“पाहा! हा आमचा देव”
या दोन अभ्यास लेखांतील माहिती यहोवाजवळ या (इंग्रजी), या प्रकाशनावर आधारित आहे. हे पुस्तक २००२/०३ सालांदरम्यान सबंध जगात संपन्न झालेल्या प्रांतीय अधिवेशनांत प्रसिद्ध करण्यात आले.—पृष्ठ २० वर असलेला ‘या पुस्तकाने माझ्या मनातली पोकळी भरून काढली आहे’ हा लेख पाहा.
“पाहा, हा आमचा देव! याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे.”—यशया २५:९.
१, २. (अ) यहोवाने कुलपिता अब्राहाम याला कशाप्रकारे संबोधले आणि यामुळे आपल्या मनात कोणता विचार येऊ शकतो? (ब) देवासोबत जवळचा नातेसंबंध स्थापित करणे शक्य आहे याची बायबल आपल्याला कशाप्रकारे खात्री करून देते?
“माझा मित्र.” स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या यहोवाने या शब्दांत, पुराणपुरुष अब्राहाम याच्याविषयी उल्लेख केला. (यशया ४१:८) कल्पना करा—सबंध विश्वाचा सार्वभौम सत्ताधीश आणि एक साधा मनुष्य यांच्यात मैत्री! कदाचित तुम्ही विचार करत असाल, ‘मी कधी देवाच्या इतक्या जवळ जाऊ शकेन का?’
२ बायबल आपल्याला खात्री करून देते की देवासोबत एक घनिष्ट नातेसंबंध जोडणे शक्य आहे. अब्राहामाला देवासोबत इतके जवळचे नाते जोडता आले कारण त्याने “देवावर विश्वास ठेवला.” (याकोब २:२३) आजही यहोवा, ‘जो नीतिमान आहे त्याला मित्र मानतो.’ (नीतिसूत्रे ३:३२, सुबोध भाषांतर) याकोब ४:८ येथे बायबल आपल्याला असा आग्रह करते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” यावरून स्पष्ट होते की जर आपण यहोवाच्या जवळ येण्याकरता पावले उचलली तर तो आपल्याला प्रतिसाद देईल. म्हणजेच, तो आपल्या जवळ येईल. पण या प्रेरित शब्दांचा असा अर्थ होतो का, की आपण, अर्थात, पापी, अपरिपूर्ण मानव पहिले पाऊल उचलतो? मुळीच नाही. आपल्या प्रेमळ देवाने दोन महत्त्वाची पावले उचलल्यामुळेच त्याच्यासोबत एक जवळचा संबंध स्थापित करणे शक्य आहे.—स्तोत्र २५:१४.
३. यहोवाने कोणती दोन पावले उचलली आहेत ज्यांमुळे त्याच्यासोबत मैत्री करणे आपल्याला शक्य होते?
३ पहिले म्हणजे येशूने “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” करावा अशी यहोवाने तरतूद केली. (मत्तय २०:२८) या खंडणी यज्ञार्पणामुळे आपण देवाच्या जवळ येऊ शकतो. बायबल म्हणते: “पहिल्याने त्याने आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.” (१ योहान ४:१९) होय, देवाने ‘पहिल्याने आपणावर प्रीति केली.’ आणि असे करण्याद्वारे त्याच्यासोबत मैत्री करण्याकरता आपल्यासाठी त्याने एक पाया घातला. दुसरे म्हणजे यहोवाने स्वतःला आपल्यापुढे प्रकट केले आहे. आपण कोणाशीही मैत्री करतो तेव्हा त्या व्यक्तीशी आपला संबंध तिला खऱ्या अर्थाने जाणण्यावर, तिच्या खास गुणांबद्दल कौतुक व त्यांचे मोल वाटण्यावर अवलंबून असतो. याचा काय अर्थ होतो यावर विचार करा. जर यहोवा एक गुप्त, रहस्यमय देव असता तर आपण कधीही त्याच्या जवळ येऊ शकलो नसतो. पण स्वतःला गुप्त ठेवण्याऐवजी, यहोवाची इच्छा आहे की आपण त्याला जाणावे. (यशया ४५:१९) त्याचे वचन बायबल यात तो आपल्याला समजू शकेल अशा शब्दांत स्वतःला प्रकट करतो—त्याचे आपल्यावर प्रेम आहे इतकेच नव्हे, तर आपण त्याला जाणावे आणि आपला स्वर्गीय पिता म्हणून त्याच्यावर प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे याचा पुरावा तो आपल्याला देतो.
४. यहोवाच्या गुणांविषयी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतल्याने आपल्याला त्याच्याविषयी कसे वाटू लागेल?
४ तुम्ही कधी एका लहान मुलाला आपल्या वडिलांकडे बोट दाखवून, अगदी निरागस आनंदाने व अभिमानाने, “हे माझे बाबा आहेत” असे आपल्या मित्रांना सांगताना पाहिले आहे का? यहोवाच्या उपासकांना त्याच्याबद्दल अगदी याच भावना असल्या पाहिजेत. बायबल अशा एका काळाविषयी भाकीत करते जेव्हा विश्वासू जन असे घोषित करतील: “पाहा! हा आमचा देव.” (यशया २५:८, ९) यहोवाच्या गुणांविषयी आपण जितके सखोल ज्ञान घेऊ तितकीच आपल्याला अधिकाधिक खात्री होईल की आपल्याला सर्वात चांगला पिता आणि सर्वात जिवाभावाचा मित्र मिळाला आहे. होय यहोवाच्या गुणांविषयी समजून घेतल्याने आपल्याला त्याच्या जवळ येण्याची अनेक कारणे मिळतात. तर मग त्याचे चार प्रमुख गुण—सामर्थ्य, न्याय, बुद्धी आणि प्रीती यांविषयी बायबल काय सांगते याचे आपण परीक्षण करू या. या लेखात आपण या गुणांपैकी पहिल्या तीन गुणांची चर्चा करणार आहोत.
“त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे”
५. केवळ यहोवाला ‘सर्वसमर्थ’ म्हणण्यात आले आहे हे योग्य का आहे आणि तो आपल्या अद्भुत सामर्थ्याचा कोणकोणत्या मार्गांनी उपयोग करतो?
५ यहोवाचे “सामर्थ्य अप्रतिम आहे.” (ईयोब ३७:२३) यिर्मया १०:६ म्हणते: “हे परमेश्वर, तुजसारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.” कोणत्याही जिवंत प्राण्याच्या तुलनेत यहोवाजवळ अमर्याद सामर्थ्य आहे. या कारणामुळे केवळ त्याला ‘सर्वसमर्थ’ म्हणण्यात आले आहे. (प्रकटीकरण १५:३) यहोवा आपले अद्भुत सामर्थ्य, निर्माण करण्याकरता, नष्ट करण्याकरता, बचाव करण्याकरता आणि नव्याने निर्माण करण्याकरता वापरतो. निर्माण व बचाव करण्याकरता तो आपले सामर्थ्य कशाप्रकारे वापरतो याची केवळ दोन उदाहरणे पाहा.
६, ७. सूर्य किती शक्तिशाली आहे आणि तो कोणत्या महत्त्वाच्या वस्तूस्थितीची ग्वाही देतो?
६ उन्हाळ्याच्या एखाद्या प्रसन्न सकाळी तुम्ही बाहेर उभे राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या त्वचेवर काय जाणवते? सूर्यकिरणांची ऊब. खरे पाहता, हा यहोवाच्या निर्मिती सामर्थ्याचा एक आविष्कार आहे. सूर्य किती सामर्थ्यशाली आहे? सूर्याच्या मध्यभागी जवळजवळ १.५ कोटी डिग्री सेल्सियस इतके तापमान असते. सूर्याच्या मध्यभागातून टाचणीच्या डोक्याएवढा कण काढून पृथ्वीवर ठेवल्यास, उष्णतेच्या त्या इवल्याशा स्रोतापासून १५० किलोमीटरवर देखील तुम्ही जिवंत राहू शकणार नाही! कित्येक कोटी आण्विक बॉम्ब्सच्या विस्फोटातून जितकी ऊर्जा बाहेर पडेल तितकी सूर्यातून दर सेकंदाला बाहेर पडत असते. पण पृथ्वी मात्र या अद्भुत औष्णिक अणुकेंद्रीय भट्टीपासून अगदी अचूक अंतरावर सूर्याला प्रदक्षिणा घालते. जास्त जवळ आल्यास पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि जास्त दूर गेल्यास सर्वकाही गोठून जाईल. दोन्ही टोकांना गेल्यास पृथ्वी ग्रहावर सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल.
७ पण आपले सबंध जीवन सूर्यावर अवलंबून आहे तरीसुद्धा कित्येक लोक या वस्तुस्थितीची दखल घेत नाहीत. यामुळे, सूर्य आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवतो याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. स्तोत्र ७४:१६ यहोवाविषयी म्हणते: “चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.” होय, सूर्य यहोवाचे गौरव करतो, ज्याने ‘आकाश व पृथ्वी निर्माण केली.’ (स्तोत्र १४६:६) आणि यहोवाच्या अफाट सामर्थ्याची ग्वाही देणाऱ्या असंख्य सृष्टीकृत्यांपैकी सूर्य हा केवळ एक आहे. यहोवाच्या निर्मिती सामर्थ्याविषयी आपण जितके अधिक शिकू तितकीच आपली त्याच्यावरची श्रद्धा वाढेल.
८, ९. (अ) यहोवा त्याच्या उपासकांचे संरक्षण करण्यास व त्यांची काळजी वाहण्यास किती उत्सुक आहे हे कोणत्या शब्दचित्रातून दिसून येते? (ब) बायबल काळातील मेंढपाळ कशाप्रकारे आपल्या मेंढरांची काळजी वाहत असे आणि यावरून आपल्या थोर मेंढपाळाबद्दल आपण काय शिकतो?
८ यहोवा आपल्या सेवकांचे संरक्षण करण्याकरता आणि त्यांची काळजी वाहण्याकरता देखील आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतो. यहोवाने आपल्या सेवकांचे संरक्षण करण्याच्या व त्यांची काळजी वाहण्याच्या ज्या प्रतिज्ञा केल्या आहेत त्यांचे वर्णन करण्याकरता बायबलमध्ये अनेक हृदयस्पर्शी शब्दचित्रे रेखाटली आहेत. उदाहरणार्थ यशया ४०:११ [पं.र.भा.] याकडे लक्ष द्या. येथे यहोवा स्वतःची तुलना एका मेंढपाळाशी आणि त्याच्या लोकांची तुलना मेंढरांशी करतो. या वचनात म्हटले आहे: “मेंढपाळासारखा तो आपला कळप चारील, तो आपल्या हाताने कोकरे एकवटील आणि ती आपल्या उराशी धरून वाहील, व ज्यांना तान्ही पिल्ले आहेत त्यांना तो जपून नेईल.” या वचनात केलेले वर्णन तुम्ही डोळ्यापुढे उभे करू शकता का?
९ पाळीव मेंढरांइतके गरीब फार कमी प्राणी असतात. बायबल काळातील मेंढपाळांना लांडगे, अस्वल व सिंह यांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून आपल्या मेंढरांचे रक्षण करण्याकरता धैर्यवान असावे लागत होते. (१ शमुवेल १७:३४-३६; योहान १०:१०-१३) पण कधीकधी मेंढरांचे रक्षण व संभाळ अतिशय कोमलतेने करावा लागत असे. उदाहरणार्थ, एखादी मेंढी मेंढवाड्यापासून दूर असलेल्या ठिकाणी प्रसवली तर नवजात असहाय पिलाला मेंढपाळ कशाप्रकारे सुरक्षित ठेवत असे? तो त्या कोकऱ्याला, कधीकधी कित्येक दिवस “उराशी” अर्थात त्याच्या बाह्य वस्त्राच्या सैल घड्यांमध्ये ठेवून वागवत असे. पण ते कोकरू मेंढपाळाच्या उराशी कसे काय आले? कदाचित ते कोकरू स्वतः मेंढपाळाजवळ आले असेल आणि त्याचे लक्ष वेधण्याकरता त्याने त्याच्या पायाला आपले अंग घासले असेल. पण कोकराला आपल्या उराशी घेण्यासाठी मेंढपाळाला वाकून आपल्या हातांनी त्याला उचलून घ्यावे लागले. आपला थोर मेंढपाळ त्याच्या सेवकांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांची काळजी वाहण्यासाठी किती उत्सुक आहे हे या सुरेख शब्दचित्रातून किती हळूवारपणे व्यक्त होते!
१०. आज यहोवा कशाप्रकारे संरक्षण पुरवतो आणि हे संरक्षण इतके महत्त्वाचे का आहे?
१० यहोवाने आपल्याला संरक्षण देण्याची केवळ प्रतिज्ञा दिली नाही. तर बायबल काळात त्याने चमत्कारिक रितीने हे दाखवून दिले की ‘भक्तिमान लोकांस परीक्षेतून सोडवण्यास’ तो समर्थ आहे. (२ पेत्र २:९) आजच्या काळाविषयी काय? तो त्याच्या सामर्थ्याने आपल्याला प्रत्येक समस्येतून सोडवत नाही हे आपल्याला माहीत आहे. पण त्याहूनही महत्त्वाचे असे काहीतरी, अर्थात आध्यात्मिक संरक्षण तो आपल्याला पुरवतो. परीक्षांना तोंड देण्याकरता आणि त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता आपल्याला जे काही आवश्यक असेल ते पुरवण्याद्वारे आपला प्रेमळ पिता आध्यात्मिक हानी होण्यापासून आपला बचाव करतो. उदाहरणार्थ, लूक ११:१३ म्हणते: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” ही प्रभावशाली शक्ती आपल्याला कोणत्याही परीक्षेला किंवा समस्येला तोंड देण्यास समर्थ बनवू शकते. (२ करिंथकर ४:७) अशारितीने यहोवा, आपले जीवन केवळ काही वर्षांपर्यंत नव्हे तर सर्वकाळाकरता राखून ठेवण्याची तरतूद करतो. ही आशा मनात बाळगून, या व्यवस्थीकरणात येणाऱ्या सर्व संकटांना आपण “तात्कालिक व हलके” समजू शकतो. (२ करिंथकर ४:१७) आपल्या सेवकांकरता आपले सामर्थ्य इतक्या प्रेमळपणे उपयोगात आणणाऱ्या देवाकडे आपण आपोआपच आकर्षित होत नाही का?
“परमेश्वराला न्याय प्रिय आहे”
११, १२. (अ) यहोवाचा न्याय आपल्याला त्याच्या जवळ जाण्यास का प्रवृत्त करतो? (ब) देवाच्या न्यायासंबंधाने दावीद कोणत्या निष्कर्षावर पोचला आणि हे प्रेरित शब्द आपल्याला कशाप्रकारे सांत्वन देतात?
११ यहोवा जे योग्य व न्याय्य आहे तेच करतो आणि हे तो सातत्याने, कोणत्याही प्रकारच्या पक्षपाताशिवाय करतो. देवाचे न्यायीपण भावनाविरहीत किंवा कठोर नाही. ते आपल्याला त्याच्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करत नाही; तर त्याच्या जवळ येण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त करते. हा त्याचा गुण किती हृदयस्पर्शी आहे याविषयी बायबलमध्ये स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. तर मग आपण तीन अशा मार्गांविषयी विचार करू ज्यांद्वारे यहोवा न्याय प्रदर्शित करतो.
१२ सर्वप्रथम, यहोवाचा न्याय त्याला आपल्या सेवकांप्रती विश्वासूपणा व निष्ठा दाखवण्यास प्रवृत्त करतो. यहोवाच्या न्यायाचा हा पैलू स्तोत्रकर्त्या दाविदाला स्वतः अनुभवायला मिळाला. स्वतःच्या अनुभवातून आणि देवाच्या मार्गांविषयी त्याने केलेल्या अभ्यासावरून दावीद कोणत्या निष्कर्षावर पोचला? त्याने असे घोषित केले: “परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांस सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते.” (स्तोत्र ३७:२८) किती सांत्वनदायक आश्वासन! निष्ठावान राहणाऱ्या एकालाही आपला देव कधी एका क्षणासाठीही त्यागणार नाही. आपण त्याच्या घनिष्ठ मैत्रीवर आणि त्याच्या प्रेमळ काळजीवर सदैव अवलंबून राहू शकतो. त्याचे न्यायीपण या गोष्टीची हमी देते!—नीतिसूत्रे २:७, ८.
१३. दुर्बलांबद्दल यहोवाला वाटणारी काळजी, त्याने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रातून कशाप्रकारे दिसून आली?
१३ यहोवाचे न्यायीपण आणखी एका मार्गाने व्यक्त होते. त्याचा न्याय दुःखितांच्या गरजांची दखल घेतो. यहोवाने इस्राएलला दिलेल्या नियमशास्त्रात, त्याला गोरगरिबांविषयी वाटणारी काळजी व्यक्त झाली. उदाहरणार्थ, नियमशास्त्रात अनाथांची व विधवांची काळजी घेतली जाईल या दृष्टीने तरतूद करण्यात आली होती. (अनुवाद २४:१७-२१) अशा परिस्थितीत असलेल्या कुटुंबांचे जीवन किती खडतर असते हे ओळखून यहोवा स्वतः त्यांचा पित्यासमान न्यायाधीश व संरक्षक बनला. (अनुवाद १०:१७, १८) त्याने इस्राएल लोकांना ताकीद दिली की जर त्यांनी असहाय स्त्रियांवर व मुलांवर अत्याचार केला तर अशा निर्बलांचा आक्रोश तो ऐकेल. निर्गम २२:२२-२४ येथे सांगितल्याप्रमाणे त्याने म्हटले की ‘माझा राग भडकेल.’ क्रोध हा देवाच्या प्रमुख गुणांपैकी एक नसला तरीसुद्धा, कोणी मुद्दामहून अन्याय करतो आणि तेसुद्धा असहाय लोकांना जाचतो तेव्हा देवाचा नीतिमान क्रोध अवश्य भडकतो.—स्तोत्र १०३:६.
१४. यहोवाच्या निःपक्षपातीपणाचा एक खरोखर उल्लेखनीय पुरावा कोणता आहे?
१४ न्यायीपण प्रदर्शित करण्याचा तिसरा मार्ग अनुवाद १०:१७ यावरून कळतो. तेथे बायबल आपल्याला आश्वासन देते की यहोवा “कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाच घेत नाही.” सत्तेवर असलेल्या व प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे अनेक लोक समोरच्या व्यक्तीची धनसंपत्ती किंवा बाह्य स्वरूप पाहून न्याय करण्यास प्रवृत्त होतात; पण यहोवा असा नाही. तो कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह बाळगत नाही किंवा पक्षपात करत नाही. त्याच्या निःपक्षपाती वृत्तीचा एक अत्यंत उल्लेखनीय पुरावा म्हणजे: त्याचे खरे उपासक बनण्याची व सार्वकालिक जीवन मिळवण्याची संधी केवळ एका निवडक श्रेष्ठ वर्गासाठी राखून ठेवलेली नाही. उलट प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ म्हणते: “देव पक्षपाती नाही . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” एका व्यक्तीची सामाजिक स्थिती, तिच्या त्वचेचा रंग, किंवा तिचे राष्ट्र कोणतेही असो, तिला देखील ही आशा आहे. ही न्यायीपणाची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती नाही का? निश्चितच, यहोवाचे न्यायीपण अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतल्यामुळे आपण त्याच्या अधिक जवळ जातो.
‘अहाहा, देवाची बुद्धी किती अगाध आहे!’
१५. बुद्धी म्हणजे काय आणि यहोवा कशाप्रकारे बुद्धीने व्यवहार करतो?
१५ रोमकर ११:३३ येथे सांगितल्याप्रमाणे प्रेषित पौल असे म्हणण्यास प्रेरित झाला: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे!” यहोवाच्या अगाध बुद्धीच्या निरनिराळ्या पैलूंविषयी आपण मनन करतो तेव्हा आपण विस्मयचकित होतो. पण या गुणाची व्याख्या कशी करता येईल? बुद्धी म्हणजे ज्ञान, विचारशक्ती व समज एकत्र आणून त्यांचा उपयोग करणे. यहोवा आपल्या व्यापक ज्ञानाचा व सखोल समजशक्तीचा उपयोग करण्याद्वारे नेहमी सर्वात उत्तम निर्णय घेतो आणि आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या उत्तम मार्गाने ते निर्णय अंमलात आणतो.
१६, १७. यहोवाची निर्मितीकृत्ये त्याच्या अगाध बुद्धीची कशी ग्वाही देतात? एक उदाहरण द्या.
१६ यहोवाच्या अगाध बुद्धीचे काही विशिष्ट पुरावे कोणते आहेत? स्तोत्र १०४:२४ म्हणते: “हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” यहोवाने निर्माण केलेल्या विविध वस्तूंविषयी आपण जितके अधिक शिकतो तितकेच आपण त्याच्या बुद्धीने विस्मित होतो. शास्त्रज्ञांनाही यहोवाच्या निर्मितीकृत्यांचा अभ्यास करण्याद्वारे बरेच काही शिकण्यास मिळाले आहे! अभियांत्रिकी शास्त्रात तर बायोमिमेटिक्स नावाचा एक खास विभाग आहे ज्यात सृष्टीत आढळणाऱ्या नमुन्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो.
१७ उदाहरणार्थ, तुम्ही कोळ्याचे जाळे पाहिले असेल. त्याची सुंदर रचना पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. खरोखर कोळ्याच्या जाळ्याची विस्मयकारक रचना असते. त्याचे नाजूक दिसणारे धागे, प्रमाणात पोलादापेक्षा मजबूत व एका बुलेटप्रूफ पोषाखापेक्षा कणखर असतात. कशाप्रकारे? कोळ्याच्या जाळ्याचा आकार वाढवून मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्याइतका केला अशी कल्पना करा. हे जाळे इतके मजबूत असेल की पूर्ण वेगाने उडत असलेल्या प्रवासी विमानालाही ते रोखू शकेल! होय, यहोवाने सर्व गोष्टी “सूज्ञतेने” रचल्या आहेत.
१८. यहोवाने आपले वचन, बायबल याचे लेखन करण्याकरता मानवांचा उपयोग केला यावरून त्याची बुद्धी कशाप्रकारे दिसून येते?
१८ यहोवाच्या बुद्धीचा सर्वात श्रेष्ठ पुरावा त्याचे वचन बायबल यात सापडतो. त्यात सापडणारे मार्गदर्शन खरोखर आपल्याला जीवनाचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे दाखवतात. (यशया ४८:१७) पण यहोवाची अतुलनीय बुद्धी, बायबल ज्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे त्यावरूनही दिसून येते. ती कशी? आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, यहोवाने आपल्या वचनाचे लेखन करण्याकरता मानवांचा उपयोग करायचे ठरवले. जर त्याने आपले प्रेरित वचन देवदूतांकडून लिहून घेतले असते तर ते आज आहे तितकेच सुवाच्य ठरले असते का? देवदूतांनी आपल्या उच्च दृष्टिकोनातून यहोवाचे चित्र रेखाटले असते आणि त्याच्याबद्दलच्या स्वतःच्या भक्तिभावना व्यक्त केल्या असत्या यात शंका नाही. पण त्या परिपूर्ण आत्मिक प्राण्यांच्या, ज्यांचे ज्ञान, अनुभव व ताकद आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत, त्यांच्या भावना आपण खरोखर समजू शकलो असतो का?—इब्री लोकांस २:६, ७.
१९. मानवी लेखकांचा उपयोग केल्यामुळेच बायबलचा संदेश अतिशय जिवंत व आकर्षक वाटतो हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?
१९ मानवी लेखकांचा उपयोग केल्यामुळे आपल्याला बायबलचा संदेश अतिशय जिवंत व आकर्षक वाटतो. त्याचे लेखक आपल्यासारख्याच भावना असलेले पुरुष होते. अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांनाही आपल्यासारख्याच परीक्षांना व दबावांना तोंड द्यावे लागले. काही वेळा त्यांनी स्वतःच्या भावनांचे व कठीण प्रसंगांचे थेट वर्णन केले. (२ करिंथकर १२:७-१०) त्यांनी ज्याप्रकारे लिहिले त्याप्रकारे कोणताही देवदूत लिहू शकला नसता. उदाहरणार्थ, स्तोत्र ५१ यात लिहिलेल्या दाविदाच्या शब्दांकडे लक्ष द्या. यातील उपरिलेखनानुसार दाविदाने गंभीर पाप केल्यानंतर हे स्तोत्र रचले. त्याने आपल्या मनातल्या भावना भरभरून लिहिल्या, आपल्या पापाबद्दल मनस्वी दुःख व्यक्त केले आणि देवाकडे क्षमेची भीक मागितली. २ व ३ या वचनांत असे म्हटले आहे: “मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.” ५ व्या वचनाकडेही लक्ष द्या: “पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” १७ व्या वचनात तो म्हणतो: “देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” लेखकाची उद्विग्नता तुम्हालाही जाणवत नाही का? अशा भावना एका अपरिपरिपूर्ण मनुष्याशिवाय कोण व्यक्त करू शकला असता?
२०, २१. (अ) मानवी लेखकांचा उपयोग करूनही बायबलमध्ये यहोवाची बुद्धी सामावलेली आहे असे का म्हणता येते? (ब) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
२० अशा अपरिपूर्ण मानवांचा उपयोग करण्याद्वारे यहोवाने अगदी आपल्याला ज्याची गरज आहे तेच पुरवले, अर्थात—एक असा अहवाल जो “परमेश्वरप्रेरित” तर आहे पण ज्यात मानवी दृष्टिकोनही आहे. (२ तीमथ्य ३:१६) होय, त्या लेखकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले. अशाप्रकारे त्यांनी स्वतःची नव्हे तर यहोवाची बुद्धी प्रकट केली. ही बुद्धी पूर्णपणे भरवशालायक आहे. ती आपल्या बुद्धीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे, म्हणूनच यहोवा प्रेमळपणे आपल्याला असे आर्जवतो: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) या सूज्ञ सल्ल्याचे पालन केल्याने आपण सर्व बुद्धीचा स्रोत असलेल्या आपल्या देवाच्या अधिक जवळ येतो.
२१ यहोवावर प्रेम करण्यास आपल्याला प्रवृत्त करणारा त्याचा सर्वात मोहक गुण म्हणजे प्रीती. यहोवाने कशाप्रकारे ही प्रीती व्यक्त केली आहे हे पुढच्या लेखात विचारात घेतले जाईल.
तुम्हाला आठवते का?
• आपल्याला यहोवासोबत जवळीक साधता यावी म्हणून त्याने कोणती पावले उचलली आहेत?
• यहोवाच्या निर्मिती सामर्थ्याची व त्याच्या संरक्षक सामर्थ्याची काही उदाहरणे कोणती आहेत?
• यहोवा कशाप्रकारे न्यायीपणाने व्यवहार करतो?
• यहोवाची बुद्धी त्याच्या सर्व निर्मितीकृत्यांवरून तसेच बायबलमधून कशाप्रकारे दिसून येते?
[१० पानांवरील चित्र]
मेंढराला उराशी घेणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे यहोवा अतिशय कोमलतेने आपल्या मेंढरांची काळजी वाहतो
[१३ पानांवरील चित्र]
बायबल ज्याप्रकारे लिहिण्यात आले त्यावरून यहोवाची बुद्धी दिसून येते