वाचकांचे प्रश्न
अन्नपदार्थात रक्ताच्या सुकलेल्या घटकांचे मिश्रण मिसळलेले असू शकते याबद्दल ख्रिश्चनांनी किती काळजी केली पाहिजे?
स्थानिक अन्नपदार्थात जनावरांचे रक्त (किंवा रक्ताचा घटक) निश्चितपणे वापरण्यात आलेला आहे हे मानण्यास सबळ आधार असल्यास ख्रिश्चनांनी त्याबद्दल योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. तरीपण नुसता संशय किंवा निराधार चिंता यावर आपले मत निश्चित करणे चुकीचे आहे.
मानवाच्या इतिहासाच्या आरंभापासूनच आमच्या निर्माणकर्त्याने मनुष्याने रक्ताचे सेवन करू नये असा आदेश दिला होता. (उत्पत्ती ९:३, ४) त्याने म्हटले की, रक्तात जीवन असते व ही त्याजकडील देणगी आहे. कोणा जनावरामधून काढलेले रक्त हे वेदीवर अर्पण करण्यासाठीच वापरता येऊ शकत होते. अन्यथा जनावरांचे रक्त जमिनीवर ओतून टाकावयाचे होते, याद्वारे ते त्याला परत दिले हा अर्थ ध्वनित होत होता. रक्ताचे सेवन करण्याद्वारे आपल्या जिवाचे संगोपन करायचे देवाच्या लोकांनी टाळायचे होते. त्याने अशी आज्ञा केलीः “कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये. कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच रक्त होय. जे तो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा.” (लेवीय १७:११-१४) रक्त खाण्यासंबंधाने देवाने जो मनाईहुकूम दिला होता तो ख्रिश्चनांना परत देण्यात आला. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) या कारणामुळेच आरंभीच्या ख्रिस्ती लोकांनी रक्त असलेले अन्न, जसे की, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस वा रक्ताद्वारे बनवण्यात आलेले चटकदार खाद्य खावयाचे नव्हते.
पण मग, ‘रक्तापासून दूर राहा’ या निश्चयाच्या अनुषंगाने, ख्रिस्ती लोकांनी कसे व्यावहारिकपणे वागायचे होते? (प्रे. कृत्ये २१:२५) त्यांनी, “खाटिक बाजारात जे विकण्यात येते ते निःशंक मनोवृत्तीने चौकशी न करता खा”वयाचे होते का?
नाही. १ले करिंथकर १०:२५ मधील ते शब्द, मूर्तिपूजक मंदिरात यज्ञ करण्यात आलेल्या जनावराच्या मांसाला लागू होत होते. त्या काळी मंदिरात उरलेले अधिक मांस व्यापाऱ्यांना विकून टाकीत; हे व्यापारी आपणापाशी असणाऱ्या मांसाच्या साठ्यात ते एकत्र करीत व ते विकत असत. यास्तव, पौलाचा असा मुद्दा होता की, मंदिरातून आलेले मांस हे वस्तुतः वाईट किंवा प्रदूषित असते असे नाही. खरे म्हणजे, अर्पण होत असलेल्या जनावराचे रक्त काढून ते मूर्तिपूजक वेद्यांवर अर्पण म्हणून वाहणे ही तेव्हाची प्रथा होती. तेव्हा राहिलेले जादा मांस जर बाजारात विकले गेले आणि त्याचा उघड संबंध मंदिर वा मूर्तिपूजकांच्या चुकीच्या विचारधारांशी दिसत नसल्यास, ख्रिस्ती लोकांना, ते स्वच्छ व रक्त काढून टाकलेले असे व्यापारी मांस म्हणून विकत घेता येऊ शकत होते.
तरीपण कोणा स्थानिक दुकानात गळा दाबून मारलेल्या (किंवा रक्ताचे घटक असणाऱ्या) जनावराचे मांस विकले जात आहे असे ख्रिस्ती लोकांना माहीत असले तर ती वेगळी बाब होती. तेव्हा कशाप्रकारातील मांस घ्यावे यात त्यांनी निवड करायची होती. एखाद्या मांसाचा रंग काही वेगळाच दिसतो (जसे की, आज रक्ताचे चटकदार पदार्थ हे तेथील देशात त्याच्या विशिष्ट प्रकारामुळे चटकन ओळखता येतात) तर ते मांस कोणते असू शकेल हे ते लगेच ओळखू शकत होते. किंवा ते लोक एखाद्या निष्णात खाटिकाला किंवा विक्रेत्याला मांसाची विचारणा करू शकत होते. एखाद्या मांसात रक्त आहे हे मानण्यास जर कोणतेही कारण उपलब्ध नव्हते तर ते अगदी निःशंकपणे विकत घेऊन खाऊ शकत होते.
पौलाने असेही लिहिलेः “तुमची सौम्यता [“व्यवहारीपणा,” न्यू.व.] सर्वांस कळो.” (फिलिप्पैकर ४:५) हीच गोष्ट मांस विकत घेण्याबद्दलही लागू होणारी आहे. मांसाबद्दल विचारपूस करण्यात बराच वेळ व श्रम घालवावेत, आणि मांसात रक्त असल्याची थोडीशी जरी शंका वाटली तर मांसाहार सोडून शाकाहार करावा असे इस्राएलाचा कायदा तसेच पहिल्या शतकातील नियमन मंडळाचा ठराव देखील सूचित करीत नाही.
कोणा इस्राएली शिकाऱ्याने एखाद्या प्राण्याची शिकार केली तर तो त्यामधील रक्त वाहू देई. (पडताळा अनुवाद १२:१५, १६.) त्याच्या कुटुंबाला ते मांस पुरेसे होऊन उरत होते तर मग ते तो विकू शकत होता. योग्य रितीने कापलेल्या शवात देखील थोडे रक्त राही; पण मांस विकत घेणाऱ्या यहूद्याने अगदीच निक्षून तपासणी जसे की, पशू ठार मारण्यात व त्याचे रक्त वाहू देईपर्यंत किती मिनिटे गेली, रक्त वाहण्यासाठी कोणती रक्तवाहिनी किंवा नस कापली गेली, पशूला कसे टांगवण्यात आले व किती काळ याची बारीक तपासणी करावी असे पवित्र शास्त्र कोठेही सुचवीत नव्हते. याचप्रमाणे नियमन मंडळाने देखील ख्रिश्चनांना याबाबतीत अगदीच बारीक काळजी घेण्याचे की, जणू मांस खाण्याआधी सर्व बारीक सारीक प्रश्नांची उत्तरे मिळवलीच पाहिजेत असे काही लिहिले नाही.
आज पुष्कळ देशात [रक्ताचे चटकदार पदार्थ हा असामान्य प्रकार सोडता] मांसाचे पदार्थ तयार करण्यासाठी पशू कापल्यावर त्याचे रक्त वाहू दिले पाहिजे अशी प्रथा, कायदा व धार्मिक पद्धत आहे. यामुळेच अशा ठिकाणी राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांनी पशूचे कापणे वा त्याच्या मांसावर केली जाणारी प्रक्रिया पद्धत याबद्दल अवास्तव काळजी करू नये. त्यांनी ‘खाटिक बाजारात विकण्यात येणारे मांस, निःसंकोचपणे, चौकशी न करता’ खावे. त्यांना रक्तापासून दूर असल्याचा विवेकभाव राखता येईल.
तरी देखील, रक्ताच्या व्यावसायिक वापराबद्दल काही वेळा तांत्रिक अहवालामुळे काही ख्रिस्ती लोकांना विचलीतपणा निर्माण झाला आहे. मांसावर प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिक लोकांचे असे म्हणणे आहे की, कापलेल्या प्राण्यांच्या एकत्रित केलेल्या रक्तामधून खते व जनावरांचे खाद्य निर्माण करता येऊन व्यावहारिक अवलंब व फायदा करून घेता येतो. अशा या रक्ताचा (किंवा घटकांचा) प्रक्रिया केल्या जाणाऱ्या मांसात वापर केला जाऊ शकतो का याबद्दल संशोधकांनी अभ्यास केला आहे. काही व्यावसायिकांनी तर पुढे जाऊन पॅटे किंवा इतर चटकदार उत्पादनात मांसाचे काही प्रमाण वापरण्याऐवजी पातळ, गोठलेले किंवा चूर्णरुपातील द्रव (किंवा रंगहीन लालपेशींचे सत्व) वापरावे म्हणून निर्मिती केली आहे. दुसरे संशोधन चूर्ण केलेल्या रक्तातील सत्त्व, हे दळण्यात आलेले मांस, शिजवण्याचे पदार्थ, किंवा इतर आहार व पेये यात प्रथिने किंवा लोह यांची भर पडावी म्हणून वापरता येतात का यावर केंद्रित करण्यात आले.
तरीही, ही संशोधने दशकभर होत राहिली हे लक्षात घेण्याजोगे आहे. आणि अशा उत्पादनांचा वापर अगदीच अल्परुपात किंवा जवळजवळ नाहीच अशाप्रमाणात कित्येक देश होत गेला. त्यामागील कारण काय असावे याबद्दल पुढील विशिष्ट अहवाल स्पष्टता पुरवतील:
“रक्त हे सकस व व्यवहारोपयोगी प्रथिनांचा उगम आहे. तथापि, गोमांसातील रक्त हे त्याचा भडक रंग व विशिष्ट चव यामुळे केवळ मर्यादित रुपात वापरण्यात आले.”—जर्नल ऑफ फूड सायन्स, खंड ५५, नं. २, १९९०.
“रक्त घटकातील प्रथिनांमध्ये उच्च स्वरुपातील विद्राव्यता, फेसाळ मिश्रणाची हालचाल, आणि रासायनिक आकर्षण हे महत्त्वपूर्ण प्रकार आढळतात . . . आणि अन्नाची प्रक्रिया घडवताना त्यांचा खूप फायदा मिळतो. तरीपण, जपानमध्ये, रक्तातील शुष्कता संपल्यावर प्रभावी असे निरोगी घटक मिळवण्यात अद्याप यश मिळू शकले नाही.”—जर्नल ऑफ फूड सायन्स, खंड ५६, नं. १, १९९१.
काही ख्रिस्ती लोक उत्पादनावरील वेष्टनात दिलेली माहिती तपासून पाहतात, कारण पदार्थात कोणकोणत्या घटकांचा वापर झाला आहे त्याची यादी द्यावी अशी सरकारची इच्छा असते. त्यामुळे एखाद्या पदार्थात रक्ताचा वापर आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ते ती यादी तपासून पाहू इच्छितील. या यादीत रक्त, रक्त घटक, प्लाझमा, ग्लोबिन (किंवा ग्लौबिन) प्रथिने, किंवा हिमोग्लोबिन (अथवा ग्लोबिन) लोह असे काही प्रकार आढळल्यास ती उत्पादने टाळणे हे चांगलेच असणार. या क्षेत्राबद्दल युरोपियन कंपनीकडून मिळालेल्या बाजारपेठेतील माहिती अशी कबूली देतेः “तयार खाद्याच्या डब्यावरील आवरणात ग्लोबिनचा घटक म्हणून उपयोग केलेला आहे ही माहिती दिलीच पाहिजे; कारण त्यामुळे कोणकोणते घटक आहेत त्याविषयी किंवा अन्नाची चव याबद्दल ग्राहकाची दिशाभूल होऊ शकत नाही.”
तरीपण, यादी तपासून पाहणे, खाटिकांकडे जाऊन विचारपूस करणे यामध्ये व्यवहारीपणा वा समंजसपणा असला पाहिजे. जगभर असलेल्या प्रत्येक ख्रिश्चनाने अन्नाच्या सर्व पाकिटावरील घटकपदार्थांची यादी तपासावी, हॉटेलमधील किंवा स्टोअर्समधील सर्व कर्मचाऱ्यांना विचारणा करीत राहावे असे काही नाही. उलट, ख्रिश्चनाने प्रथम स्वतःला हे विचारुन बघावेः ‘या देशात किंवा मी राहतो त्या ठिकाणी साधारण अन्नाच्या उत्पादनात रक्त किंवा त्यातील विविध घटकांचा वापर केला जात आहे याचा तपासलेला पुरावा आहे का?’ बहुतेक ठिकाणी याचे उत्तर नाही, हेच असेल. या कारणामुळे पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी हे ठरविले आहे की, ते आपला बहुतेक वेळ व लक्ष या दूरच्या शक्यतांचा शोध लावण्यात घालवणार नाहीत. ज्या व्यक्तिला असे वाटत नाही त्याने आपल्या विवेकाप्रमाणे हालचाल करावी, आणि दुसरे जी हालचाल देवासमोर शुद्ध विवेकभाव बाळगून करतात त्याबद्दल त्यांची टिका करू नये.—रोमकर १४:२-४, १२.
रक्त असणारे खाद्य उत्पादन जरी बनवता येत असले तरी ते इतके प्रचलित होत नाही, याचे कारण त्याची किंमत, कायदा व इतर गोष्टी होत. उदाहरणार्थ, फूड प्रोसेसिंग (सप्टेंबर १९९१) म्हणतेः “(शिजवलेल्या मांसाच्या उत्पादनात) हायड्रोलाइज्ड गोमांस घटकात १ टक्क्यापेक्षाही कमी समस्या असणाऱ्या उत्पादकांना दह्यातील पाण्याचा अर्क पर्यायी म्हणून बरा वाटतो व तो कोशेर या नावाने ओळखला जातो.”
जवळजवळ बहुतेक राष्ट्रात कायदा, प्रथा व पद्धत ही आहे की, कापलेल्या जनावराचे रक्त काढून टाकले जाते आणि हे रक्त इतर कोणत्याही अन्नाच्या उत्पादनात वापरण्यात येत नाही. स्थानिक परिस्थिती यापेक्षा काही वेगळी आहे किंवा अलिकडेच मोठा बदल घडला गेला आहे असा विचार करण्यास पुरेसा आधार नसला तर निव्वळ शक्यता वाटते किंवा अफवा पसरली आहे म्हणून ख्रिश्चनांनी विचलीत होण्याचे कारण नाही. पण तेच, जेव्हा रक्ताचा सर्रास वापर होत असल्याचे निश्चितपणे दिसत आहे, मग ते अन्न असो की, वैद्यकीय इलाज, आपण रक्तापासून दूर राहावे ही देवाची आज्ञा पाळून चालण्यास हवे.