वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ७/१५ पृ. २९-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • “बरे करताना खचू नका”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • ‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ७/१५ पृ. २९-३१

वाचकांचे प्रश्‍न

दुसरे थेस्सलनीकाकर ३:१४ या वचनात ‘लक्ष ठेवा’ असे जे सांगितले आहे त्यावरून मंडळीद्वारे काही कारवाई केली जाते असे सुचवले आहे का, की मंडळीत अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍यांना टाळण्यासाठी ख्रिस्तीजनांना व्यक्‍तिगत पातळीवर काही करायचे आहे?

प्रेषित पौलाने थेस्सलनीकाकरांना जे लिहिले त्यावरून असे दिसते की या ‘लक्ष ठेवण्यात’ मंडळीच्या वडिलांची निश्‍चित भूमिका आहे. पण त्यानंतर, व्यक्‍तिगत पातळीवर ख्रिस्तीजन देखील आध्यात्मिक उद्देश बाळगून वडिलांनी घेतलेल्या भूमिकेनुसार वागतात. हा विषय नीट समजण्यासाठी, पौलाने ज्या परिस्थितीत हा सल्ला दिला होता ती मूळ परिस्थिती विचारात घ्यावी लागेल.

थेस्सलनीका मंडळीतल्या अनेक स्त्रीपुरुषांना सत्य स्वीकारण्यास मदत करून पौलाने ही मंडळी स्थापन करण्यास हातभार लावला होता. (प्रेषितांची कृत्ये १७:१-४) नंतर त्याने करिंथहून त्यांना प्रशंसेचे आणि प्रोत्साहनाचे पत्र लिहिले. यात पौलाने आवश्‍यक सल्ला देखील दिला. ‘स्वस्थ राहा, आपापला व्यवसाय करा, आणि आपल्या हातांनी काम करा,’ असे त्याने त्यांना आवर्जून सांगितले. काहीजण या सल्ल्याप्रमाणे वागत नव्हते; त्यामुळे पौलाने पुढे म्हटले: “बंधूनो, आम्ही तुम्हास बोध करितो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्‍तांना आधार द्या.” यावरून स्पष्टच आहे, की त्यांच्यातले काहीजण “अव्यवस्थित”a होते आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज होती.—१ थेस्सलनीकाकर १:२-१०; ४:११; ५:१४.

काही महिन्यांनंतर पौलाने थेस्सलनीकाकरांना दुसरे पत्र लिहिले ज्यात त्याने येशूच्या भावी उपस्थितीविषयी अधिक खुलासा केला होता. तसेच, ‘काहीएक काम न करिता लुडबूड करणाऱ्‍या’ अव्यवस्थित लोकांशी कसा व्यवहार करावा याबद्दलही पौलाने या पत्रात पुन्हा मार्गदर्शन दिले. पौलाने श्रम व कष्ट करण्याचा जो आदर्श घालून दिला होता त्याचे हे लोक अनुकरण करीत नव्हते आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी कष्ट करण्याचा जो स्पष्ट आदेश त्याने दिला होता त्याचेही ते पालन करीत नव्हते हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसून आले. (२ थेस्सलनीकाकर ३:७-१२) पौलाने या लोकांविरुद्ध पावले उचलण्याची सूचना दिली. या अव्यवस्थित लोकांना वडिलांनी आधीच ताकीद किंवा सल्ला दिल्यानंतरच ही पावले उचलायची होती. पौलाने लिहिले:

“बंधुजनहो, आम्ही . . . तुम्हास आज्ञा करितो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍या व आम्हापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्‍या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. तुम्ही तर बंधूनो, बरे करताना खचू नका. ह्‍या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका; तरी त्याला शत्रु समजू नका, तर त्याला बंधु समजून त्याची कानउघाडणी करा.”—२ थेस्सलनीकाकर ३:६, १३-१५.

तेव्हा, जी पुढची पावले उचलायची होती ती अशी: अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍यांपासून दूर होणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्यासोबत संगत न धरणे पण त्याचवेळेस बंधू समजून त्यांची कानउघडणी करणे. कोणत्या परिस्थितीत मंडळीने ही पावले उचलायची होती? याबाबतीत अधिक खुलासा होण्यासाठी आपण अशा तीन परिस्थितींवर विचार करू ज्यांविषयी पौल येथे बोलत नव्हता.

१. सर्व ख्रिस्ती अपरिपूर्ण आहेत आणि बऱ्‍याचदा त्यांच्या हातून चुका होतात हे आपल्याला ठाऊक आहे. तरीसुद्धा, प्रेम हे खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे ओळखचिन्ह असल्यामुळे इतरांशी समजूतदारपणे वागून त्यांच्या चुका क्षमा करणे आपले कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, क्वचित प्रसंगी एखाद्या ख्रिस्ती बंधूचा राग अनावर होऊ शकतो; बर्णबा आणि पौल यांच्यातही एकदा तीव्र मतभेद झाला होता. (प्रेषितांची कृत्ये १५:३६-४०) किंवा खूप थकल्यामुळे कदाचित एखादा कठोरपणे, बोचणारे असे काहीतरी बोलून जाईल. अशा घटना घडतात तेव्हा प्रेमपूर्वक वागून बायबलच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यास, आपण आपल्या सहख्रिस्ती बांधवाच्या चुकांवर पांघरूण घालू शकतो; आणि त्यानंतर आपण त्याच्यासोबत पूर्वीसारखेच राहतो, त्याच्यासोबत उठतो बसतो, तसेच त्याच्यासोबत नेहमीसारखे कामही करतो. (मत्तय ५:२३-२५; ६:१४; ७:१-५; १ पेत्र ४:८) तर मग २ थेस्सलनीकाकराच्या पत्रात पौल अशाप्रकारच्या चुकांविषयी सांगत नव्हता हे अगदी स्पष्ट आहे.

२. आणखी एक परिस्थिती जिच्या संदर्भात पौल बोलत नव्हता, ती म्हणजे: ख्रिस्ती मंडळीत एखाद्याची वागणूक किंवा त्याची एकंदर प्रवृत्ती चांगली नसल्यामुळे—उदाहरणार्थ, करमणुकीवर किंवा भौतिक गोष्टींवर नको तितके लक्ष देण्याची त्याची प्रवृत्ती असल्यामुळे दुसरा एखादा बांधव कदाचित त्याच्याशी तेवढ्यापुरतेच संबंध ठेवण्याचा वैयक्‍तिक निर्णय घेतो. किंवा जी मुले आपल्या आईवडिलांना मान देत नसतील, किंवा खेळताना आडदांडपणा करत असतील नाहीतर फाजील साहसीपणा दाखवत असतील, किंवा मग ख्रिस्ती तत्त्वांना हवे तेवढे महत्त्व देत नसतील अशा मुलांसोबत काही आईवडील कदाचित आपल्या मुलांना फार मिसळू देणार नाहीत. अशाप्रकारचे निर्णय हे वैयक्‍तिक निर्णय असून नीतिसूत्रे १३:२० येथे सांगितल्यानुसारच आहेत, “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—पडताळा १ करिंथकर १५:३३.

३. यापेक्षा गंभीर स्वरूपाच्या एका परिस्थितीविषयी पौलाने करिंथकरांना लिहिले होते; गंभीर पापाचरण करून पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल. पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या अशा पापी जनांना मंडळीतून काढून टाकायचे होते. जणू त्या “दुष्टाला” सैतानाच्या हाती सोपवून द्यायचे होते. त्यानंतर निष्ठावान ख्रिस्तीजनांनी अशा दुष्ट लोकांसोबत संबंध ठेवायचे नव्हते; प्रेषित योहानाने तर अशा व्यक्‍तीचे क्षेमकुशलही विचारु नका असे ख्रिस्तीजनांना सांगितले. (१ करिंथकर ५:१-१३; २ योहान ९-११) पण २ थेस्सलनीकाकर ३:१४ येथे दिलेले मार्गदर्शन या परिस्थितीलाही लागू होत नाही.

‘अव्यवस्थित लोकांविषयी’ उद्‌भवणाऱ्‍या ज्या परिस्थितीविषयी पौलाने २ थेस्सलनीकाकरांत सांगितले आहे, ती वरती दिलेल्या तीनही परिस्थितींपेक्षा वेगळी आहे. हे ‘अव्यवस्थित लोक’ अद्यापही “बंधू” होते आणि बंधू समजूनच त्यांची कानउघाडणी आणि त्यांच्यासोबत व्यवहार करायचा होता असे पौलाने लिहिले. त्याअर्थी या “अव्यवस्थित” बांधवांची समस्या ख्रिस्ती बांधवांची आपसांतील वैयक्‍तिक बाब असण्याइतकी क्षुल्लकही नव्हती आणि ती इतक्या गंभीर स्वरूपाचीही नव्हती की त्यासाठी मंडळीच्या वडिलांनी मध्ये पडून बहिष्कृतीचे पाऊल उचलावे, जसे पौलाने करिंथमध्ये अनैतिकतेची समस्या उद्‌भवली त्यावेळी केले होते. करिंथमध्ये बहिष्कृत झालेल्या माणसासारखे या “अव्यवस्थित” लोकांनी गंभीर पाप केले नव्हते.

थेस्सलनीका येथील “अव्यवस्थित” लोकांचे वागणे ख्रिस्ती तत्त्वांच्या खूपच विरोधात होते. ख्रिस्ताचे परतणे लगेचच होणार असा त्यांचा समज असल्यामुळे असो किंवा त्यांच्या आळशीपणामुळे असो, पण ते काहीएक काम करायला तयार नव्हते. इतकेच नव्हे, तर कोणतेही कारण नसताना इतरांच्या व्यवहारांत “लुडबुड” करून ते बरीच गडबड करत होते. पौलाने पहिल्या पत्रात सल्ला दिल्याप्रमाणे आणि देवाच्या वचनात इतर ठिकाणी दिलेल्या मार्गदर्शनाच्या आधारावर, वडिलांनी कदाचित अशा लोकांची वारंवार कानउघडणीही केली असेल. (नीतिसूत्रे ६:६-११; १०:४, ५; १२:११, २४; २४:३०-३४) पण, ख्रिस्ती मंडळीची बदनामी करणारे आपले वर्तन त्यांनी सुरूच ठेवले; आणि त्यांच्या या वागणुकीचा कुप्रभाव इतर ख्रिश्‍चनांवरही पडण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन ख्रिस्ती वडील असणाऱ्‍या पौलाने, त्या व्यक्‍तींची नावे न घेता, त्यांचा अव्यवस्थितपणा, त्यांचे चुकीचे वर्तन सर्वांपुढे उघड केले.

शिवाय, त्याने मंडळीतल्या ख्रिस्तीजनांना हेही सांगितले की अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍या अशा लोकांवर त्यांनी वैयक्‍तिकपणे ‘लक्ष ठेवणे’ योग्य ठरेल. याचा अर्थ, ज्या दुर्वर्तनाविषयी मंडळीला जाहीररित्या ताकीद देण्यात आली होती तशी ज्यांची कृत्ये आहेत अशांना त्या ख्रिस्तीजनांनी लक्षात ठेवावे. पौलाने सल्ला दिल्याप्रमाणे, “अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍या . . . प्रत्येक बंधूपासून [त्यांनी] दूर व्हावे.” अर्थात अशा व्यक्‍तीला अगदीच वाळीत टाकावे असा याचा अर्थ असू शकत नाही, कारण त्यांनी ‘बंधू समजून त्याची कानउघडणी’ करायची होती. सभांमध्ये आणि कदाचित सेवेला जाताना ख्रिस्ती लोकांचा एकमेकांशी येतो तितका संपर्क त्यांचा पुढेही येत राहणार होता. या बांधवाने त्याला दिलेल्या निर्देशांप्रमाणे वागून, इतरांना खटकणारे आपले दुर्वर्तन सोडून द्यावे अशी आशा त्याविषयी मंडळीतले इतरजण बाळगू शकत होते.

मग त्यांनी त्याच्यापासून “दूर व्हावे,” हे कोणत्या अर्थाने होते? अर्थातच, हे सामाजिक संबंधांच्या संदर्भात होते. (पडताळा गलतीकर २:१२.) त्याच्यासोबतचे सामाजिक व्यवहार, उठणेबसणे बंद केल्यामुळे त्याला याची जाणीव होण्याची शक्यता आहे की तत्त्वनिष्ठ लोकांना त्याचे वागणे पसंत नाही. लाज वाटून त्याने आपले आचरण बदलले नाही तरीसुद्धा, निदान त्याच्या आचारविचारांचा इतरांवर प्रभाव पडण्याची इतकी शक्यता राहणार नाही. पण त्याच वेळेस, या ख्रिस्तीजनांनी नेहमी सुधारणेला प्रोत्साहन देणाऱ्‍या गोष्टींचा विचार करावा. पौलाने असा सल्ला दिला, की “तुम्ही तर बंधूंनो, बरे करताना खचू नका.”—२ थेस्सलनीकाकर ३:१३.

अर्थात, प्रेषित पौलाने दिलेल्या या मार्गदर्शनाचा आधार घेऊन आपण आपल्या बांधवांना तुच्छ लेखू नये, किंवा नकळत एखादी क्षुल्लक चूक त्यांच्या हातून झाल्यास लगेच त्यांना दोषी ठरवू नये. उलट, या मार्गदर्शनाचा उद्देश ख्रिस्ती तत्त्वांशी बऱ्‍याच प्रमाणात विसंगत असा मार्ग पत्करणाऱ्‍याला मदत करण्याचा आहे.

पौलाने याबाबतीत काही तपशीलवार नियम घालून दिले नाहीत किंवा कोणती गुंतागुंतीची कारवाई करण्याविषयी सांगितले नाही. पण हे मात्र स्पष्ट आहे की अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍या व्यक्‍तीची आधी वडिलांनी कानउघडणी करावी आणि या व्यक्‍तीला मदत करण्याचा प्रयत्न करावा. पण समजा त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले, आणि त्या व्यक्‍तीने इतरांना खटकेल आणि मंडळीत इतरजणही कदाचित अनुकरण करतील अशाप्रकारची वागणूक सुरूच ठेवली तर याविषयी मंडळीला धोक्याची सूचना दिली जावी असा निष्कर्ष वडील काढू शकतात. यासाठी ते मंडळीत भाषण दिले जाण्याची व्यवस्था करू शकतात, ज्यात ते समजावतील की अशाप्रकारचे अव्यवस्थित वागणे का टाळले पाहिजे. अर्थात ते कोणाचे नाव घेणार नाहीत, पण या ताकीदपर भाषणामुळे मंडळीचे संरक्षण होईल; कारण जे लोक या भाषणातील मार्गदर्शन मनावर घेतील ते अशाप्रकारचा अव्यवस्थितपणा ज्यांच्या वागण्यातून स्पष्टपणे दिसून येतो त्यांच्यासोबत उठणेबसणे, मिळणे-मिसळणे कमी करण्याचा खास प्रयत्न करतील.

कदाचित, त्या अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍याला आपल्या वर्तनाबद्दल लाज वाटेल आणि यामुळे तो आपल्या मार्गापासून फिरेल. वडील आणि मंडळीतले इतरजण जेव्हा त्याच्यात बदल झालेला पाहतील तेव्हा ते त्याच्यासोबत पुन्हा एकदा पूर्वीसारखे संबंध सुरू करण्याचा वैयक्‍तिक निर्णय घेऊ शकतात.

तर मग थोडक्यात असे, की मंडळीत कोणी अव्यवस्थितपणे वागत असल्यास मंडळीतले वडील पुढाकार घेऊन त्याला मदत करतात, सल्ला देतात. पण आपले वर्तन अयोग्य आहे हे कबूल न करता इतरांवर वाईट प्रभाव पडेल असे तो वागतच राहिला, तर मग वडील बायबलचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी भाषण देऊन मंडळीला अशा वर्तनाविषयी—उदाहरणार्थ, विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीसोबत विवाह करण्याच्या दृष्टीने संबंध वाढवणे किंवा अशा इतर कोणत्या अयोग्य वर्तनाविषयी, ताकीद देऊ शकतात. (१ करिंथकर ७:३९; २ करिंथकर ६:१४) ही ताकीद मिळाल्यावर सावध झालेले मंडळीतले ख्रिस्तीजन अशा लोकांसोबत, म्हणजे जे अद्यापही बंधू आहेत पण ज्यांचे आचरण मात्र स्पष्टपणे अव्यवस्थितपणाचे आहे, अशांसोबत उठणेबसणे, मिळणे-मिसळणे कमी करण्याचा वैयक्‍तिक निर्णय घेऊ शकतात.

[तळटीपा]

a याठिकाणी वापरलेला मूळ ग्रीक शब्द, आपल्या विशिष्ट रांगेत न राहणाऱ्‍या किंवा शिस्तभंग करणाऱ्‍या शिपायांच्या तसेच शाळा बुडवून उनाडक्या करणाऱ्‍या मुलांच्या संदर्भात वापरला जात असे.

[३१ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडील अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍यांची कानउघडणी तर करतात, पण त्यांना सहविश्‍वासू बंधू समजूनच

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा