येशूचे जीवन व उपाध्यपण
मत्तयाला पाचारण
पक्षघाती माणसाला बरे केल्यावर लवकरच येशू कफर्णहूमातून निघून गालील समुद्राकडे येतो. पुनः येथे लोकांचा समुदाय त्याच्याकडे येतो व तो त्यांना शिकवू लागतो. तो जात असता त्याला मत्तय दिसतो, ज्याला लेवी असेही म्हणत. हा मत्तय जकातीच्या नाक्यावर बसलेला असतो. “माझ्यामागे ये” असे येशू त्याला निमंत्रण देतो.
मत्तयाला येशूच्या शिक्षणाचा आधीच परिचय असावा. याचप्रमाणे पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांनासुद्धा, येशूने त्यांना पाचारण करण्याआधी येशूच्या शिक्षणाची कल्पना होती. त्यामुळे यांच्याप्रमाणेच मत्तय येशूच्या निमंत्रणाचा लगेच स्वीकार करतो. तो उठतो, जकातदार ही आपली जबाबदारी मागे सोडतो व येशूच्या मागे जातो.
आपल्याला झालेल्या पाचारणाप्रीत्यर्थ आनंदोत्सव म्हणून मत्तय नंतर आपल्या घरात मोठी मेजवानी देतो. या मेजवानीस येशू व त्याचे शिष्य या खेरीज मत्तयाचे पूर्वीचे सहकारी सुद्धा उपस्थित आहेत. यहुद्यांना रोमी अधिकाऱ्यांचा हेवा वाटे आणि रोमी अधिकाऱ्यांच्या वतीने हे जकातदार यहुद्यांकडून कर वसूल करीत त्यामुळे यहुद्यांना जकातदार सुद्धा तुच्छ वाटत. याशिवाय हे जकातदार लोकांकडून वाजवीपेक्षा अधिक रक्कम कर म्हणून लुबाडत असत त्यामुळेही यहुद्यांना त्यांचा वीट वाटे.
आता अशा लोकांच्या मेळाव्यात येशू बसला आहे हे बघून परूशी त्याच्या शिष्यांना विचारतात: “तुमचा गुरु जकातदार व पापी लोकांसोबत जेवतो हे कसे?” त्यांचा प्रश्न दुरुन ऐकून येशू त्यांना उत्तर देतो: “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. तर मग, ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतीमानांना नव्हे तर पापी जनांना बोलाविण्यासाठी मी आलो आहे.”
त्या इतर जकातदारांना मत्तयाने बहुधा या कारणास्तव बोलावले असेल की त्यांनीही येशूचे ऐकावे व आध्यात्मिक आरोग्य मिळवावे. याच कारणामुळे येशू त्यांना देवासोबत दृढ नातेसंबंध प्राप्त व्हावा म्हणून मदत देण्यास तेथे होता. स्वमताभिमानी परूश्यांसारखे येशू यांना तुच्छ लेखीत नाही. उलट त्यांच्याबद्दल कळवळा वाटून तो त्यांना आध्यात्मिक वैद्य या नात्याने सेवा देतो.
अशाप्रकारे येशूने पाप्यांविषयी व्यक्त केलेली दया त्यांच्या पापास अनुमति दाखविणारी नव्हती तर शारीरिक दृष्ट्या आजारी असणाऱ्यांच्या बाबतीत त्याने जो कळवळा प्रदर्शित केला होता तसाच कळवळा येथेही तो दाखवीत होता. उदाहरणार्थ, त्याने कुष्ठरोग्याला कळवळ्यामुळे काय म्हटले होते ते आठवा. तो म्हणाला: “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” याचप्रमाणे आम्हीही गरजवंताना खासपणे आध्यात्मिकरित्या मदत करून त्यांच्याविषयी आपली दया व्यक्त करावी. मत्तय ८:३; ९:९–१३; मार्क २:१३–१७; लूक ५:२७–३२.
◆ येशू मत्तयाला बघतो त्यावेळी तो कोणत्या स्थळी आलेला असतो?
◆ मत्तयाचा व्यवसाय कोणता आहे व अशा व्यक्तींना यहुदी लोक का तुच्छ मानीत?
◆ येशू विरूद्ध कोणती तक्रार करण्यात येते व तो त्याचे कसे उत्तर देतो?
◆ येशू पापी लोकांची संगत का ठेवून होता?