वाढदिवस समारंभांनी मृत्युचा मागोवा मागे सोडला आहे
आज अनेक लोक वाढदिवसांच्या समारंभाला, केवळ एक निरूपद्रवी रीत समजतात. परंतु, पवित्र शास्त्र या परंपरेचे सकारात्मक चित्र रेखाटत नाही. कारण, शास्त्रवचनांमध्ये देवाच्या कोणत्याही विश्वासू सेवकाने वाढदिवस पाळल्याचा कोणताच उल्लेख नाही.
पवित्र शास्त्रात ज्या दोन वाढदिवसांचा उल्लेख केला आहे तो, त्या शासकांचा होता, जे देवाचे शत्रू होते. दोन्ही समारंभांमध्ये देहदंड होता जेणेकरून जमा झालेले अतिथि, राजाला नाखूष करणाऱ्याच्या मृत्युस द्वेषपूर्ण नजरेने पाहू शकतील. पहिल्या प्रसंगी, इजिप्तच्या फारो राजाने त्याच्या प्रमुख आचाऱ्याला देहदंड दिला. (उत्पत्ती ४०:२, ३, २०, २२) त्या इजिप्तच्या शासकाने हे कृत्य मेजवानीच्या वेळी केले कारण, तो त्याच्या सेवकावर अतिशय संतप्त झाला होता. दुसऱ्या प्रसंगात, गालीलचा अनैतिक शासक, हेरोद याच्या समोर, एका मुलीने नाच करून दाखवल्यामुळे खूष होऊन त्याने तिच्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद केला. किती ती किळसवाणी दृश्ये!—मत्तय १४:६-११.
तरीही, पवित्र शास्त्र दोन अपवादात्मक वाढदिवसांवर लक्ष केंद्रित करत नाही का? वास्तविकपणे, नाही. प्राचीन यहुदी इतिहासकार जोसेफस प्रकट करतात की, या घटना अतुलनीय नव्हत्या. ते, वाढदिवशी करमणूकीखातर केल्या जाणाऱ्या हत्येच्या इतर घटनांची नोंद देतात.
उदाहरणार्थ, काही घटना सा. यु. ७० मध्ये यरूशलेमेच्या नाशानंतर, १०,००,००० यहुद्यांचा नाश झाला आणि ९७,००० लोक कैदी म्हणून नेण्यासाठी बचावले तेव्हा घडल्या. रोमच्या मार्गावर असताना, रोमी सुभेदार टायटसने त्याच्या यहुदी कैद्यांना जवळपास असलेल्या कैसरियाच्या समुद्र बंदरावर नेले.
जोसेफस लिहितात: “टायटस कैसरियातच राहिला तेव्हा त्याने त्याचा भाऊ डॉमिटियनचा वाढदिवस अतिशय वैभवशालीपणे साजरा करून, प्राण्यांच्या आणि अग्नीच्या खेळांमध्ये २,५०० पेक्षा अधिक कैद्यांना ठार मारले. यानंतर, तो बेरूत, फुनिके येथील एका रोमी वसाहतीत आला, आणि येथे त्याने आणखी विस्तृत प्रदर्शनात अनेक कैद्यांना ठार करून त्याच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला.”—जोसेफस: महत्त्वपूर्ण लिखाणे (इंग्रजी) यातील, पॉल एल. मेअर यांचे, यहुदी युद्ध, (इंग्रजी) खंड ७, ३७, हे भाषांतर.
निसंशये, द इंम्पेरियल बायबल-डिक्श्नरी असे विवेचन मांडते की: “नंतरच्या काळातील इब्री लोक, वाढदिवस साजरा करण्याच्या रूढीकडे मूर्तीपूजक उपासनेचा एक भाग या दृष्टीने पाहू लागले. त्यांचा असा दृष्टिकोन झाला कारण, या दिवसांसोबत संबंधित असलेल्या सामान्य विधी त्यांनी पाहिल्या होत्या.”
पहिल्या शतकातील विश्वासू ख्रिश्चनांना, पवित्र शास्त्रात इतक्या वाईटरीतीने सादर केलेल्या आणि रोमी लोकांनी इतक्या भयानकपणे साजरा केलेल्या रूढीत भाग घ्यावा, असे मुळीच वाटले नसेल. आज, प्रामाणिक ख्रिस्ती हे समजून घेतात की, वाढदिवसांविषयीचे पवित्र शास्त्रीय अहवाल त्यांच्या शिक्षणाकरता लिहिलेल्या गोष्टींतील भाग होते. (रोमकर १५:४) ते वाढदिवस साजरा करण्यास टाळतात, कारण अशा प्रकारचे विधी त्या व्यक्तीला फाजील महत्त्व देतात. याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवाचे सेवक पवित्र शास्त्रातील वाढदिवसांचे हे भयंकर अहवाल सुज्ञपणे विचारात घेतात.
[२५ पानांवरील चित्रं]
कैसरियातील भव्य पटांगण