तुमचे तारण झाले आहे का?
जॉनी दहा वर्षांचा असताना एका जत्रेत कोणा माणसाने त्याला थांबवून विचारले, “मुला, तू येशू ख्रिस्ताला तुझा प्रभू व तारक म्हणून स्वीकारतो का?” जॉनीला हा प्रश्न विचित्र वाटला, कारण त्याने नेहमीच येशूवर विश्वास ठेवला होता. यास्तव त्याने उत्तर दिले, “अर्थातच, स्वीकारतो.” यावर, सर्वांना ऐकू येईल एवढ्या जोराने तो माणूस ओरडला, “प्रभूची स्तुती करा! ख्रिस्तासाठी आणखी एका जिवाचे तारण झाले आहे!”
तारण खरोखर एवढे सोपे आहे का? जॉनीच्या उर्वरित जीवनात त्याने काहीही केले तरीसुद्धा, ते शब्द उद्गारले त्या क्षणापासून त्याचे ‘तारण झाले’ होते का? अनेक प्रांजळ लोक होकारार्थी उत्तर देतील. आठवण राहावी याकरता तुमच्या ‘तारणाची’ तारीख लिहून ठेवण्याचा सल्ला काही धार्मिक हस्तपत्रिका देतात.
“ख्रिस्तावर वरकरणी विश्वास ठेवता क्षणीच . . . एखाद्याचे नशीब कायमचे ठरते,” असे एका पाळकांनी लिहिले. बायबलनुसार तारण, “विश्वासाच्या अखंडत्वावर नव्हे” तर केवळ एकदाच केलेल्या “विश्वासाच्या कृतीवर” अवलंबून आहे असा त्यांनी दावा केला. आणखी एका धार्मिक लेखकांनी लिहिले: “हे पूर्ण झालेले कार्य आहे. ते तुमच्यासाठी आधीच साध्य करण्यात आले आहे . . . तुमचा ‘संघर्ष संपला आहे.’ तुमचे ‘पाप काढून टाकण्यात आले आहे.’” परंतु, हे खरे आहे अशी पूर्णपणे खात्री बाळगून असलेल्या लोकांना सुद्धा येथे एक अडचण दिसू शकेल. अनेक लोक ज्यांना त्यांचे, ‘तारण झाल्याचे’ सांगण्यात आले आहे, ते बायबल सांगते त्यानुसार जीवन जगत नाहीत. कदाचित त्यांनी ख्रिस्ताला खरोखर “स्वीकारले” नव्हते ही सामान्य सबब असते.
तर मग, येशूला “स्वीकारणे” म्हणजे नेमके काय? ती केवळ एकदाच केलेली विश्वासाची कृती आहे की एक अखंड जीवनमार्ग आहे? आपला विश्वास आपल्याला कृती करण्यास प्रेरित करण्याइतपत दृढ असावा का? आपण येशूचे अनुकरण करण्याच्या जबाबदारीशिवाय त्याच्या यज्ञार्पणाचे फायदे खऱ्या अर्थाने स्वीकारू शकतो का?
अनेक लोकांना आशीर्वाद तर हवे आहेत परंतु, येशूचे अनुकरण व आज्ञापालन करण्याची जबाबदारी नको आहे. खरे तर, “आज्ञा पाळणे” हेच ऐकून ते अनेकदा अस्वस्थ होतात. असे असले तरीसुद्धा, येशूने म्हटले: “चल, माझ्यामागे ये.” (लूक १८:१८-२३) तसेच, बायबल म्हणते: “आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत . . . त्यांना . . . युगानुयुगाचा नाश ही शिक्षा . . . मिळेल.”—२ थेस्सलनीकाकर १:८, ९; मत्तय १०:३८; १६:२४.
बायबलमध्ये असे पुष्कळ काही म्हटलेले आहे जे तारणाबाबत शिकविण्यात आलेल्या गोष्टींविषयी गंभीर प्रश्न उभे करते. या विषयावर बायबल नेमके काय म्हणते याची तुम्हाला प्रचिती करण्याची इच्छा असल्यास, पुढील पाने तुम्हाला विशेषतः आवडतील. येशू व त्याच्या प्रेषितांनी या महत्त्वपूर्ण मुद्याविषयी जे शिकविले ते पाहायचे असल्यास तुमचे बायबल उघडा व उल्लेखिलेली शास्त्रवचने वाचा.