“एका देखण्या पत्नीचा आनंदी पती”
अधूनमधून काही लोक यहोवाच्या साक्षीदारांवर विवाह मोडण्याचा आरोप करतात. परंतु, ज्यात फक्त एकच विवाह सोबती यहोवाचा साक्षीदार असतो असे अनेक यशस्वी विवाह, हे खरे नसल्याचे दाखवून देतात. कौटुंबिक जीवनात बायबल सल्ल्याचे अनुकरण केल्याने विवाह आनंदी होतात; एका फ्रेन्च दैनिकामध्ये छापलेल्या एका पत्रावरून हे स्पष्ट होते.
“आता, जवळजवळ २८ वर्षांपासून मी यहोवाची साक्षीदार असलेल्या एका देखण्या पत्नीचा आनंदी पती आहे. तिनं माझ्या पाच मुलांना, यांपैकी दोन तिच्या पोटची नाहीत तरीसुद्धा सर्वांना एकसारखं व प्रेमानं वाढवलं आहे. मी सध्या, ४५ कामगार असलेल्या एका कंपनीचा व्यवस्थापक आहे; आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो, फक्त तिच्याचमुळे आज मी यशाच्या शिखरावर आहे. म्हणूनच, मी जेव्हा दैनिकामध्ये, लोटेगरोन भागाला यहोवाच्या साक्षीदारांचा धोका आहे अशा मजकुराचा लेख वाचला तेव्हा तुम्हाला सप्रमाण साक्ष द्यायचं ठरवलं.”
पत्रात पुढे असेही म्हटले होते: “ते धूम्रपान किंवा दारूबाजी करत नाहीत. मग हा धोका आहे का? ते सहनशील ख्रिस्ती आहेत; ज्या नियमांचं ते अनुसरण करतात ते नियम ते इतरांवर लादत नाहीत. उलट, पुष्कळ बाबतीत ते स्वतःच उदाहरणीय आहेत. . . . ते पैशाच्या अफरातफरीत नाहीत किंवा अंमली पदार्थांची नेआण करत नाहीत. ते अविवाहितपणाची शपथ घेत नाहीत आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो, ते सामान्य जीवन जगतात. . . .
“आता तुम्ही मला विचाराल: की मग तुम्ही स्वतः यहोवाचे साक्षीदार का झाला नाहीत? त्याचं कारण असं आहे, की यहोवाचा साक्षीदार होण्यासाठी ख्रिस्ती विश्वास आणि कडक नैतिक मूल्य जपावी लागतात जे बहुतेक लोकांमध्ये सर्रास दिसत नाहीत.”