वाचकांचे प्रश्न
रोमकर ९:३ मध्ये पौलाने लिहिले: “माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.” सहयहुद्यांना वाचविण्यासाठी स्वतःचे बलिदान करील हा त्याच्या बोलण्याचा अर्थ होता का?
येशूने प्रीतीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले. पापी मानवजातीसाठी तो त्याचा जीव किंवा जीवन देखील देण्यासाठी तयार होता. त्याच्या सार्वजनिक सेवेत, त्याने त्याच्या स्वदेशाच्या लोकांसाठी—यहुद्यांसाठी—स्वतः प्रयत्न केले जेणेकडून शक्य तितके लोक त्याच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी झाले असते. (मार्क ६:३०-३४) त्यांचा बेजबाबदारपणा आणि तारणाच्या संदेशाला केलेल्या विरोधाने यहुदी लोकांविषयी असलेली येशूची प्रेमळ काळजी कधीही कमी झाली नाही. (मत्तय २३:३७) उलट, त्याने “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून आपल्यासाठी कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१.
प्रीतीविषयी येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणे अपरिपूर्ण मानवांसाठी शक्य आहे का? होय, आम्ही याचे उदाहरण प्रेषित पौलाच्याबाबतीत पाहू शकतो. त्याला सहयहुद्यांसाठी अतिशय काळजी वाटत होती, त्यांच्यासाठी असलेल्या त्याच्या प्रीतीने तो असे म्हणू शकला की त्यांच्यासाठी तो “ख्रिस्तापासून शापभ्रष्ट” होऊ शकतो.
पौलाने त्याचा मुद्दा सांगण्यासाठी अतिशयोक्तीचे किंवा फुगवून सांगण्याचे रुप वापरले. येशूने देखील मत्तय ५:१८ मध्ये अशाचप्रकारे अतिशयोक्तीचा वापर केला, तेव्हा त्याने म्हटले: “आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.” येशूला माहीत होते की आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होणार नाहीत. त्याचप्रमाणे पौल देखील शापभ्रष्ट होणार नव्हता आणि सर्वच यहुदी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणार नव्हते. परंतु पौलाच्या बोलण्याचा मुद्दा होता की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाने केलेल्या तारणाच्या माध्यमाचा फायदा यहुद्यांनी करुन घेण्यासाठी तो वास्तविकपणे काहीही करु शकत होता. म्हणून प्रेषिताने सहविश्वासू ख्रिश्चनांना उत्तेजन दिले हे आश्चर्याचे नाही: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथकर ११:१.
आज, ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्यांसाठी ख्रिश्चनांनी येशू आणि पौलाप्रमाणेच कळकळ दाखवली पाहिजे. शेजाऱ्यांसाठी असलेली आमची प्रीती आणि तारणाच्या मार्गाविषयी त्यांना शिकण्यासाठी मदत करण्याच्या आमच्या आवेशाला लोकांमधील आस्थेच्या उणीवेमुळे किंवा त्यांनी आणलेल्या विरोधामुळे कमी होऊ देऊ नका.—मत्तय २२:३९.