बायबल त्याचे खरे मूल्य काय आहे?
“बायबल एक गूढ आहे. ते समजावे म्हणून बनवलेले नव्हते,” असे एक घरमालक म्हणतो. दुसऱ्या एकाचे असे मत आहे की: “बायबल हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे हे मला ठाऊक आहे; परंतु मला त्याविषयी अधिक माहिती नाही. ते समजण्यास अतिशय कठीण आहे.”
“बहुतेक ख्रिश्चनांना . . . बायबलविषयी त्रोटक माहिती आहे,” असे द टोरंटो स्टारने सांगितले. एका कॅथलिक स्त्रीने असे विवेचन दिले: “बायबल जवळ बाळगल्याने मला बरे वाटते. ते आंतरिक शांती प्रदान करते.” “बायबल हे होकायंत्राप्रमाणे आहे जे, एखाद्याला जीवनाच्या खवळलेल्या, वादळी समुद्रातून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मार्गदर्शित करते,” असे एक कोळी म्हणतो. पूर्वी हिंदू असलेल्या एका व्यक्तीच्या तोंडचे हे शब्द आहेत की, “बायबल देवाचे वचन आहे आणि मानवजातीकरता एक देण व आध्यात्मिक इजांकरता मलम आहे.”
बायबलच्या खऱ्या मूल्याबद्दलचे अनेक व विविध मत आहेत. परंतु, त्याचे खरे मूल्य काय आहे?
बायबल, अस्तित्वात असलेले सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वाधिक खपलेले पुस्तक आहे. त्यामध्ये मानवाने अनुभवलेल्या किंवा अजूनही अनुभवतील अशा जटिल समस्यांची उत्तरे आहेत. त्यातील सल्ल्याची व्यावहारिकता अतुलनीय आहे. ते ज्या नैतिक दर्जांचे समर्थन करते ते अतिश्रेष्ठ आहेत. त्यातील संदेश शक्तिशाली व फायदेकारक आहे. अतुलनीय मूल्यांचे हे पुस्तक, आमच्या पुस्तकांच्या कपाटातून काढून त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याची छानणी करण्याच्या योग्यतेचे आहे.
बायबल हे पूर्णपणे अचूक, विश्वसनीय व खरे आहे या पूर्ण आत्मविश्वासाने आम्ही ते उघडू शकतो. त्यात लिहिलेल्या ऐतिहासिक घटनांना लौकिक इतिहासाने मान्यता दिली आहे. वारंवार, उत्खननाद्वारे झालेले शोध याची पुष्टी देतात की, बायबल हे वस्तुस्थिती संबंधित व सत्य आहे. बायबलच्या सुमारे ४० लेखकांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना, ईमानदार व सत्वनिष्ठेचे पुरूष म्हणून वेगळे करते. बायबल हे, मानवी उगमाकडून नाही हे त्याची आंतरिक सुसंगतता सूचित करते. त्यात नमूद केलेल्या घटना सत्य आहेत. ते ज्या लोकांविषयी बोलते तेही खरे आहेत. ज्या स्थळांना किंवा ठिकाणांना ते दर्शविते ते वास्तविक आहेत. त्याहून अधिक म्हणजे, यहोवा देवच बायबलचा लेखक आहे याच्या नाकारता न येण्याजोग्या लक्षणीय भविष्यवाण्या त्यामध्ये आहेत.—२ पेत्र १:२१.
आमच्या महान शिक्षकाने, त्याची इच्छा आणि उद्देशांविषयीचे ज्ञान, ज्या लोकांना माहीत करून घ्यायचे आहे अशांना ते उपलब्ध होईल याची खात्री करून घेतली. वास्तविक पाहता, यहोवा आम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की, सर्व माणसांनी त्याच्या वचनाचा अभ्यास करावा आणि “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:३, ४; नीतीसूत्रे १:५, २०-३३) आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत, हीच सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट करू शकतो. अचूक ज्ञान मिळवणे हे आम्हाला सामना करावयास भाग पाडणारे एक आव्हान आहे. सुरवातीच्या ख्रिश्चनांना हे समजले. त्यांच्यातील एकाला असे म्हणावयास प्रेरणा मिळाली की: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी; असे की, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत अशांची तुम्ही खात्री करून घ्यावी.”—फिलिप्पैकर १:९, १०, NW; कलस्सैकर १:९, १०.
बायबल, निर्माणकर्त्याचा मानवी कुटुंबाला त्याची इच्छा आणि उद्देश प्रकट करण्यासाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. प्रत्येक व्यक्ती त्या उद्देशात कसा मावतो याचे स्पष्टीकरण ते देते. त्यामध्ये भूतकाळातील घटनांची नोंद करून ठेवली आहे. ते भवितव्याचे मनासमोर हुबेहुब दृश्य ठेवते. बायबल अचूक शिकवणी सादर करते व आम्ही काय विश्वास बाळगावा आणि काय बाळगू नये याबद्दलच्या सरळ मार्गावर ते आम्हाला नेते. (प्रेषितांची कृत्ये १७:११; २ तीमथ्य ३:१६, १७) मानवाने ज्यानुसार त्याचे जीवन व्यतित केले पाहिजे त्याबद्दलचे वर्तणूकीचे नियम ते पुरविते. शिवाय, ते यश आणि आनंदाच्या मार्गावर मानवांना निर्देशिते. (मत्तय, अध्याय ५ ते ७) ते, देवाचे राज्य सर्व मानवजातीकरिता केवळ एकमात्र आशा आहे यावर जोर देते. तसेच त्याचे सरकार, त्याचे नाव पवित्र करण्याचे व त्याच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करण्याचे एक साधन कसे आहे हे दाखवते. बायबल आपल्याला, आपल्या जीवन-दात्या यहोवासोबत एक जवळचा, प्रेमळ नातेसंबंध जोडण्यासाठी ज्या मार्गावर असले पाहिजे त्याविषयीचे विवरण देते.
शिवाय, बायबल, नंदनवनमय पृथ्वीवर परिपूर्ण मानव म्हणून अनंत काळचे जीवन जगणे—या मानवजातीला मिळणाऱ्या सर्वात भव्य बक्षीसाप्रत निरवू शकणारे एकमेव पुस्तक आहे. (रोमकर ६:२३) यहोवाचा एकुलता एक पुत्र आम्हाला सांगतो: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) निश्चितच, मूल्यवान असलेल्या या पुस्तकाने आपल्याला, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ते शिकण्यास प्रवृत्त करावे. पुढील लेख दाखवील त्याप्रमाणे, बायबल हे पुस्तक समजण्याकरिता बनवले आहे.