वाचकांचे प्रश्न
यशयाच्या ५३ व्या अध्यायात मशिहाविषयी एक प्रसिद्ध भविष्यवाणी आहे. १० व्या वचनात म्हटले आहे: “त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पीडिले.” याचा काय अर्थ होतो?
काहींना हे वचन का खटकत असावे हे आपल्या लक्षात आलेच असेल. आपला दयाळू आणि कोमल देव कोणाला ठेचण्यात किंवा पीडा देण्यात आनंद घेईल असे खऱ्या ख्रिश्चनांना वाटत नाही. निर्दोष लोकांना यातना द्यायला देवाला आनंद वाटत नाही याचा बायबलमध्ये पुरावा मिळतो. (अनुवाद ३२:४; यिर्मया ७:३०, ३१) परंतु, काही वेळा यहोवाने त्याच्या बुद्धीनुसार आणि प्रीतीनुसार घडण्यासाठी यातनेला अनुमती दिली आहे. परंतु, आपला प्रिय पुत्र येशू, याला यातना देण्यासाठी यहोवा कारणीभूत होता असे मात्र मुळीच म्हणता येणार नाही. मग, या वचनाचा नेमका अर्थ काय आहे?
हे संपूर्ण वचन आपण नीट वाचून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला याचा अर्थ कळेल. या वचनात ‘मर्जी’ किंवा “मनोरथ” हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले आहेत ते आपण पाहिले पाहिजे. यशया ५३:१० म्हणते: “त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पीडिले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतति पाहील, तो दीर्घायु होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.”
या वचनाच्या शेवटी “परमेश्वराचा मनोरथ” हा वाक्यांश पाहिला तर याचा नेमका अर्थ आपल्या लक्षात येतो; तेथे तो वाक्यांश देवाच्या राज्याद्वारे त्याचा उद्देश पूर्ण करण्याला सूचित होतो. मग देव, आपण सर्वशक्तिमान आहे हे सिद्ध करील आणि आज्ञाधारक मानवजातीला अर्थात आपल्याला वारशात मिळालेल्या पापापासून मुक्त करील. (१ इतिहास २९:११; स्तोत्र ८३:१८; प्रेषितांची कृत्ये ४:२४; इब्री लोकांस २:१४, १५; १ योहान ३:८) परंतु हे सगळे शक्य व्हायला देवाच्या पुत्राला मानवरूप धारण करावे लागले आणि खंडणी बलिदान द्यावे लागले. आणि हे करताना येशूला यातना भोगाव्या लागल्या हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. बायबल आपल्याला सांगते की, “त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” म्हणजेच, त्या यातनेचा येशूला लाभ झाला.—इब्री लोकांस ५:७-९.
हे सत्कर्म करण्यासाठी आपल्याला पीडा भोगावी लागेल हे येशूला आधीच ठाऊक होते. योहान १२:२३, २४ मधील शब्दांवरून हे स्पष्ट दिसून येते; तेथे असे म्हटले आहे: “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.” होय, येशूला ठाऊक होते की, मरण आले तरी त्याला निष्ठावान राहावे लागणार होते. पुढे त्या अहवालात म्हटले आहे: “‘आता माझा जीव व्याकुळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.’ तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, ‘मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.’”—योहान १२:२७, २८; मत्तय २६:३८, ३९.
हा संदर्भ पाहिल्यावर आपल्याला यशया ५३:१० या वचनाचा उलगडा होईल. यहोवाला हे ठाऊक होते की, त्याच्या पुत्राला भोगाव्या लागणाऱ्या यातनेत तो एका अर्थाने ठेचला जाईल. परंतु, त्यामुळे सबंध मानवजातीला चिरकालिक फायदा होणार होता हे लक्षात ठेवून यहोवाने त्यात आनंद मानला. या अर्थाने “त्याला [म्हणजेच मशिहाला] ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले.” तसेच, येशू जे साध्य करू शकला आणि त्याने जे साध्य केले त्याबद्दल त्यालाही आनंद वाटला. अशाप्रकारे, यशया ५३:१० वचनाच्या शेवटी दिल्याप्रमाणे, ‘त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल झाला.’