‘प्रार्थना करावयास आम्हाला शिकवा’
‘प्रभुजी, प्रार्थना करावयास आम्हाला शिकवा.’ ही विनंती येशू ख्रिस्ताच्या अनुयायांपैकी एकाने केली होती. (लूक ११:१) हा निनावी अनुयायी प्रार्थनेबाबत मनापासून आस्था बाळगणारा पुरुष होता हे स्पष्टच आहे. त्याचप्रमाणे आजही खरे उपासक प्रार्थनेचे मोल जाणतात. काही झाले तरी, प्रार्थनेच्या माध्यमानेच आपल्याला विश्वातील सर्वात थोर व्यक्तीशी संपर्क साधता येतो! जरा कल्पना तर करा! ‘प्रार्थना ऐकणारा,’ तुमची आमची काळजी व विवंचना यांकडे जातीने लक्ष देतो. (स्तोत्र ६५:२) याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे, प्रार्थनेकरवी आपण देवाला धन्यवाद व स्तुती सादर करत असतो.—फिलिप्पैकर ४:६.
तथापि, ‘प्रार्थना करावयास आम्हाला शिकवा,’ हे उद्गार काही गंभीर प्रश्न सामोरे आणतात. देवासन्मुख येण्याकरता सबंध जगात, विविध धर्म निरनिराळ्या पद्धती अवलंबतात. परंतु, प्रार्थना करण्याचा योग्य तसाच अयोग्य मार्ग देखील आहे का? याचे उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रथमत: प्रार्थनेशी संबंधित असलेले काही प्रचलित धार्मिक रितीरिवाज विचारात घेऊ या. विशेषतः आपण लॅटिन अमेरिकेतील प्रचलित रितीरिवाजांवर लक्ष केंद्रित करू या.
प्रतिमा व “संरक्षक संत”
सामान्यपणे, लॅटिन अमेरिकी देश अत्यंत धार्मिक आहेत. उदाहरणार्थ, मेक्सिकोत सर्वत्र, ‘संरक्षक संतांना’ प्रार्थना करण्याचा प्रघात आढळतो. खरे तर, मेक्सिकोतील विशिष्ट गावांसाठी विशिष्ट “संरक्षक संत” आहेत व त्यांच्या प्रीत्यर्थ विशिष्ट तारखांना सण पाळण्याची तेथे रीत आहे. शिवाय, मेक्सिकोतील कॅथलिक लोक निरनिराळ्या प्रतिमांसमोरही प्रार्थना करतात. तथापि, कोणत्या ‘संताचा’ धावा करावा हे उपासकास कोणत्या प्रकारची विनंती करावयाची आहे यावरून ठरविण्यात येते. कोणी विवाह जोडीदाराच्या शोधात असल्यास तो “संत” अन्थोनी यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावील. एखादा, वाहनाने प्रवास करण्याच्या बेतात असल्यास तो प्रवाशांचा, विशेषतः वाहनचालकांचा संरक्षक अर्थात “संत” ख्रिस्टोफर याच्या हातात कदाचित स्वतःला सोपवून देईल.
तथापि, हे रिवाज कोठून सुरू झाले? ऐतिहासिक अहवालानुसार, स्पेनचे लोक मेक्सिकोत आले त्यावेळेस त्यांना विधर्मी दैवतांची श्रद्धाळुपणे उपासना करणारा जनसमुदाय आढळला. लॉस ऑस्टेकास, हॉम्बर ई ट्रीब्यू (ॲस्टेक लोक, मनुष्य व जमात) या पुस्तकाचे लेखक, विक्टर वॉल्फगाँग वॉन हॉगअन म्हणतात: “खूपसे वैयक्तिक देव होते, प्रत्येक वनस्पतीच्या नावाने एक देव तसेच प्रत्येक कार्याशी संबंधित एक देव किंवा देवी होती, एवढेच नव्हे, आत्महत्यांचा देखील एक देव होता. याकातीकूत्ली हे व्यापाऱ्यांचे दैवत होते. त्या अनेकेश्वरवादी जगात, सर्व देवांची निश्चित गुणवैशिष्ट्ये होती व त्यांतील प्रत्येक देव विशिष्ट उद्देशासाठी होता.”
हे देव व कॅथलिक “संत” यांमध्ये कमालीचे साम्य होते. इतके, की त्यामुळे स्पेनच्या विजेत्यांनी येथील मूळ रहिवाशांचे “ख्रिस्तीकरण” करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, या रहिवाशांनी केवळ आपल्या प्रतिमांच्याऐवजी चर्चच्या ‘संतांविषयी’ निष्ठा बाळगण्याचे सुरू केले. द वॉल स्ट्रीट जर्नल (इंग्रजी) यातील एका लेखाने कबूल केले की मेक्सिकोतील काही प्रदेशांत पाळल्या जाणाऱ्या कॅथलिक धर्माची विधर्मी मुळे आहेत. या लेखाच्या निरीक्षणानुसार, येथील जनसमुदाय श्रद्धाळुपणे मानत असलेल्या ६४ ‘संतांपैकी’ खूपसे संत, ‘विशिष्ट माया देवतांचे’ प्रतिनिधीत्व करतात.
न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया असा युक्तिवाद करतो की, “संत व पृथ्वीवर राहणाऱ्या त्याच्या भक्तांमध्ये परस्पर विश्वासाचे व घनिष्टतेचे बंधन निर्माण होते, . . . असे बंधन, जे ख्रिस्त व देव यांच्यासोबतच्या नातेसंबंधापासून परावृत्त करण्याऐवजी, त्यास आणखीन समृद्ध व दृढ बनवते.” तथापि, स्पष्टपणे पाखंडाचे अवशेष असलेले हे बंधन खऱ्या देवासोबत एखाद्याचा नातेसंबंध कशाप्रकारे दृढ बनवू शकेल? अशा ‘संतांना’ वाहिलेल्या प्रार्थना खरोखर देवाला प्रसन्न करू शकतील का?
जपमाळेचा उगम
रूढ असलेली आणखीन एक परंपरा म्हणजे जपमाळेचा उपयोग. डिक्स्यॉनॉर्यो एन्सीक्लोपेडीको हीस्पॉनो-ऑमेरिकॉनो (हिस्पॅनिक-अमेरिकन विश्वकोषीय शब्दकोष) (इंग्रजी) जपमाळेचे वर्णन, “इतर मण्यांपासून मोठ्या आकाराच्या मणीने वेगळे करण्यात आलेल्या व प्रत्येकी दहा या प्रमाणे विभाजन करण्यात आलेल्या पन्नास किंवा दीडशे मण्यांची माळ जिची टोके तीन मण्यांनंतर एका क्रूसाने जोडलेली असतात” असे करतो.
जपमाळेचा कसा उपयोग करतात हे स्पष्ट करताना एक कॅथलिक प्रकाशन म्हणते: “पवित्र जपमाळ, आपल्या सुटकेच्या रहस्यांविषयी एक प्रकारची वाचिक व मानसिक प्रार्थना आहे. ती दहा दहा मण्यांच्या पंधरा भागांनी बनलेली असते. प्रत्येक भागांत, एकदा प्रभूची प्रार्थना, दहा वेळा हेल मेरी हा मंत्र व एकदा ग्लोरिया पात्री ही प्रार्थना उच्चारणे समाविष्ट आहे. शिवाय दहा मण्यांच्या प्रत्येक भागांत एका रहस्यावर मनन करण्यात येते.” रहस्य म्हणजे कॅथलिकांना माहीत असावेत असे तत्त्व किंवा शिकवणुकी होत; याबाबतीत बोलायचे झाल्यास, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याने सोसलेले दुःख व त्याच्या मृत्युशी संबंधित तत्त्वे किंवा शिकवणुकी.
द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “जपमाळेच्या आधाराने प्रार्थना करण्याचे प्रारंभिक प्रकार ख्रिस्ती विश्वासात मध्य युगांत सुरू झाले, तथापि, ते प्रचलित मात्र १४०० व १५०० या शतकांतच झाले.” जपमाळेचा उपयोग एकमेवपणे कॅथलिक धर्मातच केला जातो का? नाही. हिस्पॅनिक-अमेरिकन विश्वकोषीय शब्दकोष म्हणतो: “अशाच प्रकारचे मणी मुसलमान, लामा व बौद्ध या धर्मांच्या उपासनेतही उपयोगात आणले जातात.” वास्तविकतः, एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलीजन ॲण्ड रिलीजन्स सांगतो की, “जपमाळेची प्रथा, मुसलमानांनी बौद्धांकडून घेतली व ख्रिश्चनांनी ती धर्मयुद्धांच्या काळात मुसलमानांकडून आत्मसात केली असे सुचिवण्यात आले आहे.”
काही लोक असा युक्तिवाद करतात की, अनेक प्रार्थनांचे पुन्हा पुन्हा उच्चारण आवश्यक असते तेव्हा जपमाळ ही निव्वळ एक स्मरणाचे साधन म्हणून उपयोगात आणली जाते. तथापि, तिच्या वापराने देवाला संतोष होतो का?
आपल्याला अशा प्रथांच्या औचित्याविषयी किंवा त्यांच्या सार्थकतेविषयी अंदाज बांधण्याची अथवा वाद घालण्याची गरज नाही. प्रार्थना करावयास शिकविण्याबद्दल येशूने आपल्या अनुयायांच्या विनंतीला अधिकारवाणीने उत्तर दिले. त्याने सांगितलेल्या गोष्टींमुळे काही वाचकांना ज्ञान प्राप्त होईल तर काहींना चक्क आश्चर्य होईल.
[३ पानांवरील चित्रं]
कॅथलिक लोक सहसा जपमाळेतील मण्यांचा उपयोग करतात. यांची सुरवात कोठून झाली?