येथे आपण वाचतो: “सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुजवरील सर्व वस्तुजात यांनी कान द्यावा; प्रभु परमेश्‍वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभु तुमच्याविरुद्ध साक्ष देतो.” तुम्ही मीखाच्या काळात जिवंत असता, तर या शब्दांनी नक्कीच तुमचेही लक्ष वेधले असते. हे शब्द नक्कीच तुमचे लक्ष वेधतात कारण यहोवा आपल्या पवित्र मंदिरातून बोलत आहे आणि तो केवळ इस्राएल व यहुदालाच नव्हे तर सर्व पृथ्वीवरील लोकांना उद्देशून बोलत आहे. मीखाच्या काळात लोकांनी सार्वभौम प्रभू यहोवा याच्याकडे बऱ्‍याच काळापासून दुर्लक्ष केले होते. पण लवकरच ही परिस्थिती बदलणार होती. यहोवाने कारवाई करण्याचा निर्धार केला होता.

१०. मीखा १:२ यातील शब्द आपल्याकरता का महत्त्वाचे आहेत?

१० हेच आपल्या काळाविषयीही खरे आहे. प्रकटीकरण १४:१८-२० ही वचने दाखवतात की पुन्हा एकदा यहोवा आपल्या पवित्र मंदिरातून संदेश घोषित करत आहे. लवकरच तो निर्णायक पावले उचलणार आहे आणि महत्त्वपूर्ण घटना मानवजातीला हादरवून सोडणार आहेत. या वेळी, ‘पृथ्वीच्या दुष्टतेच्या द्राक्षीचे घड’ यहोवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले जातील आणि अशारितीने सैतानाच्या व्यवस्थीकरणाचा पूर्णतः नाश होईल.

११. मीखा १:३, ४ यातील शब्दांचा काय अर्थ होतो?

११ यहोवा काय करणार आहे याकडे लक्ष द्या. मीखा १:३, ४ म्हणते: “पाहा, परमेश्‍वर आपल्या स्थानाहून येतो, खाली उतरतो, व पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालत जातो, अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते तसे पर्वत त्यांच्या खाली विरघळतात, व खोरी फाटतात.” यहोवा आपले स्वर्गीय निवासस्थान सोडून प्रत्यक्षात प्रतिज्ञात देशाच्या पर्वतांवर अथवा खोऱ्‍यांत चालतो असा याचा अर्थ होतो का? नाही. त्याला असे करण्याची गरज नाही. त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला केवळ पृथ्वीकडे आपले लक्ष वळवण्याची गरज आहे. शिवाय, या वचनांत वर्णन केलेल्या पीडा शाब्दिक पृथ्वीवर नव्हे तर या राष्ट्रांतील रहिवाशांना भोगाव्या लागतील. यहोवा कार्य करतो तेव्हा अविश्‍वासू जनांना भयानक परिणाम भोगावे लागतील—जणू काही पर्वत वितळतील आणि खोरी भूकंप आल्याप्रमाणे फाटतील.

१२, १३. दुसरे पेत्र ३:१०-१२ यानुसार आपली आशा आपण कशाप्रकारे निश्‍चित करू शकतो?

१२ मीखा १:३, ४ यातील भविष्यसूचक शब्द तुम्हाला पृथ्वीवरील भयानक घटनांविषयी भाकीत करणाऱ्‍या दुसऱ्‍या एका देवप्रेरित भविष्यवाणीची आठवण करून देतील. २ पेत्र ३:१० यात सांगितल्याप्रमाणे प्रेषित पेत्राने लिहिले: “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” मीखाच्या भविष्यवाणीप्रमाणेच पेत्राचे शब्द शाब्दिक स्वर्ग व पृथ्वी यांना सूचित करत नाहीत. तर या अधार्मिक व्यवस्थीकरणावर येणार असलेल्या महासंकटाला ते सूचित करतात.

१३ हे संकट निश्‍चितच येणार असले तरीसुद्धा ख्रिश्‍चनांना मीखाप्रमाणेच भविष्यासंबंधी भरवसा असू शकतो. तो कसा? पेत्राच्या पत्रातील पुढची काही वचने वाचल्यानंतर आपल्याला हे कळून येते. प्रेषित पेत्र म्हणतो: “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११, १२) आपण एक आज्ञाधारक अंतःकरण विकसित केल्यास आणि आपले आचरण पवित्र व आपले जीवन सुभक्‍तीच्या कार्यांनी भरलेले आहे याची खात्री केल्यास आपण देखील भविष्याविषयी निश्‍चिंत असू शकतो. सुरक्षित भवितव्य मिळवण्याकरता, आपण देखील हे आठवणीत ठेवले पाहिजे की यहोवाचा दिवस अवश्‍य येईल.

१४. इस्राएल व यहुदा दंडास पात्र का होते?

१४ यहोवाचे प्राचीन लोक नाशास का पात्र होते याचा यहोवा खुलासा करतो. मीखा १:५ सांगते: “याकोबाच्या अपराधामुळे, इस्राएली घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय?” इस्राएल व यहुदा ही राष्ट्रे केवळ यहोवामुळे अस्तित्वात होती. तरीसुद्धा त्यांनी त्याच्याविरुद्ध द्रोह केला आणि त्यांचा हा द्रोह या राष्ट्रांच्या राजधान्या समारिया व जेरूसलेम येथपर्यंत पोचला होता.

दुष्ट चालीरितींची भरभराट

१५, १६. मीखाच्या काळातील लोक कोणती दुष्ट कृत्ये करण्याकरता दोषी होते?

१५ मीखाच्या काळातील लोकांच्या दुष्टपणाच्या एका उदाहरणाचे मीखा २:१, २ यात सुस्पष्टपणे वर्णन केले आहे: “जे अनर्थांचा संकल्प करितात व बिछान्यावर पडल्यापडल्या दुष्टतेची योजना करितात त्यांस धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्याच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करितात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करितात; असे ते माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करितात.”

१६ लोभी व्यक्‍तींना रात्रीची झोप लागत नाही; ते पडल्या पडल्या, आपल्या शेजाऱ्‍यांची शेतीवाडी आणि घरे आपल्या ताब्यात कशी येतील याच्या योजना आखत असतात. सकाळ होताच ते आपल्या दुष्ट योजना अंमलात आणण्याची घाई करतात. त्यांनी यहोवाचा करार आठवणीत ठेवला असता तर अशी दुष्ट कृत्ये त्यांच्या हातून घडली नसती. मोशेच्या नियमशास्त्रात गरिबांचे रक्षण करण्याकरता तरतुदी आहेत. त्याअंतर्गत, कोणत्याही कुटुंबाला आपले वतन कायमचे गमवावे लागू नये अशी तरतूद आहे. पण या लोभी व्यक्‍तींना कशाची पर्वा नाही. “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर” असे जे लेवीय १९:१८ यात म्हटले आहे त्याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

१७. एक व्यक्‍ती देवाची सेवा करण्याचा दावा करत असताना भौतिक गोष्टींना जीवनात प्राधान्य देऊ लागते तेव्हा काय घडते?

१७ यावरून दिसून येते, की जेव्हा देवाची सेवा करण्याचा दावा करणारे लोक आध्यात्मिक ध्येये विसरून भौतिक वस्तूंना प्राधान्य देऊ लागतात तेव्हा काय घडते. पौलाने त्याच्या काळातील ख्रिश्‍चनांना अशी ताकीद दिली: “परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तीमथ्य ६:९) एक व्यक्‍ती जेव्हा पैसा कमवणे हेच आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे असे मानू लागते तेव्हा एक अर्थाने ती धनाच्या रूपात एका खोट्या दैवताची उपासना करत असते. हे दैवत भविष्याची काहीही शाश्‍वती देत नाही.—मत्तय ६:२४.

१८. मीखाच्या काळातील भौतिकवादी लोकांना काय भोगावे लागेल?

१८ मीखाच्या काळातील बऱ्‍याच जणांनी कटू अनुभवातून हा धडा शिकला की भौतिक गोष्टींवर विसंबून राहणे व्यर्थ आहे. मीखा २:४ या वचनानुसार, यहोवा म्हणतो: “त्या दिवसात लोक तुम्हास उद्देशून बोलतील, विवळून शोक करितील व म्हणतील, सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो मजपासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र फितुऱ्‍यांस त्याने वाटून दिले आहे.” होय, घरे व जमीन लुटणाऱ्‍यांना त्यांच्या स्वतःच्या घराण्याचे वतन गमवावे लागेल. त्यांना एका परक्या देशात हद्दपार केले जाईल आणि त्यांची मालमत्ता ‘फितुरी’ अर्थात विदेशी लोक लुटतील. समृद्ध भविष्याच्या त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळतील.

१९, २०. यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍या यहुद्यांचा काय अनुभव होता?

१९ पण यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांची आशा व्यर्थ ठरणार नाही. यहोवा, अब्राहाम व दावीद यांच्यासोबत केलेल्या कराराला विश्‍वासू राहिला आणि मीखाप्रमाणे जे लोक त्याच्यावर प्रीती करतात आणि आपल्या देशबांधवांनी यहोवाला सोडून दिले आहे याबद्दल ज्यांना दुःख वाटते त्यांच्यावर यहोवा दया करतो. सरळ मनाच्या लोकांकरता देवाच्या नियुक्‍त वेळी पुनःस्थापना होईल.

२० सा.यु.पू. ५३७ साली, बॅबिलोनचे पतन होऊन यहुद्यांचे शेषजन मायदेशी परततात तेव्हा हे घडते. त्या वेळी, मीखा २:१२ चे शब्द पहिल्यांदा पूर्ण होतात. यहोवा म्हणतो: “हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्‍चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्‍चये जमा करीन; मी त्यांस बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन, लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपाप्रमाणे ते गजबजतील.” यहोवा खरोखर किती प्रेमळ आहे! आपल्या लोकांना शिक्षा दिल्यानंतर तो शेषजनांना परत येऊन त्यांच्या पितरांना देण्यात आलेल्या देशात यहोवाची सेवा करण्याची पुन्हा संधी देतो.

आपल्या काळातील उल्लेखनीय समांतर

२१. सध्याच्या काळातील परिस्थिती मीखाच्या काळातील परिस्थितीशी कशाप्रकारे मिळतीजुळती आहे?

२१ मीखाचे पहिले दोन अध्याय विचारात घेत असताना, तेव्हाची परिस्थिती व सध्याची परिस्थिती यांत किती साम्य आहे हे पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटले का? मीखाच्या काळाप्रमाणेच, आज अनेकजण देवाची सेवा करण्याचा दावा करतात. पण यहुदा व इस्राएलप्रमाणे ते विभाजित आहेत, इतकेच काय तर त्यांनी आपसांत युद्धे देखील लढली आहेत. ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक श्रीमंतांनी गरिबांवर अत्याचार केले आहेत. अनेक धर्मपुढारी अशा कृत्यांकडे डोळेझाक करत आहेत ज्यांची बायबलमध्ये उघडपणे निंदा करण्यात आली आहे. त्यामुळे यात काही आश्‍चर्याची गोष्ट नाही की लवकरच ख्रिस्ती धर्मजगत खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, अर्थात “मोठी बाबेल” हिच्यासमवेत कायमचे नष्ट होईल. (प्रकटीकरण १८:१-५) पण मीखाच्या काळातील नमुन्याप्रमाणे, यहोवा या पृथ्वीवर शेष विश्‍वासू सेवकांना राहू देईल.

२२. कोणत्या दोन गटांनी देवाच्या राज्यावर आपली आशा लावली आहे?

२२ एकोणीसशे एकोणीस साली, विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ती धर्मजगताशी सर्व नाती तोडली आणि त्यांनी सर्व राष्ट्रांना राज्याची सुवार्ता घोषित करण्यास सुरवात केली. (मत्तय २४:१४) सुरवातीला त्यांनी आध्यात्मिक इस्राएलच्या शेषवर्गावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यानंतर ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ एकत्र करण्यास सुरवात झाली आणि तेव्हा हे दोन गट “एक कळप, एक मेंढपाळ” असे झाले. (योहान १०:१६) आज ते २३४ देशांत देवाची सेवा करत असले तरीसुद्धा यहोवाचे हे सर्व विश्‍वासू उपासक “एकत्र” आहेत. कुरणात ‘लोकसमुदायाची गजबज’ वाढू लागली आहे. त्यांची आशा या व्यवस्थीकरणावर नव्हे तर देवाच्या राज्यावर आहे जे लवकरच पृथ्वीवर एक परादीस आणेल.

२३. तुमची आशा निश्‍चित आहे याची तुम्हाला का खात्री आहे?

२३ यहोवाच्या विश्‍वासू उपासकांसंबंधी, मीखाच्या दुसऱ्‍या अध्यायातील शेवटल्या वचनात असे म्हटले आहे: “त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्‍वर त्यांच्या अग्रभागी आहे.” त्या विजयशाली मिरवणुकीत, ज्याच्या अग्रभागी यहोवा आहे, आपल्या राजा येशू ख्रिस्ताच्या मागोमाग चालत असलेले तुम्ही स्वतःला पाहू शकता का? जर पाहू शकत असाल तर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवू शकता की विजय निश्‍चित आहे व तुमची आशा देखील खात्रीलायक आहे. आपण मीखाच्या भविष्यवाणीतील पुढील ठळक मुद्दे विचारात घेऊ तेव्हा हे अधिकच स्पष्ट होईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मीखाच्या काळात यहुदा व इस्राएलविरुद्ध कारवाई करण्याचा यहोवाने निर्णय का घेतला?

• देवाची सेवा करण्याचा दावा करणारे भौतिक गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य देऊ लागतात तेव्हा काय घडू शकते?

• मीखा अध्याय १ व २ विचारात घेतल्यानंतर तुम्हाला आपली आशा निश्‍चित असल्याबद्दल खात्री का वाटते?

[९ पानांवरील चित्र]

मीखाची भविष्यवाणी आपल्याला आध्यात्मिकरित्या बळकट करू शकते

[१० पानांवरील चित्रे]

सा.यु.पू. ५३७ सालच्या यहुदी शेषवर्गाप्रमाणेच, आत्मिक इस्राएल व त्यांचे सोबती देखील खऱ्‍या उपासनेला उंचावून धरतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा