आपल्याला मिळालेल्या समृद्ध वारशाची—तुम्ही कदर बाळगता का?
“माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.”—मत्तय २५:३४.
१. लोकांना वारशाने काय काय मिळते?
सर्व मानवांना काही न काही वारशाने मिळालेले आहे. काहींना त्यांच्या वाडवडिलांनी जमवलेली संपत्ती, मालमत्ता वारशाने मिळते. काहींच्या वाट्याला मात्र दारिद्र्य येते. काहींना त्यांच्या जुन्या पिढीकडून विशिष्ट जातीबद्दलची घृणा जणू वारशाने मिळालेली असते. जुन्या पिढीला आलेल्या वाईट अनुभवांमुळे पुढच्या पिढ्या देखील त्या विशिष्ट जातीची घृणा करू लागतात. मनुष्य या नात्याने आपल्या सर्वांना देखील एक समान वारसा मिळालेला आहे. पहिला मनुष्य आदाम याजकडून आपल्या सर्वांमध्ये पाप आले आहे. हा पापाचा वारसा मिळाल्यामुळे आपल्या सर्वांना मृत्यू येतो.—उपदेशक ९:२, १०; रोमकर ५:१२.
२, ३. आदाम व हव्वा यांच्या संततीला कशाप्रकारचे जीवन वारशाने मिळण्याची यहोवाने सुरवातीलाच तरतूद केली होती, आणि त्यांना ते जीवन का मिळू शकले नाही?
२ आपला स्वर्गीय पिता यहोवा अतिशय प्रेमळ देव आहे. सर्व मानवांना एक परिपूर्ण सार्वकालिक जीवन वारशाने मिळावे या इच्छेने त्याने आपल्या पहिल्या मातापित्याला अर्थात, आदाम व हव्वेला परिपूर्ण, पापरहित शरीर दिले होते. ही पृथ्वी देखील यहोवा देवाने मानवांना दिली होती. (स्तोत्र ११५:१६) एक छोटासा नमुना म्हणून एदेनची सुंदर वाटिका त्याने मानवांना राहण्याकरता दिली. हळूहळू त्यांना सबंध पृथ्वी एदेन वाटिकेसारखी बनवायची होती. ही आनंददायक, पण आव्हानात्मक कामगिरी यहोवाने पहिल्या मानव दांपत्यावर सोपवली होती. त्यांना मुले उत्पन्न करायची होती, या पृथ्वीची मशागत करायची होती, वनस्पती आणि प्राणी विश्वाची काळजी घ्यायची होती आणि अशाप्रकारे सबंध पृथ्वीवर एखाद्या सुंदर बगीच्यासारखी परिस्थिती आणायची होती. (उत्पत्ति १:२८; २:८, ९, १५) त्यांची मुले देखील या कामात त्यांना मदत करू शकत होती. आदाम व हव्वेला आपल्या मुलांना किती अद्भुत वारसा देण्याची संधी होती!
३ पण हे सर्व घडण्याकरता आदाम व हव्वा यांचा, तसेच त्यांच्या मुलांचा देखील देवासोबत एक चांगला नातेसंबंध असणे महत्त्वाचे होते. यहोवा देवाने इतके सर्वकाही दिल्यानंतर त्याच्यावर प्रेम करण्याचे व त्याच्या आज्ञेत राहण्याचे आदाम व हव्वेचे खरे तर कर्तव्य होते. पण यहोवाने दिलेल्या देणग्यांची त्यांनी कदर केली नाही. त्यांनी त्याची आज्ञा मोडली. त्यामुळे त्यांना मिळालेले परिपूर्ण जीवन ते आपल्या संततीला वारशात देऊ शकले नाहीत. त्यांचे सुंदर निवासस्थान आणि देवाने त्यांच्याकरता राखून ठेवलेले सर्व अद्भुत आशीर्वाद ते गमावून बसले.—उत्पत्ति २:१६, १७; ३:१-२४.
४. आदामाने गमवलेला वारसा आपण कशाप्रकारे मिळवू शकतो?
४ पण आदामाने गमवलेला वारसा त्याच्या संततीला मिळावा म्हणून यहोवाने दयाळूपणे तरतूद केली. कशाप्रकारे? देवाच्या नियुक्त वेळी त्याच्या स्वतःच्या पुत्राने, अर्थात येशू ख्रिस्ताने आदामाच्या संततीकरता आपले परिपूर्ण जीवन बलिदान केले. आपल्या जीवनाचे मोल देऊन ख्रिस्ताने त्या सर्वांना विकत घेतले. पण येशूने बलिदान दिल्यामुळे, मानवांना काही न करता परिपूर्ण जीवनाचा वारसा मिळेल असा याचा अर्थ नाही. हा वारसा मिळवू इच्छिणाऱ्यांना आधी देवाची स्वीकृती मिळणे आवश्यक आहे. ही स्वीकृती मिळण्यासाठी त्यांना येशूच्या बलिदानामुळे शक्य झालेल्या प्रायश्चित्तावर विश्वास ठेवून, हा विश्वास देवाच्या आज्ञेत राहण्याद्वारे प्रकट करणे आवश्यक आहे. (योहान ३:१६, ३६; १ तीमथ्य २:५, ६; इब्री लोकांस २:९; ५:९) तुम्हाला यहोवाच्या या तरतुदीबद्दल कदर वाटते का? तुमच्या प्रत्येक कृतीवरून हे दिसून येते का?
अब्राहामाने हाती दिलेला वारसा
५. यहोवासोबत असलेल्या नातेसंबंधाबद्दल कदर असल्याचे अब्राहामाने कशाप्रकारे दाखवले?
५ या पृथ्वीसंबंधी आपला उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी यहोवाने अब्राहामाला काही खास आशीर्वाद दिले. यहोवाने आपल्या या विश्वासू सेवकाला त्याचे राष्ट्र सोडून देव दाखवील त्या देशात जाण्याची आज्ञा दिली. अब्राहामाने यहोवाच्या आज्ञेचे आनंदाने पालन केले. त्या देशात आल्यानंतर यहोवाने अब्राहामाला सांगितले की त्या देशाचे वतन त्याला स्वतःला नव्हे तर त्याच्या संततीला मिळेल. (उत्पत्ति १२:१, २, ७) यावर अब्राहामाची काय प्रतिक्रिया होती? यहोवाने प्रतीज्ञा दिलेल्या देशाचा वारसा आपल्या संततीला मिळावा म्हणून, तो सांगेल तेथे आणि सांगेल त्याप्रमाणे कार्य करण्यास अब्राहाम तयार होता. अशाप्रकारे अब्राहामाने एका परक्या देशात १०० वर्षांपर्यंत, म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत यहोवाची सेवा केली. (उत्पत्ति १२:४; २५:८-१०) तुम्ही अब्राहामाच्या ठिकाणी असता तर तुम्हीही असेच केले असते का? यहोवाने अब्राहामाला आपला “मित्र” म्हटले.—यशया ४१:८.
६. (अ) आपल्या पुत्राचीही गय न करण्याद्वारे अब्राहामाने काय दाखवले? (ब) अब्राहामाला आपल्या संततीला देण्याकरता कोणता मोलवान असा वारसा प्राप्त झाला होता?
६ अब्राहामाला अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर इसहाक झाला होता; साहजिकच इसहाकवर तो अतोनात प्रेम करत होता. अब्राहामाचा हा लाडका मुलगा तरुण झाला तेव्हा यहोवाने त्याला त्याचा बली देण्याची आज्ञा दिली. देव स्वतः मानवजातीकरता कशाप्रकारे आपल्या पुत्राचे बलिदान देईल हे प्रदर्शित करण्यासाठी यहोवाने आपल्याला ही आज्ञा दिली आहे याची अब्राहामाला कल्पना नव्हती. पण तरीसुद्धा त्याने यहोवाची आज्ञा पाळली. तो इसहाकचा वध करणार इतक्यात यहोवाच्या दूताने त्याला अडवले. (उत्पत्ति २२:९-१४) यहोवाने आधीच सांगितले होते की त्याने अब्राहामाला दिलेली सर्व अभिवचने इसहाकाद्वारेच पूर्ण होतील. त्यामुळे गरज पडल्यास देव इसहाकाला मृतांतूनही पुन्हा जिवंत करील याची अब्राहामाला खात्री होती हेच यावरून दिसून येते. यापूर्वी कधीही असे घडले नव्हते तरीही अब्राहामाला हा विश्वास होता. (उत्पत्ति १७:१५-१८; इब्री लोकांस ११:१७-१९) यहोवाच्या आज्ञेसाठी अब्राहामाने आपल्या पुत्राचीही गय केली नाही, त्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला की: “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१५-१८) यहोवाच्या या प्रतिज्ञेवरून स्पष्ट झाले की उत्पत्ति ३:१५ येथे उल्लेख करण्यात आलेला मशीहा अब्राहामाच्या कुळातून येईल. अब्राहामाला आपल्या संततीला देण्याकरता किती मोलवान असा वारसा प्राप्त झाला होता!
७. अब्राहाम, इसहाक व याकोब यांनी आपल्याला मिळालेल्या वारशाची कदर असल्याचे कशाप्रकारे दाखवले?
७ यहोवा आपला उद्देश कशाप्रकारे पूर्णत्वास नेत आहे याबद्दल अब्राहामाला माहिती नव्हती; “त्याच वचनाचे [प्रतिज्ञेचे] सहभागी वारीस” अर्थात, त्याचा पुत्र इसहाक आणि त्याचा नातू याकोब यांना देखील याबद्दल कल्पना नव्हती. पण त्या सर्वांना यहोवावर भरवसा होता. ते त्या देशातील कोणत्याही शहरात कायमचे वसले नाहीत कारण ते एका अधिक चांगल्या देशाची उत्कंठा बाळगत होते. ‘[“खरे,” NW] पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची ते वाट पाहत होते.’ (इब्री लोकांस ११:८-१०, १३-१६) पण अब्राहामाद्वारे मिळालेल्या अनमोल वारशाची कदर त्याच्या सर्वच वंशजांनी बाळगली नाही.
काहींनी वारशाला तुच्छ लेखले
८. एसावने आपल्याला मिळालेल्या वारशाला कशाप्रकारे तुच्छ लेखले?
८ इसहाकाचा थोरला पुत्र एसाव याने आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचे महत्त्व ओळखले नाही. त्याला आध्यात्मिक गोष्टींची कदर नव्हती. एकदा त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याने आपल्या भावाला, याकोबाला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. कशाच्या मोबदल्यात? फक्त भाकर व मसुरीच्या वरणाच्या मोबदल्यात! (उत्पत्ति २५:२९-३४; इब्री लोकांस १२:१४-१७) देवाने अब्राहामाला दिलेल्या प्रतीज्ञा ज्या राष्ट्राच्या माध्यमाने पूर्ण होणार होत्या ते राष्ट्र याकोबापासून तयार झाले. यहोवाने याकोबाचे नाव बदलून इस्राएल ठेवले. या राष्ट्राला मिळालेल्या वारशासोबत त्यांना कोणते खास आशीर्वाद मिळाले?
९. याकोबाच्या वंशजांना, अर्थात इस्राएल राष्ट्राला मिळालेल्या आध्यात्मिक वारशामुळे कोणती सुटका अनुभवायला मिळाली?
९ दुष्काळ पडल्यामुळे याकोब व त्याच्या घराण्याला मिसर देशात जावे लागले. तेथे त्यांची संख्या खूप वाढली, पण ते गुलाम बनले. अब्राहामासोबत बांधलेली वाचा यहोवा विसरला नव्हता. त्याच्या नियुक्त वेळी, त्याने इस्राएल लोकांना गुलामीतून सोडवले आणि “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशांत,” अर्थात अब्राहामाला प्रतीज्ञा केलेल्या देशात आपण त्यांना नेणार आहोत असे सांगितले.—निर्गम ३:७, ८; उत्पत्ति १५:१८-२१.
१०. सीनाय पर्वतावर इस्राएल राष्ट्राच्या वारशाच्या संदर्भात आणखी काय घडले?
१० प्रतीज्ञात देशाकडे जात असताना यहोवाने इस्राएल राष्ट्राला सीनाय पर्वताच्या पायथ्याशी एकत्रित केले. तेथे तो त्यांना म्हणाला: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्गम १९:५-६) सर्व लोकांनी एकसाथ स्वखुषीने यास होकार दिल्यानंतर यहोवाने त्यांना आपले नियमशास्त्र दिले. हा एक खास आशीर्वाद होता, कारण यहोवाने इतर कोणत्याही राष्ट्राला नियमशास्त्र दिले नव्हते.—स्तोत्र १४७:१९, २०.
११. इस्राएल राष्ट्राला मिळालेल्या आध्यात्मिक वारशात कोणत्या मोलवान सुहक्कांचा समावेश होता?
११ इस्राएलच्या नुकत्याच जन्माला आलेल्या राष्ट्राला किती समृद्ध असा वारसा मिळाला होता! ते एकच खऱ्या देवाचे उपासक होते. त्यांना मिसर देशाच्या गुलामीतून सोडवण्यात आले होते आणि सीनाय पर्वतावर नियमशास्त्र दिले जाताना अनेक अद्भुत चमत्कार त्यांना पाहायला मिळाले होते. संदेष्ट्यांकडून मिळालेल्या ‘देवाच्या वचनांमुळे’ त्यांचा आध्यात्मिक वारसा अधिकच समृद्ध झाला होता. (रोमकर ३:१, २) यहोवाने त्यांना आपले साक्षीदार म्हटले होते. (यशया ४३:१०-१२) त्यांच्याच राष्ट्रातून मशीहा येणार होता. मोशेच्या नियमशास्त्रात मशीहाच्या येण्याविषयी सूचित करण्यात आले होते. नियमशास्त्रच मशीहाची ओळख पटवण्यास आणि मशीहाची गरज का आहे हे समजण्यास त्यांना मदत करणार होते. (गलतीकर ३:१९, २४) शिवाय मशीहासोबत याजकांचे राज्य व पवित्र राष्ट्र या नात्याने ते कार्य करणार होते.—रोमकर ९:४, ५.
१२. इस्राएल राष्ट्राने प्रतिज्ञात देशात प्रवेश केला तरीसुद्धा त्यांना काय अनुभवता आले नाही? का?
१२ यहोवाने इस्राएल राष्ट्राला दिलेले वचन पूर्ण केले. त्याने त्यांना प्रतिज्ञात देशात नेले. पण प्रेषित पौलाने नंतर खुलासा केल्याप्रमाणे, त्यांच्या अविश्वासूपणामुळे या देशात त्यांना कायमचा “विसावा” मिळू शकला नाही. संपूर्ण राष्ट्र या नात्याने ते ‘देवाच्या विसाव्यात’ प्रवेश करू शकले नाहीत कारण आदाम व हव्वेला निर्माण केल्यानंतर सुरू झालेल्या देवाच्या विसाव्याच्या दिवसाचा खरा उद्देश ते समजू शकले नाहीत व त्यानुसार त्यांनी कार्य केले नाही.—इब्री लोकांस ४:३-१०.
१३. इस्राएल राष्ट्राने त्यांच्या आध्यात्मिक वारशाची कदर न बाळगल्यामुळे त्यांना कशापासून वंचित करण्यात आले?
१३ मशीहासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात सहभाग घेणाऱ्या याजक राज्याची आणि पवित्र राष्ट्राची संख्या शारीरिक इस्राएल राष्ट्रातूनच भरून काढता आली असती. पण त्यांनी या अनमोल वारशाची कदर बाळगली नाही. मशीहा आला तेव्हा शारीरिक इस्राएलापैकी फार कमी जणांनी त्याला स्वीकारले. त्यामुळे याजकांच्या राज्यात त्यांच्यापैकी फार कमी जणांचा समावेश करण्यात आला. देवाचे राज्य शारीरिक इस्राएलकडून काढून घेण्यात आले व “जी प्रजा फळ देईल तिला” ते देण्यात आले. (मत्तय २१:४३) ही प्रजा किंवा हे नवे राष्ट्र कोणते आहे?
स्वर्गातील वतन
१४, १५. (अ) येशूच्या मृत्यूनंतर, अब्राहामाच्या ‘संततीद्वारे’ पृथ्वीवरील सर्व कुळे कशाप्रकारे आशीर्वादित झाली? (ब) ‘देवाच्या इस्राएलातील’ सदस्यांना कोणते वतन मिळते?
१४ ज्या नव्या राष्ट्राला राज्य देण्यात आले ते होते ‘देवाचे इस्राएल.’ यात येशू ख्रिस्ताच्या १,४४,००० अनुयायांचा समावेश आहे ज्यांना आत्म्याने अभिषिक्त करण्यात आले आहे. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण ५:९, १०; १४:१-३) या १,४४,००० जणांपैकी केवळ काहीजण यहुदी वंशाचे होते, अधिकांश जण इतर राष्ट्रांचे होते. अशाप्रकारे, तुझ्या “संततीच्या द्वारे” पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील ही अब्राहामाला केलेली यहोवाची प्रतीज्ञा पूर्ण होण्यास सुरवात झाली. (प्रेषितांची कृत्ये ३:२५, २६; गलतीकर ३:८, ९) या भविष्यवाणीच्या सुरवातीच्या पूर्णतेत, अन्य राष्ट्रांच्या लोकांनाही पवित्र आत्म्याने अभिषिक्त करण्यात आले आणि अशारितीने ते यहोवा देवाचे आध्यात्मिक पुत्र, आणि येशू ख्रिस्ताचे बंधू बनले. अशारितीने ते प्रतीज्ञा केलेल्या ‘संततीचे’ द्वितीय भाग बनले.—गलतीकर ३:२८, २९.
१५ आपल्या मृत्यूआधी येशूने त्या नव्या राष्ट्राच्या भावी यहुदी सदस्यांशी एक नवी वाचा बांधली. आपले रक्त सांडून येशूने ही वाचा कायम केली. ती वाचा कायम करणाऱ्या येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे या वाचेत सामील केलेल्यांना ‘सर्वकाळाकरता पूर्ण’ केले जाणार होते. (इब्री लोकांस १०:१४-१८, पं.र.भा.) त्यांना ‘नीतिमान ठरवले’ जाणार होते व त्यांच्या पापांची क्षमा केली जाणार होती. (१ करिंथकर ६:११) अशाप्रकारे ते आदाम पाप करण्याआधी जसा परिपूर्ण होता तसे होणार होते. पण ते अभिषिक्त जण पृथ्वीवरील परादीसात राहणार नाहीत. येशूने म्हटले होते की तो त्यांच्याकरता स्वर्गात जागा तयार करेल. (योहान १४:२, ३) त्यांच्याकरता ‘स्वर्गात राखून ठेवलेले वतन’ मिळवण्याकरता ते पृथ्वीवर जगण्याची इच्छा त्यागतात. (१ पेत्र १:३, ४, ५) स्वर्गात ते काय करतील? येशूने सांगितले: “जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो.”—लूक २२:२९.
१६. अभिषिक्त ख्रिश्चनांना कोणते अद्भूत कार्य करण्याची संधी मिळेल?
१६ ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणारे इतर कार्यांसोबतच यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला नाकारणाऱ्यांचे या पृथ्वीवरून नामोनिशाण मिटवून टाकण्यास हातभार लावतील. (प्रकटीकरण २:२६, २७) अब्राहामाच्या आध्यात्मिक संततीचे दुय्यम सदस्य या नात्याने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना परिपूर्ण जीवनाचा आशीर्वाद देण्यातही सहभागी होतील. (रोमकर ८:१७-२१) त्यांना किती अमूल्य असे वतन प्राप्त होईल!—इफिसकर १:१६-१८.
१७. या पृथ्वीवर असताना देखील अभिषिक्त ख्रिश्चनांना कोणते आध्यात्मिक आशीर्वाद लाभले आहेत?
१७ पण येशूच्या अभिषिक्त अनुयायांना आजही अनेक अद्भूत आध्यात्मिक आशीर्वाद लाभले आहेत. येशूने त्यांना एकच खरा देव यहोवा याच्याविषयी इतर कोणाजवळही नाही अशाप्रकारचे ज्ञान व समज दिली आहे. (मत्तय ११:२७; योहान १७:३, २६) त्याने त्यांना यहोवावर ‘भरवसा ठेवण्याचा’ काय अर्थ होतो आणि त्याला आज्ञाधारक राहण्यात काय सामील आहे हे शिकवले आणि स्वतःचा उत्तम आदर्श त्यांच्यापुढे मांडला. (इब्री लोकांस २:१३; ५:७-९) येशूने त्यांना देवाच्या उद्देशाविषयीचे सत्य कळवले आणि या सत्याची अधिक सखोल समज त्यांना देण्याकरता पवित्र आत्मा पाठवण्याचेही त्यांना अभिवचन दिले. (योहान १४:२४-२६) त्याने त्यांच्या मनावर देवाच्या राज्याचे महत्त्व बिंबवले. (मत्तय ६:१०, ३३) तसेच येशूने त्यांना यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याचे शिष्य बनवण्याचे कार्य देखील सोपवले.—मत्तय २४:१४; २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८.
एका मोठ्या लोकसमुदायाकरता अनमोल वारसा
१८. अब्राहामाच्या ‘संततीद्वारे’ सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील ही यहोवाने केलेली प्रतीज्ञा आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे?
१८ आध्यात्मिक इस्राएलाची, म्हणजेच राज्य वारसांच्या ‘लहान कळपाची’ संख्या बहुधा पूर्ण झाली आहे. (लूक १२:३२) कित्येक दशकांपासून यहोवाने एक मोठा लोकसमुदाय एकत्रित करण्यास सुरवात केली आहे. अशाप्रकारे तुझ्या ‘संततीद्वारे’ पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील ही यहोवाने अब्राहामाला दिलेली प्रतीज्ञा मोठ्या प्रमाणावर पूर्ण होत आहे. हे आशीर्वादित जन देखील यहोवाची पवित्र सेवा करतात आणि त्यांना देवाचा कोकरा, अर्थात येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवल्यानेच तारण मिळू शकते याची जाणीव आहे. (प्रकटीकरण ७:९, १०) या आशीर्वादित समुदायात सामील होण्याचे आज यहोवा सर्वांना निमंत्रण देत आहे. तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे का?
१९. सर्व राष्ट्रांतील आशीर्वादित ठरलेल्यांना कोणते वतन मिळेल?
१९ लहान कळपात नसलेल्यांना यहोवा देव कोणते वतन देईल? नाही त्यांचे वतन स्वर्गाचे नाही. आदाम आपल्या संततीला जो वारसा देण्यास अपेशी ठरला तो वारसा; अर्थात जगव्याप्त परादीसात परिपूर्ण सार्वकालिक जीवनाचा वारसा यहोवा त्यांना देईल. त्या जगात ‘मरण, शोक, रडणे व कष्ट ही नसतील.’ (प्रकटीकरण २१:४) तेव्हा देवाचे प्रेरित वचन तुम्हाला हे आव्हान करत आहे: “परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल; म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:३, ४, १०, ११, २९.
२०. अभिषिक्त ख्रिश्चनांना मिळालेला आध्यात्मिक वारसा ‘दुसऱ्या मेंढरांनाही’ कशाप्रकारे प्राप्त झाला आहे?
२० येशूच्या ‘दुसऱ्या मेंढरांना’ त्याच्या स्वर्गीय राज्यात पृथ्वीचे वतन मिळेल. (योहान १०:१६अ) ते स्वर्गात नसतील, पण अभिषिक्त जनांना मिळणारे बरेचसे आध्यात्मिक आशीर्वाद त्यांना देखील मिळतात. अभिषिक्त जणांच्या सामुहिक ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने त्यांना देवाच्या वचनातील अनेक अद्भुत प्रतीज्ञांची समज प्राप्त झाली आहे. (मत्तय २४:४५-४७; २५:३४) अभिषिक्त जनांसोबत ते एकच खरा देव यहोवा याला ओळखतात व त्याची उपासना करतात. (योहान १७:२०, २१) त्यांच्यासोबत मिळून येशूच्या बलिदानाकरवी मिळालेल्या प्रायश्चित्ताकरता ते देवाचे आभार मानतात. एकच मेंढपाळ येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली ते एकत्र मिळून सेवा करतात. (योहान १०:१६ब) सबंध जगभरात त्यांचा एक प्रेमपूर्ण बंधूसमाज आहे. स्वतःला यहोवाचे व त्याच्या राज्याचे साक्षीदार म्हणण्यात त्यांना आनंद वाटतो. होय, तुम्ही यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतला असेल तर या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे तुम्ही देखील वाटेकरी आहात.
२१, २२. आपल्या आध्यात्मिक वारशाची आपल्याला कदर आहे हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?
२१ तुम्हाला लाभलेल्या आध्यात्मिक वारशाची तुम्ही कितपत कदर करता? देवाची इच्छा पूर्ण करणे ही तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का? देवाच्या वचनातून आणि त्याच्या संस्थेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाकडे लक्ष देऊन तुम्ही ख्रिस्ती मंडळीच्या सर्व सभांना नियमित उपस्थित राहता का? (इब्री लोकांस १०:२४, २५) कितीही कष्ट सहन करावे लागले तरीसुद्धा तुम्ही देवाची सेवा करत राहाल का? देवाच्या मार्गापासून दूर नेणाऱ्या कोणत्याही मोहाचा प्रतिकार करण्यास तुम्ही तयार आहात का?
२२ देवाने दिलेल्या आध्यात्मिक वारशाची मनापासून कदर बाळगा. भविष्यात येणाऱ्या परादीसवर सतत आपली नजर खिळवून आज यहोवा देत असलेल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांचा आपण पुरेपूर लाभ करून घेऊया. यहोवासोबत एक चांगला नातेसंबंध ठेवून जीवनातील सर्व निर्णय त्याला डोळ्यापुढे ठेवून घेतल्यास आपण हे दाखवू की देवाने दिलेल्या आध्यात्मिक आशीर्वादांची आपल्याला खरोखरच कदर आहे. आपणही यहोवाच्या सर्व सेवकांसोबत मिळून म्हणूया: “हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.”—स्तोत्र १४५:१.
तुम्हाला समजावून सांगता येईल का?
• आदाम देवाला विश्वासू राहिला असता तर तो आपल्याला कशाप्रकारचे जीवन वारशाने देऊ शकला असता?
• अब्राहामाच्या वंशजांचा त्यांना मिळालेल्या वारशाबद्दल कसा दृष्टिकोन होता?
• ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांना कोणते आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात?
• मोठ्या लोकसमुदायाच्या वारशात कशाचा समावेश आहे आणि या वारशाची त्यांना खरोखर कदर आहे हे ते कशाप्रकारे दाखवू शकतात?
[२० पानांवरील चित्रे]
अब्राहामाच्या संततीला एका मोलवान वारशाची प्रतीज्ञा मिळाली होती
[२३ पानांवरील चित्रे]
तुम्हाला लाभलेल्या आध्यात्मिक वारशाची तुम्ही कितपत कदर करता?