ताहितीमध्ये परादीसची सुवार्ता
ताहिती! या नावात जणू एक आगळीच जादू आहे. या बेटाला नावारूपाला आणले ते पॉल गॉगे, रॉबर्ट लूई स्टिव्हनसन आणि हर्मन मेलविल यांसारख्या कलाकारांनी आणि लेखकांनी, हिरव्यागार सौंदर्याच्या चित्रांनी आणि वर्णनांनी अनेक लोकांची मने जिंकली आहेत.
दक्षिण प्रशांत महासागरात वसलेल्या फ्रेंच पॉलिनेशियाच्या १२० बेटांपेक्षा ताहिती हे सर्वात मोठे बेट आहे. अनेक लोकांच्या मनांत दक्षिण समुद्रातील हे बेट एका परादीसप्रमाणे असले तरी ताहितीच्या लोकांना अद्यापही लवकरच येणाऱ्या आणखी एका परादीसविषयी ऐकणे गरजेचे आहे. (लूक २३:४३) आज, ताहितीमध्ये एकूण यहोवाच्या साक्षीदारांची संख्या १,९१८ इतकी असून ते तेथील २,२०,००० लोकांना देवाचे राज्य केवळ ताहितीमध्येच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवर वास्तविक परादीसमय परिस्थिती लवकरच आणील ही सुवार्ता सांगण्यात व्यग्र आहेत.—मत्तय २४:१४; प्रकटीकरण २१:३, ४.
ताहितीमधील प्रचारकार्य अनेक वर्षे तेथून सुमारे ३,५०० किलोमीटर दूर असलेल्या फिजीमधील वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराद्वारे मार्गदर्शित करण्यात आले. हे अंतर फार मोठे असल्यामुळे अनेक समस्या आल्या आणि त्यामुळे प्रगतीदेखील मंदावली. यास्तव, एप्रिल १, १९७५ मध्ये ताहितीमध्ये शाखा दफ्तर स्थापित करण्यात आले आणि यामुळे त्या क्षेत्रातील खऱ्या ख्रिश्चनांच्या कार्याला कलाटणी मिळाली. ही कलाटणी कशी मिळाली आणि ताहितीमध्ये प्रचारकार्याला कशाप्रकारे सुरवात झाली?
छोटीशी सुरवात
ताहितीमध्ये राज्य सुवार्ता पहिल्यांदा ऐकण्यात आली तो काळ म्हणजे १९३० चे दशक, आणि बायबलप्रती गाढ आदर असलेल्या अनेक द्वीपरहिवाश्यांनी मोठ्या आस्थेने प्रतिक्रिया दाखवली. तथापि, सरकारची बंदी आणि इतर बंधने यांमुळे १९५० च्या दशकाच्या अखेरपर्यंत तेथे एकही साक्षीदार नव्हता. आन्येस शेन्क, या मूळच्या ताहितीच्या रहिवासी त्यावेळी अमेरिकेत राहत होत्या; आपल्या पतीबरोबर आणि मुलाबरोबर ताहितीला जाण्याचे त्यांनी ठरवले. हे सर्व कसे झाले याविषयी त्या सांगतात.
“लॉस अन्जेलेसमध्ये १९५७ साली झालेल्या प्रांतीय अधिवेशनात, बंधू नॉर [वॉच टावर संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष] यांनी, ताहितीमध्ये राज्य प्रचारकांची नितान्त आवश्यकता असल्याचं सांगितलं. तेव्हा मला बाप्तिस्मा घेऊन एक वर्षच झालं होतं आणि मी म्हटलं, ‘तर मग आपण ताहितीला जाऊ या!’ नील आणि कॉरनॉ ही दोन कुटुंबे आमच्या जवळची होती, मी जे म्हटलं ते त्यांनी ऐकलं. त्यांचीही तशी इच्छा असल्याचं त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं होतं, पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझे पतीही पुष्कळ काळापासून आजारी होते आणि मुलगा तर अद्याप फार लहान होता. त्यामुळे आम्हाला तेथून निघणं कठीण होतं. आमच्या इराद्याविषयी शेजारच्या मंडळ्यांतील स्नेह्यांना कळलं आणि त्यांनी आम्हाकरता पैसे आणि काही गृहउपयोगी सामान पाठवलं. त्यानंतर आम्ही १९५८ च्या मे महिन्यात ताहितीला जलप्रवासाने रवाना झालो, त्यावेळी इतर सामानासह आमच्यासोबत ३६ बेडशीटं होती!
“आम्ही ताहितीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा मला चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं कारण ते बेट सोडून मला २० वर्षे झाली होती. आम्ही प्रचारास सुरवात केली, पण आमच्या ख्रिस्ती कार्यावर बंदी असल्यामुळे आम्हाला सावधगिरी बाळगावी लागत होती. आम्हाला नियतकालिके लपवून ठेवावी लागत, आणि त्याकाळात आम्ही केवळ बायबलचा उपयोग करत असू. सुरवातीला आम्ही केवळ अशा लोकांना साक्ष देत होतो ज्यांनी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांची वर्गणी केलेली होती.
“सन १९५८ मध्ये न्यूयॉर्क शहरातील आंतरराष्ट्रीय अधिवेशनानंतर क्लाइड नील आणि डेव्हिड कॉरनॉ सहकुटुंब आमच्याकडे आले. आम्ही सर्व मिळून प्रचाराला जात असू आणि भाषण ऐकण्यासाठी लोकांना बांधवांच्या घरी बोलावत असू. हळूहळू गोष्टी जुळून आल्या आणि आम्ही १५ लोकांसोबत बायबल अभ्यास गटाची सुरवात केली. नील आणि कॉरनॉ त्यांच्या पर्यटक परवान्याची मुदत संपल्यामुळे त्यांना तीन महिन्यांनंतर परत जावं लागणार होतं. म्हणून त्यांच्या जाण्याआधी पात्र असलेल्या सर्व आस्थेवाईकांना बाप्तिस्मा देण्याचं बांधवांनी ठरवलं. पहिल्या बाप्तिस्मा भाषणाचं भाषांतर करण्याचा सुहक्क मला देण्यात आला होता. त्या प्रसंगी आठ स्थानिक द्वीपरहिवाश्यांनी यहोवाला समर्पणाचं द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर नील आणि कॉरनॉ कुटुंबे अमेरिकेला परतली.
“प्रचारकार्य अखंडपणे चालू राहिले. छोट्याछोट्या गटांमध्ये संघटित होऊन आम्ही लोकांच्या घरी संध्याकाळी जात असू. बहुतेक वेळा आस्थेवाईक लोकांसोबतच्या चर्चा मध्यरात्रीपर्यंत चालत. काहीवेळा तर प्रॉटेस्टंट पाळकही चर्चांमध्ये सहभागी होत असत. सन १९५९ पर्यंत पहिल्या मंडळीची स्थापना झाली होती. सन १९६० मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेला कायदेशीर मान्यता मिळाली तेव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. सुरवातीच्या काळातील ती वर्षे आनंदाने आणि आध्यात्मिक उत्साहाने भरलेली होती. ज्या ठिकाणी अधिक आवश्यकता होती तेथे जाण्याचा आमचा निर्णय यहोवाने खरोखरच आशीर्वादित केला होता.” बहीण शेन्क आता ८७ वर्षांच्या आहेत आणि त्या अद्यापही त्यांच्या मंडळीत यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत.
कार्याची पुढील वाटचाल
सन १९६९ मध्ये फ्रान्सच्या झॉक आणि पॉलेट इनॉडी या दोघा साक्षीदारांना ताहितीमध्ये खास पायनियर म्हणून नेमण्यात आले. झॉक यांना आठवते: “आम्ही जेव्हा ताहितीमध्ये आलो तेव्हा तेथे फक्त १२४ प्रचारक होते, पापीतीमध्ये एक मंडळी होती आणि वाइरॉओ या द्वीपकल्पावर दोन खास पायनियर होते.” हा द्वीपकल्प ताहितीला एका संयोगभूमीद्वारे जोडलेला आहे. “पृथ्वीवर शांती” हे आंतरराष्ट्रीय संमेलन त्यावेळी लवकरच भरवण्यात येणार होते. “अधिवेशनाचं आयोजन करण्याचा तो माझा पहिलाच अनुभव होता,” झॉक पुढे म्हणतात. “पाहुण्यांसाठी इंग्रजी कार्यक्रमाची योजना आम्हाला करायची होती तसेच राज्यगीतांसाठी वाद्यवादनाची व्यवस्था आणि दोन नाटकांची तालीम करायची होती. हे सर्व काम केवळ १२६ प्रचारकांनी पूर्ण केलं. या कामात सर्वात मोठा वाटा यहोवाचा होता, याची मला खात्री आहे.” उपस्थित असलेल्या ४८८ जणांना पाहून द्वीपवासी रोमांचित झाले होते. त्यांपैकी अनेक जण पहिल्यांदाच दुसऱ्या देशातील सहसाक्षीदारांना भेटले होते.
काही काळानंतर, झॉक इनॉडी यांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. विविध बेटांना भेटी देत असताना त्यांना असे दिसून आले, की तेथे खूप आस्था आहे पण ती आस्था वाढविण्यासाठी राज्य प्रचारक कमी आहेत. “त्यामुळे ज्याठिकाणी जास्त आवश्यकता आहे अशा बेटांवर सेवा करण्याकरता जाण्याचं उत्तेजन मी अनेक कुटुंबांना दिलं,” झॉक सांगतात. “परिणामी, हळूहळू त्या द्वीपसमूहावर सुवार्ता पसरली.” बंधू इनॉडी यांनी १९६९ ते १९७४ पर्यंत प्रवासी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले आणि आज ते ताहितीमधील एका मंडळीत वडील आहेत.
बंधू इनॉडी यांच्या उत्तेजनाला प्रतिक्रिया दाखवण्याऱ्यांपैकी ऑगुस्त टेमानाहे हे एक होते, सन १९५८ मध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या आठ जणांपैकी तेही होते. नक्की काय घडले याविषयी ते सविस्तर सांगतात. “सन १९७२ मध्ये विभागीय पर्यवेक्षक, झॉक इनॉडी यांनी आम्हाला सोसायटी द्वीपसमूहातील, लीवर्ड बेटावरील वॉहिनी येथे जाण्याचा विचार करण्याचे उत्तेजन दिले. मी जायला काकू करत होतो कारण त्यावेळी मी मंडळीमध्ये केवळ बायबल वाचनाचा भाग केला होता आणि माझ्यावर अशा प्रकारची जबाबदारी सोपवण्यात यावी इतका मी स्वतःस पात्र समजत नव्हतो. तथापि, बंधू इनॉडी मला नेहमी सांगत असत, ‘तुम्ही चिंता करू नका, तुम्ही ते करू शकता!’ काही काळानंतर आम्ही आमच्या मनाची तयारी केली. अशा प्रकारे सन १९७३ मध्ये आम्ही आमचे होते नव्हते ते विकून आमच्या तिन्ही मुलांसोबत वॉहिनीला येऊन पोहंचलो.
“तेथे पोहंचल्यानंतर सर्व गोष्टींची मला सुरवात करावी लागली—टेहळणी बुरूज अभ्यास, ईश्वरशासित सेवा प्रशाला वगैरे. हे सर्व तितकं सोपं नव्हतं, पण आम्हाला यहोवाच्या संरक्षणाचा आणि मदतीचा अनुभव आला. कित्येक प्रसंगी राहण्याकरता जागा शोधण्यात त्याने आम्हाला मदत केली. त्यानंतर, जेव्हा विरोधकांच्या एका गटाने साक्षीदारांना बेटावरून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक स्थानिक राजकीय व्यक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली होती. खरोखरच, त्या सर्व काळात यहोवाची कृपादृष्टी आमच्यावर निश्चितच होती.” आता, वॉहिनीमध्ये दोन मंडळ्या आहेत—फ्रेंच मंडळीत २३ प्रचारक आहेत आणि ताहितियन मंडळीत ५५ प्रचारक आहेत.
सन १९६९ मध्ये एलेन मॉपु यांना या द्वीपकल्पावर काम करण्यासाठी खास पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आले. “या द्वीपकल्पावर अनेक लोक आस्थेवाईक होते आणि थोड्याच कालावधीत मी अनेक बायबल अभ्यास घेऊ लागले,” एलेन म्हणतात. लवकरच वाइरॉओमध्ये छोटी मंडळी स्थापण्यात आली, परंतु त्याठिकाणी वडिलांची गरज होती. कालांतराने, ३५ किलोमीटर दूर पापारामध्ये राहणाऱ्या कॉलसन डीन नामक वडिलांची मंडळीला मदत झाली. “वाइरॉओमध्ये सेवा करता यावी म्हणून आम्हाला सुसंघटित व्हावयाचे होते,” बंधू डीन सांगतात. “त्यावेळी मी वाइरॉओपासून ७० किलोमीटर अंतरावर द्वीपाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या फाआ नामक ठिकाणी काम करायचो. काम संपल्यानंतर मला घाईघाईने घरी जावं लागत असे त्यानंतर माझ्या कुटुंबाला घेऊन वाइरॉओला जावं लागत असे. पुढे माझ्या नोकरीसाठी आम्हाला फाआला जावं लागलं. वाइरॉओतील मंडळीला जाणं आम्हाला अद्यापही शक्य होणार होतं का? तेथील बांधवांना मदत करावी असं आम्हाला मनोमन वाटत होतं त्यामुळे आम्ही तेथील सभांना जाण्याचं चालू ठेवलं. आम्ही सभेच्या दिवशी मध्यरात्रीपूर्वी घरी फार क्वचितच आलो कारण ज्यांच्याकडे कार नव्हत्या अशा लोकांना आम्हाला त्यांच्या घरी पोहंचविण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागत असत. आम्ही असं पाच वर्षे केलं. बेटावरील या भागात आता चार मंडळ्या असल्याचं पाहून फार आनंद होतो आणि त्या दिवसांच्या अनेक गोड आठवणी आमच्याकडे आहेत.”
ताहिती शाखा बनते
सन १९७४ पर्यंत ताहितीमधील राज्य प्रचारकांची संख्या वाढून १९९ झाली. त्यानंतरच्या वर्षी, तेव्हाचे वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एन. एच. नॉर आणि एफ. डब्लू. फ्रान्झ यांनी फ्रेंच पॉलिनेशियाला भेट दिली तेव्हा त्यांना तेथील प्रचार कार्य ३,५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या फिजीद्वारे मार्गदर्शित करण्यापेक्षा ते ताहितीमधून मार्गदर्शित करणे व्यवहार्य असल्याचे दिसून आले. अशा प्रकारे, एप्रिल १, १९७५ मध्ये ताहिती शाखा कार्यरत झाली आणि विभागीय पर्यवेक्षक, ॲलन जाहमे यांना शाखा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले.
सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी बंधू जाहमे यांनी यहोवाच्या आशीर्वादांविषयी सांगितले. “आमच्या क्षेत्रातील सर्व बेटांवर आणि द्वीपसमूहांवर सुवार्ता नेण्यासाठी सन १९७५ पासून फार मोठा प्रयत्न करण्यात आला आहे आणि हे क्षेत्र पश्चिमी यूरोप इतके मोठे आहे. या प्रयत्नाचा परिणाम आनंदमय झाला आहे. सन १९८३ पर्यंत प्रचारकांची संख्या ५३८ पर्यंत वाढली होती. त्या वर्षी शाखा दफ्तराची आणि बेथेल गृहाची इमारत पाइआमध्ये उभारण्यात आली. आता सोसायटी द्वीपसमूहात ३० मंडळ्या असून त्यात सुमारे १,९०० प्रचारक आहेत, ऑस्ट्रल द्वीपसमूहात एक मंडळी आणि एकाकी गट आहे, मार्केसासमध्ये एक मंडळी आणि दोन एकाकी गट आहेत, तसेच तूआमोतू आणि गँबिअर बेटांमध्ये अनेक एकाकी गट आहेत. संभांना येणाऱ्या नवीन लोकांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेता अनेक राज्य सभागृह उभारण्यात येत आहेत—मार्केसासमध्ये तीन आणि ताहितीमध्ये सात. मागील २० वर्षांत, ताहितियन क्षेत्रात कार्य करण्याच्या आमच्या प्रयत्नांवर यहोवाने खरोखरच आशीर्वाद दिला आहे.”
अद्यापही पुष्कळ काही करायचे आहे
फ्रेंच पॉलिनेशियामध्ये संभाव्य वाढ फार उत्तम आहे. मार्च २३, १९९७ रोजी संपूर्ण फ्रेंच पॉलिनेशियामध्ये येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकाला सुमारे ५,३७६ लोक यहोवाच्या साक्षीदारांसोबत जमा झाले होते. या आस्थेवाईक लोकांच्या आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी आपली बायबल प्रकाशने अनेक स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ताहितियनशिवाय, साहित्य पाऊमोटू भाषेत तयार करण्यात आले आहे, ही भाषा तूआमोतू द्वीपसमूहात आणि उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील मार्केसासमध्ये बोलली जाते.
स्थिर वाढ आणि उत्तम अनुभव यांमुळे ताहितीमधील राज्य प्रचारकांना यहोवाचे प्रेम आणि त्याची सहनशीलता यांची अधिक चांगल्याप्रकारे कदर करण्यास मदत मिळाली आहे, कारण दक्षिण समुद्राच्या दूरवरील द्वीपसमूहातील लोकांचेही ‘तारण व्हावे व त्यांनीही सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे,’ अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) ताहितीमधील आणि फ्रेंच पॉलिनेशियामधील इतर बेटांवरील यहोवाच्या साक्षीदारांचा यहोवाच्या अभिवचनावर पूर्ण विश्वास आहे: “द्वीपांना माझा ध्यास लागला आहे. त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे.”—यशया ५१:५.
[२५ पानांवरील चित्र]
डावीकडून उजवीकडे: ॲलन जाहमे, मेरी-ॲन जाहमे, आन्येस शेन्क, पॉलेट इनॉडी आणि झॉक इनॉडी
[२६ पानांवरील चित्र]
ताहिती शाखा फ्रेंच पॉलिनेशियाच्या गरजा भागवते
[२७ पानांवरील चित्र]
ताहिती शाखा दफ्तर