“वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे”
मोशेने तीन हजारपेक्षा अधिक वर्षांआधी असे लिहिले: ‘आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे.’—स्तोत्र ९०:१०.
वैद्यकीय प्रगती झाली असली तरी माणसाचे आयुष्य मोशेच्या काळी होते तितकेच राहिले आहे. तथापि, मानवांना अशा क्षणभंगुर अस्तित्वात कायमचे ठेवले जाणार नाही. बायबलच्या यशया या पुस्तकात देवाने म्हटले: “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.”—यशया ६५:२२.
बायबल प्रदेशातील वृक्षांपैकी सर्वात अधिक काळ जगणारा वृक्ष जैतुनाचा होय. येथे ज्या वृक्षाचे चित्र दिले आहे ते आजही गालीलात बहरणाऱ्या हजारो वर्षे पुरातन असलेल्या वृक्षांपैकी एकाचे आहे. मानवांना इतका काळ जगणे कधी शक्य होईल का? तीच भविष्यवाणी स्पष्ट करते की, जेव्हा देव “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांची निर्मिती करील तेव्हा हे घडेल.—यशया ६५:१७.
प्रकटीकरणाचे पुस्तक देखील “नवे आकाश व नवी पृथ्वी”—नवे स्वर्गीय सरकार आणि नवा मानवी समाज—यांच्या प्रस्थापनेबद्दल भाकीत करते. तेव्हा देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:१, ४.
हे ईश्वरी अभिवचन लवकरच पूर्ण होईल. तेव्हा जैतुन झाडाचे आयुष्य देखील जणू २४-तासांच्या एका दिवसाप्रमाणे भासेल. तेव्हा आपल्या हातांच्या श्रमाचा पूर्णपणे उपभोग घेण्यास पुष्कळ काळ असेल.