संभोगहीन विवाह?
मरीयेने अखेरपर्यंत राखलेल्या कौमार्याच्या आणि योसेफाबरोबर तिच्या विवाहाच्या एकवाक्यतेत राहण्याकरता अनेक चित्रकारांनी आणि मूर्तिकारांनी योसेफाला वयस्कर दाखवले आहे. ते असे कारण सांगतात, की योसेफ मरीयेच्या पतीपेक्षा तिचा संरक्षकच होता. पण पोप जॉन पॉल दुसरे यांनी अलीकडे या घटनेच्या बाबतीत एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. ते असे सूचवतात, की योसेफ “त्यावेळी वयस्कर मनुष्य नव्हता.” उलटपक्षी, “त्याची आंतरिक परिपूर्णता, देवाच्या कृपेमुळे त्याच्याकडे असणाऱ्या आंतरिक तत्त्वाने त्याला मरीयेचे कौमार्य कायम ठेवून तिच्यासोबत वैवाहिक जीवन व्यतीत करण्यास प्रेरित केले.”
मरीयेला अखेरपर्यंत कौमार्य कायम टिकवायचे होते, तर तिने विवाहाचे वचन तरी का दिले? पोप उत्तर देतात, “असे आपण गृहीत धरू शकतो, की वाङ्निश्चयावेळी योसेफ आणि मरीया या दोघांनी कौमार्य कायम राखण्याचे ठरवले होते.”
तथापि, बायबल या घटनेविषयी वेगळीच माहिती देते. मत्तयाचा अहवाल सांगतो की, “जोपर्यंत तिने मुलाला जन्म दिला नाही तोपर्यंत योसेफाने तिच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही.” (मत्तय १:२५, कॅथलिक न्यू अमेरिकन बायबल, तिरपे वळण आमचे.) येशूच्या जन्मानंतर, योसेफ आणि मरीयेच्या वैवाहिक बंधनात कोणत्याही अर्थाने कौमार्य राहिले नाही. त्याचा एक पुरावा म्हणजे, नंतर शुभवर्तमानाच्या अहवालात येशूला भाऊ आणि बहिणी असल्याचे सांगण्यात आले आहे.—मत्तय १३:५५, ५६.
अशा प्रकारे, मरीयेने येशूला जन्म दिला त्यावेळी ती कुमारिका असल्याचे बायबल सांगते, पण त्यानंतर तिने योसेफाबरोबर तिचे पुढील आयुष्य कुमारिका म्हणून घालविले असा दावा करण्यासाठी कोणताही आधार नाही.