खोट्या शिक्षकांविरूद्ध यहोवाचा न्यायदंड
“यरूशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत, व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”—यिर्मया २३:१४.
१. ईश्वरी शिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर गंभीर जबाबदारी का येते?
ईश्वरी शिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रत्येकांवर गंभीर जबाबदारी येते. याकोब ३:१ ईशारा देतेः “माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांस माहीत आहे.” होय, देवाच्या वचनाच्या शिक्षकांवर, सर्वसाधारण ख्रिस्ती जनांपेक्षा, संमतीकारक जाब देण्याची अधिक गहन जबाबदारी आहे. यास्तव, जे खोटे शिक्षक असल्याचे शाबीत होतील, अशांसाठी याचा काय अर्थ होईल? यासाठी आपण यिर्मयाच्या काळी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीकडे आपली नजर टाकू. आज जे काही घडत आहे त्याची पडछाया तेथे कशी दिसत होती त्याकडे आपण लक्ष देऊ या.
२, ३. यरुशलेमच्या खोट्या शिक्षकांविषयी यहोवाने यिर्मयाकरवी कोणता न्यायदंड बजावला?
२ योशीया राजाच्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी, म्हणजेच सामान्य युग पूर्व ६४७ मध्ये यिर्मयाला यहोवाचा संदेष्टा म्हणून नियुक्ती लाभली. यहोवाची यहूदाविरुद्ध तक्रार होती, व यासाठीच त्याने यिर्मयाला त्यांच्याकडे ती जाहीर करण्यासाठी पाठविले. यरुशलेमेचे खोटे संदेष्टे किंवा शिक्षक देवाच्या दृष्टिने “घोर प्रकार” आचरीत होते. त्यांचा दुष्टपणा इतका मोठा होता की, देवाने यरुशलेम व यहूदाची तुलना सदोम व गमोरासोबत केली. यिर्मयाच्या पुस्तकाचा २३ वा अध्याय आम्हाला याबद्दल सांगतो. यातील १४ वे वचन म्हणतेः
३ “यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करतात की, त्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”
४. यरुशलेमच्या शिक्षकांचे वाईट नैतिक उदाहरण आजच्या ख्रिस्ती धर्मजगताच्या समांतरतेत कसे आहे?
४ होय, त्या संदेष्ट्यांनी व शिक्षकांनी स्वतःचे असे खूपच वाईट, नैतिक उदाहरण राखले होते व त्याद्वारे लोकांनाही तेच करण्याचे प्रोत्साहन दिले. आजच्या ख्रिस्ती धर्मजगताची स्थिती बघा! ती देखील यिर्मयाच्या काळाप्रमाणेच दिसत नाही का? आज पाळक जारकर्मी व पुरुषगाम्यांना, पाळकांच्या वर्गातील सदस्य म्हणून राहू देतात, शिवाय चर्च सेवेची कर्तव्य पार पाडू देतात. मग, चर्चमध्ये भरती झालेले बहुतेक सदस्य हे देखील अनैतिक आहेत हे आश्चर्याचे वाटावे का?
५. ख्रिस्ती धर्मजगताची अनैतिक स्थिती सदोम व गमोरा यांच्यापेक्षाही अधिक वाईट का झाली आहे?
५ यहोवाने यरुशलेमच्या रहिवाश्यांची तुलना सदोम व गमोरा यांच्याबरोबर केली. पण ख्रिस्ती धर्मजगतातील अनैतिक स्थिती तर सदोम व गमोरा यांच्यापेक्षाही अधिक वाईट झाली आहे. होय, ख्रिस्ती धर्मजगत यहोवाच्या दृष्टिने अधिक दोषी आहे. त्याचे शिक्षक ख्रिस्ती नैतिक कायद्यांना धाब्यावर बसवतात. यामुळे नैतिक अधःपतनाचे वातावरण फलण्यास वाट मिळाली असून सर्व प्रकारच्या वाईट कामांचा अगदी कावेबाजपणे मोह पाडला जातो. ही नैतिक स्थिती इतकी प्रचलित झाली आहे की, आज वाईट गोष्टींकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहण्यात येत आहे.
“लबाडीने चालत होते”
६. यरुशलेमेच्या संदेष्ट्यांच्या दुष्टतेबद्दल यिर्मयाने काय म्हटले?
६ आता १४ वे वचन यरुशलेमेच्या संदेष्ट्यांबद्दल काय म्हणते ते पाहा. ते “लबाडीने चालत होते.” तसेच १५ व्या वचनाचा नंतरचा भाग म्हणतोः “यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.” पुढे १६ वे वचन म्हणतेः “सेनाधीश परमेश्वर [यहोवा, न्यूव] म्हणतोः ‘तुम्हांस संदेश देणाऱ्या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांस फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात, परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव] मुखातला सांगत नाहीत.’”
७, ८. ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक, यरुशलेमेतील खोट्या संदेष्ट्यांप्रमाणे का आहेत, व याचा परिणाम चर्चला जाणाऱ्यांवर कसा झाला आहे?
७ यरुशलेमेतील खोट्या संदेष्ट्यांप्रमाणे, ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक देखील लबाडीत चालत असून ते धर्मत्यागी तत्त्वांना पसरवीत आहेत, आणि देवाच्या वचनात आढळत नसणारे शिक्षण देत आहेत. या खोट्या शिक्षणातील काही शिक्षण कोणते आहे? जीवाचे अमरत्व, त्रैक्य, परगेटरी व लोकांना चिरकालिक यातना देणारा अग्नी नरक. लोकांना ऐकायला आवडते अशाच गोष्टींचे शिक्षण देऊन ते त्यांच्या श्रोत्यांच्या कानांची खाज जिरवतात. ते असेही म्हणतात की, ख्रिस्ती धर्मजगतावर देवाची शांती असल्यामुळे तिच्यावर कसलीही विपत्ती येणार नाही. पण हे पाळक तर, “आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात.” तो खोटा आहे. जे अशा लबाडीवर विश्वास ठेवतात अशांना आध्यात्मिक रुपाने विष पाजले जाते. त्यांच्या नाशाप्रत त्यांची दिशाभूल केली जात आहे!
८ अशा खोट्या शिक्षकांबद्दल यहोवा २१ व्या वचनात काय म्हणतो त्याचा विचार कराः “मी ह्या संदेष्ट्यांस पाठविले नाही, तरी ते धावत सुटले. मी त्यांजबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला.” अशाप्रकारे आज, देवाने पाळकांना पाठविले नाही, आणि ते त्याची सत्यवचने शिकवत नाहीत. याचा परिणाम तो काय? चर्चला जाणाऱ्यांमध्ये पवित्र शास्त्र शिक्षणाबद्दल भयंकर स्वरुपाची निरक्षरता नांदत आहे कारण त्यांचे सेवक त्यांना जागतिक गोष्टींचे ज्ञान शिकवतात.
९, १०. (अ) यरुशलेमच्या खोट्या शिक्षकांनी कोणत्या प्रकारची स्वप्ने पाहिली? (ब) याचप्रकारे ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी कोणती “खोटी स्वप्ने” दाखवली?
९ पुढे, आज पाळक सर्वत्र खोट्या आशा पसरवत आहेत. २५ वे वचन बघाः “‘मी स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे.” ही कोणत्या प्रकारची स्वप्ने आहेत? ३२ वे वचन आम्हांस सांगतेः “यहोवा म्हणतोः ‘पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांस आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवितात; मी तर त्यांस पाठविले नाही व आज्ञापिलेही नाही; ते या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत,’ असे परमेश्वर [यहोवा, न्यूव] म्हणतो.”
१० पाळकांनी कोणती खोटी स्वप्ने दाखवली, किंवा कोणत्या खोट्या आशा शिकवल्या? हेच की, मानवाची शांती व सुरक्षिततेची एकमात्र आशा संयुक्त राष्ट्र आहे. अलिकडच्या वर्षात त्यांनी संयुक्त राष्ट्राला “शांती व समेटाची शेवटची आशा,” “शांती तसेच न्यायाचे सर्वोच्च व्यासपीठ,” “जागतिक शांतीसाठी मुख्य कालबाधित आशा” असे म्हटले आहे. केवढी ही फसवणूक! मानवजातीची एकमात्र आशा खरे पाहता देवाचे राज्य आहे. पण येशूच्या प्रचाराचा केंद्रभाग असणाऱ्या स्वर्गीय सरकाराच्या सत्याबद्दल हे पाळक प्रचार करीत नाहीत व शिकवत नाहीत.
११. (अ) यरुशलेमेच्या खोट्या संदेष्ट्यांनी देवाच्या नावावर कोणता वाईट परिणाम घडवून आणला? (ब) यिर्मया वर्गाच्या विरुद्धतेत, आजच्या खोट्या धार्मिक शिक्षकांनी ईश्वरी नावाच्या बाबतीत काय केले आहे?
११ सत्ताविसावे वचन आपल्याला आणखी काही सांगते. “त्यांचे पूर्वज बआल दैवतामुळे माझे नाम विसरले, तसे ते आपली स्वप्ने एकमेकांस सांगून माझ्या लोकांस माझे नाम विसरावयास लावितील अशी त्यांची कल्पना आहे.” यरुशलेमेच्या खोट्या संदेष्ट्यांनी लोकांना देवाचे नाव विसरावयास लावले. मग, आजच्या खोट्या धार्मिक शिक्षकांनी देखील असेच केले नाही का? यापेक्षा वाईट म्हणजे ते देवाचे नाव, यहोवा हे लपवतात. ते असे शिकवतात की, त्याचा वापर करण्याची तितकी गरज नाही, व म्हणून ते आपल्या पवित्र शास्त्र भाषांतरातून त्याचे नाव काढून टाकतात. शिवाय जे लोक, देवाचे नाव यहोवा आहे असे शिक्षण देतात अशांचा हे कटु विरोध करतात. परंतु, यिर्मया वर्ग, म्हणजे आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ख्रिश्चनांचे शेष व त्यांच्या सहकाऱ्यांनी येशूप्रमाणेच कार्य केले. त्यांनी लाखो लोकांना देवाच्या नावाबद्दल शिकवले.—योहान १७:६.
त्यांचा दोष उघड करणे
१२. (अ) खोट्या धार्मिक शिक्षकांवर मोठा रक्तदोष का आहे? (ब) दोन जागतिक महायुद्धांमध्ये पाळकांची कोणती भूमिका राहिली आहे?
१२ यिर्मया वर्गाने, पाळकांना खोटे शिक्षक असल्याचे आणि ते आपल्या कळपाला रूंद रस्त्यावरून नाशाकडे नेणारे आहेत असे वेळोवेळी उघड करून दाखवले आहे. होय, अशा या स्वप्नदर्शींना यहोवाचा प्रतिकूल न्याय का मिळेल हे त्या शेषांनी स्पष्ट केले. उदाहरणार्थ, यहोवाच्या सेवकांनी प्रकटीकरण १८:२४ चा वारंवार उल्लेख करून हे दाखवले की, मोठ्या बाबेलमध्ये “पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे” रक्त आढळले. धार्मिक मतभेदांमुळे जी युद्धे लढली गेली ती सर्व विचारात आणा. खोट्या धार्मिक शिक्षकांवर याचा केवढा मोठा रक्तदोष आहे! त्यांच्या शिक्षणांनी फुटी पाडल्या आणि वेगवेगळ्या विश्वासाचे व राष्ट्रीय गटात असलेल्यांमध्ये द्वेष वाढीस लावला. पहिल्या जागतिक महायुद्धाबद्दल, प्रचारक शस्त्र सादर करतात (इंग्रजी) हे पुस्तक म्हणतेः “पाळकांनी युद्धाला तीव्र आध्यात्मिक अभूतपूर्वता व चालना दिली. . . . यामुळे चर्च युद्धात एकंदर प्रकाराने समाविष्ट झाले.” हीच गोष्ट दुसऱ्या महायुद्धात देखील खरी ठरली. पाळकांनी लढणाऱ्या राष्ट्रांना पाठिंबा दिला व त्यांच्या सैन्यावर आशीर्वाद दिला. दोन जागतिक महायुद्धे ख्रिस्ती धर्मजगतात घडली, जेथे समधर्मीयांना एकमेकांची कत्तल केली. ख्रिस्ती धर्मजगतातील प्रापंचिक व धार्मिक दुफळी सध्याच्या काळी देखील रक्तपात घडवून आणीत आहे. त्यांच्या खोट्या शिक्षणामुळे केवढे भयंकर परिणाम उद्भवलेत!
१३. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांचा यहोवाशी कोणताच संबंध नाही हे यिर्मया २३:२२ ने कसे शाबीत केले आहे?
१३ कृपया यिर्मयाच्या २३ व्या अध्यायातील २२ व्या वचनाकडे लक्ष द्याः “ते माझ्या मित्रमंडळात असते तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकांस विदित केली असती, आणि त्यांस त्यांच्या दुष्ट मार्गातून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.” ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक संदेष्टे यहोवाच्या मित्रमंडळात, त्याच्याशी एक विश्वासू व बुद्धिमान दास या नात्याने राहिले असते तर, त्यांनी देवाच्या दर्जांनुरुप आपले जीवन व्यतित केले असते. त्यांनीसुद्धा ख्रिस्ती धर्मजगताच्या लोकांना देवाचे स्वतःचे वचन ऐकण्यासाठी उपलब्ध केले असते. याउलट, आधुनिक काळाच्या खोट्या शिक्षकांनी त्यांच्या अनुयायांचे डोळे अंधळे बनवून त्यांना देवाचा प्रतिस्पर्धी, दियाबल सैतान याचे सेवक केले.
१४. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांची १९५८ मध्ये कोणती सत्यता अगदी जोरदारपणे उघड करण्यात आली?
१४ यिर्मया वर्गाने पाळकांची सत्यता अगदी जोरदारपणे उघड केली. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहरामध्ये भरलेल्या १९५८ च्या यहोवाच्या साक्षीदारांच्या ईश्वरी इच्छा आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये वॉचटावर संस्थेच्या उपाध्यक्षांनी माहिती दिली, जी काही भागात अशी आहेः “दुटप्पी भाषण किंवा कसलीही हेळसांड न करता आम्ही घोषित करतो की, सर्व गुन्हे, दंगे, द्वेष, झगडे व अहंभाव . . . आणि चुकीचा धर्म, खोट्या धर्माच्या वेडेपणाच्या गोंधळामागे असणारे मूळ कारण, मानवाचा अदृश्य शत्रू, दियाबल सैतान हा आहे. जागतिक परिस्थितीला अधिकांशपणे धार्मिक पुढारी व नेते जबाबदार आहेत व यापैकीचे अधिक दोषास्पद लोक ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पाळकवर्ग आहेत. . . . पहिले जागतिक युद्ध झाल्यापासून आतापर्यंत ख्रिस्ती धर्मजगत देवाशी, यिर्मयाच्या काळी इस्राएल होते तसे नाते राखून आहे. होय, यिर्मयाने यरुशलेमेच्या बाबतीत जे घडल्याचे पाहिले त्यापेक्षा अधिक भयानक व विध्वंसक असा ख्रिस्ती धर्मजगताचा नाश होईल.”
खोट्या शिक्षकांचा न्याय
१५. पाळकांनी शांतीविषयी कोणत्या भविष्यवाण्या केल्या? त्या पूर्ण होतील का?
१५ असा हा ईशारा दिला गेला तरी पाळकांची तेव्हापासूनची वागणूक कशी आहे? १७ वे वचन कळवते त्याप्रमाणेः “मला तुच्छ मानणाऱ्यांस ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर [यहोवा, न्यूव] बोलला आहेः “तुम्हांस शांती प्राप्त होईल.”’ आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणाऱ्या सर्वास ते म्हणतात की, ‘तुम्हांवर काही अरिष्ट येणार नाही.’” हे खरे काय? नाही! पाळकांच्या या खोट्या भविष्यवादांना यहोवा निश्चये उघड करून दाखवील. ते त्याच्या नावात जे काही म्हणत आहेत ते तो पूर्ण करणार नाही. तथापि, पाळकांनी देवासोबतच्या शांतीबद्दल जी खात्री दिली आहे ती भ्रामक आहे!
१६. (अ) ह्या जगाचे कोणते नैतिक वातावरण आहे, व याला कोण जबाबदार आहेत? (ब) या जगाच्या हिणकस नैतिक दृष्टिकोनाविषयी यिर्मया वर्ग काय करत आहे?
१६ आता तुम्ही असा विचार करीत आहात का की, ‘काय, मी पाळकांच्या खोट्या शिक्षणाने फसणार? छे, मुळीच नाही!’ पण, एवढा आत्मविश्वास दाखवू नका! हे लक्षात आणा की, पाळकांच्या खोट्या शिकवणींमुळे नैतिक वातावरण भयंकर व कावेबाज बनले आहे. त्यांचे स्वैराचारी शिक्षण सर्व, मग ते कितीही अनैतिक असले तरी त्या गोष्टींचे समर्थन करते. असे हे पतित नैतिक वातावरण करमणुकीची सर्व क्षेत्रे, चित्रपट, दूरदर्शन, मासिके आणि संगीतात व्यापून भरलेले आहे. याकरताच, आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर या पतित पण कावेबाजपणे अपील करणाऱ्या नैतिक वातावरणात गुरफटले जाण्याची शक्यता आहे. तरूण जण हिणकस व्हिडिओ व संगीताद्वारे पाशात सापडू शकतात. शिवाय हेही लक्षात घ्या की, लोकांनी काहीही केले तरी चालू शकते ही जी धारणा बनलेली आहे ती पाळकांच्या खोट्या शिक्षणामुळे व ते देवाचे नीतीमान दर्जे उंचावून धरण्यात अपयशी पडल्यामुळे परिणामित झाली आहे. अशा अनैतिक दृष्टिकोनासोबत यिर्मया वर्ग लढत देत आहे व ख्रिस्ती धर्मजगताला व्यापून टाकणाऱ्या दुष्टतेचा धिक्कार करण्यासाठी यहोवाच्या सेवकांना मदत करत आहे.
१७. (अ) यिर्मयानुसार, दुष्ट यरुशलेमेवर कोणता न्यायदंड येणार होता? (ब) ख्रिस्ती धर्मजगताचे फार लवकर काय होईल?
१७ यहोवा या थोर न्यायाधिशामार्फत ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिक्षकांना कोणता दंड मिळणार? वचने १९, २०, ३९ व ४० उत्तर देतातः “पाहा, परमेश्वरापासून [यहोवा, न्यूव] त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल. परमेश्वर [यहोवा, न्यूव] आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप फिरावयाचा नाही. . . . पाहा, मी तुम्हाला अगदी विसरेन, मी तुम्हांस आणि जे नगर तुम्हांस व तुमच्या पूर्वजास दिले त्यास माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन. आणि तुम्हांस सर्वकाळचा कलंक लावीन; जिचा कधी विसर पडणार नाही अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करीन.” हे सर्व दुष्ट यरूशलेम व त्याच्या मंदिराविषयी घडले, आणि अशीच विपत्ती दुष्ट ख्रिस्ती धर्म जगतावर लवकरच येणार!
“परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव] भारी वचनाची” घोषणा करणे
१८, १९. यिर्मयाने कोणते “परमेश्वराचे [यहोवा, न्यूव] भारी वचन” यहूदाला घोषित केले, व याचा काय संबंध आहे?
१८ यास्तव, यिर्मया वर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांची कोणती जबाबदारी आहे? ३३ वे वचन आम्हांस सांगतेः “जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की, ‘परमेश्वराचे [यहोवा, न्यूव] भारी वचन काय आहे?’ तेव्हा त्यांस म्हणः ‘“तुम्ही भारी आहा आणि मीच तुम्हांस हाकून देईन,” असे परमेश्वर म्हणतो.’”
१९ “भारी” या इब्री शब्दाचा दुहेरी अर्थ होतो. तो, जोरदार ईश्वरी संदेश किंवा, एखाद्यास खाली टाकावयास लावणारा भार असा उल्लेख करू शकतो. येथे “परमेश्वराचे [यहोवा, न्यूव] भारी वचन” ही अभिव्यक्ति जोरदार भविष्यकथनाला—यरुशलेमेला नाशपात्र ठरवणाऱ्या संदेशाला सूचित करते. पण यिर्मयाने यहोवाकडून हा जो भारी संदेश लोकांना वारंवार वदविला तो त्यांना आवडला का? नाही, ते लोक यिर्मयाची टवाळी करून म्हणालेः ‘आता कोणता भविष्यवाद (भार) तू आणला आहेस? ती भविष्यवाणी आणखी एक कंटाळवाणा भार असेल याची आम्हाला खात्री आहे!’ पण यहोवाने त्यांना काय सांगितले? हे कीः “तुम्ही भारी आहा! आणि मीच तुम्हांस टाकून देईन.” होय, हे लोकच स्वतः यहोवाला भार झाले होते व एथूनपुढे त्याच्यावर भार म्हणून राहू नये यासाठी तो त्यांना टाकून देणार होता.
२०. आज “परमेश्वराचे [यहोवा, न्यूव] भारी वचन” काय आहे?
२० आज “परमेश्वराचे [यहोवा, न्यूव] भारी वचन” काय आहे? तो देवाच्या वचनातील जोरदार भविष्यवादीत संदेश आहे. तो विनाशाने भरलेला आहे व ख्रिस्ती धर्मजगतावर लवकरच येणाऱ्या नाशाची घोषणा करत आहे. यहोवाचे लोक या नात्याने, ह्या ‘यहोवाच्या भारा’ची घोषणा करण्याची मोठी जबाबदारी आम्हावर आहे. शेवट जवळ येत असता ख्रिस्ती धर्मजगतातील भटकलेले लोक ‘भार’ आहेत, होय यहोवा देवासाठी “भारी” झालेले आहेत आणि तो फार लवकर ख्रिस्ती धर्मजगताला विनाशासाठी ह्या भारातून स्वतःला मुक्त करून घेणार आहे हे आम्ही सांगितलेच पाहिजे.
२१. (अ) यरुशलेमचा सामान्य युग पूर्व ६०७ मध्ये नाश का झाला? (ब) यरुशलेमेच्या पतनानंतर, खोट्या संदेष्ट्यांचे आणि यहोवाच्या खऱ्या संदेष्ट्यांचे काय झाले, व आज ते आम्हाला कोणती खात्री देते?
२१ बाबेलोन्यांनी सामान्य युग पूर्व ६०७ मध्ये यरुशलेमेचा नाश केला तेव्हा यहोवाचा न्यायदंड यिर्मयाच्या काळी पूर्ण झाला. आधी भाकीत केल्याप्रमाणे, त्या उद्दाम व अविश्वासू इस्राएलांसाठी तो खूपच अपमानकारक व मानहानीकारक अनुभव होता. (यिर्मया २३:३९, ४०) या अनुभवाने त्यांना हे समजले की, ज्याचा त्यांनी सारखा अनादर केला होता त्या यहोवाने शेवटी त्यांना त्यांच्या दुष्टपणाचा परिणाम प्राप्त होऊ दिला. यामुळे त्यांच्या उद्दाम व फाजील खोट्या संदेष्ट्यांच्या मुखांना बंद करण्यात आले. पण यिर्मयाचे मुख मात्र भविष्यकथन करीत राहिले. त्याला यहोवाने सोडले नाही. या नमुन्याला अनुसरून, यहोवा जेव्हा ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक व त्यांच्या लबाड्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे जीवन आपल्या भारी निर्णयाद्वारे चिरडून टाकील तेव्हा तो आपल्या यिर्मया वर्गाचा त्याग करणार नाही.
२२. यहोवाच्या न्यायदंडामुळे ख्रिस्ती धर्मजगताला कोणत्या परिस्थितीप्रत आणले जाईल?
२२ होय, सामान्य युग पूर्व ६०७ च्या नंतर यरुशलेमची जी निर्जन, विध्वंसकारी स्थिती झाली तशीच, धार्मिक ख्रिस्ती धर्मजगताचे सारे ऐश्वर्य हिरावून घेतल्यावर व तिला लाजिरवाण्यारितीने उघड केल्यानंतर तिची स्थिती दिसेल. खोट्या शिक्षकांविरुद्ध यहोवाने ह्याच पात्र ठरवलेल्या न्यायदंडाचा हुकूम दिला आहे. तो न्यायदंड कधीही अपयशी ठरणार नाही. गतकाळात जसे यिर्मयाचे सर्व प्रेरित ईशारे खरे ठरले, तसेच ते त्यांची आधुनिक पूर्णता होताना खरे ठरतील. तर आपण यिर्मयासारखे होऊ या. यहोवाचे भविष्यवादित भारी संदेश आपण लोकांना निर्भयपणे कळवू या जेणेकडून, खोट्या धार्मिक शिक्षकांवर त्याच्या धार्मिक न्यायदंडाचा पूर्ण भार का पडत आहे हे त्यांना कळून येईल!
पुनरावलोकन प्रश्न
▫ यहोवाच्या दृष्टिकोनातून प्राचीन इस्त्राएल किती दुष्ट होते?
▫ ख्रिस्ती धर्मजगत कोणत्या मार्गाने ‘लबाडीने चालले’ आहेत?
▫ आधुनिक दिवसातील पाळकांच्या दोषाला कसे उघड करण्यात आले आहे?
▫ कोणते “परमेश्वराचे [यहोवा, न्यूव] भारी वचन” आज घोषित करण्यात येत आहे?
[८ पानांवरील चित्रं]
यिर्मयाने “घोर प्रकार” उघड केले
[९ पानांवरील चित्रं]
“ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात”
[१० पानांवरील चित्रं]
यरुशलेमेचा नाश झाल्यानंतरची स्थिती, ख्रिस्ती धर्मजगताच्या अंतिम नाशाला चित्रित करते