वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१५ पृ. २५-२९
  • दगडास पाझर फुटतो तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दगडास पाझर फुटतो तेव्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • कार्याला सुरवात
  • प्रभावशाली शैक्षणिक कार्यक्रम
  • खास संमेलनांमुळे आनंद
  • चमत्कारिक रूपांतर घडून येते
  • पूर्वीच्या दोस्तांकडून दबाव
  • देवाचे समर्पित सेवक बनणे
  • तुरुंग अधिकाऱ्‍यांकडून कबुली
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१५ पृ. २५-२९

दगडास पाझर फुटतो तेव्हा

यहोवाच्या साक्षीदारांना सन १९८९ यावर्षी पोलंडमध्ये धार्मिक संघटना म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली. ख्रिस्ती तटस्थतेसाठी बंदित ठेवलेल्या साक्षीदारांना कालांतराने बंधमुक्‍त करण्यात आले; ते स्वतः बंधमुक्‍त झाले खरे, परंतु त्यांच्याकडून बायबलविषयी आणखी शिकू इच्छिणाऱ्‍या त्यांच्या सहवासींना त्यांनी मागे सोडले. अशाच एका तुरुंगात यहोवाच्या साक्षीदारांनी, एकेकाळी पाषाण-हृदयी असलेल्या लोकांना देवाच्या वचनाच्या शक्‍तीला दाद देण्यास कशी मदत केली त्याचा अहवाल पुढे आहे.

नैर्ऋत्य पोलंडमध्ये १२,००० रहिवासी असलेल्या वोवुफ नामक एका शहरात, २०० वर्षांपूर्वीचे एक जुने सुधारगृह आहे जेथे पोलंडच्या सर्वात कड्या गुन्हेगारांना ठेवले जाते. यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या कार्याची अधिकृत मान्यता मिळाल्यापासून त्यांनी तेथील सहवासींपर्यंत राज्याची सुवार्ता आणण्याचा प्रयत्न केला आहे व हे काम ते अतिशय आवेशाने करत आहेत.

मिनिस्ट्री ऑफ जस्टीसकडून १९९० च्या फेब्रुवारीत पोलंड येथील सर्व तुरुंग संचालकांना आलेल्या पत्राची ही कमाल होती. पत्रात असे सुचवण्यात आले होते, की वॉच टावर संस्थेची प्रकाशने प्राप्त करू पाहणाऱ्‍या किंवा यहोवाच्या साक्षीदारांना भेटू इच्छिणाऱ्‍या कोणत्याही सहवासीला त्यांनी “अडवू” नये. वोवुफ तुरुंगात पुष्कळ वर्षे घालवलेले साक्षीदार तेथील अनेक निर्ढावलेल्या अपराध्यांना ओळखत होते. परंतु, इतर सहवासींचे पाषाण-हृदय बायबल सत्याद्वारे नरम व्हावे म्हणून ते जे काही प्रयत्न करतील त्यावर आशीर्वाद मिळावेत म्हणून ते यहोवावर पूर्णपणे विसंबून होते.

कार्याला सुरवात

वोवुफ मधील तुरुंगाला भेट देण्याची परवानगी मिळालेल्या व सुमारे ४० किलोमीटर दूर असलेल्या व्रोक्लॉ नामक शहरातील बंधू चेसवॉफ म्हणतात: “कार्यक्रमाला सुरवात करणे जरा कठीणच होते. आमच्या ‘धार्मिक सेवा’ कैद्यांच्याच लाभासाठी आहेत हे तुरुंग अधिकाऱ्‍यांना पटवून द्यायलाच कितीतरी वेळ चर्चा झाली.”

चेसवॉफचे सहकर्मी पॉव्हू आठवून सांगतात: “एक उच्च पदाधिकारी एकाच गोष्टीवर अडून राहिले होते, की भौतिक लाभ मिळावेत म्हणून अपराधी धार्मिक सेवांचे निमित्त सांगत आहेत.” यामुळे परिस्थिती आणखीन बिकट झाली. परंतु जेव्हा, पूर्वी खतरनाक असलेल्या गुन्हेगारांनी १९९१ मध्ये बाप्तिस्मा घेतला तेव्हा तुरुंग अधिकाऱ्‍यांनी आपली मनोवृत्ती बदलली आणि हळूहळू सहकार्य करू लागले.

चेसवॉफ स्पष्टीकरण देतात: “अपराध्यांना, तुरुंगात भेटायला आलेल्या त्यांच्या कुटुंबाला तसेच सुधारगृहाच्या कर्मचाऱ्‍यांना साक्ष देऊन आम्ही सुरवात केली. मग आम्हाला, एकेका वॉर्डाला सुवार्तेचा प्रचार करण्याची परवानगी मिळाली; हा असामान्य अपवाद होता! आम्हाला आस्थेवाईक लोक भेटले तेव्हा बायबल अभ्यास व ख्रिस्ती सभा चालवण्याकरता एक लहानशी खोली देण्यात आली.” होय, यहोवाने पाषाण-हृदयी कैद्यांपर्यंत पोहंचण्याचा मार्ग खुला केला होता.

प्रभावशाली शैक्षणिक कार्यक्रम

थोड्याच दिवसात तो लहानसा हॉल अपुरा पडू लागला. बाप्तिस्मा प्राप्त कैदी आणि तुरुंगाच्या बाहेरून येणारे बंधू प्रचार कार्यात भाग घेऊ लागल्यामुळे ५० पेक्षा अधिक अपराधी सभांना उपस्थित राहू लागले. एक स्थानीय वडील म्हणतात: “तीन पेक्षा अधिक वर्षांपर्यंत आम्ही सर्व सभा तेथेच चालवल्या, कैदी साप्ताहिक सभांना नियमितरीत्या उपस्थित राहू लागले.” म्हणून १९९५ च्या मे महिन्यात, आम्हाला एक मोठे सभागृह देण्यात आले.

तुरुंगात होणाऱ्‍या सभांना कोण येऊ शकतात हे जबाबदार बंधू कसे ठरवतात बरे? चेसवॉफ आणि झ्जेसवॉफ या दोघा बांधवांनी म्हटले: “सत्यामध्ये प्रांजळ आस्था दाखवणाऱ्‍या कैद्यांची आमच्याकडे यादी आहे. एखादा अपराधी प्रगती करीत नाही किंवा सबळ कारण नसताना सभा चुकवत असेल व अशा तरतूदींबद्दल कृतज्ञता दाखवत नसेल तर आम्ही त्याचे नाव यादीतून खोडून टाकतो व ते तुरुंग संचालकाला कळवतो.”

त्यांच्या बायबल अभ्यासांदरम्यान, सभांची चांगल्याप्रकारे कशी तयारी करायची व आपल्या साहित्यांचा प्रभावीरीत्या उपयोग कसा करायचा हेही बंधूजन कैद्यांना शिकवतात. यामुळे, सहवासी सभांना येतात तेव्हा, ते चांगल्याप्रकारे तयारीत असतात व अगदी मुक्‍तपणे त्यात सहभाग घेतात. आपल्या बायबलचा कौशल्यपूर्णरीत्या उपयोग करून ते उभारणीकारक उत्तरे देतात व सल्ला स्वतःला लागू करतात; बहुतेक वेळा उत्तरं देताना, ‘मी असं केलं पाहिजे असं मला वाटतं,’ अशाप्रकारचे उद्‌गार काढतात.

“वोवुफ तुरुंगात एकूण २० बायबल अभ्यास चालवले जातात. त्यांपैकी आठ कैदी प्रचारक अभ्यास चालवतात,” असे मंडळीचे सचिव म्हणतात. या आठ प्रचारकांना एका वॉर्डातून दुसऱ्‍या वॉर्डात आणि तुरुंगाच्या आवारात फिरत असताना प्रचार करताना खूप चांगले प्रतिफळ मिळाले आहेत. जसे की, दहा महिन्यात म्हणजे, सप्टेंबर १९९३ पासून ते जून १९९४ पर्यंत त्यांनी २३५ पुस्तकांचे, सुमारे ३०० माहितीपत्रकांचे आणि १,७०० नियतकालिकांचे वितरण केले आहे. अलिकडेच, दोन तुरुंग अधिकाऱ्‍यांनी बायबल अभ्यासांची विचारणा केली.

खास संमेलनांमुळे आनंद

कालांतराने, त्या तुरुंगातील शैक्षणिक कार्यक्रमात आणखी एका गोष्टीची भर घालण्यात आली; खास संमेलने. प्रवासी पर्यवेक्षक आणि इतर योग्यताप्राप्त बांधव, विभागीय संमेलनाचे आणि एक दिवसीय खास संमेलनाचे मुख्य भाग तुरुंगाच्या व्यायामशाळेत सादर करीत असत. पहिले खास संमेलन ऑक्टोबर १९९३ मध्ये भरले होते. पन्‍नास सहवासी तसेच “व्रोक्लॉ येथून स्त्रिया आणि मुलांचा समावेश असलेली अख्खी कुटुंबे” या संमेलनाला उपस्थित होती; म्हणजे एकूण १३९ जण उपस्थित होते असा स्वोवा पोलस्की नामक बातमीपत्राने अहवाल दिला. संमेलन कार्यक्रमाच्या मध्यन्तराच्या काळात भगिनींनी बनवलेल्या भोजनाचा आस्वाद लुटता आला, शिवाय ख्रिस्ती संगतीसाठीही वेळ मिळाला.

तेव्हापासून सात इतर खास संमेलने भरवण्यात आली आहेत व याचा फायदा केवळ तुरुंगात असलेल्यांनाच नव्हे तर बाहेर असलेल्यांना देखील मिळाला. पूर्वी वोवुफ तुरुंगात असलेल्या पण आता शहरात राहणाऱ्‍या एका कैद्याला एका साक्षीदार भगिनीने भेट दिली तेव्हा सुरवातीला तो जरा साशंकच होता. परंतु जेव्हा त्याला सांगण्यात आले, की अमका एक कैदी आता साक्षीदार आहे तेव्हा त्याला त्याच्या कानावर विश्‍वासच बसत नव्हता; तो म्हणाला: “तो खुनी आता साक्षीदार आहे?” परिणामतः, याने बायबल अभ्यास स्वीकारला.

चमत्कारिक रूपांतर घडून येते

या विस्तृत स्वरूपाच्या शैक्षणिक कार्यक्रमाने खरोखरच कैद्यांचे पाषाण-हृदय नरम केले आहे का? त्यांनाच त्यांची कहाणी सांगू द्या.

स्वभावाने विचारी असलेला झ्झीसलॉ म्हणतो: “मी लहान असतानाच माझ्या आईवडिलांनी मला सोडून दिल्यामुळे मला त्यांची कधीच ओळख झाली नाही आणि मला कोणी प्रेम करीत नसल्याची भावना अतिशय तीव्रतेने भासली. मी अगदी लहान वयातच गुन्हेगारीत गुरफटलो; परिणामी, माझ्या हातून एकाचा खून झाला. दोषी भावनेने मला आत्महत्येस प्रवृत्त केले; मला खऱ्‍या आशेची अत्यंत गरज होती. मग, १९८७ मध्ये टेहळणी बुरूज नियतकालिक माझ्या पाहण्यात आले. त्यातून मला पुनरुत्थानाच्या आणि सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल शिकायला मिळालं. अजूनही वेळ गेलेली नाही याची मला जाणीव झाल्यावर मी आत्महत्येचा विचार मनातून झटकला आणि बायबलचा अभ्यास करू लागलो. आता मी यहोवाकडून आणि बांधवांकडून मिळणाऱ्‍या प्रीतीचा अर्थ शिकलो आहे.” पूर्वी खुनी असलेला हा मनुष्य १९९३ पासून तुरुंगात सेवा-सेवक व सहायक पायनियर या नात्याने कार्य करीत होती व गेल्या वर्षी तो नियमित पायनियर झाला.

टोमॉशचे उदाहरण वेगळे आहे; त्याने बायबल अभ्यास लागलीच स्वीकारला. पण तो कबूल करतो: “खरं सांगायचं तर, माझं हे पाऊल प्रांजळ नव्हतं. मी अभ्यास फक्‍त कशाला करायचो तर इतरांना यहोवाच्या साक्षीदारांचे विश्‍वास काय आहेत याचं मला स्पष्टीकरण देता येतं याची बढाई मारण्याकरता. बायबल सत्याविषयी मी काहीच करत नव्हतो. एके दिवशी, मी मनात ठरवलं आणि एका ख्रिस्ती सभेला गेलो. बाप्तिस्मा प्राप्त कैद्यांनी माझं प्रेमानं स्वागत केलं. माझ्याकडं ज्ञान आहे याची बढाई मारण्याऐवजी मी माझं पाषाण-हृदय नरम केलं पाहिजे व माझ्या विचारसरणीत परिवर्तन केलं पाहिजे हे मी जाणलं.” टोमॉशने नवीन ख्रिस्ती मनुष्यत्व धारण करण्यास सुरवात केली. (इफिसकर ४:२२-२४) आज तो एक समर्पित बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार आहे व एका वॉर्डातून दुसऱ्‍या वॉर्डात प्रचार करताना त्याला आनंद वाटतो.

पूर्वीच्या दोस्तांकडून दबाव

तुरुंगात बायबल सत्य शिकलेल्यांवर वॉर्डातील पूर्वीच्या मित्रांनी आणि तुरुंग अधिकाऱ्‍यांनी खूप दबाव आणला. एकाच्या आठवणींची शिवण उसवली आणि तो सांगू लागला: “माझी सारखी थट्टा केली जायची, माझ्याबरोबर तुच्छतेनं बोलले जायचे. पण मी बांधवांचे उत्तेजनात्मक शब्द लक्षात ठेवले. ते मला सांगायचे, ‘यहोवाला सतत प्रार्थना करीत राहा.’ ‘बायबल वाचत जा, बघ तुला आतंरिक शांती मिळेल.’ आणि खरंच याचा उपयोग झाला.”

रिशार्ड नामक एक धट्टाकट्टा बाप्तिस्मा प्राप्त बंधू म्हणतो: “माझे सहकैदी माझ्याविरुद्ध अगदी बिनधास्तपणे माझ्याबद्दल कडू बोलायचे. ते मला म्हणायचे, ‘तू तुझ्या सभांना जा, पण उगाच शायनिंग मारून तू खूप चांगला असल्याचं नाटक करू नकोस, कळलं का?’ बायबल तत्त्वं लागू केल्यामुळे मी माझ्या जीवनात बदल केले तेव्हा मला खूप त्रास झाला. त्यांनी माझा बिछाना उलटापालटा केला, माझं बायबल साहित्य फेकून दिलं, मी ज्या वॉर्डात होतो तिथं सर्व अस्ताव्यस्त केलं. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याकरता मला साहाय्य करावं अशी मी यहोवाजवळ प्रार्थना केली आणि मग निमूटपणे आवराआवर करू लागलो. कालांतराने, हे सर्व हल्ले थांबले.”

बाप्तिस्मा घेतलेले काही कैदी सांगतात: “यहोवाची सेवा करण्याचा आम्ही पक्का निर्णय घेतला आहे हे जेव्हा सहकैदी पाहतात तेव्हा वेगळ्या रूपात दबाव येतो. ते कदाचित म्हणतील, ‘बघ हं, तुला आता पिता येणार नाही, धूम्रपान नाही, खोटं बोलता येणार नाही.’ अशाप्रकारचा दबाव एखाद्याला आत्मसंयम बाळगण्यास मदत करतो; कोणत्याही सवयी किंवा व्यसनं लगेच सोडता येतात. शिवाय आत्म्याची फळे विकसित करण्यासही मदत होते.”—गलतीकर ५:२२, २३.

देवाचे समर्पित सेवक बनणे

तुरुंग अधिकाऱ्‍यांच्या परवानगीने, पहिला बाप्तिस्मा १९९१ च्या वसंतऋतूत व्यायामशाळेतच झाला. झ्झीसलॉ हा तो हर्षित उमेदवार होता. या प्रसंगी, तुरुंगातील बारा सहवासी आणि बाहेरून २१ बंधूभगिनी उपस्थित राहिले. सभेचा कैद्यांवर उत्तेजनात्मक प्रभाव पडला. त्यांच्यातील पुष्कळांनी उल्लेखनीय प्रगती केली आणि त्याच्याच पुढील वर्षी आणखी दोघा अपराध्यांचा बाप्तिस्मा झाला. दोन वर्षांनंतर म्हणजे, १९९३ मध्ये दोनदा बाप्तिस्माचे प्रसंग झाले आणि आणखी सात अपराध्यांनी बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपले जीवन यहोवाला समर्पित केले!

डिसेंबर महिन्यात झालेल्या बाप्तिस्माविषयी व्हेकॉर्ड ऱ्‍हॉस्वाव्हॉ या स्थानीय बातमीपत्राने असे निरीक्षण केले: “व्यायामशाळेत लोक येतच राहिले, त्यांचे अभिनंदन करीत हस्तांदोलन करीत राहिले. येथे कोणीही परका नाही. त्यांचे एकच मोठे कुटुंब आहे, त्यांचे एक विचार, त्यांची जीवनशैली आणि त्यांचा देवही एकच आहे, यहोवा.” हे “एकच मोठे कुटुंब” तेव्हा १३५ जणांचे आणि ५० अपराध्यांचे मिळून बनले होते. चला त्यांच्यातील काहींना भेटू या.

जून महिन्यात बाप्तिस्मा घेतलेला यरझी म्हणतो: “मला खूप वर्षांपासून बायबल सत्य माहीत होते पण माझं अंतःकरण खरोखरच पाषाणासारखं होतं. लबाडी, पहिल्या पत्नीकडून घटस्फोट, क्रिस्टीनबरोबरचे माझे अवैध संबंध, विवाहाबाहेर झालेले एक मूल आणि तुरुंगात माझं सारखं सारखं जाणं—हेच होतं माझं जीवन!” इतर निर्ढावलेले गुन्हेगार तुरुंगातच साक्षीदार झाल्याचे पाहून तो स्वतःला विचारू लागला: ‘मलाही चांगलं होता येईल का?’ त्याने बायबल अभ्यासासाठी विनंती केली आणि तो सभांना येऊ लागला. परंतु खरे परिवर्तन तेव्हा झाले जेव्हा त्याला सरकारी अभियोक्‍त्‌याकडून समजलं की तीन वर्षांआधी क्रिस्टीन यहोवाची साक्षीदार बनली होती. यरझी म्हणतो: “मला आश्‍चर्यच वाटले! मी स्वतःबद्दल विचार करू लागलो: ‘माझं काय? मी काय करतोय?’ मी हे जाणलं की यहोवाची स्वीकृती मिळवण्याकरता मला माझं जीवन सुस्थित केलं पाहिजे.” परिणामतः, तुरुंगातच क्रिस्टीन, त्यांची ११ वर्षीय कन्या मॉरझीन आणि त्याचे एक आनंदी पुनर्मिलन घडले. काही अवधीतच त्यांनी आपला विवाह कायदेशीर केला. तो अद्याप तुरुंगातच असला व त्याला बरे-वाईट अनुभव अजूनही येत असले तरी, त्याने अलिकडेच साईन लँग्वेज शिकून घेतली व बहिऱ्‍या कैद्यांना तो मदत करीत आहे.

मिरोस्वॉफ प्राथमिक शाळेत होता तेव्हापासूनच गुन्हेगारीत अडकला होता. त्याचे मित्र काय करत असत ते तो लक्ष देऊन पाहत असे आणि काही काळातच तोही तेच करू लागला. त्याने पुष्कळांची चोरी केली होती किंवा पुष्कळांना मारले होते. आणि असं करता करता बिनभाड्याच्या घरात आला. मिरोस्वॉफ कबूल करतो, “येथे तुरुंगात आल्यावर, मी पाळकांकडे मदतीसाठी वळालो. पण मला काही समाधान मिळालं नाही. म्हणून मग मी विष घेऊन स्वतःच्या जीवनाला विराम देण्याचं ठरवलं.” ज्यादिवशी तो आत्महत्या करणार होता त्याच दिवशी त्याला दुसऱ्‍या वॉर्डात हलवण्यात आले. तेथे त्याला टेहळणी बुरूज नियतकालिकाची एक प्रत सापडली ज्यात जीवनाच्या उद्देशाविषयी माहिती होती. तो म्हणतो: “मला हीच साधी आणि सोपी माहिती हवी होती. आता मला जगायचे होते! मी यहोवाला प्रार्थना केली आणि माझ्याबरोबर बायबल अभ्यास करावा असे यहोवाच्या साक्षीदारांना सांगितलं.” त्याने आपल्या बायबल अभ्यासात जलद प्रगती केली व १९९१ मध्ये बाप्तिस्मा घेतला. आता तो तुरुंगात सहायक पायनियर म्हणून कार्य करीत आहे; त्याला एका वॉर्डातून दुसऱ्‍या वॉर्डात प्रचार करण्याची परवानगी मिळाली आहे.

या वेळेपर्यंत एकूण १५ कैद्यांचा बाप्तिस्मा झाला होता. त्या सर्वांची शिक्षा एकत्र केली तर ती जवळपास २६० वर्षे होते. काहींना त्यांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच बंधमुक्‍त करण्यात आले. एका कैद्याची शिक्षा २५ वर्षे होती; ती १० वर्ष करण्यात आली. शिवाय तुरुंगात असताना ज्यांनी आस्था दाखवली होती त्यांनी त्यांची सुटका झाल्यावर बाप्तिस्मा घेऊन ते साक्षीदार बनले. याशिवाय, तुरुंगात आणखी चार सहवासी आहेत जे बाप्तिस्म्याची तयारी करत आहेत.

तुरुंग अधिकाऱ्‍यांकडून कबुली

एका तुरुंग अहवालात असे म्हटले आहे: “अपराध्यांच्या मनोवृत्तीत झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. पुष्कळ जण धूम्रपान करणे सोडून देतात व आपले वॉर्ड स्वच्छ ठेवतात. वर्तनातील असे बदल पुष्कळ अपराध्यांमध्ये दिसून येतात.”

“रूपांतर झालेले शिस्तबद्ध आहेत; तुरुंग रक्षकांना त्यांच्यापासून कोणताही धोका नाही” अशी कबुली वोवुफ सुधारगृहाच्या व्यवस्थापन मंडळाने दिल्याची झ्हचे वॉरसॉ या बातमीपत्राने बातमी दिली. त्याच लेखात पुढे म्हटले आहे, की शिक्षा पूर्ण होण्याआधीच ज्यांची सुटका झाली ते यहोवाच्या साक्षीदारांमध्ये चांगल्याप्रकारे सामील झाले आहेत व पुन्हा गुन्हेगारीकडे त्याचे पाय वळत नाहीत.

आणि तुरुंगाच्या संचालकांचे मत काय आहे? ते म्हणतात: “सुधारगृहातील यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य अतिशय इष्ट आहे व अपराध्यांना सामाजिक शिक्षण देण्यात बरेच उपयोगी आहे.” ते कबूल करतात, की “[साक्षीदारांबरोबर] बायबल अभ्यास करताना, अपराधी जसजसे हे धार्मिक तत्त्व आपलेसे करतात तसतसे त्यांची मूल्ये व दर्जा यांत परिवर्तन घडते; त्यांच्या जीवनाला दिशा दाखवणारे नवीन मार्गदर्शक मिळते. त्यांचे वर्तन अतिशय कौशल्यपूर्ण व सभ्य आहे. ते मेहनती आहेत सहसा त्यांच्याकडून काहीच समस्या नाही.” अर्थातच, अधिकाऱ्‍यांचे हे पसंतीदर्शक अभिप्राय, वोवुफ तुरुंगात सहवासींबरोबर कार्य करणाऱ्‍या साक्षीदारांना समाधान देतात.

“त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; . . . ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल,” या येशूच्या शब्दांचा अर्थ भेट देणारे साक्षीदार समजून घेतात. (योहान १०:१४-१६) तुरुंगातील भिंतीदेखील, मेंढरासमान लोकांना गोळा करण्यात उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्ताच्या आड येणार नाहीत. वोवुफमधील साक्षीदार, या आनंदी सेवेत भाग घेण्याचा सुहक्क मिळाल्याबद्दल कृतज्ञ आहेत. तसेच, आणखी पाषाण-हृदयी लोकांना अंत येण्याआधी राज्याच्या सुवार्तेला प्रतिसाद देण्यास मदत करण्याकरता यहोवाकडून सतत आशीर्वाद मिळावेत म्हणून ते यहोवाकडे पाहत आहेत.—मत्तय २४:१४.

[२७ पानांवरील चौकट]

“मोठ्या बाळाची” समस्या

वोवुफ सुधारगृहात काम करणाऱ्‍या साक्षीदारांचे असे म्हणणे आहे, की “काही वेळापर्यंत तुरुंगात राहिल्यानंतर, मुक्‍तपणे जगणे किंवा स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजे काय हे एखादा सहवासी विसरून जातो. आम्हाला खरं तर ‘मोठ्या बाळाची’ समस्या आहे; तुरुंगातून सुटल्यावर एखाद्याला स्वतःची काळजी कशी घ्यावी हे समजत नाही. म्हणून मग, मंडळी फक्‍त त्याला बायबल सत्य शिकवून वाऱ्‍यावर सोडून देत नाही. त्याने समाजाचा एक भाग व्हावा म्हणून आम्हाला त्याला तयार करावं लागतं, त्याला सामोरे जावे लागेल अशा नवनवीन धोक्यांची, प्रलोभनांची सूचना द्यावी लागते. अतिसंरक्षक न बनता काळजीपूर्वक राहून आपण त्याला जीवनात नवीन सुरवात करण्यास मदत केली पाहिजे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा