‘त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातील’
जुलै २८, १९९४, गुरुवारी सकाळी ८:५० वाजता, जॉर्ज डी. गँगस यांनी आपले पार्थिव जीवन संपवले. ते ९८ वर्षांचे होते. अभिषिक्तांमधील एक असून, जॉर्ज गँगस ऑक्टोबर १५, १९७१ पासून यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य होते.
बंधू गँगस धार्मिकतेवर प्रीती आणि दुष्टाईचा द्वेष करणारे होते हे, त्यांना व्यक्तिगतरीत्या ओळखणाऱ्या सर्वांना ठाऊक होते. त्या सर्वांच्या आठवणीत आहे की त्यांनी सैतानाचे वर्णन, पशुतुल्य, राक्षसी, दुष्ट, नीच व तिरस्कारणीय लबाड असे केले तर यहोवाचे वर्णन प्रेमळ, कृपाळू, दयाळू, मृदू अंतःकरणाचा व काळजी वाहणारा पिता असे केले होते. त्यांना बायबल आधारित प्रश्न विचारण्यास फार आवडत असे तेही अनेकांना आठवते. कोणत्याही संभाषणात, ते न चुकता—काही सोपे, काही अतिशय कठीण प्रश्न विचारत असत. खरेच, त्यांना बायबल सत्याची खूप आवड होती.
बंधू गँगस यांचा बाप्तिस्मा जुलै १५, १९२१ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या पूर्ण वेळेच्या प्रचार कार्याचे (पायनियरींग) त्यांचे ध्येय मार्च १९२८ मध्ये सुरू केले. यास्तव, ते पूर्णवेळेच्या सेवेत एकूण ६६ वर्षांपासून होते. ते ऑक्टोबर ३१, १९२८ रोजी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या ब्रुकलिन मुख्यालयाचे सदस्य झाले.
त्यांची जीवन कथा ऑक्टोबर १५, १९६६ च्या वॉचटावर अंकात आली होती. त्यात, ते खरोखरच देवाचा एक आध्यात्मिक पुरूष होते याचे वर्णन केले आहे. त्या लेखात, त्यांनी पुढीलप्रमाणे अंतःकरणास उबदार बनवणारे उद्गार काढले: “मला जीवन खूप आवडते आणि माझ्या बांधवांनी जीवन मिळवावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. प्रेषित पौलाप्रमाणे मला देखील हेच वाटते की, इतर सर्व गोष्टी ‘ख्रिस्त येशूविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे हानी आहे.’”—फिलिप्पैकर ३:८.
बंधू गँगसने त्यांच्या कार्यांवरून हे दाखवून दिले की त्यांना खरोखर जीवन आवडत होते, व त्यांनी ‘खिस्त येशूविषयीच्या ज्ञानाची’ इतरांसोबत उत्सुकतेने सहभागिता केली. त्यांची उणीव जरूर भासेल, परंतु आता त्यांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळाले आहे याचा आम्हाला किती आनंद होतो! आता, ‘त्यांना त्यांच्या कष्टापासून विसावा मिळेल, कारण त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात.’—प्रकटीकरण १४:१३, न्यू इंटरनॅशनल वर्शन.