मुक्तता निकट येते तसे धीर धरा
“‘तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे,’ असे परमेश्वर म्हणतो.”—यिर्मया १:१९.
१, २. मानवी कुटुंबाला मुक्ततेची आवश्यकता का आहे?
मुक्तता! किती सांत्वनपर शब्द! मुक्त होणे म्हणजे सोडवणे, वाईट, दुःखद अवस्थेतून स्वतंत्र होणे. यामध्ये, सर्वोत्तम, आनंदी अवस्थेत पुन्हा आणले जाण्याचा विचार गोवलेला आहे.
२ मानवी कुटुंबाला या काळात अशा प्रकारच्या मुक्ततेची किती नितान्त गरज आहे! लोक सर्वत्र जुलूमाखाली आहेत व आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक, अशा कठीण समस्यांनी निरुत्साहित झाले आहेत. जग जेथे वाटचाल करीत आहे त्यामुळे बहुसंख्य लोक असमाधानी व निराश आहेत आणि त्यांच्या भल्यासाठी त्यांना बदल हवा आहे.—यशया ६०:२; मत्तय ९:३६.
“शेवटल्या काळी कठीण दिवस”
३, ४. मुक्ततेची आज नितांत गरज का आहे?
३ इतर कोणत्याही शतकापेक्षा या २० व्या शतकाने अधिक दुःख अनुभवले असल्यामुळे पूर्वीपेक्षा आता मुक्ततेची अधिक आवश्यकता आहे. आज, शेकडो कोटीपेक्षा अधिक लोक दारिद्र्यात जगत आहेत आणि ही संख्या दर वर्षी २ कोटी ५० लाख इतकी वाढतच चालली आहे. प्रत्येक वर्षी उपासमार अथवा दारिद्र्यासंबंधित इतर कारणांमुळे सुमारे १ कोटी ३० लाख मुले—एका दिवसाला ३५,००० पेक्षा अधिक मुले दगावतात. याशिवाय, विविध आजारांमुळे लाखो वृद्धांचा अकाली मृत्यू होत आहे.—लूक २१:११; प्रकटीकरण ६:८.
४ युद्धे आणि नागरी अव्यवस्थांमुळे प्रचंड दुःख ओढवले आहे. सरकारामुळे मृत्यू (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, की युद्धे, जातीय व धार्मिक झगडे तसेच सरकारद्वारा आपल्याच नागरिकांच्या प्रचंड कत्तलीमुळे “या शतकात २० कोटी ३० लाखापेक्षा अधिक लोक ठार झाले.” ते पुढे म्हणते: “मेलेल्यांची खरी संख्या ३६ कोटीच्या आसपास असू शकते. जणू काय आपली जाती एखाद्या आधुनिक काळ्या प्लेगमुळे नष्ट झाली आहे. या जातीचा जरूर नाश झालेला आहे, पण कोणत्याही जंतूमुळे नव्हे तर सत्तेच्या साथीमुळे.” लेखक रिचर्ड हॉरवुड यांनी असे निरीक्षण केले: “तुलना केल्यास गत काळातील रानटी युद्धे क्षुल्लक होती.”—मत्तय २४:६, ७; प्रकटीकरण ६:४.
५, ६. आपला काळ कशामुळे इतका दुःखमय झाला आहे?
५ अलिकडील वर्षांतील दुःखमय परिस्थिती या व्यतिरिक्त, हिंसक गुन्हेगारी, अनैतिकता व कौटुंबिक बिघाड यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भूतपूर्व संयुक्त संस्थान शिक्षणाचे सेक्रेटरी विल्यम बेनट यांनी अशी नोंद केली, की ३० वर्षांदरम्यान संयुक्त संस्थानांतील लोकसंख्या ४१ टक्के वाढली, पण हिंसक गुन्हेगारी ५६० टक्क्यांनी, अनौरस जन्म ४०० टक्क्यांनी, घटस्फोट ३०० टक्क्यांनी व किशोरवयीन आत्महत्यांचे २०० टक्क्यांनी प्रमाण वाढले. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक जॉन डियुलयो ज्युनियर यांनी, “खून, हल्ला, बलात्कार, चोरी, घरफोडी करणाऱ्या व गंभीर जातीय भंग निर्माण करणाऱ्या” तरुण ‘सुपर-लुटारूंच्या’ वाढत्या संख्येचा इशारा दिला. “त्यांना अटकेच्या कलंकाची, कारावासाच्या वेदनांची किंवा विवेकाच्या यातनांची भीती वाटत नाही.” त्या देशात मनुष्यवध आता, १५ ते १९ वयोगटात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे कारण आहे. शिवाय, चार वर्षांखालील पुष्कळ मुले आजारापेक्षा गैरवागणूकीमुळे दगावत आहेत.
६ अशा प्रकारची गुन्हेगारी व हिंसा केवळ एकाच देशात होते असे नाही. बहुतेक देश याचप्रकारच्या प्रवृत्तींचा अहवाल देतात. यात लाखो लोकांचे पतन करणाऱ्या बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या वापराची लाट आणखी भर घालत आहे. ऑस्ट्रेलियाचे सिडनी मॉर्निंग हेरल्ड म्हणते: “आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचा व्यापार, शस्त्रांच्या व्यापारानंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लाभप्रद व्यापार बनला आहे.” दुसरे एक कारण, हिंसा आणि अनैतिकतेने भरलेले दूरदर्शन कार्यक्रम. अनेक राष्ट्रांमध्ये, एक मूल १८ वर्षांचे होईपर्यंत त्याने टीव्हीवर अगणित हिंसक कृत्ये व अगणित अनैतिक कृत्ये पाहिलेली असतात. हा भ्रष्ट करणारा विलक्षण प्रभाव आहे कारण आपण नियमितरीत्या आपल्या मनांची जी भरवणूक करतो त्यानुसार आपले व्यक्तिमत्व घडवले जाते.—रोमकर १२:२; इफिसकर ५:३, ४.
७. वर्तमान दुष्ट परिस्थितीबद्दल बायबलच्या भविष्यवाणीने कसे भाकीत केले?
७ बायबल भविष्यवाणीने आपल्या शतकातील घटनांच्या भयंकर झुकावाविषयी अचूकपणे भाकीत केले होते. तिने म्हटले की, विश्वव्यापी युद्धे होतील, रोगांच्या साथी येतील, अन्नटंचाई असेल व अधर्माची वाढ होईल. (मत्तय २४:७-१२; लूक २१:१०, ११) आणि २ तीमथ्य ३:१-५ मधील भविष्यवाणीचा विचार करणे, दररोजच्या बातम्या ऐकण्याप्रमाणे आहे. ती आपल्या युगाची ओळख ‘शेवटला काळ’ अशी करते व ‘स्वार्थी, धनलोभी, आईबापास न मानणारी, अप्रामाणिक, ममताहीन, असंयमी, क्रूर, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,’ असे लोकांचे वर्णन करते. आजचे जग हुबेहूब असेच आहे. विल्यम बेनट यांनी कबूल केल्याप्रमाणे: “संस्कृती पूर्णपणे भ्रष्ट झाल्याची . . . पुष्कळ चिन्हे आहेत.” असेही म्हटले गेले की पहिले महायुद्ध झाले तेव्हाच संस्कृती लयास पोहंचली.
८. देवाने नोहाच्या दिवसांत जलप्रलय का आणला व त्याचा संबंध आपल्या काळाशी कसा लागतो?
८ आताची परिस्थिती नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाआधी ‘पृथ्वी जेव्हा भ्रष्ट झाली होती’ त्यापेक्षाही बिकट आहे. त्याकाळी, लोकांनी सामान्यपणे आपल्या वाईट मार्गांबद्दल पश्चात्ताप करण्यास नकार दिला. म्हणून देव म्हणाला: “त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे पाहा, मी . . . त्यांचा नाश करीन.” जलप्रलयाने त्या हिंसक जगाचा अंत केला.—उत्पत्ति ६:११, १३; ७:१७-२४.
मानवांकडून मुक्तता नाही
९, १०. मुक्तता मिळावी म्हणून आपण मानवांकडे का पाहू नये?
९ मानवी प्रयत्न या वाईट परिस्थितीतून आपली सुटका करू शकतात का? देवाचे वचन उत्तरते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरंवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (स्तोत्र १४६:३; यिर्मया १०:२३) इतिहासाच्या हजारो वर्षांनी या सत्यांचा पुरावा दिला आहे. मानवांनी, कल्पना करता येणार नाही अशा सर्व प्रकारच्या राजनैतिक, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांद्वारा प्रयत्न केले पण परिस्थिती आणखीनच बिकट झाली. एखादा मानवी उपाय असता तर तो आतापर्यंत प्रकट झाला असता. उलट, “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो,” ही वास्तविकता आहे.—उपदेशक ८:९; नीतिसूत्रे २९:२; यिर्मया १७:५, ६.
१० काही वर्षांपूर्वी, संयुक्त संस्थान राष्ट्रीय सुरक्षाचे भूतपूर्व सल्लागार, झ्बेगनेव ब्राझींस्की म्हणाले: “सामाजिक अस्वस्थता, राजनैतिक गोंधळ, आर्थिक संकट आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष अधिक फैलावण्याची शक्यता आहे, हा विश्वव्यापी झुकावांबद्दलच्या कोणत्याही प्रकारच्या अपक्षपाती पृथक्करणाचा टाळता न येण्याजोगा समारोप आहे.” ते पुढे म्हणाले: “विश्वव्यापी अराजकता, हा मानवजातीसमोर धोका [आहे].” जागतिक परिस्थितीचा तो अंदाज आज खूपच खरा आहे. वाढत्या हिंसाचाराच्या या युगावर विवेचन करताना कनेक्टिकटच्या न्यू हॅवन, रेजिस्टर मध्ये, एका संपादकीय लेखाने असे घोषित केले: “परिस्थितीला आटोक्यात आणणे शक्य नाही कारण ती हाताबाहेर गेली आहे.” होय, या जगाचा होणारा ऱ्हास थांबवता येणार नाही कारण, ‘शेवटल्या काळाबद्दलच्या’ भविष्यवाणीने असेही म्हटले: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.”—२ तीमथ्य ३:१३.
११. बिकट झालेल्या परिस्थितीत मानवी प्रयत्नांनी परिवर्तन का येऊ शकत नाही?
११ मानव या प्रवृत्तींमध्ये परिवर्तन करू शकत नाहीत कारण सैतान ‘या युगाचा दैवत आहे.’ (२ करिंथकर ४:४) होय, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९; तसेच योहान १४:३० देखील पाहा.) बायबल आपल्या दिवसांविषयी अचूकपणे म्हणते: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) आपले शासन आणि आपले जग लवकरच समाप्त होणार आहे हे सैतानाला माहीत आहे म्हणून तो “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.
मुक्तिसमय जवळ आहे—कोणासाठी?
१२. कोणासाठी मुक्तीचा समय जवळ येत आहे?
१२ पृथ्वीवरील वाढती कठीण परिस्थिती, एक मोठा बदल, होय, एक भव्य मुक्तिसमय निकट असल्याचा विलक्षण पुरावा आहे! पण कोणासाठी मुक्तता? इशारेवजा चिन्हांकडे लक्ष देणाऱ्या व तदनुसार कृती करणाऱ्यांसाठी मुक्तिसमय जवळ आहे. पहिले योहान २:१७ हे वचन काय करण्याची आवश्यकता आहे ते दाखवते: “जग [सैतानाचे व्यवस्थीकरण] व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (तिरपे वळण आमचे.)—तसेच २ पेत्र ३:१०-१३ देखील पाहा.
१३, १४. जागृत राहण्याच्या गरजेवर येशूने कसा जोर दिला?
१३ येशूने भाकीत केले की आजचा भ्रष्ट समाज लवकरच, “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीहि येणार नाही,” अशा पीडादायक काळात समाप्त केला जाणार आहे. (मत्तय २४:२१) म्हणूनच त्याने असे म्हणून आपल्याला सावध केले: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित् अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास . . . समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३४-३६.
१४ ‘कान देणारे’ व ‘जागृत’ लोक देवाची इच्छा काय आहे ते शोधून काढतील व ती पूर्ण करतील. (नीतिसूत्रे २:१-५; रोमकर १२:२) हेच लोक, सैतानाच्या व्यवस्थीकरणावर लवकरच आणल्या जाणाऱ्या नाशातून बचावण्यात ‘समर्थ ठरतील.’ शिवाय, त्यांना मुक्तता मिळेल हा पूर्ण भरवसा ते बाळगू शकतात.—स्तोत्र ३४:१५; नीतिसूत्रे १०:२८-३०.
प्रमुख मुक्तिदाता
१५, १६. प्रमुख मुक्तिदाता कोण आहे, व त्याचे न्यायदंड धार्मिक असतील याची आपल्याला खात्री का वाटते?
१५ देवाच्या सेवकांना मुक्तता देण्याकरता, सैतान आणि जगभरातील त्याच्या संपूर्ण व्यवस्थेला काढून टाकण्याची आवश्यकता आहे. यासाठी मानवांपेक्षा अधिक पटीने शक्तिशाली मुक्ततेच्या उगमाची आवश्यकता आहे. तो उगम यहोवा देव, सर्वश्रेष्ठ सार्वभौम, या भयजनक विश्वाचा सर्वशक्तिमान निर्माणकर्ता आहे. तोच प्रमुख मुक्तिदाता आहे: “मीच परमेश्वर [यहोवा, NW] आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.”—यशया ४३:११; नीतिसूत्रे १८:१०.
१६ यहोवाठायी सर्वोच्च प्रमाणात शक्ती, बुद्धी, न्याय आणि प्रीती आहे. (स्तोत्र १४७:५; नीतिसूत्रे २:६; यशया ६१:८; १ योहान ४:८) यास्तव, तो आपले न्यायदंड बजावेल तेव्हा त्याची कार्ये धार्मिक असतील याची आपण खात्री बाळगू शकतो. अब्राहामाने विचारले: “सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” (उत्पत्ति १८:२४-३३) पौलाने म्हटले: “देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही!” (रोमकर ९:१४) योहानाने लिहिले: “हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत.”—प्रकटीकरण १६:७.
१७. गत काळातील यहोवाच्या सेवकांनी त्याच्या अभिवचनांवर कशा प्रकारे भरवसा प्रकट केला?
१७ यहोवा मुक्ततेचे अभिवचन देतो तेव्हा तो न चुकता ते पूर्ण करील. यहोशवाने म्हटले: “परमेश्वराने . . . ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही.” (यहोशवा २१:४५) शलमोन बोलला: “तो . . . जे वचन बोलला त्यातला एकहि शब्द व्यर्थ गेला नाही.” (१ राजे ८:५६) अब्राहाम “अविश्वासामुळे डळमळला नाही, . . . देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासहि समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती,” अशी नोंद प्रेषित पौलाने केली. त्याचप्रमाणे सारेनेही “वचन देणाऱ्यास [देवास] विश्वसनीय मानले.”—रोमकर ४:२०, २१; इब्री लोकांस ११:११.
१८. आपला बचाव होईल असा भरवसा यहोवाचे सेवक आज का बाळगू शकतात?
१८ मनुष्यांपासून विपरित, यहोवा पूर्णपणे भरवसालायक व आपल्या वचनाला जागतो. “सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की, मी कल्पिले तसे होईलच; मी योजिले तसे घडेलच.” (यशया १४:२४) यास्तव, “भक्तिमान् लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान् लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते,” असे जेव्हा बायबल म्हणते तेव्हा त्याप्रमाणेच घडेल असा संपूर्ण भरवसा आपण बाळगू शकतो. (२ पेत्र २:९) शक्तिशाली शत्रूंकडून नाशाची धमकी मिळाली तरी, यहोवाने आपल्या एका संदेष्ट्याद्वारा दिलेल्या अभिवचनात प्रतिबिंबित होणाऱ्या त्याच्या मनोवृत्तीमुळे त्याचे सेवक धीर धरतात की: “ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”—यिर्मया १:१९; स्तोत्र ३३:१८, १९; तीत १:२.
गत काळांतील मुक्तता
१९. यहोवाने लोटाला कसे मुक्त केले व आपल्या काळात ते कशाशी समांतर आहे?
१९ गत काळात यहोवाच्या बचाव कार्यांतील काही घटनांचे स्मरण करण्याद्वारे आपण बरेच उत्तेजन प्राप्त करू शकतो. जसे की, सदोम आणि गमोराच्या दुष्टाईमुळे लोट खूपच ‘विटला’ होता. पण यहोवाने त्या शहरांविषयीची ‘ओरड ऐकली.’ उचित समयी त्याने लोट आणि त्याच्या कुटुंबाला त्या क्षेत्रातून लगेचच निघण्यास आर्जवण्याकरता संदेशवाहक पाठवले. परिणाम? “सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून” यहोवाने “नीतिमान् लोट ह्याची सुटका केली.” (२ पेत्र २:६-८; उत्पत्ति १८:२०, २१) आजही, या जगाची भयंकर दुष्टता पाहून तक्रार करणाऱ्या लोकांकडे यहोवाचे लक्ष आहे. आपल्या आधुनिक दिवसातील संदेशवाहकांनी त्याला हवे त्या प्रमाणावर त्यांचे निकडीचे साक्षकार्य पूर्ण केल्यानंतर, तो या जगाविरुद्ध कार्यवाही करील आणि लोटाप्रमाणे आपल्या सेवकांनाही मुक्त करील.—मत्तय २४:१४.
२०. प्राचीन इस्राएलला यहोवाने इजिप्तच्या हातून कसे सोडवले त्याचे वर्णन करा.
२० प्राचीन इजिप्तमध्ये देवाचे लाखो लोक दास्यत्वात होते. त्यांच्याविषयी यहोवा म्हणाला: ‘त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मी सोडवणार आहे.’ (निर्गम ३:७, ८) परंतु, देवाच्या लोकांना जाऊ दिल्यानंतर, फारोने आपले मन बदलले व आपल्या शक्तिशाली सेनेला घेऊन त्यांचा पिच्छा केला. तांबड्या समुद्राजवळ इस्राएल लोक जणू काय अडकून राहिले. तरी मोशे म्हणाला: “भिऊ नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा.” (निर्गम १४:८-१४) यहोवाने तांबडा समुद्र दुभंगविला आणि इस्राएली वाचले. फारोच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला, पण यहोवाने आपल्या शक्तीचा असा वापर केला की, “समुद्राने त्यांना गडप केले, ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले.” नंतर, मोशेने यहोवाला गायिलेल्या एका गीताद्वारे ह्याप्रकारे आनंद व्यक्त केला: “पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू त्या तुझ्यासारखा कोण आहे?”—निर्गम १५:४-१२, १९.
२१. अम्मोन, मवाब आणि सेइर यांच्या हातून यहोवाच्या लोकांचा बचाव कसा झाला?
२१ दुसऱ्या प्रसंगी, अम्मोन, मवाब आणि सेइर (एदोम) या शत्रू राष्ट्रांनी यहोवाच्या लोकांना नाशाची धमकी दिली. यहोवा म्हणाला: “हा मोठा समुदाय [शत्रू] पाहून घाबरू नका; कचरू नका: कारण युद्ध तुमचे नव्हे; देवाचे आहे. . . . तुम्हास लढावे लागणार नाही . . . स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.” यहोवाने शत्रूंच्या तुकड्यांना गोंधळून टाकले ज्यामुळे त्यांनी एकमेकांचीच कत्तल केली, अशा प्रकारे त्याने आपल्या लोकांची सुटका केली.—२ इतिहास २०:१५-२३.
२२. यहोवाने इस्राएलांना अश्शूरी लोकांच्या हातून चमत्कारिकरीत्या कसे वाचवले?
२२ अश्शूरी जागतिक सत्ता जेरुसलेमविरुद्ध चाल करून आली तेव्हा, सन्हेरीब राजाने कोटावर बसलेल्या लोकांना असे म्हणून यहोवाला टोमणा मारला: “या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला [मी जिंकलेला] देश माझ्या हातून सोडविला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडविणार?” देवाच्या सेवकांना तो म्हणाला: “परमेश्वर आमचा बचाव करीलच असे बोलून हिज्कीया . . . तुम्हांस परमेश्वरावर भिस्त ठेवावयास न लावो.” मग हिज्कीयाने मुक्ततेसाठी कळकळीने प्रार्थना केली जेणेकरून “पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.” यहोवाने १,८५,००० अश्शूरी सैनिकांची कत्तल केली व देवाच्या सेवकांना मुक्तता मिळाली. नंतर, सन्हेरीब आपल्या दैवतांची उपासना करत असताना त्याच्या पुत्रांनी त्याचा वध केला.—यशया ३६ आणि ३७ अध्याय.
२३. मुक्ततेविषयी कोणत्या प्रश्नांच्या उत्तरांची आज गरज आहे?
२३ गत काळात यहोवाने आपल्या लोकांना केवढ्या आश्चर्यकारकरीत्या सोडवले ते आपण पाहतो तेव्हा आपल्याला खरोखरच धीर येतो. आजच्याबद्दल काय? त्याचे विश्वासू सेवक अशा कोणत्या घातक परिस्थितीत येतील की जेव्हा त्याला चमत्कारिकरीत्या त्यांची सुटका करावी लागेल? त्यांची सुटका करण्यासाठी तो इतका वेळ का थांबून राहिला आहे? “ह्या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे,” या येशूच्या शब्दांची पूर्णता कशी होईल? (लूक २१:२८) पण, आधीच मरण पावलेल्या देवाच्या सेवकांची सुटका कशी होईल? पुढील लेख या प्रश्नांचे परीक्षण करील.
उजळणीचे प्रश्न
◻ मुक्ततेची अधिक आवश्यकता का आहे?
◻ मुक्ततेसाठी आपण मानवांकडे का पाहू नये?
◻ कोणासाठी मुक्तिसमय नजीक आहे?
◻ यहोवा देत असणाऱ्या मुक्ततेवर आपण भरवसा का ठेवू शकतो?
◻ गत काळातील मुक्ततेची कोणती उदाहरणे उत्तेजनात्मक आहेत?
[१० पानांवरील चित्र]
अब्राहाम यहोवावर पूर्ण भरवसा ठेवणाऱ्यांपैकी होता