माझे अपंगत्व असले तरी यहोवाची स्तुति होवो!
गंभीर असे शारिरीक अपंगत्व आहे तरी यहोवा देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांना त्याच्या पाठबळाचा नित्य प्रत्यय येतो. “धार्मिकांस तो कधीही ढळू देणार नाही.”—स्तोत्रसंहिता ५५:२२.
हे सांत्वनदायक शब्द विशीतल्या बील व जेनीस या दोघांसाठी खऱ्या अर्थाचे आहेत. यांचा विवाह होऊन साधारण तीन वर्षे झाली आहेत व ते आता वॉशिंग्टन डी.सी. येथील एका यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीसोबत संलग्न आहेत. बील पूर्ण वेळेचे राज्य घोषक म्हणजे पायनियर आहेत व ते अनेक घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालवितात. यापैकींचे चार बहिऱ्या व्यक्तींबरोबर चालविले जातात.
जेनीसला जन्मतःच बहिरेपणा होता व त्याचा प्रादुर्भाव तिच्या दृष्टीवर होऊन तिला अंधत्व आले. “राज्याची वाढ” या गतवर्षीच्या प्रांतिय अधिवेशनात जेनीस बहिऱ्यांसाठी खास व्यवस्था असणाऱ्या बैठकीत बसली. येथे चिन्हांकित भाषेद्वारे कार्यक्रमाचा भाग श्रवणशक्ती गमाविलेल्यांसाठी समजावला जातो. पण जेनीसला तर अंधत्वही होते त्यामुळे तिला या पद्धतीचा उपयोग होऊ शकत नव्हता. यासाठीच एका अनुवादकाला तिच्या शेजारी बसायला सांगितले गेले. जेनीस आपला हात या अनुवादकाच्या तळव्यावर ठेवून सांकेतिक भाषेकरवी तो कार्यक्रम “ऐकू” शकली.
कार्यक्रमात एकदा राज्याचे गीत गायिले जात असताना तेथे ज्या अनुवादकाला असावयास हवे होते तो आराखडयासंबंधीच्या काही गैरसमजूतीने तेथे येऊ शकला नाही. यावेळी बील जे, जेनीसला अनुवाद करून सांगत होते, तिला घेऊन उभे राहिले व ते चिन्हांनी गीत दर्शवू लागले. याचवेळी जेनीसने आपला हात त्याच्या तळव्यावर ठेवला व सांकेतिक छटा ओळखून तीही इतरांबरोबर गाऊ लागली. हे दृश्य पाहून कित्येकांच्या डोळयात अश्रू आले.
बील व जेनीस आता सुमारे दोन वर्षांपासून “सत्यामध्ये चालत” आहेत. (३ योहान ४) वस्तुतः जेनीस शारीरिकदृष्ट्या अंध व बहिरी असली तरी ती इतरांना देवाचे सत्य बघण्याची व ऐकण्याची मदत देते. तिला सध्या तीन घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याचा आशीर्वाद लाभला आहे. ती हा अभ्यास, विद्यार्थी स्वतः बहिरे असल्यामुळे चिन्हांकित भाषेकरवी चालविते. अशा प्रकारे हे स्पष्ट आहे की जेथे यहोवाची स्तुति करण्याची आणि इतरांना मदत देण्याची तळमळीची इच्छा आहे तेथे देवाच्या सेवकांना मार्ग हा सापडतोच.