येशूचे जीवन व उपाध्यपण
प्रेषितांची निवड
बाप्तिस्मा करणारा योहान याने येशूला देवाचा कोकरा असे सादर करुन आणि येशूने त्याचे उपाध्यपण सुरु करुन आता जवळजवळ दीड वर्ष लोटले आहे. त्यावेळेस आंद्रिया, शिमोन, पेत्र, योहान आणि याकोब (योहानाचा भाऊ), तसेच फिलिप्प आणि नथनेल (ज्याला बर्थलमय म्हणत) हे येशूचे पहिले शिष्य होते. मध्यंतरात पुष्कळजण ख्रिस्ताचे अनुयायी बनतात.
आता येशू त्याच्या प्रेषितांना निवडणार आहे. हे त्याचे जवळचे सोबती यानाते त्यांना खास नेमणूक देण्यात येणार होती. पण त्यांची निवड करण्यापूर्वी येशू डोंगरावर जातो आणि सबंध रात्रभर सूज्ञान व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. दिवस उजाडताच तो शिष्यांना बोलावितो आणि त्यांच्यामधून १२ जणांची निवड करतो. यानतंर देखील हे येशूचे विद्यार्थी म्हणून त्याचे शिष्य असेच ओळखले जातात.
येशू ज्या सहा जणांची प्रथम निवड करतो व त्यांची नावे वर उल्लेखिलेली आहेत ते त्याचे पहिले शिष्य होय. जकात कार्यालयातून येशूने बोलाविलेला मत्तय देखील निवडण्यात येतो. निवडलेल्यांपैकी इतर पाच जण म्हणजे यहुदा (ज्याला तद्दय म्हणत), यहुदा इस्कर्योत, शिमोन कनानी, थोमा, आणि अल्फीचा मुलगा याकोब. या याकोबाला दुसऱ्या प्रेषित याकोबापासून वेगळेपणाने ओळखण्यासाठी याकोब (कनिष्ठ) असेहि म्हणतात.
हे १२ जण आता काही काळापासून येशूसोबत आहेत व तो त्यांना चांगले ओळखतो. वस्तुतः यांच्यातील पुष्कळजण येशूचे स्वतःचे नातलग आहेत. याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तर येशूचे चुलत भाऊ आहेत. बहुधा अल्फी हा येशूचा दत्तक पिता योसेफ याचा भाऊ असावा व यामुळे अल्फीचा मुलगा प्रेषित याकोब हा देखील येशूचा चुलत भाऊ असणार.
येशूला त्याच्या प्रेषितांची नावे लक्षात ठेवण्यास अवघड नव्हते यात काहीच शंका नाही. पण तुम्ही त्यांना लक्षात ठेवू शकता का? बरे, फक्त एवढे लक्षात घ्या की, यांच्यापैकी दोघे शिमोन नावाचे, दोघे याकोब नावाचे आणि दोघे यहुदा नावाचे आहेत, आणि यातील एका शिमोनाचा भाऊ आंद्रिया, एका याकोबाचा भाऊ योहान आहे. अशाप्रकारे आठ प्रेषितांची नावे तुम्हाला लक्षात ठेवता येतील. आता बाकीचे इतर चौघे, जकातदार (मत्तय), ज्याला नंतर शंका आली तो (थोमा), आणि ज्याला झाडाखालून बोलाविले तो (नथनेल) व त्याचा मित्र फिलिप्प.
यापैकीचे अकरा प्रेषित हे येशूच्या घराच्या परिसरातील म्हणजे गालीलातील आहेत. नथनेल काना येथील आहे. फिलिप्प, पेत्र व आंद्रिया हे बेथेसैदा येथील आहेत. नंतर पेत्र व आंद्रिया हे मत्तय जेथे राहात होता त्या कफर्णहूम गावी रहावयास गेले. मासेमारी करणारे याकोब व योहान हे देखील कफर्णहुमात किंवा त्याच्या आसपास राहणारे होते. ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला तो यहुदा इस्कर्योत हा एकटाच यहुदीया येथील प्रेषित आहे. मार्क ३:१३-१९; लूक ६:१२-१६.
येशूचे कोणते प्रेषित त्याचे नातलग असावेत?
येशूचे प्रेषित कोण आहेत आणि त्यांचे नावे तुम्ही कशी लक्षात ठेऊ शकता?
कोणकोणत्या परिसरातून हे प्रेषित आले होते?
[८ पानावरील चौकट]
१२ प्रेषितांना निवडण्याआधी येशूने सबंध रात्र यहोवाला प्रार्थना करण्यात घालविली