“यहोवाच्या साक्षीदारांनी माझे संरक्षण केले!”
या शेवटल्या दिवसांच्या दरम्यान, अनेकांनी स्वतःला “क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे” शाबीत केले आहे. (२ तीमथ्य ३:१, ३) पश्चिम आफ्रिकेतील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरात काम करणाऱ्या, आयझक नावाच्या एका स्वयंसेवकाने हे अनुभवले. तो त्याची हकीकत सांगतो:
“जानेवारी १९९२ मध्ये, मी इतर पाच प्रवाश्यांसोबत एका ओसाड आणि लांबच्या रस्त्यावरून स्थानिक टॅक्सीने प्रवास करत होतो. माझ्या शेजारी बसलेल्या स्त्रीसोबत मी संभाषण चालू केले, आणि तिने आनंदाने माझ्याकडून पवित्र शास्त्रावर आधारित असलेले माहितीपत्रक स्वीकारले.
“दुपारचे चार वाजले होते आणि अचानक, अनुज्ञप्ति मुद्रणपट्ट नसलेली एक नवी कार आमच्या गाडीच्या अगदी समोर आडवी येऊन उभी राहिली. त्याच क्षणी आमची कार कर्कश आवाज करीत थांबली. प्रत्येकाच्या हातात बंदुका असलेले तीन धट्टेकट्टे पुरूष, त्या समोरच्या कारमधून उतरले आणि त्यांनी खाडकन् आमच्या कारचा दरवाजा उघडला. त्यांच्यातील एक खेकसून ओरडला, ‘सर्वजण बाहेर निघा.’
“दुसऱ्या एकाने माझी पुस्तकांची बॅग ओढून घेतली. त्यामध्ये फक्त पवित्र शास्त्र साहित्य पाहून, ती बॅग त्याने दूर फेकून दिली. त्याची बंदुक माझ्याकडे रोखून त्याने मला विचारले, ‘तुझ्याजवळ आणखी काय आहे?’ माझ्या पैशाच्या पाकिटात होते तेवढे सर्व पैसे मी त्याला लगेच काढून दिले. त्याने ते पैसे पाहात विचारले ‘इतकेच?’ मी त्याला सांगितले की मी एक यहोवाचा साक्षीदार आहे आणि साक्षीदार खोटे बोलत नाहीत. त्याने माझे ते पैशाचे पाकिट हिसकावून घेतले, माझे वॉचटावर ओळखपत्र पाहिले आणि मग म्हटले, ‘बरं, वॉचटावर. येथे बाजूला थांब.’
“मग, तो मी ज्या स्त्रीसोबत बोललो होतो तिच्याकडे वळाला. तिने घाईघाईने तिचा गळ्यातला हार काढला आणि तिच्या पाकिटातील सर्व पैसे त्याला देऊन मोकळी झाली. त्या वाटमाऱ्याने तिच्या थरथरणाऱ्या हातातील ते माहितीपत्रक पाहिले, तेव्हा त्याला वाटले की आम्ही दोघे सोबत आहोत, व म्हणून त्याने तिला माझ्या सोबत राहण्यास सांगितले.
“तोपर्यंत, दुसऱ्या सशस्त्र डाकूंनी, आमच्या सोबतच्या इतर प्रवाश्यांवर निष्ठुरपणे हल्ला केला. त्यांनी वाहन चालकाला आणि आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या दुसऱ्या एका माणसाला बेदम मारले. एका डाकूने दुसऱ्या एका स्त्रीच्या गळातील हार ओरबडला. तिने प्रतिकार केला तेव्हा, त्यांनी बंदुकीच्या दस्त्याने तिच्या डोक्यावर आणि छातीवर इतक्या जोरात मारले की ती जागीच मरण पावली. तिसरी स्त्री जी गाडीतच घाबरून बसली होती तिला त्यांनी बाहेर खेचले आणि तिच्याही छातीत गोळ्या झाडल्या. दुःखाची गोष्ट म्हणजे ती पण मरण पावली. फक्त मला आणि त्या तरुण स्त्रीला काहीच इजा पोंहचली नाही.
“काही वेळानंतर, त्याच रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने आम्हाला त्याच्या गाडीत घेतले. ती घाबरलेली स्त्री वारंवार अशी म्हणत होती की, ‘यहोवाच्या साक्षीदारांनी माझे संरक्षण केले.’”