“एका बोटाचे बायबल”
आजारपणानंतर लुळे झालेल्या जोसेफ शेरशेव्हस्की यांना केवळ एका पद्धतीने लिहिता येणे शक्य होते, टायपिंग करून; आणि तेसुद्धा एका बोटानेच. असे असूनही त्यांनी आपले ध्येय साधले. ध्येय कोणते, तर परदेशी माणसाला शिकायला सर्वात कठीण असणाऱ्या भाषेत अर्थात चिनी भाषेत बायबलचे भाषांतर.
यहुदी घराण्यात जन्मलेल्या शेरशेव्हस्की यांनी प्रौढावस्थेत ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करून तो स्वीकारला. कालांतराने ते एक मिशनरी म्हणून कार्य करण्यासाठी चीनला गेले. तेथे, अगदी १८६६ सालापासून ते २० व्या शतकाच्या सुरवातीच्या वर्षांपर्यंत त्यांनी कित्येक भाषांतर प्रकल्पांत भाग घेतला. यहुदी पार्श्वभूमी असल्यामुळे, शेरशेव्हस्की यांना आपल्या सहविद्वानांच्या तुलनेत हिब्रू भाषेचा अधिक जवळचा परिचय होता. म्हणूनच सबंध हिब्रू शास्त्रवचनांचे भाषांतर करण्याचे काम त्यांच्याच सुपूर्द करण्यात आले. त्यांचा दीर्घ सेवाकाळ संपत आला होता तोपर्यंत त्यांनी संपूर्ण बायबलचे संदर्भांसहित असलेले चिनी भाषांतर देखील पूर्ण केलेले होते.
बायबल भाषांतरकार या भूमिकेतून जोसेफ शेरशेव्हस्की हे सामान्य माणसाच्या भाषेत बायबल आवृत्त्या काढण्याचे आद्य समर्थक होते. पण त्यांचे कार्य काही साधेसुधे नव्हते. द बुक ऑफ अ थाउसंड टंग्स या पुस्तकात सांगितल्यानुसार चिनी बायबल तयार करण्यात त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे, “कारण [हे भाषांतर] अत्यंत बहुव्यापक असून कितीतरी असमर्थतांवर मात करून साकार झाले आहे.”
शेरशेव्हस्की यांचे हात लुळे पडले तरीही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. टायपिंग करणे त्यांना अतिशय अवघड जात असे, कारण ते पूर्वीसारखे आपल्या हातांचा उपयोग करू शकत नव्हते. म्हणूनच त्यांनी आपल्या या भाषांतराला एका बोटाचे बायबल असे नाव दिले. सर्व असमर्थतांवर मात करून हे भाषांतर तयार करण्यासाठी शेरशेव्हस्की यांना २५ वर्षे प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. पण हिंमत न हारल्यामुळे त्यांनी, आणखी कोणत्याही भाषेच्या तुलनेत सर्वाधिक लोक जी भाषा बोलतात त्या चिनी भाषेत देवाच्या वचनाचे एक सुलभ भाषांतर उपलब्ध करून देण्यात हातभार लावला.
[११ पानांवरील चित्राचे श्रेय]
दोन्ही आकृत्या: Courtesy of American Bible Society Archives