एक निरर्थक प्रथा?
कॅथलिक लोकांनी कबुलीचा विधी शतकानुशतके पाळला आहे. असे असूनही, काहींच्या दृष्टीने तो वायफळ नित्यक्रम आहे. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, बॉब त्यांच्या तरुणपणाचा विचार करताना म्हणतात: “मी किशोरवयीन होतो तेव्हा देखील मी त्यास गंभीरतेने घेतले नव्हते.” का बरे? त्यांच्या दृष्टीने, कबुली एक निरर्थक अनुष्ठान बनले होते. ते सांगतात: “कबुली म्हणजे पातकांनी भरलेले आपले सामान विमानतळावरील सीमा-शुल्क अधिकाऱ्याकडे घेऊन येण्यासारखे होते. तो तुम्हाला तुमच्या पातकांसंबंधी काही प्रश्न विचारतो व परदेशी असताना तुम्ही विकत घेतलेल्या चैनीच्या वस्तूंसाठी कर म्हणून काही भरले, की तो तुम्हाला पुढे जाऊ देतो.”
त्याचप्रकारे, यु.एस. कॅथलिक, या नियतकालिकात लिहिताना फ्रँक वेसलिंग, कबुलीच्या प्रथेचे: “पश्चात्तापाच्या तोंडपाठ केलेल्या प्रार्थनेद्वारे क्षुल्लक पातकांना खोडून टाकण्यापासून ते नाममात्र प्रायश्चित्ताच्या विधीवत कृत्यापर्यंत, एक अत्यंत सोपी क्रमवार मार्गदर्शिका” असे वर्णन करतात. वेसलिंग यांचा निष्कर्ष? ते म्हणतात, “कबुली व्यक्तीच्या कल्याणासाठी असते याची मला खात्री आहे. पण कॅथलिक ज्याप्रमाणे करतात ते चुकीचे आहे.”
बायबल, कबुली या विषयास एका पूर्णपणे वेगळ्या प्रकारे मांडते. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे देवाला कबुली देणे होय. (स्तोत्र ३२:१-५) तसेच ख्रिस्ती शिष्य याकोब याने लिहीले: “तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा.”—याकोब ५:१४, १६.
पातकांच्या ओझ्याखाली दबलेला ख्रिस्ती, मंडळीतील पर्यवेक्षकांना बोलावू शकतो जे अपराध्यास त्याचा पापी मार्ग सोडून देण्यासाठी बायबलमधून वैयक्तिक व व्यावहारिक सल्ला देऊ शकतात. आध्यात्मिक दुखणे असलेल्या व्यक्तीच्या उन्नतीवर लक्ष ठेवताना हे पर्यवेक्षक त्यास योग्य प्रोत्साहन देऊ शकतात. आजच्या चर्चेसमध्ये पाळल्या जाणाऱ्या कबुलीच्या औपचारिक प्रथेच्या किती विपरीत! मंडळीतील वडिलांची वैयक्तिक मदत मिळाल्याने बळकट झालेले पश्चात्तापी पापीजन दावीदाला मिळालेला दिलासा प्राप्त करू शकतात, जो त्याने एका स्तोत्रात या शब्दात व्यक्त केला: “मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीति लपवून ठेविली नाही; मी आपले अपराध परमेश्वराजवळ [यहोवा, NW] कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.”—स्तोत्र ३२:५.