वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 ८/१ पृ. ९-१४
  • यहोवा, सत्याचा देव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा, सत्याचा देव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा सत्य जाणतो
  • यहोवा सत्यशील आहे
  • यहोवा सत्य प्रकट करतो
  • सत्याला धरून राहा
  • यहोवा ‘निष्कपट विश्‍वासाची’ अपेक्षा करतो
  • सत्याच्या देवाचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • नेहमी खरं बोला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • लबाडीबद्दलची सत्यता
    सावध राहा!—१९९७
  • आपल्या शेजाऱ्‍याबरोबर सत्य बोला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 ८/१ पृ. ९-१४

यहोवा, सत्याचा देव

“हे यहोवा, सत्याच्या देवा, तू मला उद्धरले आहे.”—स्तोत्र ३१:५, पं.र.भा.

१. असत्य नव्हते तेव्हा स्वर्गात व पृथ्वीवर कशी परिस्थिती होती?

एक असा काळ होता जेव्हा असत्य नव्हते. अदृश्‍य स्वर्गात परिपूर्ण आत्मिक प्राणी राहत होते व ते आपल्या निर्माणकर्त्याची, ‘सत्याच्या देवाची’ उपासना करत होते. (स्तोत्र ३१:५) खोटेपणा, फसवणूक अस्तित्वात नव्हती. यहोवा आपल्या आत्मिक पुत्रांना जे सत्य तेच विदीत करत होता. कारण त्यांच्यावर त्याचे प्रेम होते आणि त्यांच्या कल्याणात त्याला मनापासून आस्था होती. पृथ्वीवरील परिस्थिती देखील तशीच होती. यहोवाने पहिला पुरुष व स्त्री यांना निर्माण केले आणि आपल्या नियुक्‍त माध्यमाकरवी त्याने नेहमी त्यांच्यासोबत स्पष्ट, सरळ व सत्य पद्धतीने दळणवळण राखले. ते किती अद्‌भुत असावे!

२. असत्याला कोणी जन्म दिला आणि का?

२ परंतु, शेवटी देवाच्या एका आत्मिक पुत्राने स्वतःला यहोवाच्या विरोधात एक प्रतिस्पर्धी देव ठरवण्याचे धैर्य केले. हा आत्मिक प्राणी ज्याला नंतर दियाबल सैतान असे नाव पडले, त्याला इतरांनी आपली उपासना करावी अशी इच्छा होती. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याने इतरांना आपल्या नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने असत्याला जन्म दिला. असे करण्याद्वारे तो “लबाड व लबाडीचा बाप” बनला.—योहान ८:४४.

३. आदाम व हव्वा यांनी सैतानाच्या लबाडीला कशाप्रकारे प्रतिसाद दिला आणि याचा काय परिणाम झाला?

३ एका सर्पाचा उपयोग करून सैतानाने पहिली स्त्री हवा हिला सांगितले की तिने देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून निषिद्ध फळ खाल्ले तरीसुद्धा ती मरणार नाही. हे असत्य होते. त्याने तिला असेही सांगितले की ते फळ खालल्यामुळे ती देवासारखी होईल आणि तिला चांगले व वाईट यांचे ज्ञान प्राप्त होईल. हे देखील खोटे होते. हवेला आधी कधीच खोटे सांगण्यात आले नव्हते तरीसुद्धा, सैतानाने जे सांगितले ते देवाने तिचा पती आदाम याला जे सांगितले होते त्यापेक्षा वेगळे होते हे तिने ओळखले असावे. तरीसुद्धा, तिने यहोवावर नव्हे तर सैतानावर विश्‍वास ठेवण्याचे निवडले. फसवणुकीला बळी पडून तिने ते फळ घेतले व खाल्ले. नंतर आदामानेही ते फळ खाल्ले. (उत्पत्ति ३:१-६) हव्वेप्रमाणेच, आदामानेही पूर्वी कधीच लबाडी ऐकली नव्हती, पण तो भुलविला गेला नाही. (१ तीमथ्य २:१४) त्याच्या कृतींद्वारे त्याने आपल्या निर्माणकर्त्याला नाकारले. यामुळे मानवजातीला भयंकर परिणाम भोगावे लागले. आदामाच्या अवज्ञेमुळे त्याच्या सर्व संततीमध्ये पाप व मृत्यू तसेच अनीती व दुःख पसरले.—रोमकर ५:१२.

४. (अ) एदेन बागेत कशाप्रकारे असत्य सांगण्यात आले? (ब) सैतानाच्या फसवणुकीला बळी न पडण्याकरता आपण काय केले पाहिजे?

४ यासोबतच असत्य देखील पसरले. आपण हे ओळखले पाहिजे की एदेन बागेत सांगण्यात आलेल्या लबाडीने खुद्द यहोवाच्या सत्यतेवर आघात केला. सैतानाने असे प्रतिपादित केले की देव पहिल्या मानवी जोडप्याला काही चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवत होता. अर्थात हे खरे नव्हते. देवाची आज्ञा मोडून आदाम व हव्वा यांना काहीही फायदा झाला नाही. यहोवाने बजावल्याप्रमाणे त्यांचा मृत्यू झाला. तरीपण, यहोवाविरुद्ध सैतानाचा निंदाजनक हल्ला सुरूच राहिला; तो देखील इतक्या प्रमाणात की कित्येक शतकांनंतरही प्रेषित योहानाला असे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले की सैतान ‘सर्व जगाला ठकवीत’ आहे. (प्रकटीकरण १२:९) दियाबल सैतानाच्या फसवणुकीला बळी पडायचे नसेल, तर आपल्याला यहोवाच्या व त्याच्या वचनाच्या सत्यतेवर पूर्ण भरवसा असला पाहिजे. यहोवावर आपला भरवसा भक्कम करून त्याचा शत्रू सैतान याच्या फसवणुकीचा प्रतिकार करण्याकरता आपल्याला स्वतःस बळकट कसे करता येईल?

यहोवा सत्य जाणतो

५, ६. (अ) यहोवाजवळ कशाप्रकारचे ज्ञान आहे? (ब) यहोवाच्या तुलनेत मानवाचे ज्ञान कितपत आहे?

५ बायबल वारंवार यहोवाची ओळख, ज्याने “सर्व काही निर्माण केले” तो, याप्रकारे करून देते. (इफिसकर ३:९) “आकाश, पृथ्वी, समुद्र ह्‍यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्‍नकर्ता” तोच आहे. (प्रेषितांची कृत्ये ४:२४) निर्माणकरता असल्यामुळे यहोवा सर्व गोष्टींविषयीचे सत्य जाणतो. उदाहरणार्थ अशा मनुष्याची कल्पना करा जो आपल्या घराचा आराखडा तयार करून स्वतः ते बांधतो. बांधकामात लागणारा प्रत्येक लाकडाचा तुकडा, प्रत्येक खिळा त्याने स्वतः हाताळलेला असतो. इतर कोणत्याही व्यक्‍तीच्या तुलनेत साहजिकच या मनुष्याला त्या घराच्या कानाकोपऱ्‍याविषयी अधिक ज्ञान असेल. एखादी वस्तू निर्माण करणाऱ्‍या व्यक्‍तीला त्या वस्तूविषयी पूर्ण माहिती असते. त्याचप्रकारे, निर्माणकर्त्याने जे काही निर्माण केले आहे त्याविषयी त्याला सर्वकाही माहीत आहे.

६ संदेष्टा यशया याने यहोवाच्या ज्ञानाचा अवाका किती प्रचंड आहे हे अत्यंत सुरेखपणे व्यक्‍त केले. त्याने म्हटले: “जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापिली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलिल्या आहेत? परमेश्‍वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकविले आहे? त्याने कोणाला मसलत विचारिली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकविले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखविला?” (यशया ४०:१२-१४) खरोखर यहोवा “ज्ञाता देव” व “पूर्ण ज्ञानी” आहे. (१ शमुवेल २:३; ईयोब ३६:४; ३७:१६) त्याच्या तुलनेत आपले ज्ञान किती नगण्य आहे! मनुष्याने संपादन केलेल्या अफाट ज्ञानाचा विचार केला तरीसुद्धा, सृष्टीविषयी आपली माहिती ‘[देवाच्या] कार्यक्षेत्राच्या केवळ सीमेपर्यंतही’ पोचत नाही. ‘त्याच्या प्रभावाच्या गर्जनेच्या’ तुलनेत “केवळ चाहूल आपल्या कानी येते.”—ईयोब २६:१४.

७. यहोवाच्या ज्ञानाविषयी दाविदाने काय ओळखले आणि त्याअर्थी आपणही काय ओळखले पाहिजे?

७ यहोवाने आपल्याला निर्माण केले असल्यामुळे, त्याला आपल्याबद्दल पूर्ण ज्ञान आहे हे अपेक्षितच आहे. दावीद राजाने हे ओळखले होते. त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्‍वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकहि शब्द माझ्या मुखांतून निघत नाही.” (स्तोत्र १३९:१-४) अर्थात दाविदाला ठाऊक होते की मनुष्य आपल्या इच्छा-स्वातंत्र्यानुसार वागतो—देवाने आपल्याला त्याच्या आज्ञा पाळाव्यात अथवा पाळू नयेत याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. (अनुवाद ३०:१९, २०; यहोशवा २४:१५) पण आपण स्वतःला ओळखत नाही, इतक्या चांगल्याप्रकारे यहोवा आपल्याला ओळखतो. आपल्याकरता जे उत्तम तेच तो इच्छितो आणि आपले मार्गदर्शन करण्यास तो समर्थ आहे. (यिर्मया १०:२३) अर्थात, आपल्याला जो सत्य शिकवून, सुज्ञ व आनंदी बनवू शकेल असा त्याच्यापेक्षा उत्तम शिक्षक, तज्ज्ञ किंवा मार्गदर्शक कोठेही सापडणार नाही.

यहोवा सत्यशील आहे

८. यहोवा सत्यशील आहे हे आपल्याला कसे कळते?

८ सत्य जाणणे एक गोष्ट आहे, पण नेहमीच सत्य बोलणे आणि सत्यशील असणे वेगळे आहे. उदाहरणार्थ, दियाबल “सत्यात टिकला नाही;” हा मार्ग त्याने स्वतःहून निवडला. (योहान ८:४४) त्याउलट, यहोवा “सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६) शास्त्रवचने सातत्याने यहोवाच्या सत्यतेविषयी साक्ष देतात. प्रेषित पौलाने म्हटले की “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे” आणि त्याच्याने “असत्य बोलवतच नाही.” (इब्री लोकांस ६:१८; तीत १:२, पं.र.भा.) सत्यता देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आहे. आपण यहोवावर विसंबून राहू शकतो व भरवसा ठेवू शकतो कारण तो सत्यशील आहे; तो आपल्या निष्ठावान जनांची कधीही फसवणूक करत नाही.

९. यहोवाचे नाव सत्याशी कशाप्रकारे निगडीत आहे?

९ यहोवाचे नावच त्याच्या सत्यशीलतेची ग्वाही देते. देवाच्या नावाचा अर्थ “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा आहे. यहोवा जी काही प्रतिज्ञा करतो ती प्रगतीशीलपणे पूर्ण करतो असे त्याच्या या नावावरून सूचित होते. आणखी कोणीही असे करण्यास समर्थ नाही. यहोवा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याच्या उद्देशांच्या पूर्णतेत कोणीही बाधा आणू शकत नाही. यहोवा केवळ सत्यशीलच नाही तर त्याची सर्व वचने पूर्ण व्हायला लावण्याचे सामर्थ्य व बुद्धीसुद्धा त्याच्याजवळ आहे.

१०. (अ) यहोशवाने कशाप्रकारे यहोवाची सत्यशीलता प्रत्यक्ष अनुभवली? (ब) यहोवाच्या कोणत्या प्रतिज्ञांची पूर्णता तुम्ही पाहिली आहे?

१० यहोशवा त्या अनेकजणांपैकी एक होता ज्यांनी यहोवाच्या सत्यशीलतेची ग्वाही देणाऱ्‍या उल्लेखनीय घटना प्रत्यक्ष पाहिल्या. यहोवाने ईजिप्त राष्ट्रावर दहा पीडा आणल्या आणि प्रत्येक पीडेच्या आधी तिचे भाकीत केले तेव्हा यहोशवा ईजिप्तमध्येच होता. तसेच, इस्राएल लोकांना ईजिप्तमधून सोडवून प्रतिज्ञात देशात नेण्याविषयी व तेथे त्यांचा विरोध करणाऱ्‍या कनानी सैन्याचा पराभव करण्याविषयी यहोवाने केलेल्या सर्व प्रतिज्ञा यहोशवाने पूर्ण होताना पाहिल्या. आपल्या जीवनाच्या शेवटी यहोशवाने इस्राएल राष्ट्राच्या वडीलधाऱ्‍या माणसांना सांगितले: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहोशवा २३:१४) यहोशवाप्रमाणे जरी तुम्ही स्वतः चमत्कार पाहिले नसतील तरीसुद्धा देवाच्या प्रतिज्ञांची सत्यता तुम्ही आपल्या जीवनात अनुभवली आहे का?

यहोवा सत्य प्रकट करतो

११. यहोवा मानवजातीला सत्य सांगू इच्छितो हे कशावरून दिसून येते?

११ काही आईवडील खूप ज्ञानी असतात, पण ते क्वचितच आपल्या मुलांशी बोलतात. यहोवा असा नाही, याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटत नाही का? यहोवा प्रेमळपणे मनुष्यजातीशी संवाद करतो आणि तेसुद्धा मुबलकपणे. शास्त्रवचनांत त्याला “महान शिक्षक” म्हणण्यात आले आहे. (यशया ३०:२०, NW) तो अशा लोकांशीही प्रेमळपणे संवाद करतो ज्यांची ऐकून घेण्याची प्रवृत्ती नाही. उदाहरणार्थ, यहेज्केलला अशा लोकांना प्रचार करण्यास सांगण्यात आले होते जे त्याचा संदेश ग्रहण करणार नाहीत आणि यहोवाला हे माहीत होते. यहोवाने म्हटले: “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांजवळ माझी वचने बोल.” मग त्याने त्याला ताकीद दिली: “इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाही; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे.” यहेज्केलला देण्यात आलेली नेमणूक कठीण होती, पण त्याने ती विश्‍वासूपणे पार पाडली आणि असे करण्याद्वारे त्याने यहोवाची दया प्रदर्शित केली. तुम्हाला नेमण्यात आलेल्या क्षेत्रातही जर प्रचार करणे कठीण असेल आणि जर तुम्ही देवावर भिस्त टाकली तर आपला संदेष्टा यहेज्केल याला ज्याप्रमाणे देवाने साहाय्य केले त्याप्रमाणे तो तुम्हालाही साहाय्य करेल.—यहेज्केल ३:४, ७-९.

१२, १३. देवाने कशाप्रकारे मानवांसोबत संवाद केला आहे?

१२ यहोवाची अशी इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) त्याने आपल्या संदेष्ट्यांद्वारे, देवदूतांद्वारे आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारेही मानवांशी संवाद केला. (इब्री लोकांस १:१, २; २:२) पिलाताला येशूने म्हटले: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” तारणाकरता यहोवाने केलेल्या तरतुदीविषयीचे सत्य खुद्द देवाच्या पुत्राकडून जाणून घेण्याची पिलाताकडे अनमोल संधी होती. पण तो सत्याच्या पक्षात नव्हता आणि त्याला येशू ख्रिस्तापासून ज्ञान घेण्याची इच्छा नव्हती. उलट, त्याने उपरोधाने असा प्रश्‍न केला: “सत्य काय आहे?” (योहान १८:३७, ३८) किती दुःखाची गोष्ट! पण बऱ्‍याच जणांनी येशूने घोषित केलेले सत्य ऐकले. त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.”—मत्तय १३:१६.

१३ यहोवाने बायबलच्या माध्यमाने सत्याचे संरक्षण केले आहे आणि सबंध जगातील लोकांना ते उपलब्ध होईल असे केले आहे. कोणतीही गोष्ट मुळात जशी आहे तशीच बायबलमध्ये प्रकट करण्यात आली आहे. यात देवाचे गुण, त्याचे उद्देश व आज्ञा तसेच मानवजातीची खरी परिस्थिती विदित करण्यात आली आहे. येशूने प्रार्थनेत यहोवाला म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) या कारणांमुळे बायबल एक असामान्य ग्रंथ आहे. केवळ हाच एक ग्रंथ आहे जो सर्व काही जाणणाऱ्‍या देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आला आहे. (२ तीमथ्य ३:१६) ही मानवजातीला देण्यात आलेली एक अनमोल देणगी आहे जी देवाच्या सेवकांना प्रिय आहे. याचे रोज वाचन करणे सुज्ञतेचे आहे.

सत्याला धरून राहा

१४. कोणत्या काही गोष्टी करण्याची यहोवाने प्रतिज्ञा केली आहे आणि आपण त्याच्यावर विश्‍वास का ठेवला पाहिजे?

१४ यहोवा आपल्याला त्याच्या वचनात जे सांगतो ते आपण गांभिर्याने घेतले पाहिजे. त्याने स्वतःला ज्याप्रकारे चित्रित केले आहे तसाच तो वास्तवात आहे आणि आपण जे करू असे त्याने म्हटले ते तो अवश्‍य करेल. आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा मी सूड उगवील’ असे यहोवा म्हणतो व यावर आपण विश्‍वास ठेवू शकतो. (२ थेस्सलनीकाकर १:८) तसेच जे नीतिमत्त्वाचा शोध घेतात त्यांच्यावर आपण प्रेम करतो, जे कोणी विश्‍वास ठेवतात त्यांना आपण सार्वकालिक जीवन बहाल करू आणि पृथ्वीवरून दुःख, शोक आणि मृत्यूचे नामोनिशाण काढून टाकू असे यहोवा म्हणतो त्यावरही आपण विश्‍वास ठेवू शकतो. दुःख, शोक व मृत्यू काढून टाकण्याविषयीच्या प्रतिज्ञेची विश्‍वासार्हता ठासून सांगण्याकरता यहोवाने प्रेषित योहानाला अशी सूचना दिली: “लिही; कारण ही वचने विश्‍वसीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:४, ५; नीतिसूत्रे १५:९; योहान ३:३६.

१५. सैतानाने कोणत्या काही लबाड्या पसरवल्या आहेत?

१५ सैतान यहोवाच्या अगदी उलट आहे. इतरांना ज्ञान देण्याऐवजी तो त्यांना भुलवतो. लोकांना खऱ्‍या उपासनेपासून दूर करण्यासाठी सैतान लबाडीवर लबाडी करतो. उदाहरणार्थ, सैतान आपल्याला असे मानण्यास लावण्याचा प्रयत्न करतो, की देवाला आपल्याबद्दल आपुलकी नाही आणि पृथ्वीवरील दुःखद परिस्थितीची त्याला पर्वा नाही. तरीपण बायबल असे दाखवते की यहोवा आपल्या प्राण्यांची मनापासून काळजी वाहतो आणि दुष्टता व दुःख पाहून त्याला अत्यंत खेद वाटतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२४-३०) सैतान लोकांना असा विश्‍वास करायला लावू इच्छितो की आध्यात्मिक गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पण शास्त्रवचने आपल्याला असे आश्‍वासन देतात की “तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” शिवाय, बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की परमेश्‍वर ‘त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देणारा आहे.’—इब्री लोकांस ६:१०; ११:६.

१६. ख्रिश्‍चनांनी जागरूक राहून सत्याला का धरून राहावे?

१६ सैतानाच्या संदर्भात प्रेषित पौलाने लिहिले: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने ह्‍या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:४) हव्वेप्रमाणे, काहीजण दियाबल सैतानाकरवी पूर्णपणे फसवले जातात. इतरजण आदामाचे अनुकरण करतात जो भुलवला गेला नाही पण ज्याने जाणूनबुजून आज्ञा मोडण्याचा मार्ग निवडला. (यहूदा ५, ११) यास्तव ख्रिश्‍चनांनी जागरूक राहणे आणि सत्याला धरून राहणे आवश्‍यक आहे.

यहोवा ‘निष्कपट विश्‍वासाची’ अपेक्षा करतो

१७. यहोवाची कृपा मिळवण्याकरता आपण काय केले पाहिजे?

१७ यहोवाचे सर्व मार्ग सत्य असल्यामुळे यहोवाची उपासना करणाऱ्‍यांनी देखील सत्यशील असावे अशी तो अपेक्षा करतो. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरांवर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो.” (स्तोत्र १५:१, २) हे भजन गाणाऱ्‍या यहुद्यांना यहोवाचे पवित्र डोंगर म्हटल्यावर नक्कीच सीयोन पर्वताची आठवण होत असावी, जेथे राजा दाविदाने तंबू बांधून तेथे कराराचा कोश आणला होता. (२ शमुवेल ६:१२, १७) डोंगर व मंडप त्या ठिकाणाची आठवण करून देत होते जेथे लाक्षणिकरित्या यहोवा निवास करत होता. तेथे लोक देवाची कृपा मिळवण्याकरता प्रार्थना करू शकत होते.

१८. (अ) देवासोबत मैत्री करायची असल्यास काय आवश्‍यक आहे? (ब) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१८ ज्या कोणाला यहोवाबरोबर मैत्री करायची आहे त्याने केवळ तोंडाने नव्हे, तर “मनापासून सत्य” बोलले पाहिजे. देवाच्या खऱ्‍या मित्रांची मने प्रामाणिक असली पाहिजेत आणि त्यांनी ‘निष्कपट विश्‍वास’ असल्याचे शाबीत केले पाहिजे, कारण सत्यशील कृत्ये मनातूनच उत्पन्‍न होतात. (१ तीमथ्य १:५; मत्तय १२:३४, ३५) देवाचा मित्र फसवणूक करणारा असू शकत नाही कारण “कपटी मनुष्याचा परमेश्‍वराला वीट येतो.” (स्तोत्र ५:६) सबंध पृथ्वीवरील यहोवाचे साक्षीदार आपल्या देवाचे अनुकरण करून सत्यशील होण्याचा मनस्वी प्रयत्न करतात. पुढील लेख या विषयाचे परीक्षण करील.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाला सर्व गोष्टींविषयीचे सत्य का माहीत आहे?

• यहोवा सत्याचा देव आहे हे कशावरून दिसून येते?

• यहोवाने कशाप्रकारे सत्य प्रकट केले आहे?

• सत्याच्या संदर्भात आपल्याकडून काय अपेक्षा केली जाते?

[१० पानांवरील चित्रे]

सत्याचा देव आपण निर्माण केलेल्या गोष्टींविषयी सर्वकाही जाणतो

[१३ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या प्रतिज्ञा खऱ्‍या ठरतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा