मूलतत्त्ववादाचा प्रसार
मूलतत्त्ववाद—काही दशकांआधी प्रोटेस्टंटवादातील ती एक अल्पसंख्याकांची चळवळ होती. पण सर्व काही किती बदलले आहे! धर्मावरील विवेचनकर्ता, ब्रूस बी. लॉरेन्स यांनी लिहिले, की २० व्या शतकाच्या अंताला मूलतत्त्ववादa हा विषय प्रसार माध्यम आणि विश्वविद्यालयीन संशोधनासाठी इतका महत्त्वपूर्ण होईल व त्या विषयाने ते पछाडून जातील, असा फार कमी लोकांचा ३० वर्षांपूर्वी विचार असावा.
तरीसुद्धा, तेच घडले आहे. रस्त्यावरील हिंसक प्रदर्शने, खून, गर्भपातविरोधी चळवळी, धार्मिक प्रभावक गटांद्वारे राजकीय डावपेच आणि देवनिंदात्मक समजल्या जाणाऱ्या पुस्तकांची सार्वजनिक होळी, यांबद्दलच्या वृत्तपत्रातील बातम्या मूलतत्त्ववाद्यांच्या कृत्यांची सतत आठवण करून देतात. मॉन्डो इकॉनॉमिको या इटॅलियन वित्तीय साप्ताहिकाने म्हटले, की मूलतत्त्ववाद सर्वत्र “देवाच्या नावाखाली हल्ला करत आहे.”
टोकाची भूमिका घेणारे व धर्मवेडे, कट रचणारे व अतिरेकी हल्ले करणारे अशा वर्णनाने अनेकदा मूलतत्त्ववाद्यांचे चित्र रेखाटले जाते. कॅथलिक धर्मात कम्युनिओन ए लिबराझिओन, यहुदी धर्मात गश एम्युनीम आणि उत्तर अमेरिकी प्रोटेस्टंट धर्मात ख्रिश्चन कोअलिशन यासारख्या गटांची भरभराट पाहून लोकांना धक्का बसतो. मूलतत्त्ववाद इतका फोफावत का चालला आहे? त्यामागे कोणती प्रेरक शक्ती आहे? फ्रेन्च समाजशास्त्रज्ञ झील केपेल सुचवतात त्यानुसार कदाचित तो “देवाचा सूड” आहे का?
[तळटीपा]
a पारंपारिक, रूढीवादी धार्मिक मूल्यांना सख्तपणे धरून राहणाऱ्याला मूलतत्त्ववादी म्हटले जाते. पुढील लेखात ‘मूलतत्त्ववादाचा’ अर्थ पूर्णपणे चर्चिला आहे.
[Picture Credit Line on page 3]
Nina Berman/Sipa Press