जगभरातील स्त्रिया
पहिल्या मानवी जोडप्याने देवाविरुद्ध बंड केले तेव्हा, त्यांच्यावर व त्यांच्या संततीवर नाशकारक परिणाम येतील असे यहोवाने भाकीत केले. यहोवा हव्वेला म्हणाला: “तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” (उत्पत्ती ३:१६) बायबल, स्त्रियांना सखोल आदर देण्यास वारंवार उत्तेजन देते आणि लाखो स्त्रिया व त्यांची कुटुंबे बायबलची तत्त्वे लागू करत असल्यामुळे अधिक आनंदी व समाधानकारक जीवन जगत आहेत.
तथापि, मानवी हक्कांच्या अलीकडील अहवालानुसार, जगभरातील इतर पुष्कळ स्त्रियांचा अनादर केला जातो, त्यांची पिळवणूक व मानहानी केली जाते. या अहवालावर विवेचन मांडून इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून म्हणते: “मेहनतीने गोळा केलेल्या तपशीलासह, १९३ देशांवरील अहवाल . . . दररोजचा दुजाभाव व गैरवागणूक यांचे भयाण चित्र रेखाटते.”
काही उदाहरणे: मध्य आफ्रिकेमध्ये, मुलींना बहुतेक कष्टाचे शेतातले काम करावे लागते आणि मुलांच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश मुली शाळेत जातात. तेथील एका देशात, व्यभिचार करणे स्त्रियांकरता बेकायदेशीर आहे परंतु पुरुषांसाठी तसे नाही. एखाद्या पतीने आपल्या पत्नीला व्यभिचार केल्यामुळे ठार मारले तर चालते परंतु एखाद्या पत्नीने अशाच परिस्थितींमध्ये तिच्या पतीला ठार मारले तर कायद्याने तिला माफ केले जात नाही असा आणखी एका आफ्रिकी देशाचा कायदा आहे.
तो अहवाल सांगतो की, दक्षिण अमेरिकेच्या भागांमध्ये, मारहाण केल्या जाणाऱ्या स्त्रियांबद्दल पोलिसांना काहीच दया वाटत नाही. तसेच बहुतेककरून नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी पुरुषांच्या पगारापेक्षा ३० ते ४० टक्के कमी पगारात चालवून घेतले पाहिजे.
आशियाच्या भागांमध्ये, स्त्रियांना बळजबरीने वंध्यत्व आणले जाते किंवा गर्भपात करण्यास बळी पाडण्यात येते. एका देशात, ५,००,००० वेश्या आहेत, त्यांच्या पालकांना स्वतःसाठी नवी घरे घेता यावी म्हणून त्यांना येथे विकले जाते. आणखी एका देशातील पोलिसांना सार्वत्रिकपणे “हुंड्याने घडणारे मत्यू”—पत्नीने दिलेला हुंडा अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे तिचा पती किंवा त्याचे कुटुंब तिला ठार मारते—यांना तोंड द्यावे लागते.
येशू ख्रिस्ताविषयी बायबल आपल्याला खात्री देते: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्याचे रक्त अमोल ठरेल.” (स्तोत्र ७२:१२-१४) अशा प्रकारे आपल्याला आशावादी असावयास कारण आहे; जगभरातील स्त्रिया, त्या वेळेच्या सुधारित परिस्थितींची वाट पाहू शकतात.