तुम्ही तुमच्या मुलांचे संरक्षण कसे कराल?
जवळच्याच शाळेत अनेक वर्षांपर्यंत शिक्षण घेतल्यावर, वर्नरनेa साउ पाउलु, ब्राझीलमधील इतर ३,००० युवकांबरोबर पुढील शिक्षण घेण्यास सुरवात केली. त्याने त्याच्या जीवनात पहिल्यांदा, सहविद्यार्थ्यांना मादक पदार्थ विकताना व सेवन करताना पाहिले. दिसायला ठेंगणा असल्यामुळे, त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या अपमानजनक व भयंकर रॅगींगला तो बळी पडला.
वर्नरची बहीण, ईवा, हिला देखील समस्या होत्या. चांगले मार्क मिळावेत म्हणून ती इतका अभ्यास करू लागली की मानसिकरीत्या पार थकून गेली आणि गोंधळून गेली. इतर तरुणांप्रमाणेच वर्नर आणि ईवा, यांना दोन्ही शारीरिक आणि मानसिक संरक्षण हवे होते. तुमच्या मुलांना कोणत्याप्रकारचे संरक्षण हवे आहे? तुम्ही त्यांना प्रौढपणासाठी तयार होण्यास कशी मदत करू शकता? होय, तुमच्या मुलांचे भवितव्य काय असावे असे तुम्हाला वाटते?
पोषण पुरेसे नाही
आज पालकांसमोर आपल्या मुलांचे संरक्षण करण्यात जे आव्हान आहे त्याचा क्षणभर थांबून जरा विचार करा. कौटुंबिक जीवनाचा दर्जा खालावल्यामुळे व दारिद्र्य वाढल्यामुळे अनेक देशांत बेघर मुलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालमजुरी, ही शोषणापासून अल्पवयीनांचे संरक्षण करण्यात अपयश आल्याचे फलित आहे. मादक पदार्थांच्या दुरुपयोगामुळे देखील पुष्कळ अल्पवयीनांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. उदाहरणार्थ, एक ब्राझिलीयन किशोरवयीन मादक पदार्थांचा व्यसनी झाला तेव्हा त्याच्या घरातील शांतीच गायब झाली. यामुळे त्याच्या पालकांवर मानसिक ताण आला, त्याला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आणि अंमली पदार्थांचे निर्दयी विक्रेते पैसे वसून करण्यासाठी त्यांच्या दारी येऊ लागले.
जीवनाच्या अनेक दबावांतही अनेक पालक आपल्या मुलांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवण्यासाठी झटतातच, पण त्या व्यतिरिक्त ते त्यांना हिंसा, अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि इतर समस्यांपासून संरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न देखील करतात. हा खरोखरच एक उदात्त प्रयत्न आहे; पण इतकेच पुरेसे आहे का? मानसिक आणि आध्यात्मिक धोक्यापासून त्यांचे संरक्षण करण्याबाबत काय? यशस्वीरीत्या मुलांचे संगोपन करण्यात, आपल्या मुलांच्या मित्रांची आणि मनोरंजनाची निवड या बाबतच्या समस्या सोडवणे समाविष्ट आहे. तरीसुद्धा पालक, अतिसंरक्षक होण्याचे किंवा अनिर्बंध स्वातंत्र्य देण्याचे कसे टाळू शकतात? पुढील लेखात मिळणाऱ्या उत्तरांचा विचार करण्यास आम्ही आपल्याला आमंत्रण देत आहोत.
[तळटीपा]
a या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.