देवाची सेवा करण्यास तुम्हाला काय प्रवृत्त करते?
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर.”—मार्क १२:३०.
१, २. प्रचार कार्याविषयी कोणत्या रोमांचक गोष्टी साध्य केल्या जात आहेत?
एखाद्या गाडीचे खरे मूल्य केवळ तिच्या स्वरूपावरून ठरवले जात नाही. रंगाचा लेप लावल्याने तिचे बाह्य स्वरूप चांगले दिसेल, आणि तिची विशिष्ट सुरेख रचना एखाद्या संभवनीय ग्राहकाला आकर्षित करील; परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाच्या गोष्टी—गाडीला चालना देणारे इंजिन त्याचप्रमाणे तिच्यावर नियंत्रण करणाऱ्या इतर सर्व साधनांकडे—विशेष लक्ष दिले जात नाही.
२ एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या देवाच्या सेवेबाबतीतही असेच आहे. यहोवाचे साक्षीदार विपुलतेने धार्मिक कार्ये करतात. दर वर्षी, एक अरबपेक्षा अधिक तास देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारात खर्च करण्यात येतात. त्याशिवाय, लाखो बायबल अभ्यास चालवले जातात आणि बाप्तिस्मा घेणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. तुम्ही सुवार्तेचे घोषक असल्यास, या रोमांचक आकडेवारीमध्ये तुमचा भाग—अल्प वाटत असला तरीही—तुम्ही तो घेतला आहे. तसेच, “तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखवलेली प्रीति ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही,” याची तुम्हाला खात्री असू शकते.—इब्रीयांस ६:१०.
३. ख्रिश्चनांना कार्याशिवाय इतर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या पाहिजेत आणि का?
३ तथापि, आपल्या सेवेचे खरे मूल्य—सामुदायिकरित्या किंवा व्यक्तिगतपणे—केवळ संख्येवरून मोजले जात नाही. शमुवेलाला सांगण्यात आले त्याप्रमाणे, “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) होय, आपले आंतरिक स्वरूप कसे आहे हे देवाला महत्त्वाचे वाटते. हे खरे की, कृती आवश्यक आहेत. ईश्वरी भक्तीची कर्मे यहोवाच्या शिकवणींना सुशोभित करतात आणि संभवनीय शिष्यांना आकर्षित करतात. (मत्तय ५:१४-१६; तीत २:१०; २ पेत्र ३:११) तरीसुद्धा, आपली कार्ये सर्वकाही सांगत नाहीत. पुनरुत्थित येशूला इफिस मंडळीविषयी—त्यांच्या चांगल्या कार्यांचा अहवाल असतानाही काळजी करण्याचे कारण होते. “तुझी कृत्ये . . . मला ठाऊक आहेत,” तो म्हणाला. “तरी तू आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.”—प्रकटीकरण २:१-४.
४. (अ) आपण देवाला देत असलेली सेवा कशाप्रकारे कर्तव्यतत्पर विधीसारखी बनू शकते? (ब) आत्म-परीक्षणाची गरज का आहे?
४ एक धोका आहे. कालांतराने, आपण देवाची करीत असलेली सेवा एखाद्या कर्तव्यतत्पर विधीप्रमाणे होऊ शकते. एका ख्रिस्ती स्त्रीने त्याचे असे वर्णन केले: “मी सेवेला जात असे, सभांना जात असे, अभ्यास आणि प्रार्थना करीत असे—परंतु ते सर्व आपोआपच घडत होते, त्याबद्दल मला काहीही वाटत नसे.” अर्थात, देवाच्या सेवकांना “खाली पडलेले” किंवा ‘दीन’ वाटत असतानाही ते परिश्रम करतात तेव्हा त्यांची प्रशंसा केली पाहिजे. (२ करिंथकर ४:९; ७:६) परंतु, आपला ख्रिस्ती नित्यक्रम स्थिरावतो तेव्हा आलंकारिकपणे सांगावयाचे झाले तर, इंजिनमध्ये डोकावून पाहायला हवे. सर्वात उत्तम गाड्यांची देखील वेळोवेळी काळजी घ्यावी लागते; त्याचप्रमाणे सर्व ख्रिश्चनांना नियमितपणे आत्म-परीक्षण करण्याची गरज आहे. (२ करिंथकर १३:५) इतरांना आपली कार्ये दिसतात, पण आपली कृत्ये कशाने प्रवृत्त होतात हे त्यांना समजत नाही. यास्तव, आपल्यापैकी प्रत्येकाने या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे: “देवाची सेवा करण्यास मला काय प्रवृत्त करते?”
योग्य चालनेस अडथळे
५. सर्वात प्रथम आज्ञा कोणती आहे असे येशू म्हणाला?
५ इस्राएलाला दिलेल्या नियमांमध्ये कोणता नियम सर्वात प्रथम होता असे विचारल्यावर, येशूने बाह्य स्वरूपावर नव्हे तर आंतरिक हेतूवर केंद्रित असणारी आज्ञा उद्धृत केली: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर.” (मार्क १२:२८-३०) अशा प्रकारे, देवाची सेवा करण्यामागील प्रवृत्त करणारी शक्ती काय असली पाहिजे याची ओळख येशूने करून दिली—ती म्हणजे प्रीती.
६, ७. (अ) सैतानाने कौटुंबिक वर्तुळावर कावेबाजपणे हल्ला कसा केला आहे आणि का? (२ करिंथकर २:११) (ब) संगोपनामुळे ईश्वरी अधिकाराविषयी एखाद्याच्या मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडू शकतो?
६ प्रीतीचा महत्त्वपूर्ण गुण विकसित करण्याच्या आपल्या क्षमतेच्या आड येण्याचे सैतान इच्छितो. हे साध्य करण्यासाठी, कौटुंबिक वर्तुळावर हल्ला करण्याची एक पद्धत त्याने अनुसरली आहे. का बरे? कारण येथेच प्रीतीविषयीचे आपले पहिले तसेच कायमचे प्रभाव पाडले जातात. बालपणात शिकलेल्या गोष्टी प्रौढ वयात मूल्यवान असू शकतात हे बायबलचे तत्त्व सैतानाला चांगल्यारीतीने ठाऊक आहे. (नीतीसूत्रे २२:६) लहान वयातच आपल्या प्रीतीच्या कल्पनेचा विपर्यास करण्याचा तो कावेबाजपणे प्रयत्न करतो. पुष्कळांचे संगोपन, प्रीतीची आश्रयस्थाने नसणाऱ्या, तर कटुपणा, क्रोध व गलिच्छ भाषेची रणक्षेत्रे असणाऱ्या घरांमध्ये होते तेव्हा या ‘युगाचे दैवत’ या नात्याने सैतान आपले उद्देश सफल झालेले पाहतो.—२ करिंथकर ४:४; इफिसकर ४:३१, ३२; ६:४, तळटीप [NW]; कलस्सैकर ३:२१.
७ तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक निरीक्षण करते की, पिता आपली पालकीय भूमिका ज्या पद्धतीने हाताळतो त्याचा “अधिकाराकडे पाहण्याचा—मग तो अधिकार मानवी असो की ईश्वरी—मुलांच्या दृष्टिकोनावर मोठा परिणाम होतो.”a कठोर पित्याच्या वर्चस्वामध्ये संगोपन झालेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीने कबूल केले: “माझ्याकरता यहोवाची आज्ञा पाळणे सोपे आहे; त्यावर प्रीती करणे अधिक कठीण आहे.” अर्थात, आज्ञाधारकता आवश्यक आहे कारण देवाच्या नजरेत, “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे” आहे. (१ शमुवेल १५:२२) परंतु, आज्ञाधारकता दाखवण्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या उपासनेमागील प्रवृत्त करणारी शक्ती या नात्याने यहोवाबद्दल प्रीती विकसित करण्यास काय मदत करू शकते?
“ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते”
८, ९. येशूच्या खंडणी बलिदानाने यहोवाबद्दलच्या आपल्या प्रीतीला कसे प्रवृत्त केले पाहिजे?
८ यहोवाबद्दल संपूर्ण अंतःकरणपूर्वक प्रीती विकसित करण्यासाठी सर्वात मोठे उद्दीपन म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानासाठी गुणग्राहकता बाळगणे होय. “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली.” (१ योहान ४:९) एकदा आपल्याला हे समजले व आपण त्याची गुणग्राहकता बाळगली तर, प्रीतीचे हे कृत्य प्रीतीची प्रतिक्रिया दाखवण्यास प्रवृत्त करते. “पहिल्याने [यहोवाने] आपणांवर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.”—१ योहान ४:१९.
९ येशूने मानवाचा तारणारा या नात्याने सेवा करण्यास त्याची नेमणूक स्वेच्छेने स्वीकारली. “ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे.” (१ योहान ३:१६; योहान १५:१३) येशूच्या आत्मत्यागी प्रीतीने आपणामध्ये प्रशंसात्मक प्रतिसाद उत्पन्न केला पाहिजे. स्पष्टीकरण द्यावयाचे तर: समजा तुम्हाला पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यात आले. तुम्ही घरी जाऊन, अंग पुसून, झालेल्या सर्व गोष्टी विसरू शकता का? मुळीच नाही! ज्या व्यक्तीने तुम्हाला वाचवले तिचे ऋणी असल्याचे तुम्हास वाटेल. शेवटी, तुमच्या जीवनासाठी तुम्ही त्या व्यक्तीचे ऋणी आहात. यहोवा देव व येशू ख्रिस्त यांचे आपण काही कमी ऋणी आहोत काय? खंडणीविना, आपणातील प्रत्येकजण जणू पाप व मृत्यूमध्ये बुडून गेला असता. त्याऐवजी, प्रीतीच्या या महान कृत्यामुळे आपल्याला परादीसमय पृथ्वीवर सर्वदा जिवंत राहण्याचे भवितव्य आहे.—रोमकर ५:१२, १८; १ पेत्र २:२४.
१०. (अ) आपण खंडणीला व्यक्तिगतपणे लागू कसे करू शकतो? (ब) ख्रिस्ताची प्रीती आपल्याला कशी गळ घालते?
१० खंडणीवर मनन करा. पौलाने केले त्याप्रमाणे व्यक्तिगतपणे तिचा अवलंब करा: “आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.” (गलतीकर २:२०) असे मनन मनःपूर्वक उत्तेजन जागृत करील कारण पौलाने करिंथकरांना लिहिले: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते . . . ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी . . . यापुढे स्वतःसाठी, स्वतःला संतोष देण्यासाठी जगू नये, तर जो ख्रिस्त त्यांच्यासाठी मरण पावला आणि पुन्हा उठला, त्याला संतोष देण्यासाठी जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५, सुबोध भाषांतर) द जेरूसलेम बायबल म्हणते, की ख्रिस्ताची प्रीती “आपणावर मात करते.” आपण ख्रिस्ताच्या प्रीतीचा खोल विचार करतो, तेव्हा आपल्याला गळ घातली जाते, आपण अंतःकरणापासून प्रवृत्त होतो तसेच आपल्यावर मातही केली जाते. ती आपल्या अंतःकरणांना स्पर्श करते आणि आपल्याला कृती करण्यास प्रवृत्त करते. जे. बी. फिलिप्सचे भाषांतर याला दुसऱ्या शब्दात असे सांगते, “ख्रिस्ताची प्रीती आपल्या कृत्यांचा उगम आहे.” परूश्यांच्या उदाहरणाने दाखवल्याप्रमाणे इतर कोणत्याही प्रकारची चालना आपल्यामध्ये टिकाऊ फळ उत्पन्न करणार नाही.
‘परूश्यांच्या खमीराविषयी जपून राहा’
११. धार्मिक कार्यांविषयी परूश्यांच्या मनोवृत्तीचे वर्णन करा.
११ परूश्यांनी देवाच्या उपासनेतील सर्व अर्थ काढून टाकला. आध्यात्मिकतेचे मोजण्याचे माप म्हणून देवावरील प्रेमावर जोर देण्याऐवजी, त्यांनी कृतींवर अधिक जोर दिला. तपशीलवार ते, नियमात अधिक गढलेले असल्यामुळे बाहेरून धार्मिक दिसत होते, परंतु, आतून ‘मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले’ होते.—मत्तय २३:२७.
१२. येशूने एका मनुष्याला बरे केल्यावर, परूश्यांनी ते मनाचे कठोर असल्याचे कसे दाखवले?
१२ येशूने, एके प्रसंगी, वाळलेला हात असलेल्या एका माणसाला दयाळुपणे बरे केले. ज्या आजारामुळे निःसंशये त्या मनुष्याला शारीरिक व भावनिक अस्वस्थता वाटत होती तो तत्काळ बरा करण्यात आल्यावर त्याला किती आनंद झाला असावा! तरीपण, त्यासोबत परूश्यांना आनंद वाटला नाही. त्याउलट, त्यांनी तांत्रिक गोष्टीवरून टीका केली—की येशूने शब्बाथाच्या दिवशी बरे केले होते. परूशी नियमशास्त्राचे तांत्रिक प्रतिपादन करण्यात गढलेले असून, त्यांना नियमशास्त्राचा हेतू पूर्णपणे समजला नव्हता. यामुळे येशू ‘त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न झाला,’ यात काहीच शंका नाही! (मार्क ३:१-५) त्याशिवाय, त्याने त्याच्या शिष्यांना इशारा दिला: “परूशी व सदुकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा.” (मत्तय १६:६) त्यांच्या कृत्यांना व मनोवृत्तींना बायबलमध्ये आपल्याच लाभास्तव उघड करण्यात आले आहे.
१३. परूश्यांच्या उदाहरणामध्ये आपल्यासाठी कोणता धडा आहे?
१३ आपल्याला कार्यांविषयी योग्य दृष्टिकोन असला पाहिजे, हे परूश्यांचे उदाहरण शिकवते. अर्थात, कार्ये आवश्यक आहेत कारण “विश्वासहि क्रियावाचून निर्जीव आहे.” (याकोब २:२६) तथापि, अपरिपूर्ण मानवांना इतर कसे आहेत याऐवजी ते काय करतात यावरून न्याय करण्याची वृत्ती असते. काही वेळा, आपण स्वतःचा देखील अशाच पद्धतीने न्याय करू. आध्यात्मिकता जणू कृतींवरूनच ठरवली जाते असे समजून आपण कदाचित नुसत्या कृतींचाच ध्यास घेऊ. आपल्या हेतूंचे परीक्षण करण्याचे महत्त्व आपण विसरू शकतो. (पडताळा २ करिंथकर ५:१२.) आपण कदाचित कायद्याचे काटेकोरपणे पालन करणारे होऊ शकतो, जे ‘मुरकुट गाळून उंट गिळतात,’ म्हणजेच नियमाचे शब्दशः पालन करतात पण त्याच्या उद्देशाचा भंग करतात.—मत्तय २३:२४.
१४. परूशी एखाद्या अशुद्ध वाटी किंवा ताटासारखे कसे होते?
१४ परूश्यांना ही गोष्ट समजली नाही की, एखाद्या व्यक्तीने यहोवावर खरोखर प्रीती केली, तर ईश्वरी भक्तीची कृत्ये आपोआपच घडतील. आध्यात्मिकता आतून बाहेर वाहते. याबाबतीत परूश्यांच्या चुकीच्या विचारसरणीबद्दल येशूने त्यांचा जोरदारपणे धिक्कार केला, तो म्हणाला: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करिता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परूशा, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनहि साफ होईल.”—मत्तय २३:२५, २६.
१५. येशू स्वरूपांपलीकडे पाहतो याची काही उदाहरणे द्या.
१५ एखाद्या वाटीचे, ताटाचे किंवा इमारतीचे देखील बाह्य स्वरूप सर्वच प्रकट करीत नाही. येशूचे शिष्य जेरूसलेममधील मंदिराच्या सौंदर्याने विस्मयचकित झाले होते, पण त्याच्या आत घडणाऱ्या गोष्टींमुळे येशूने त्यास “लुटारूंची गुहा” असे संबोधले. (मार्क ११:१७; १३:१) त्या मंदिराविषयीची जी गोष्ट खरी होती तीच आज ख्रिस्ती धर्मजगताचा अहवाल दाखवतो त्याप्रमाणे करोडो तथाकथित ख्रिश्चनांच्या बाबतीतही खरी आहे. येशूने म्हटले की, त्याच्या नावाने “महत्कृत्ये” करणाऱ्यांचा तो ‘अनाचार करणारे’ असा न्याय करील. (मत्तय ७:२२, २३) याच्या अगदीच विरुद्धतेत, त्याने मंदिरात पैशांचे अगदीच किरकोळ दान दिलेल्या एका विधवेविषयी सांगितले: “जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे . . . हिने, आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.” (मार्क १२:४१-४४) विसंगत न्याय? मुळीच नाही. दोन्ही परिस्थितींमध्ये येशूने यहोवाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित केला. (योहान ८:१६) त्याने कार्यांमागील हेतू जाणले आणि त्याप्रमाणे न्याय केला.
“ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे”
१६. आपल्या कार्याची तुलना इतर कोणा ख्रिश्चनाच्या कार्यासोबत नेहमीच करण्याची गरज का नाही?
१६ आपले हेतू योग्य असल्यास, नेहमीच तुलना करण्याची काहीएक गरज नाही. उदाहरणार्थ, एखादा ख्रिस्ती सेवेमध्ये खर्च करील तितकाच वेळ खर्च करण्यासाठी किंवा एखादा प्रचारात जे साध्य करतो त्याच्याशी स्पर्धात्मकरीतीने बरोबरी करण्याचा प्रयत्न केल्याने कोणतीही चांगली गोष्ट साध्य होत नाही. येशूने इतरांच्या नव्हे तर, तुमच्या संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने व शक्तीने यहोवावर प्रीती करा असे सांगितले. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता, कुवत आणि परिस्थिती वेगवेगळ्या असतात. तुमची परिस्थिती अनुमती देत असल्यास, प्रीती तुम्हाला सेवेत अधिक वेळ खर्च करण्यास प्रवृत्त करील—कदाचित पूर्ण-वेळेचा पायनियर सेवक या नात्याने देखील. तथापि, तुम्ही एखाद्या विकाराविरुद्ध झटत असल्यास, सेवेत खर्च करत असलेला वेळ तुम्ही अपेक्षिता त्यापेक्षा कमी असेल. निरुत्साहित होऊ नका. देवाला विश्वासू असणे हे तासांमध्ये मोजले जात नाही. शुद्ध हेतू बाळगल्याने, तुम्हाला आनंद करण्याचे कारण असेल. पौलाने लिहिले: “तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलतीकर ६:४.
१७. तुमच्या स्वतःच्या शब्दात, रुपयांच्या दृष्टांताचे संक्षिप्त रूपात कथन करा.
१७ मत्तय २५:१४-३० मध्ये नोंदवल्यानुसार, येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टांताचा विचार करा. परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती सोपवून दिली. “एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले.” आपल्या दासांकडून हिशेब घ्यावयास धनी परतला, तेव्हा त्याला काय आढळले? ज्या दासाला पाच हजार रुपये दिले होते त्याने आणखी पाच हजार कमावले. त्याचप्रमाणे, ज्या दासाला दोन हजार रुपये दिले होते त्याने आणखी दोन हजार कमावले. ज्या दासाला एक हजार रुपये दिले होते त्याने ते जमिनीत पुरून ठेवले आणि आपल्या धन्याची संपत्ती वाढवण्यास काहीच केले नाही. त्या परिस्थितीबद्दल धन्याने काय ठरवले?
१८, १९. (अ) धन्याने दोन हजार रुपये दिलेल्या दासाची तुलना पाच हजार रुपये दिलेल्या दासाशी का केली नाही? (ब) रुपयांचा दृष्टांत आपल्याला शाबासकी आणि तुलना यांच्याविषयी काय शिकवतो? (क) तिसऱ्या दासाला प्रतिकूल न्याय का देण्यात आला?
१८ प्रथम, ज्या दासांना प्रत्येकी पाच हजार आणि दोन हजार रुपये देण्यात आले त्यांचा आपण विचार करू या. या प्रत्येक दासाला, धनी म्हणाला: “शाबास, भल्या व विश्वासू दासा!” पाच हजार रुपये दिलेल्या दासाने केवळ दोन हजार कमावले असते तर त्याने त्याला असे म्हटले असते का? नाही! दुसऱ्या बाजूला पाहता, दोन हजार रुपये दिलेल्या दासाला तो असे म्हणाला नाही, ‘तू पाच हजार रुपये का मिळवले नाहीस? तुझ्या बरोबरीच्या दासाकडे बघ, त्याने माझ्यासाठी किती कमावले!’ नाही, येशू ख्रिस्ताला चित्रित करणाऱ्या दयाळु धन्याने तुलना केल्या नाहीत. त्याने “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” रुपये सोपवून दिले आणि त्याबदली प्रत्येक जण आपल्या योग्यतेनुसार जे देऊ शकत होता त्यापेक्षा अधिक अपेक्षिले नाही. दोन्ही दासांना एकसारखीच शाबासकी मिळाली, कारण दोघांनीही आपल्या धन्यासाठी जिवेभावे कार्य केले होते. आपण सर्वजण यातून शिकू शकतो.
१९ अर्थात, तिसऱ्या दासाला शाबासकी मिळाली नाही. वस्तुतः, त्याला बाहेरील अंधकारात ढकलून देण्यात आले. केवळ एक हजार रुपये देण्यात आल्यामुळे, त्याच्याकडून पाच हजार रुपये दिलेल्या दासाइतके कमावण्याची अपेक्षा करण्यात आली नसती. तथापि, त्याने प्रयत्न देखील केला नाही! त्याच्या अंतःकरणाच्या “दुष्ट व आळशी” मनोवृत्तीमुळे त्याला मूलतः प्रतिकूल न्याय मिळाला, त्यावरून त्याच्या धन्याकरता प्रीती नसल्याचे दर्शवले गेले.
२०. यहोवा आपल्या मर्यादांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?
२० आपण आपल्या संपूर्ण शक्तीने यहोवावर प्रीती करावी असे तो अपेक्षितो, तरीपण “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो,” हे जाणणे किती दिलासा देणारे आहे! (स्तोत्र १०३:१४) नीतीसूत्रे २१:२ म्हणते की, आकडेवारी नव्हे तर ‘यहोवा अंतःकरणे तोलून पाहणारा आहे.’ आपला ताबा नसेल अशा आर्थिक, शारीरिक, भावनिक किंवा इतर कोणत्याही मर्यादेची त्याला जाणीव आहे. (यशया ६३:९) त्याचवेळी, आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही संपत्तीचा आपण होता होईल तितका उपयोग करावा अशी तो अपेक्षा करतो. यहोवा परिपूर्ण आहे, परंतु त्याच्या अपरिपूर्ण उपासकांशी व्यवहार करताना तो परिपूर्णतेची अपेक्षा करीत नाही. त्याच्या व्यवहारात तो अवाजवी नाही तसेच त्याच्या अपेक्षांमध्ये तो अव्यावहारिक नाही.
२१. देवाची करीत असलेली सेवा प्रीतीने प्रवृत्त झाली असल्यास, कोणते चांगले परिणाम घडतील?
२१ यहोवावर आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, जिवाने, मनाने आणि शक्तीने प्रीती करणे हे “सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यांपेक्षा अधिक आहे.” (मार्क १२:३३) आपण प्रीतीने प्रवृत्त होत असल्यास, देवाच्या सेवेत होता होईल तितके करू. पेत्राने लिहिले की, ईश्वरी गुण, त्याचप्रमाणे प्रेम देखील “तुम्हामध्ये असून ते वाढत असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही.”—२ पेत्र १:८.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका., द्वारे प्रकाशित.
उजळणीमध्ये
◻ देवाची सेवा करण्यामागे कोणती प्रवृत्त करणारी शक्ती असली पाहिजे?
◻ ख्रिस्ताची प्रीती आपणास यहोवाची सेवा करण्यास गळ कशी घालते?
◻ परूश्यांचे कोणते गढून जाणे आपण टाळावयास हवे?
◻ आपल्या सेवेची तुलना दुसऱ्या ख्रिश्चनाच्या सेवेशी करत राहणे मूर्खतेचे का आहे?
[१६ पानांवरील चित्रं]
प्रत्येकांच्या क्षमता, कुवत आणि परिस्थिती वेगवेगळ्या असतात