वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१५ पृ. ८-९
  • त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”
  • आपल्यासाठी शिकण्यासारखा धडा
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • “येशूविषयीचा आनंदाचा संदेश” घोषित करण्यात आला
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • फिलिप्प—आवेशी सुवार्तिक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • बायबलची समज प्राप्त करण्यासाठी साहाय्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१५ पृ. ८-९

त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली

फिलिप्प कूशी अधिकाऱ्‍यास बाप्तिस्मा देतो

एक कूशी माणूस आपल्या रथातून प्रवास करीत असताना वेळेचा सदुपयोग करीत होता. तो मोठ्याने वाचत होता व असे करणे पहिल्या शतकातील प्रवाशांमध्ये प्रचलित होते. हा माणूस “कुशी लोकांची राणी कांदके, हिचा मोठा अधिकारी होता.”a त्याच्या हाती “तिचे सर्व भांडार होते,” म्हणजेच तो अर्थमंत्री होता. हा अधिकारी, ज्ञान संपादन करण्यासाठी देवाच्या वचनातून वाचत होता.—प्रेषितांची कृत्ये ८:२७, २८.

काही अंतरावर सुवार्तिक फिलिप्प होता. एका देवदूताने त्याला या स्थानी पोहंचविले होते व आता त्यास सांगण्यात आले: “जा, त्याचा रथ गाठ.” (प्रेषितांची कृत्ये ८:२६, २९) फिलिप्पाच्या मनात आलेल्या प्रश्‍नांची आपण कल्पना करू शकतो. तो मनात म्हणाला असेल, ‘कोण हा माणूस? तो काय वाचत आहे? मला त्याच्याकडे का आणण्यात आले आहे?’

फिलिप्प रथासोबत धावत असता, कूशी माणूस पुढील शब्द वाचत असल्याचे तो ऐकतो: “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणाऱ्‍याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही; त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही; त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.”—प्रेषितांची कृत्ये ८:३२, ३३.

फिलिप्पाने लगेच तो शास्त्रलेख ओळखला. तो यशया संदेष्ट्याच्या ग्रंथातून होता. (यशया ५३:७, ८) कूशी जे वाचत होता त्यामुळे तो बुचकळ्यात पडला होता. फिलिप्पाने संवाद सुरू करण्यासाठी विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” कूशी माणसाने उत्तर दिले: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिल्लिपास आपल्या रथात येऊन बसण्याचा आग्रह केला.—प्रेषितांची कृत्ये ८:३०, ३१.

“मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”

तेव्हा कूशी माणसाने फिलिप्पास म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्‍या कोणाविषयी?” (प्रेषितांची कृत्ये ८:३४) कूशी माणसाचे बुचकळ्यात पडणे यात काही नवल नव्हते कारण यशयाच्या भविष्यवाणीतील “मेंढरू“ किंवा “सेवक” कोण आहे, हे पुष्कळ काळापासून एक रहस्यच होते. (यशया ५३:११) तथापि, फिलिप्पाने कूशी माणसास “येशूविषयीची सुवार्ता” सांगितली तेव्हा ते किती स्पष्ट झाले असेल! थोड्या वेळाने कूशी माणूस म्हणाला: “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” तेव्हा फिलिप्पाने त्याला ताबडतोब बाप्तिस्मा दिला.—प्रेषितांची कृत्ये ८:३५-३८.

ही एक घाईगर्दीने उरकलेली कृती होती का? मुळीच नाही! हा कूशी माणूस यहूदीय मतानुसारी होता.b याअर्थी तो आधीच यहोवाचा उपासक होता व त्याला मशीहासंबंधीच्या भविष्यवादासहित इतर शास्त्रवचनांचे देखील ज्ञान होते. तथापि, त्याचे ज्ञान अपुरे होते. आता येशू ख्रिस्ताच्या भूमिकेविषयी ही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यावर कूशी माणसास, यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो हे कळून आले व या अपेक्षा पूर्ण करण्याची त्याची तयारी होती. अशा वेळेस बाप्तिस्मा उचित होता.—मत्तय २८:१८-२०; १ पेत्र ३:२१.

यानंतर लगेच, “प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला.” तो दुसऱ्‍या कामाला लागला. कूशी माणूस “आपल्या वाटेने हर्ष करीत” निघून गेला.—प्रेषितांची कृत्ये ८:३९, ४०.

आपल्यासाठी शिकण्यासारखा धडा

यहोवाचे विद्यमान काळातील सेवक या नात्याने आपल्यावर, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना देवाच्या वचनाचे सत्य शिकण्यास मदत करण्याची जबाबदारी आहे. प्रवास करताना किंवा इतर अनौपचारिक प्रसंगी इतरांना सुवार्ता सादर करण्यात अनेकांना सुयश प्राप्त झाले आहे. राज्य-प्रचाराच्या कार्यामुळे दर वर्षी लाखो लोक यहोवा देवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतात.

अर्थात, नवीन लोकांना बाप्तिस्मा देण्याची घाई करू नये. प्रथम त्यांनी यहोवा देव व त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याविषयी अचूक ज्ञान संपादन करण्यास हवे. (योहान १७:३) यानंतर त्यांनी पश्‍चात्ताप करावा व यहोवाच्या दर्जांनुरूप वागण्यासाठी अयोग्य आचरणाचा त्याग करून त्या मार्गातून मागे फिरावे. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) असे करण्यास वेळ लागतो. विशेषतः, अनुचित विचारसरणी व आचरण अंतःकरणात खोलवर रुजले असल्यास हे खरे ठरते. निःसंशये, ख्रिस्ती शिष्यत्त्वासाठी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागेल हे नवीन लोकांनी हिशोबात घेतलेच पाहिजे; तथापि, यहोवा देवासोबत एक समर्पित नातेसंबंध कायम केल्याने विलक्षण आशीर्वाद प्राप्त होतात. (पडताळा लूक ९:२३; १४:२५-३३.) देव आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणत असलेल्या संघटनेपर्यंत पोहंचण्यासाठी, यहोवाचे साक्षीदार अशा नवीन लोकांना, उत्साहाने मार्गदर्शन करतात. (मत्तय २४:४५-४७) देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे जाणून घेण्यात व त्या अपेक्षा पूर्ण करण्यात कूशी माणसाप्रमाणेच हे नवीन लोक देखील आनंद प्राप्त करतील.

[तळटीपा]

a “कांदके” हे नाव नसून (“फारो” व “कैसर” यांसारखी) एक पदवी आहे. ही पदवी कूशी राण्यांच्या उत्तराधिकाऱ्‍यांसाठी वापरण्यात येत असे.

b ज्या गैर-इस्राएली लोकांनी मोशेच्या नियमशास्त्रास जडून राहण्याचे स्वेच्छेने स्वीकारले होते त्यांना यहूदीय मतानुसारी म्हणत.—लेवीय २४:२२.

[८ पानांवरील चौकट]

त्यास षंढ का म्हणण्यात आले?

प्रेषितांची कृत्ये यातील ८ व्या अध्यायातील सबंध वृत्तान्तात कूशी माणसास “षंढ” म्हटलेले आहे. परंतु, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे नपुंसक असलेल्या एखाद्याला, मंडळीत स्वीकारले जात नसल्यामुळे, हा माणूस शब्दशः अर्थाने षंढ नव्हता हे स्पष्ट आहे. (अनुवाद २३:१) “षंढ“ यासाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द, वरिष्ठ अधिकाऱ्‍यास सूचित करतो. याअर्थी, हा कूशी माणूस कूशी लोकांच्या राणीचा अधिकारी होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा