त्यांना त्यांचे सामर्थ्य कोठून प्राप्त होते?
तुम्ही या चित्रातील फुलपाखराचे बारकाईने निरीक्षण केल्यास, त्याच्या चार पंखांपैकी एक पंख पूर्णपणे निकामी झाले असल्याचे तुम्हाला दिसून येईल. असे असले तरीही फुलपाखराचे पोषण व उड्डाण सातत्याने चालूच असते. पण ही एक अद्वितीय गोष्ट नव्हे. पंखांचा ७० टक्के पृष्ठभाग नाहीसा झाला तरी फुलपाखरे आपल्या दैनिक कार्यहालचाली पूर्ण करत असल्याचे दिसून आले आहे.
अशाचप्रकारे, बहुविध लोक एक दृढनिश्चयी आत्मा प्रदर्शित करतात. गंभीर अशा शारीरिक व भावनात्मक समस्या सहन करत असताही ते हार मानत नाहीत.—पडताळा २ करिंथकर ४:१६.
प्रेषित पौलाने स्वतः त्याच्या मिशनरी प्रवासांदरम्यान पुष्कळ हालअपेष्टा सहन केल्या. त्याला फटके मारण्यात आले, मारहाण करण्यात आली, दगडमार करण्यात आला व बंदिशाळेत टाकण्यात आले. याशिवाय त्याला आणखी एक प्रकारची दुर्बलता होती, कदाचित त्याच्या डोळ्यांसंबंधी ही समस्या असावी जी सतत त्याच्या “शरीरात एक काटा” अशी होती.—२ करिंथकर १२:७-९; गलतीकर ४:१५.
अनेक वर्षे खिन्नतेच्या जबर तडाख्यांशी लढत देणाऱ्या डेविड नामक एका ख्रिस्ती वडिलांना आपल्या पूर्वस्थितीला येण्याकरता यहोवाचे सामर्थ्यच महत्त्वपूर्ण ठरल्याचा विश्वास आहे. “परिश्रमाने साध्य केलेली प्रगती, वेळोवेळी माझ्यापासून नाहीशी होत असल्याचे दिसत होते,” असे स्पष्टीकरण ते देतात. “अशा प्रकारच्या निरुत्साहाचा सामना करत असताना मी संपूर्णपणे यहोवावर विसंबून राहिलो व त्याने खरोखर मला आधार दिला. असेही काही प्रसंग होते जेव्हा मी एकेका वेळी कितीतरी तास प्रार्थना केली. यहोवाशी बोलल्यानंतर माझ्यातील एकाकीपणाच्या व निरुपयोगीपणाच्या भावना नाहीशा झाल्या. मी दुर्बलतेच्या खडतर काळांशी लढा दिला पण यहोवाच्या मदतीने या दुर्बलतेतूनच मला सामर्थ्य—इतरांना मदत करण्याचे सामर्थ्य देखील प्राप्त झाले आहे.”
यहोवा देवाने प्रेषित पौलाला सामर्थ्य दिले. याकारणास्तव, तो म्हणू शकला, “जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.” (२ करिंथकर १२:१०) होय, पौलाच्या दुर्बलतेने त्याला यहोवाकडील सामर्थ्यावर विसंबून राहण्यास शिकवले. “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे,” असे त्या प्रेषिताने म्हटले. (फिलिप्पैकर ४:१३) यहोवा खरोखरच त्याच्या सेवकांना सामर्थ्य देतो.