वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 १०/१ पृ. ३०-३१
  • “सुंदर रानशेळी”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सुंदर रानशेळी”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 १०/१ पृ. ३०-३१

“सुंदर रानशेळी”

शेळी, आणि सुंदर? शेळ्या उपयोगी असतात, त्यांचे मांस चविष्ट असते, त्या दूधही देतात. शिवाय, त्यांना काही खास खाद्य द्यावे लागत नाही, त्या बिचाऱ्‍या दिसेल ते खातात. ही सर्व तारीफ ठीक आहे. पण त्यांना सुंदर म्हणणे जरा विचित्रच वाटते.

बायबलमध्ये मात्र, पत्नीचे वर्णन करण्याकरता “रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी” असे रूपक वापरले आहे. (नीतिसूत्रे ५:१८, १९) नीतिसूत्राचे पुस्तक लिहिणारा राजा शलमोन इस्राएलच्या वन्यजीवांचा चाहता होता. त्यामुळेच कदाचित त्याने या रूपकाचा उपयोग केला असावा. (१ राजे ४:३०-३३) आपला पिता दावीद याच्याप्रमाणे कदाचित शलमोनानेही, मृत समुद्राच्या किनाऱ्‍यालगतच्या एन-गेदी क्षेत्रात सर्रास दिसणाऱ्‍या रानशेळ्यांचे बऱ्‍याचदा निरीक्षण केले असावे.

जुडिअन वाळवंटाच्या जवळपास राहणाऱ्‍या रानशेळ्यांचे कळप एन-गेदीच्या झऱ्‍याजवळ कायम येत असतात. कारण या वाळवंटात फक्‍त ही एकच पाणवट आहे, जेथे बाराही महिने पाणी असते. त्यामुळे कित्येक शतकांपासून रानशेळ्यांचे हे आवडते ठिकाण राहिले आहे. किंबहुना, एन-गेदी या नावाचा अर्थच कदाचित “करड्याचा झरा” असा होतो. या नावावरूनच कळते की बकऱ्‍यांची पिले या भागात नेहमी दिसत असावीत. याच एन-गेदीच्या रानात राजा दावीद, राजा शौलापासून आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसला होता. त्याला फरार झालेल्या व्यक्‍तीप्रमाणे “रानबकऱ्‍यांच्या खडकांवर” आश्रय घ्यावा लागला होता.—१ शमुवेल २४:१, २.

अजूनही एन-गेदीच्या परिसरात गेल्यास, पाण्याकडे जाणाऱ्‍या बोकडाच्या मागे मागे खडकाळ दरीतून आपला तोल सांभाळत नाजूकपणे चालणारी शेळी किंवा रानबकरी तुम्हाला हमखास दिसेल. ते दृश्‍य पाहून कदाचित एका निष्ठावान पत्नीची तुलना रानशेळीबरोबर का केली आहे याची तुम्हाला कल्पना येईल. तिचा शांत स्वभाव आणि नाजूक चाल देखील स्त्रीसुलभ गुणांचे वर्णन करतात. रानशेळीच्या नाजूक सहजसुंदरतेमुळेच तिला “सुंदर” म्हटले आहे.a

पण रानशेळीला नाजूक असण्यासोबत कणखर देखील असावे लागते. यहोवाने ईयोबाला म्हटले होते, की रानशेळ्या डोंगरकपारींमध्ये आपल्या पिल्लांना जन्म देतात. तेथे जाणे तसेच खाद्य मिळणे कठीण असते आणि हवामानही टोकाचे असते. (ईयोब ३९:१) अशा खडतर परिस्थितीत रानशेळी आपल्या पिलांची काळजी घेते; ती त्यांना डोंगरकडा चढण्यात आणि खडकांमधून चपळाईने उड्या मारण्यात आपल्याइतकीच तरबेज बनवते. शत्रूंपासूनही ती त्यांचे मोठ्या शूरतेने संरक्षण करते. असे पाहण्यात आले, की एकदा एक रानशेळी, आपल्या पिलाला वाचवायला अर्धा तास एका घारीशी झुंज देत होती. तिचे पिलू तिच्या पोटाखाली सुरक्षित उभे होते.

कित्येक ख्रिस्ती पत्नींना आणि मातांनाही आपल्या मुलांचे खडतर परिस्थितीत पालनपोषण करावे लागते. रानशेळ्यांप्रमाणे त्याही जीव ओतून, निःस्वार्थपणे आपल्या मुलांचे संगोपन करण्याची देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करत असतात. त्या धैर्याने आपल्या मुलांचे आध्यात्मिक धोक्यांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा, अशा पत्नींना व मातांना रानशेळ्यांची उपमा देऊन शलमोन त्यांना दुर्बळ ठरवत नव्हता. उलट हे रूपक वापरून तो स्त्रीच्या आंतरिक सौंदर्याकडे अर्थात तिच्या आध्यात्मिक गुणांकडे लोकांचे लक्ष वेधतो जे खडतर परिस्थितीतही उठून दिसतात.

[तळटीप]

a द न्यू ब्राऊन-ड्रायव्हर-ब्रिग्स-जेसेनियस हिब्रू ॲण्ड इंग्लिश लेक्सिकन या शब्दकोशानुसार, या संदर्भात “सुंदर” असे भाषांतर केलेल्या केन या इब्री शब्दाचा अर्थ ‘सहजसुंदर, नाजुक स्वरूप’ असा होतो.

[३०, ३१ पानांवरील चित्रे]

देवाने दिलेली जबाबदारी पार पाडत असताना ख्रिस्ती पत्नी आणि मातेमधील सुरेख आध्यात्मिक गुण दिसून येतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा