काम आणि फुरसत यातील संतुलन
“फुरसतीची तुलना एखाद्या भरजरी वस्त्राशी करता येईल, जे अतिशय सुंदर तर आहे पण सतत घालता येत नाही.” या शब्दांतून एका निनावी लेखकाने स्पष्ट केले की माणसाला फुरसत मिळणे महत्त्वाचे असले तरीसुद्धा, त्यासोबत कामही केले पाहिजे.
बायबलचा ईश्वरप्रेरित लेखक शलमोन यानेही या गोष्टीबद्दल सांगितले आहे. या सुज्ञ राजाने अशा दोन टोकाच्या भूमिकांबद्दल सांगितले ज्या आपण टाळल्या पाहिजेत. पहिली, तो म्हणाला: “मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.” (उपदेशक ४:५) होय, आळशी माणूस स्वतःवर दारिद्र्य ओढवतो. शिवाय, यामुळे त्याच्या आरोग्यावरही अनिष्ट परिणाम होऊ शकतो, आणि प्रसंगी हा आळशीपणा त्याच्या जीवावरही बेतू शकतो. परंतु, काही असेही लोक असतात ज्यांना कामाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. शलमोनाने अशा लोकांच्या कामाच्या अतिरेकाचे वर्णन “व्यर्थ व वायफळ उद्योग” असे केले.—उपदेशक ४:४.
म्हणूनच शलमोनाने हा संतुलित सल्ला दिला: “कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठीपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.” (उपदेशक ४:६) माणसाने “श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे” म्हणजे, आपण जे कमवले आहे त्याचा आनंद लुटण्यासाठीही अधूनमधून वेळ काढला पाहिजे. (उपदेशक २:२४) नोकरी धंदा, प्रपंच हेच जीवनात सर्वकाही असू नये. आपल्या कुटुंबासाठी तर काही वेळ दिलाच पाहिजे. शलमोनाने वारंवार सांगितले, की जीवनातले परम कर्तव्य म्हणजे देवाची सेवा, प्रपंच नव्हे. (उपदेशक १२:१३) कामाविषयीचा संतुलित दृष्टिकोन बाळगणाऱ्या लोकांपैकी तुम्हीपण एक आहात का?