त्यांनी धैर्य दाखवले
प्रचारकार्यात धैर्य दाखवणे नेहमीच सोपे नसते. प्रेषित पौल तर एके प्रसंगी म्हणाला होता की, त्याने ‘मोठ्या कष्टाने’ धैर्य दाखवले होते. (१ थेस्सलनीकाकर २:२) ‘मोठ्या कष्टाने’ प्रचार करणे खरोखरच सार्थक ठरते का? धैर्य दाखवल्यामुळे नेहमीच चांगले अनुभव येणार नाहीत; पण सहसा देवाच्या लोकांना धैर्य दाखवल्यामुळे आनंद होतो. याची काही उदाहरणे पाहा.
एक शिक्षिका आपल्या वर्गाला सांगत होती की, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी छळ छावण्यांमधील यहुदी लोकांचे ओळखचिन्ह होते त्यांच्या कपड्यांवरील पिवळ्या रंगाचा दाविदाचा तारा. टेरा नावाची आठ वर्षांची मुलगी हे लक्ष देऊन ऐकत होती. टेराला काहीतरी सांगायचे होते, पण आता सांगावे की नंतर असा ती विचार करत होती. ती म्हणते: “मी मनातल्या मनात प्रार्थना केली.” मग तिने हात वर केला आणि म्हणाली की यहोवाचे साक्षीदारसुद्धा त्याच छळ छावण्यांमध्ये होते आणि त्यांच्या ओळखचिन्हासाठी त्यांच्या कपड्यांवर जांभळा त्रिकोण होता. टेराच्या शिक्षिकेला तिने दिलेली माहिती आवडली आणि तिने टेराचे आभार मानले. टेराने ही माहिती दिल्यामुळे शिक्षिकेबरोबर तिची आणखीन चर्चा झाली; नंतर त्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गाला जेहोवाज विटनेसेस स्टॅण्ड फर्म अगेन्स्ट नात्सी असॉल्ट हा व्हिडिओसुद्धा दाखवला.
पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथे इरेन नावाची तरुण, बाप्तिस्मा न घेतलेली एक प्रचारक होती; तिला सेवाकार्यात प्रगती करायची होती. तिचा अभ्यास घेणाऱ्या मिशनरीने तिला शाळेतल्या विद्यार्थ्यांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! पत्रिका देण्याचे उत्तेजन दिले. इरेनला आधी संकोच वाटत होता कारण तिच्या वर्गसोबत्यांना याविषयी बोललेले आवडत नव्हते. एका विद्यार्थीनीने तर फार विरोध केला होता. पण मिशनरीने उत्तेजन दिल्यामुळे इरेनने आधी तिच्याकडेच जायचे ठरवले. त्या मुलीने जेव्हा चांगले ऐकून घेतले आणि मासिके स्वीकारली तेव्हा इरेनला आश्चर्यच वाटले. दुसऱ्या विद्यार्थ्यांनीही तेच केले. त्या महिन्यात इरेनने जितकी मासिके दिली तितकी तिने त्या आधीच्या एकूण पाच महिन्यांमध्येही दिली नव्हती.
त्रिनिदादमध्ये, ख्रिस्ती मंडळीतल्या एका वडिलांना शाळेतल्या प्राध्यापिकेला सावध राहा! मासिकातून शिकण्यासारखे पुष्कळ आहे हे दाखवायचे होते पण त्यांना धीर होत नव्हता. कसेतरी त्यांनी धैर्य एकवटले. ते म्हणतात: “शाळेच्या आवारात शिरतानाच मी प्रार्थना केली. प्राध्यापिकेनं इतक्या शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं की मला विश्वासच बसेना.” “वॉट होप फॉर टुडेज युथ्स?” (आजच्या युवकांसाठी काय आशा?) या विषयाचे सावध राहा! मासिक त्यांनी घेतले आणि वर्गातही त्याचा उपयोग त्या करतील असे त्या म्हणाल्या. तेव्हापासून आतापर्यंत त्या प्राध्यापिकेने ४० वेगवेगळी मासिके घेतली आहेत.
वॉनला तरुणपणी प्रचारकार्य करणे महाकठीण वाटायचे. “मी घाबरून जायचो, माझ्या हातांना घाम फुटायचा आणि घाबरल्यामुळं मी एका दमात सर्वकाही बोलून टाकायचो; मला हळू बोलताच यायचं नाही.” तरीही पुढे वॉन पूर्ण वेळेचा सेवक बनला. पण नेहमीच त्याला प्रचार करणे सोपे जात नव्हते. एकदा नोकरीच्या शोधात दिवसभर भटकल्यावर तो निराश होऊन घरी परतत होता. त्याला वाटले, निदान ट्रेनमध्ये कोणाशी तरी देवराज्याबद्दल बोलावे म्हणजे “आजच्या खराब दिवसामध्ये काहीतरी चांगलं होईल.” परंतु ट्रेनमधील सुटाबुटातल्या व्यापाऱ्याकडे पाहून तो जरा घाबरला. पण मग शेजारच्या एका वयस्कर व्यक्तीशी बोलण्याचे त्याने धाडस केले. ते दोघं खूप वेळ बोलले. ते संभाषण ऐकून तो व्यापारी त्याला म्हणाला, “तू इतका लहान आहेस पण तुझे प्रश्न फारच चांगले आहेत. तू विद्वान वगैरे आहेस का?” वॉन म्हणाला, “नाही नाही, मी यहोवाचा साक्षीदार आहे.” तो माणूस हसून म्हणाला, “आलं लक्षात!”
या सर्व साक्षीदारांनी—तसेच बाकीच्या इतरांनीही—प्रचार करायला धैर्य एकवटले म्हणून त्यांना आनंद वाटतो. तुम्हीसुद्धा त्यांचे अनुकरण कराल का?
[२५ पानांवरील चित्र]
टेरा
[२५ पानांवरील चित्र]
वॉन