खलाशापासून धडा शिकणे
एकट्याने समुद्रप्रवास करणे फार क्षीणवणारे असू शकते. थकव्यामुळे खलाशाला काहीही सुचत नाही. तो गोंधळून जाऊ शकतो किंवा चुकीचे निर्णय घेऊ शकतो. अशावेळी, नांगर त्याला फार महत्त्वाचा वाटतो. नांगरामुळे थकलेल्या खलाशाला समुद्रात कुठेही वाहवत न जाता आराम करायला आणि क्षीणवटा घालवायला मदत मिळते. त्याच वेळी, नांगरामुळे जहाजाची समोरील बाजू वाऱ्याच्या आणि लाटांच्या दिशेने राहते. त्यामुळे जहाज स्थिर राहते.
खलाशांना समुद्रात जसे अनेक धोक्यांना तोंड द्यावे लागते तसेच ख्रिश्चनांना या जगातील दबावांचा सामना करावा लागतो. आणि काही वेळा त्यांना सुटका हवीशी वाटते. एकदा, येशूनेही आपल्या शिष्यांना म्हटले की, “तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या.” (मार्क ६:३१) आज, काहीजण काही दिवसांसाठी सुटीवर जातात किंवा आपल्या कुटुंबासोबत एखाद्या सप्ताहांती विसावा घेतात. हा काळ तजेला देणारा असू शकतो. परंतु, अशा वेळी आपण आध्यात्मिकरित्या सुरक्षित आहोत याची आपण दक्षता कशी घेऊ शकतो? आपण कुठेही वाहवत जाऊ नये आणि स्थिर राहावे म्हणून कोणती गोष्ट आपल्यासाठी नांगरासमान असेल?
यहोवाने आपल्यासाठी एक तरतूद केली आहे. ती तरतूद म्हणजे त्याचे पवित्र वचन अर्थात बायबल. दररोज त्याचे वाचन केल्याने आपण यहोवाच्या समीप राहू आणि त्याच्यापासून कधीही दूर वाहवत जाणार नाही. त्यातील सल्ला आपल्याला स्थिर राहण्यास, सैतानाचे व त्याच्या जगाचे मोहपाश टाळण्यास मदत करील. आपण सुटीवर असताना देखील नियमितपणे बायबल वाचन करत राहिलो तर आध्यात्मिकतेत आपण दृढ राहू.—यहोशवा १:७, ८; कलस्सैकर २:७.
स्तोत्रकर्ता आपल्याला आठवण करून देतो की, जो “परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य.” (स्तोत्र १:१, २) देवाचे वचन दररोज वाचून तजेला मिळाल्याने आणि ख्रिस्ती जीवनशैली आचरीत राहिल्याने आपण “धन्य” होऊ.