पाळकवर्ग जे काही शिकवतात त्या सर्वावर त्यांचा विश्वास असतो का?
त्यास्त्रीच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. तिच्या पाळकांचे म्हणणे होते, की तिचा पती स्वर्गात जाण्याइतका चांगलाही नव्हता किंवा अग्नीनरकात जाण्याइतका वाईटही नव्हता. म्हणून, तो स्वर्गात जाण्याच्या योग्यतेचा होईपर्यंत शिक्षा भोगतो आहे असे पाळकाचे म्हणणे होते. ती पाळकाला पैसे देते जेणेकरून तो, तिच्या पतीची परगेटरीतून लवकर सुटका व्हावी म्हणून प्रार्थना करील. या विधवेचे आता समाधान होते; तिला वाटते, की पाळकाचेसुद्धा तिच्यासारखेच प्रांजळ मत आहे.
परंतु मृत्यूनंतर शिक्षा होते यावर तिच्या पाळकाचा विश्वास नाही हे त्या विधवेला जर का समजलेच तर तिचा भ्रम नाहीसा होईल असे तुम्हाला वाटते का? बहुतेक पाळक जे शिकवतात त्यावर त्यांचा स्वतःचा विश्वास नसतो हे समजल्यामुळे पुष्कळ जण निराश झाले आहेत. नॅशनल कॅथलिक रिपोर्टर नामक मासिक या समस्येविषयी असे म्हणते, की “पाळकांमधील हा अवगुण, त्यांच्यातील लैंगिक अनैतिकतेच्या अवगुणापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे.” ते पुढे असे म्हणते: “आज पुष्कळशा पाळकांनी, देवाचे अस्तित्व, प्रतिफळ वा शिक्षा अथवा पुनरुत्थान यावर विश्वास ठेवण्याचे सोडून दिले आहे. . . . अविश्वास दाखवण्याची त्यांची ही प्रवृत्ती धुक्याप्रमाणे त्यांच्यामध्ये फैलावत चालली आहे.”
इतर चर्चेसही अशाच कचाट्यात सापडले आहेत. चर्च ऑफ इंग्लंडच्या पाळकांचा सर्वे घेतल्यावर असे दिसून आले, की पुष्कळ पाळक “कुमारी जन्म, येशूचे चमत्कार आणि मशीहाचे दुसरे येणे यासारख्या पारंपरिक ख्रिस्ती विश्वासाच्या मूलभूत शिकवणुकींवर विश्वास ठेवत नाहीत,” असा अहवाल ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा टाईम्सने दिला.
धर्मलेखक जॉर्ज आर. प्लेगन्झ यांनी एका सेवकाला विचारले, की तुम्ही स्वतःच अंगीकारावर विश्वास करीत नाही तर तो शुद्ध विवेकाने कसं काय बोलून दाखवता. दुसऱ्या एका सेवकाने म्हटले, की त्याने “मी विश्वास करतो,” हे अंगीकाराचे सुरवातीचे शब्द बदलले आहेत. त्याने म्हटले: “मी अंगीकार अशाप्रकारे सुरू करतो, ‘ते सर्वशक्तिमान पिता असलेल्या देवावर विश्वास करतात . . .’” प्लेगन्झ यांनी या दांभिकतेला “राष्ट्रातील सर्वात महान फसवणूक” असे संबोधले.
दुःखाची गोष्ट अशी, की पाळक दाखवत असलेला हा अविश्वास आणि अप्रामाणिकपणा यांमुळे पुष्कळ लोक धर्माबाबत निराश आहेत. परंतु आज, धर्माबाबतचा केवळ हाच एक अस्वस्थ करणारा पैलू नाही. चर्चला जाणाऱ्या बहुतेकांना शिकवले जाते, की बायबल हे देवाचे वचन आहे. चर्चने फार पूर्वी आपल्यात सामावून घेतलेल्या शिकवणुकी बायबलमध्ये नाहीत हे त्यांना समजल्यास त्यांना आश्चर्य वाटेल का? पुढील लेखात एका उदाहरणाचा विचार करण्यात आला आहे.