वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es23 पृ. २९-४२
  • मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
  • उपशिर्षक
  • बुधवार, १ मार्च
  • गुरुवार, २ मार्च
  • शुक्रवार, ३ मार्च
  • शनिवार, ४ मार्च
  • रविवार, ५ मार्च
  • सोमवार, ६ मार्च
  • मंगळवार, ७ मार्च
  • बुधवार, ८ मार्च
  • गुरुवार, ९ मार्च
  • शुक्रवार, १० मार्च
  • शनिवार, ११ मार्च
  • रविवार, १२ मार्च
  • सोमवार, १३ मार्च
  • मंगळवार, १४ मार्च
  • बुधवार, १५ मार्च
  • गुरुवार, १६ मार्च
  • शुक्रवार, १७ मार्च
  • शनिवार, १८ मार्च
  • रविवार, १९ मार्च
  • सोमवार, २० मार्च
  • मंगळवार, २१ मार्च
  • बुधवार, २२ मार्च
  • गुरुवार, २३ मार्च
  • शुक्रवार, २४ मार्च
  • शनिवार, २५ मार्च
  • रविवार, २६ मार्च
  • सोमवार, २७ मार्च
  • मंगळवार, २८ मार्च
  • बुधवार, २९ मार्च
  • गुरुवार, ३० मार्च
  • शुक्रवार, ३१ मार्च
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
es23 पृ. २९-४२

मार्च

बुधवार, १ मार्च

या माझ्या भावांपैकी सगळ्यात लहानासाठी तुम्ही जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं.—मत्त. २५:४०.

मत्तय २५:३१-३६, ४० या वचनांत ‘मेंढरं’ असं जे म्हटलं आहे, ते अंताच्या काळात जगणाऱ्‍या नीतिमान लोकांना सूचित करतं, ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे. ते ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना खासकरून प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात मदत करतात. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) दरवर्षी स्मारकविधीच्या काही आठवड्यांआधी दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेले लोक जगभरात चालवल्या जाणाऱ्‍या एका खास मोहिमेत सहभाग घेतात. या मोहीमेत ते स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी लोकांना आमंत्रण देतात आणि अशा प्रकारे ते ख्रिस्ताच्या बांधवांना साथ देतात. याशिवाय, जगभरातल्या प्रत्येक मंडळीत स्मारकविधी व्यवस्थित पार पाडला जावा म्हणून ते आवश्‍यक ती तयारी करतात. अशा प्रकारे ख्रिस्ताच्या बांधवांना मदत करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. कारण त्यांना हे माहीत आहे, की अभिषिक्‍त बांधवांसाठी आपण जे काही करतो, ते एका अर्थाने येशू ख्रिस्तासाठीच केल्यासारखं आहे.—मत्त. २५:३७-४०. टेहळणी बुरूज२२.०१ २२ ¶११-१२

गुरुवार, २ मार्च

ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.—योहा. १४:९.

यहोवाचं अनुकरण करण्यासाठी आपण येशूचं अनुकरण केलं पाहिजे. एका कुष्ठरोग्याला पाहून येशूला त्याचा कळवळा आला. गंभीर आजार असलेल्या एका स्त्रीबद्दल त्याला खूप सहानुभूती वाटली. आणि ज्यांच्या जवळच्या माणसांचा मृत्यू झाला होता, त्यांच्याबद्दल त्याला खूप दया वाटली. येशूच्या या गुणांचं आणि तो ज्या प्रकारे इतरांशी वागला त्याचं आपण अनुकरण करतो, तेव्हा एकाअर्थी आपण यहोवाचंच अनुकरण करत असतो. (मार्क १:४०, ४१; ५:२५-३४; योहा. ११:३३-३५) आपण जितकं जास्त यहोवाच्या गुणांचं अनुकरण करू, तितकी जास्त यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट होईल. येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण केल्यामुळे आपलं लक्ष नेहमी यहोवाच्या सेवेवर राहील; या दुष्ट जगामुळे ते भरकटणार नाही. आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशूने म्हटलं: “मी जगाला जिंकलंय.” (योहा. १६:३३) येशूला नेमकं काय म्हणायचं होतं? हेच, की त्याने जगातल्या लोकांच्या विचारांचा, त्यांच्या ध्येयांचा आणि कामांचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. आपल्याला यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं आहे, ही गोष्ट तो कधीच विसरला नाही. आपल्या बाबतीत काय म्हणता येईल? या जगात अशा बऱ्‍याच गोष्टी आहेत, ज्यांमुळे आपलं लक्ष यहोवाच्या सेवेपासून भरकटू शकतं. येशूसारखंच, आपणसुद्धा आपलं सगळं लक्ष यहोवाची इच्छा पूर्ण करण्यावर लावलं, तर आपल्यालासुद्धा या जगावर “विजय” मिळवता येईल.—१ योहा. ५:५. टेहळणी बुरूज२१.०४ ३-४ ¶७-८

शुक्रवार, ३ मार्च

कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं करू [शकत नाही].—रोम. ८:३९.

प्रेषित पौलला येशूचं अभिवचन माहीत होतं, की ‘जो कोणी येशूवर विश्‍वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.’ (योहा. ३:१६; रोम. ६:२३) याशिवाय, ज्यांनी गंभीर पाप केलं आहे त्यांनी जर पश्‍चात्ताप केला, तर यहोवा मोठ्या मनाने त्यांना क्षमा करतो, याची त्याला पूर्ण खातरी होती. (स्तो. ८६:५) देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे याची पौलला आणखी एका गोष्टीमुळे खातरी पटली. ती म्हणजे, देवाने आपल्यासाठी त्याच्या मुलाचं बलिदान दिलं हे त्याला माहीत होतं. गलतीकर २:२० या वचनाच्या शेवटी दिलेल्या दिलासादायक शब्दांकडे लक्ष द्या. तिथे पौल म्हणतो, की देवाच्या मुलाने “माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं.” पौलने असा विचार केला नाही की आपण फार वाईट आहोत, त्यामुळे आपण देवाच्या प्रेमाच्या लायक नाही. किंवा त्याने असाही विचार केला नाही, की ‘यहोवाचं माझ्या भाऊबहिणींवर प्रेम आहे, पण माझ्यावर नाही.’ उलट, रोमकरांना त्याने याची आठवण करून दिली, की “आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.” (रोम. ५:८) यावरून दिसून येतं, की यहोवाचं आपल्यावर अपार प्रेम आहे! देवाच्या प्रेमात किती ताकद आहे हे पौलला माहीत होतं. तसंच, यहोवा इस्राएल राष्ट्राशी किती धीराने वागला होता, हेसुद्धा पौलला माहीत होतं. टेहळणी बुरूज२१.०४ २२ ¶८-१०

शनिवार, ४ मार्च

कारण देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करावं.—१ योहा. ५:३.

बायबल अभ्यास घेताना विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला शिकवा. आपण ते कसं करू शकतो? संधी मिळेल तेव्हा आपल्या विद्यार्थ्याला यहोवाच्या गुणांबद्दल सांगा. यहोवा हा आनंदी देव आहे आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत तो नेहमी असतो ही गोष्ट आपल्या विद्यार्थ्याला समजायला मदत करा. (१ तीम. १:११; इब्री ११:६) तसंच, विद्यार्थ्याला सांगा की शिकलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे त्याला बरेच फायदे होतील. यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला या गोष्टी शिकवतो. आणि म्हणून आपल्याला हे फायदे होतात हे विद्यार्थ्याला समजायला मदत करा. (यश. ४८:१७, १८) जितकं जास्त त्याचं यहोवावरचं प्रेम वाढत जाईल तितकं जास्त त्याला स्वतःमध्ये बदल करावासा वाटेल. बाप्तिस्मा घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला आपल्या जीवनात बरेच त्याग करावे लागतात. काही विद्यार्थ्यांना आपल्या मालमत्तेचा त्याग करावा लागेल. काहींना असे मित्र सोडावे लागू शकतात जे यहोवाची उपासना करत नाहीत. आणि काहींच्या बाबतीत तर असं होतं, की ते साक्षीदार बनल्यामुळे त्यांच्या घरचेच लोक त्यांना सोडून देतात. पण, जे आपले शिष्य बनतील ते कधीच एकटे पडणार नाहीत; उलट त्यांना एक प्रेमळ आध्यात्मिक कुटुंब मिळेल असं वचन येशूने दिलं.—मार्क १०:२९, ३०. टेहळणी बुरूज२१.०६ ४ ¶८-९

रविवार, ५ मार्च

मी तुम्हाला सांगतो शेतांकडे पाहा. ती पिकली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत.—योहा. ४:३५.

प्रचार करण्यासोबतच शिकवणंही महत्त्वाचं आहे, हे समजावण्यासाठी प्रेषित पौलने शिष्य बनवण्याच्या कामाची तुलना शेतीच्या कामासोबत केली. तो करिंथकरांना म्हणाला, “मी पेरलं, अपुल्लोने पाणी घातलं, . . . तुम्ही देवाचं असं शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे.” (१ करिंथ. ३:६-९) आपण देवाच्या शेतातले कामकरी आहोत. त्यामुळे आपण जेव्हा लोकांना प्रचार करतो तेव्हा आपण बी पेरत असतो, आणि शिकवतो तेव्हा पाणी घालायचं काम करत असतो. पण त्याची वाढ करणारा देव आहे हे आपल्याला माहीत आहे. सत्याबद्दल इतरांना प्रचार करायचा आणि शिकवायचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! या कामातून आपल्याला खरा आनंद मिळतो. प्रेषित पौलने थेस्सलनीकामधल्या अनेकांना शिष्य बनायला मदत केली होती. त्या कामाबद्दल तो असं म्हणाला, “आपला प्रभू येशू याच्या उपस्थितीच्या वेळी आमची आशा, आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट शेवटी काय आहे? तुम्हीच नाही का? खरोखर, तुम्हीच आमचा गौरव आणि आमचा आनंद आहात.”—१ थेस्सलनी. २:१९, २०; प्रे. कार्यं १७:१-४. टेहळणी बुरूज२१.०७ ३ ¶५; ७ ¶१७

सोमवार, ६ मार्च

या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका.—मत्त. १८:१०.

जगातल्या लाखो-करोडो लोकांची मनं पाहताना यहोवाला तुमच्यात काहीतरी चांगलं दिसलं. त्याने पाहिलं, की तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि त्याच्यावर मनापासून प्रेम कराल. (१ इति. २८:९) म्हणूनच त्याने तुम्हाला त्याच्याकडे आणलं. (योहा. ६:४४) यावरून कळतं, की यहोवा तुम्हाला ओळखतो, समजून घेतो, तुमच्यावर प्रेम करतो. हे जाणून खरंच किती बरं वाटतं! यहोवाला तुमची काळजी तर आहेच पण त्यासोबतच त्याला इतर भाऊबहिणींचीसुद्धा काळजी आहे. हे समजावण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं. त्यात त्याने यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी केली. १०० मेंढरांपैकी १ मेंढरू कळपापासून भरकटतं तेव्हा एक मेंढपाळ काय करतो? ‘तो ९९ मेंढरांना डोंगरावर तसंच सोडून, त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जातो.’ आणि जेव्हा त्याला ते मेंढरू सापडतं तेव्हा तो त्याच्यावर ओरडत नाही, तर आनंद करतो. या उदाहरणातून येशूला हेच सांगायचं होतं, की यहोवासाठी त्याचं प्रत्येक मेंढरू खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तो असं म्हणाला, “या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या पित्याची इच्छा नाही.”—मत्त. १८:१२-१४. टेहळणी बुरूज२१.०६ २० ¶१-२

मंगळवार, ७ मार्च

देवाच्या जवळ या.—याको. ४:८.

देवाच्या प्रेमावर आपण मनन करतो तेव्हा यहोवावरचं आपलं प्रेम आणखी वाढतं आणि त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं. (रोम. ८:३८, ३९) आपल्याला येशूचं अनुकरण करायची प्रेरणा मिळते. (१ पेत्र २:२१) स्मारकविधीच्या काही दिवसांआधी आपण येशूबद्दलचे काही वृत्तान्त बायबलमधून वाचायला सुरुवात करतो. त्यांत, शेवटच्या आठवड्यादरम्यान येशूसोबत काय-काय घडलं, त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान कसं झालं याबद्दल सांगितलं आहे. मग स्मारकविधीच्या दिवशी संध्याकाळी जे भाषण दिलं जातं त्यातून येशूचं आपल्यावर किती प्रेम आहे, याची आठवण आपल्याला होते. (इफिस. ५:२; १ योहा. ३:१६) येशूने आपल्यासाठी किती त्याग केले याबद्दल जेव्हा आपण वाचतो आणि मनन करतो, तेव्हा आपल्यालाही ‘जसा येशू जगला तसंच जगायची’ प्रेरणा मिळते. (१ योहा. २:६) यामुळे देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. (यहू. २०, २१) देवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी आपण त्याच्या आज्ञा पाळायचा, त्याचं नाव पवित्र करायचा आणि त्याचं मन आनंदित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २७:११; मत्त. ६:९; १ योहा. ५:३) स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे कायम देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. टेहळणी बुरूज२२.०१ २३ ¶१७; २५ ¶१८-१९

बुधवार, ८ मार्च

ठरवा [की] तुम्ही कोणाची उपासना करणार.—यहो. २४:१५.

यहोवाने आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा, हे आपण स्वतः ठरवू शकतो. आपण जेव्हा यहोवाची उपासना करायची निवड करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. (स्तो. ८४:११; नीति. २७:११) इतर गोष्टींच्या बाबतीतही चांगले निर्णय घेण्यासाठी आपण यहोवाने दिलेल्या या स्वातंत्र्याचा उपयोग करू शकतो. येशूने नेहमी दुसऱ्‍यांचा विचार केला. एकदा तो आणि त्याचे प्रेषित खूप थकले होते. म्हणून थोडा आराम करण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी गेले. पण त्यांना काही आराम मिळाला नाही. कारण येशूकडून शिकण्यासाठी लोक त्यांच्या आधीच तिथे जाऊन पोचले होते. पण त्यामुळे येशू वैतागला नाही. उलट, त्याला त्या लोकांची खूप दया आली. म्हणून “तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.” (मार्क ६:३०-३४) आपणसुद्धा येशूसारखंच इतरांना शिकवण्यासाठी आपला वेळ देतो आणि आपली शक्‍ती खर्च करतो तेव्हा आपण यहोवाचा गौरव करत असतो.—मत्त. ५:१४-१६. टेहळणी बुरूज२१.०८ ३ ¶७-८

गुरुवार, ९ मार्च

[प्रत्येकाला] दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कामांमुळे . . . आनंदी होता येईल.—गलती. ६:४.

यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये सगळं काही एकसारखं नाही. जसं की, त्याने वेगवेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं बनवली, प्राणी बनवले. इतकंच काय, तर आपण मानवसुद्धा एकमेकांपासून फार वेगळे आहोत. आणि म्हणूनच तो कोणासोबतही आपली तुलना करत नाही. तो आपलं मन पाहतो. आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे तो पाहतो. (१ शमु. १६:७) आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, आणि आपण कोणत्या परिस्थितीत वाढलो हे सगळं त्याला माहीत आहे. त्यामुळे आपण जे करू शकत नाही ते तो आपल्याला करायला सांगत नाही. यहोवा जसं आपल्याला पाहतो तसंच आपण स्वतःला पाहिलं पाहिजे. मग आपण स्वतःबद्दल योग्य विचार करू; म्हणजे आपण स्वतःला खूप जास्तही समजणार नाही आणि खूप कमीही समजणार नाही. (रोम. १२:३) आपण इतरांकडून बरंच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, एखादा भाऊ किंवा बहीण खूप चांगलं प्रचारकार्य करत असेल, तर त्यांच्याकडे पाहून आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. (इब्री १३:७; फिलिप्पै. ३:१७) पण एखाद्याचं अनुकरण करणं आणि त्याच्यासोबत स्वतःची तुलना करणं यात खूप फरक आहे. टेहळणी बुरूज२१.०७ २० ¶१-२

शुक्रवार, १० मार्च

आपले डोळे वर करा आणि आकाशाकडे बघा. या सगळ्या ताऱ्‍यांना कोणी बनवलं?—यश. ४०:२६.

निर्माणकर्त्यावरचा विश्‍वास वाढवण्यासाठी तुम्ही प्राण्यांचं, झाडाझुडपांचं आणि ताऱ्‍यांचं निरीक्षण करू शकता. (स्तो. १९:१) या गोष्टींचं तुम्ही जितकं जास्त निरीक्षण कराल तितकी जास्त तुम्हाला खातरी पटेल, की यहोवा आपला निर्माणकर्ता आहे. सृष्टीचं निरीक्षण करताना निर्माणकर्त्याबद्दल काय शिकायला मिळतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. (रोम. १:२०) उदाहरणार्थ, सूर्याच्या प्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे पृथ्वी आपल्यासाठी राहण्यालायक बनते. पण त्याच वेळी सूर्यातून अशी काही किरणं निघतात जी आपल्यासाठी हानीकारक असतात. मग त्या किरणांपासून आपलं संरक्षण कसं होतं? पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे. यामुळे त्या हानीकारक किरणांपासून आपलं संरक्षण होतं. सूर्यातून निघणारी ही हानीकारक किरणं जितकी तीव्र होतात, ओझोनचा थरसुद्धा तितकाच दाट होतो. यावरून हेच दिसून येत नाही का, की यामागे एक प्रेमळ आणि बुद्धिमान निर्माणकर्ता आहे? टेहळणी बुरूज२१.०८ १७ ¶९-१०

शनिवार, ११ मार्च

जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.—१ योहा. ४:२१.

एखाद्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतरही आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे, त्याच्याशी आदराने वागलं पाहिजे. (१ योहा. ४:२०) हे आपण कसं करू शकतो? समजा एखाद्या भावाने काहीतरी केलं आणि त्यामुळे आपल्याला वाईट वाटलं. पण त्याने ते का केलं हे आपल्याला समजत नसेल, तर आपण त्याच्यावर शंका घेणार नाही. त्यामागे त्याचे हेतू वाईट होते किंवा त्याचा काही स्वार्थ होता असा आपण विचार करणार नाही. उलट, आपण त्याच्यावर भरवसा ठेवू आणि त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा आदर करू. (रोम. १२:१०; फिलिप्पै. २:३) आपण सगळ्यांशी दयाळूपणे वागलं पाहिजे. आपल्याला कायम यहोवाच्या कुटुंबात राहायचं असेल, तर आपण बायबलमध्ये दिलेल्या गोष्टींप्रमाणे वागलं पाहिजे. उदाहरणार्थ, येशूने सांगितलं की आपण सगळ्यांशी, अगदी आपल्या शत्रूंशीसुद्धा दयाळूपणे वागलं पाहिजे. (लूक ६:३२-३६) पण असं करणं काही वेळा आपल्याला अवघड वाटू शकतं. तसं असेल, तर आपण येशूप्रमाणे विचार करायला आणि वागायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञा पाळायचा आणि येशूप्रमाणे वागायचा पुरेपूर प्रयत्न करतो तेव्हा आपण दाखवून देतो, की आपल्याला यहोवाच्या कुटुंबात कायम राहायचं आहे. टेहळणी बुरूज२१.०८ ६ ¶१४-१५

रविवार, १२ मार्च

मी तुमच्यासाठी आकाशाची फाटकं उघडून, . . . आशीर्वादांचा वर्षाव करतो की नाही [ते पाहा].—मला. ३:१०.

यहोवावर भरवसा ठेवा. आपण त्याच्यावर भरवसा ठेवला आणि त्याची सेवा करण्यासाठी मेहनत घेतली, तर तो आपल्याला अनेक आशीर्वाद द्यायचं वचन देतो. बायबलमध्ये अशा कितीतरी लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांनी यहोवाची सेवा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांच्या बाबतीत असं घडलं, की आधी त्यांनी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवलं आणि मग यहोवाकडून त्यांना भरपूर आशीर्वाद मिळाले. उदाहरणार्थ, “आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही” अब्राहामने आपलं घर सोडलं. त्यानंतरच यहोवाने त्याला आशीर्वाद दिले. (इब्री ११:८) याकोबने स्वर्गदूताशी कुस्ती केली, त्यानंतरच त्याला एक खास आशीर्वाद मिळाला. (उत्प. ३२:२४-३०) तसंच, वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्यासाठी याजकांनी यार्देन नदीत पाय टाकल्यावरच ती वाहायची थांबली. आणि मग सगळ्या इस्राएली लोकांनी ती पार केली. (यहो. ३:१४-१६) याशिवाय, आजच्या काळातल्या ज्या सेवकांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि आपली सेवा वाढवली त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. टेहळणी बुरूज२१.०८ २९-३० ¶१२-१४

सोमवार, १३ मार्च

“पूर्वीचे दिवस आजच्यापेक्षा चांगले होते,” असं म्हणू नकोस.—उप. ७:१०.

एखादं काम आधी कसं केलं जायचं हे तुम्हा वयस्कर भाऊबहिणींना अनुभवातून माहीत असतं. पण आता परिस्थितीनुसार त्यात बदल करणंसुद्धा गरजेचं आहे हे तुम्ही ओळखता. तुमच्यापैकी काहींनी अलीकडेच बाप्तिस्मा घेतला असला, तरी तुमच्याकडे यहोवाला देण्यासारखं बरंच काही आहे. तुमचे अनुभव आणि तुम्हाला शिकायला मिळालेल्या गोष्टी ऐकायला तरुणांना नक्कीच आवडेल. तुम्ही जर तुमच्या अनुभवाच्या खजिन्यातून इतरांना देत राहिलात, तर यहोवा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. (लूक ६:३८) वयस्कर भाऊबहिणींनो, जे तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्यासोबत मैत्री करा. म्हणजे तुम्हाला आणि त्यांनाही फायदा होईल. (रोम. १:१२) वयस्कर आणि वयाने लहान असलेले या दोघांकडेही असं काहीतरी असतं जे ते एकमेकांना देऊ शकतात. जसं की, वयस्कर भाऊबहिणींकडे अनेक वर्षांपासून मिळवलेल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा खजिना असतो. तर वयाने लहान असलेल्यांकडे तुलनेत जास्त ताकद आणि उत्साह असतो. जेव्हा हे दोघेपण मित्र म्हणून एकमेकांसोबत मिळून काम करतात तेव्हा आपल्या प्रेमळ पित्याचा, यहोवा देवाचा गौरव होतो आणि मंडळीतल्या सगळ्यांनाच फायदा होतो. टेहळणी बुरूज२१.०९ ८ ¶३; १३ ¶१७-१८

मंगळवार, १४ मार्च

आपण तर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो. तो यहुद्यांसाठी अडखळण्याचं कारण [आहे].—१ करिंथ. १:२३.

येशूला एका अपराध्यासारखं वधस्तभांवर मारण्यात आलं होतं. त्यामुळे तो एक मसीहा आहे ही गोष्ट स्वीकारणं अनेक यहुद्यांना कठीण गेलं. (अनु. २१:२२, २३) ज्या यहुदी लोकांनी येशूला नाकारलं त्यांनी ही गोष्ट समजून घेतली नाही, की तो निर्दोष आहे, त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत आणि त्याच्यावर अन्याय करण्यात आला आहे. येशूवर खटला चालवणाऱ्‍या लोकांनी कोणतेही कायदे-कानून पाळले नाहीत. त्यांनी घाईघाईने न्यायसभा भरवली. (लूक २२:५४; योहा. १८:२४) त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि त्याच्या विरोधात दिलेले पुरावे कितपत खरे आहेत, हे त्या न्यायाधीशांनी तपासून पाहण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याऐवजी येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून ते स्वतःच “त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत” होते. (मत्त. २६:५९; मार्क १४:५५-६४) आणि जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं तेव्हा याच न्यायाधीशांनी येशूच्या कबरेवर पहारा देणाऱ्‍या रोमी सैनिकांना “भरपूर चांदीची नाणी दिली.” आणि कबर का रिकामी आहे याबद्दल अफवा पसरवायला सांगितली.—मत्त. २८:११-१५. टेहळणी बुरूज२१.०५ ११ ¶१२-१३

बुधवार, १५ मार्च

त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, स्वर्गदूतांना नाही आणि देवाच्या मुलालाही नाही; फक्‍त पित्याला माहीत आहे.—मत्त. २४:३६.

यहोवा या दुष्ट जगाचा अंत कधीच करू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने धीर धरला आणि त्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला. आदाम आणि हव्वापासून जन्मलेली सगळी मुलं अपरिपूर्ण आहेत. तरीही यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो. आणि त्याने अभिवचन दिलं आहे की तो या दुष्ट जगाचा अंत करेल. (१ योहा. ४:१९) तो लवकरच मानवाचं सगळं दुःख दूर करणार आहे, आणि त्यासाठी त्याने एक वेळ ठरवली आहे. तोपर्यंत आपल्यावरचं त्याचं प्रेम आपल्याला धीर धरायला मदत करेल. धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. येशूनेही आपल्या पित्यासारखाच धीर धरला आणि बऱ्‍याच गोष्टी सहन केल्या. त्याने आपल्यासाठी लोकांचं वाईट बोलणं, अपमान आणि वधस्तभांवर मृत्यूदेखील सहन केला. (इब्री १२:२, ३) हे सगळं सहन करण्याची ताकद त्याला यहोवाच्या उदाहरणामुळेच मिळाली. तशीच ताकद आपल्यालाही मिळू शकते. टेहळणी बुरूज२१.०७ १२-१३ ¶१५-१७

गुरुवार, १६ मार्च

जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसेच तुम्हीसुद्धा इतरांवर दया करत राहा.—लूक ६:३६.

आपण दररोज कितीतरी वेळा चुकतो. पण यहोवा मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करतो. (स्तो. १०३:१०-१४) येशूसुद्धा आपल्या पित्यासारखाच क्षमाशील आहे. येशूचे शिष्य बऱ्‍याचदा चुकले. पण तरीसुद्धा येशूने त्यांच्या चुका माफ केल्या. आणि मानवांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने स्वतःचं जीवनही बलिदान केलं. (१ योहा. २:१, २) आपण मोठ्या मनाने एकमेकांना क्षमा करतो तेव्हा आपल्यातलं प्रेम आणखी वाढतं. (इफिस. ४:३२) पण इतरांना क्षमा करणं नेहमीच सोपं नसतं. त्यासाठी कदाचित आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील. एका बहिणीचाच अनुभव घ्या. टेहळणी बुरूज अंकात एक लेख आला होता. त्याचा विषय होता, “एकमेकांना मनापासून क्षमा करा.” त्या लेखामुळे या बहिणीला इतरांना क्षमा करायला खूप मदत झाली. ती म्हणते, “त्या लेखात असं सांगितलं होतं, की इतरांना क्षमा करण्याचा अर्थ असा होत नाही, की त्यांनी जे केलं ते योग्य होतं असं म्हणणं, किंवा त्यांच्या वागण्याचा आपल्याला काहीच त्रास झाला नाही असं म्हणणं. उलट, इतरांना क्षमा करण्याचा अर्थ असा होतो, की त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग काढून टाकणं आणि आपल्या मनाची शांती टिकवून ठेवणं.” आपण जेव्हा एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करतो तेव्हा हेच दाखवतो, की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपण आपल्या पित्याचं, यहोवाचं अनुकरण करत आहोत. टेहळणी बुरूज२१.०९ २३-२४ ¶१५-१६

शुक्रवार, १७ मार्च

जे [देवाची] उपासना करतात त्यांनी ती . . . सत्याप्रमाणे केली पाहिजे.—योहा. ४:२४.

येशूला देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलचं सत्य माहीत होतं आणि त्यावर त्याचं प्रेम होतं. तो ज्या प्रकारे जीवन जगला त्यावरून दिसून आलं, की त्या सत्यावर त्याचा खूप विश्‍वास होता. आणि त्याने इतरांनाही त्याबद्दल सांगितलं. (योहा. १८:३७) येशूच्या शिष्यांचंही सत्यावर मनापासून प्रेम होतं. (योहा. ४:२३) इतकं, की प्रेषित पेत्रने खऱ्‍या ख्रिस्ती धर्माविषयी म्हटलं की तो ‘सत्याचा मार्ग’ आहे. (२ पेत्र २:२) या प्रेमामुळेच पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी, सत्याच्या विरोधात असलेल्या सगळ्या धार्मिक कल्पनांचा, रूढी-परंपरांचा आणि मानवी मतांचा विरोध केला. (कलस्सै. २:८) आज खरे ख्रिस्तीसुद्धा ज्या गोष्टी मानतात आणि ज्या प्रकारे जीवन जगतात ते पूर्णपणे देवाच्या वचनानुसार असतं. असं करून ते सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. (३ योहा. ३, ४) यहोवाचे साक्षीदार असा दावा करत नाहीत, की त्यांच्याकडे बायबलचं संपूर्ण ज्ञान आहे. बायबलमधली एखादी शिकवण समजावण्याच्या बाबतीत आणि संघटना चालवण्याच्या बाबतीत काही वेळा त्यांच्याकडून चुका झाल्या. आणि हे माहीत झाल्यावर त्यांनी काही सुधारणा केल्याही आहेत. टेहळणी बुरूज२१.१० २१-२२ ¶११-१२

शनिवार, १८ मार्च

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यावर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.—स्तो. ३२:१०.

प्राचीन काळात शहराभोवती असलेल्या भिंतींमुळे शहरातल्या लोकांचं संरक्षण व्हायचं. यहोवाचं एकनिष्ठ प्रेमसुद्धा सुरक्षा देणाऱ्‍या त्या भिंतीसारखंच आहे. त्याच्यासोबतचं आपलं नातं कमजोर करणाऱ्‍या कोणत्याही धोक्यापासून ते आपलं संरक्षण करतं. शिवाय, त्याच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच तो आपल्याला जवळ घेतो. (यिर्म. ३१:३) यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण कसं करतो, हे सांगताना स्तोत्रकर्ता दावीदने आणखी एका शब्दचित्राचा वापर केला. त्याने म्हटलं: “देव माझा सुरक्षित आश्रय आहे, तो माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखवतो.” यहोवाबद्दल दावीद असंही म्हणाला: “तो माझा गड आहे; तो माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करतो. तो माझा सुरक्षित आश्रय आणि माझा सोडवणारा आहे. तो माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय घेतलाय.” (स्तो. ५९:१७; १४४:२) इथे, देवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल बोलताना दावीदने सुरक्षित आश्रयाचा किंवा गडाचा उल्लेख का केला? याचं कारण म्हणजे, जगाच्या पाठीवर आपण कुठंही असलो तरी यहोवा आपल्या सेवकांना त्याच्यासोबतचं आपलं नातं जपायला मदत करतो आणि त्यांचं संरक्षण करतो. टेहळणी बुरूज२१.११ ६ ¶१४-१५

रविवार, १९ मार्च

मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन करीन.—स्तो. ७७:१२.

येशू आणि त्याचे शिष्य समुद्रातून प्रवास करत होते तेव्हा ते एका मोठ्या वादळात सापडले. त्या वेळी, शिष्यांना आपला विश्‍वास आणखी मजबूत करायची का गरज आहे हे येशूने त्यांना समजायला मदत केली. (मत्त. ८:२३-२६) ते वादळ इतकं भयंकर होतं, की मोठमोठ्या लाटा नावेवर आदळू लागल्या. तेव्हा येशू गाढ झोपला होता. त्याचे शिष्य खूप घाबरले होते. त्यांनी येशूला उठवलं आणि आपल्याला वाचवण्याची विनंती केली. तेव्हा येशूने प्रेमळपणे ते कुठं कमी पडत आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता? किती कमी विश्‍वास आहे तुमच्यात!” तुम्हीसुद्धा एखाद्या “मोठ्या वादळाचा” सामना करत आहात का? तुम्ही कदाचित नैसर्गिक आपत्तींमुळे आलेल्या समस्यांचा सामना करत असाल. किंवा एखाद्या गंभीर आजारामुळे तुमच्या आयुष्यात जणू एक मोठं वादळच आलं असेल. अशा प्रकारच्या समस्यांमुळे तुम्ही पार खचून गेला असाल, आणि काय करावं हे तुम्हाला सुचत नसेल. तुम्ही चिंतेत पार बुडून गेला असला. पण अशा चिंतांमुळे यहोवावर भरवसा ठेवायचं विसरू नका. उलट, अशा वेळी यहोवाला कळकळीची प्रार्थना करा आणि त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा. पूर्वी यहोवाने तुमची कशी मदत केली, त्या गोष्टी आठवा आणि त्यांवर विचार करा. म्हणजे तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. (स्तो. ७७:११) तुम्ही खातरी बाळगू शकता, की यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही; आताही नाही आणि पुढेही नाही. टेहळणी बुरूज२१.११ २२ ¶७, १०

सोमवार, २० मार्च

तुम्ही चोरी करू नका.—लेवी. १९:११.

एखादी व्यक्‍ती कदाचित असं म्हणेल की मी जोपर्यंत दुसऱ्‍याच्या मालकीच्या गोष्टी घेत नाही, तोपर्यंत मी ही आज्ञा पाळतो. पण कदाचित दुसऱ्‍या मार्गाने ती व्यक्‍ती चोरी करत असेल. एका व्यापाऱ्‍याने अचूक तराजू, अचूक वजनं आणि अचूक प्रमाण वापरायचं होतं. त्यामुळे जो व्यापारी गिऱ्‍हाईकाला फसवण्यासाठी चुकीच्या तराजूचा किंवा वजनांचा वापर करायचा, तो एका अर्थाने चोरीच करत होता. लेवीय १९:१३ मध्ये या गोष्टीचा संबंध बेईमानीने केलेल्या व्यवहाराशी लावला आहे. तिथे म्हटलं आहे: “तू दुसऱ्‍याशी अप्रामाणिकपणे वागू नकोस.” तर अप्रामाणिकपणे केलेल्या व्यवहाराचा संबंध चोरी आणि लुबाडणूक यांच्याशी केला आहे. आठव्या आज्ञेत फक्‍त इतकंच म्हटलं होतं, की “चोरी करू नका.” पण लेवीय पुस्तकात जी माहिती दिली आहे, त्यामुळे या आज्ञेमागचं तत्त्व समजून घ्यायला आपल्याला मदत होते. आज आपण या गोष्टींवर विचार करून बेईमानी करण्याबद्दल आणि चोरी करण्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे ते समजून घेऊ शकतो. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘लेवीय १९:११-१३ मध्ये जे म्हटलं आहे त्यानुसार मी माझी नोकरी आणि व्यवसाय प्रामाणिकपणे करतो का? माझ्या व्यवहारांमध्ये आणि कामाच्या सवयींमध्ये मला बदल करायची गरज आहे का?’ टेहळणी बुरूज२१.१२ ९-१० ¶६-८

मंगळवार, २१ मार्च

यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.—कलस्सै. ३:१३.

प्रत्येक दिवशी प्रार्थना करताना दिवसभरात आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या आपण यहोवाला सांगितल्या पाहिजेत, आणि त्यांबद्दल त्याला माफी मागितली पाहिजे. पण जर आपल्या हातून एखादं गंभीर पाप घडलं असेल, तर यहोवाला प्रार्थना करण्यासोबतच आपण वडिलांची मदतही घेतली पाहिजे. ते आपली समस्या समजून घेतील आणि आपल्याला बायबलमधून प्रेमळ सल्ला देतील. तसंच, यहोवासोबत आपल्याला पुन्हा जवळचं नातं जोडता यावं म्हणून ते आपल्यासोबत प्रार्थना करतील आणि आपल्याला क्षमा करण्याची विनंती यहोवाला करतील. (याको. ५:१४-१६) त्यासोबतच खंडणीबद्दल मनन केल्यामुळेही मदत होऊ शकते. देवाच्या मुलाने किती काही सहन केलं यावर विचार केल्यामुळे तुम्हाला कदाचित खूप वाईट वाटेल. पण येशूने दिलेल्या बलिदानाचा तुम्ही जितका जास्त विचार कराल, त्यावर जितकं जास्त मनन कराल, तितकंच त्याच्यावरचं आणि त्याच्या पित्यावरचं तुमचं प्रेम वाढेल. दरवर्षी येशूच्या स्मारकविधीला उपस्थित राहून आणि इतरांनाही त्याचं आमंत्रण देऊन खंडणीबद्दलची आपली कदर आपण आणखी वाढवू शकतो. खरंच, यहोवाने त्याच्या मुलाबद्दल इतरांना शिकवण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला दिला आहे! टेहळणी बुरूज२१.०४ १८-१९ ¶१३-१६

बुधवार, २२ मार्च

तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.—मार्क ६:३४.

एकदा येशू डोंगरावर प्रार्थना करायला गेला होता. दिवस उजाडल्यावर तो खाली आला तेव्हा त्याने पाहिलं की लोकांचा एक मोठा समुदाय तिथे जमला आहे. येशूने रात्रभर प्रार्थना केली होती. कदाचित तो खूप थकलेला असेल. पण लोकांना पाहून त्याला त्यांचा खूप कळवळा आला. कारण त्यांच्यामध्ये अनेक गरीब आणि आजारी लोक होते. त्याने त्या सगळ्यांना बरं केलं. आणि लोकांना प्रेरणा देण्यासाठी त्याने एक प्रवचन दिलं, ज्याला सहसा ‘डोंगरावरचं प्रवचन’ असं म्हटलं जातं. (लूक ६:१२-२०) स्वतःसाठी काढलेला वेळसुद्धा येशू इतरांसाठी द्यायला तयार होता. आपल्या मित्राला, म्हणजे बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानला मारून टाकण्यात आलं आहे, हे येशूने ऐकलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? बायबल म्हणतं: “[योहानच्या मृत्यूबद्दल] ऐकल्यावर, एकांत मिळावा म्हणून येशू नावेत बसून अशा एका ठिकाणी निघून गेला, जिथे कोणीही राहत नव्हतं.” (मत्त. १४:१०-१३) पण लोकांचा एक मोठा समुदाय आधीच तिथे जाऊन पोहोचला होता. (मार्क ६:३१-३३) त्यांना आपल्या मदतीची आणि देवाकडून मिळणाऱ्‍या सांत्वनाची किती गरज आहे, हे येशू पाहू शकत होता. आणि म्हणून तो त्यांची मदत करण्यासाठी लगेच पुढे आला.—लूक ९:१०, ११. टेहळणी बुरूज२२.०२ २१ ¶४, ६

गुरुवार, २३ मार्च

सगळ्यांसोबत . . . शांतीने राहा.—रोम. १२:१८.

आपल्याला जर लक्षात आलं, की आपल्यामुळे मंडळीतल्या एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं मन दुखावलं गेलं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? आपण यहोवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्यासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू, त्यावर यहोवाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती आपण त्याला केली पाहिजे. यासोबतचं, आपण स्वतःचं परीक्षणही केलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःला असे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘गर्विष्ठपणा सोडून मी नम्रपणे क्षमा मागायला आणि पुन्हा शांतीचे संबंध जोडायला तयार असतो का? मी जर असं करायचा प्रयत्न केला तर यहोवा आणि येशूला कसं वाटेल?’ आपण जर या प्रश्‍नांवर विचार केला, तर येशूचं ऐकायची आणि आपल्या भाऊबहिणींसोबत बिघडलेले संबंध पुन्हा जोडायची प्रेरणा आपल्याला मिळेल. आपण एखाद्याकडे वाद मिटवण्यासाठी जातो, तेव्हा आपण नम्र असलं पाहिजे. (इफिस. ४:२, ३) जेव्हा आपण त्याच्याशी बोलायला जाऊ, तेव्हा आपला उद्देश त्याच्यासोबत शांतीचे संबंध जोडण्याचा असला पाहिजे. हे लक्षात घ्या, की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपल्या भावासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडणं जास्त महत्त्वाचं आहे.—१ करिंथ. ६:७. टेहळणी बुरूज२१.१२ २६ ¶१३-१६

शुक्रवार, २४ मार्च

त्याने [शहरावर] नजर टाकली आणि तो रडू लागला.—लूक १९:४१.

येशूला दुःख झालं, कारण त्याला हे माहीत होतं, की बहुतेक यहुदी राज्याचा संदेश स्वीकारणार नाहीत. त्यामुळे यरुशलेम शहराचा नाश होणार होता. आणि जे यहुदी वाचणार होते त्यांना बंदिवासात जावं लागणार होतं. (लूक २१:२०-२४) आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, येशूने जसं सांगितलं तसंच झालं. लोकांनी त्याला नाकारलं. तुमच्या क्षेत्रातले बहुतेक लोक राज्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद देतात? ते तुमचं ऐकत नसतील, तर येशूच्या या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता? यहोवाला लोकांची काळजी आहे. यरुशलेमच्या लोकांसाठी येशूने अश्रू गाळले. त्यावरून कळतं, की यहोवाला लोकांची काळजी आहे. “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) आज आपणसुद्धा लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा आपण हे दाखवून देतो, की यहोवासारखंच आपल्यालाही लोकांबद्दल प्रेम आणि काळजी आहे.—मत्त. २२:३९. टेहळणी बुरूज२२.०१ १६ ¶१०-१२

शनिवार, २५ मार्च

मी सतत तुला धरून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो.—स्तो. ६३:८.

यहोवाने आत्तापर्यंत आपल्या लोकांसाठी आणि खास तुमच्यासाठी किती काही केलं आहे, यावर जर तुम्ही मनन केलं, तर त्याच्यावरचा तुमचाही विश्‍वास आणखी मजबूत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवावरचं तुमचं प्रेम आणखी वाढेल. दुसऱ्‍या कोणत्याही गुणापेक्षा प्रेमाचा हा गुण, तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळायची, त्याच्यासाठी त्याग करायची आणि कुठल्याही परीक्षेचा धीराने सामना करायची प्रेरणा देईल. (मत्त. २२:३७-३९; १ करिंथ. १३:४, ७; १ योहा. ५:३) यहोवासोबतचं हे प्रेमाचं नातं दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा कितीतरी मौल्यवान आहे! (स्तो. ६३:१-७) हे कायम लक्षात असू द्या, की प्रार्थना, बायबलचा अभ्यास आणि मनन या गोष्टी आपल्या उपासनेचाच भाग आहेत. त्यामुळे येशूसारखंच, यहोवासोबत वेळ घालवण्यासाठी एक शांत ठिकाण निवडा. लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी दूर ठेवा. बायबलचा अभ्यास करताना आणि सभांमध्ये लक्ष एकाग्र करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. अशा प्रकारे तुम्ही जर आत्ता वेळेचा चांगला उपयोग केला, तर येणाऱ्‍या नवीन जगात यहोवा तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस देईल.—मार्क ४:२४. टेहळणी बुरूज२२.०१ ३१ ¶१८-२०

रविवार, २६ मार्च

वाइटाचा द्वेष करा.—रोम. १२:९.

आपण जसा विचार करतो, त्याप्रमाणेच वागतो. येशूने शिकवलं होतं, की आपल्या हातून गंभीर पाप होऊ नये म्हणून आपण चुकीचे विचार आपल्या मनातून लगेच काढून टाकले पाहिजेत. (मत्त. ५:२१, २२, २८, २९) आपल्या स्वर्गातल्या पित्याचं मन आनंदित करावं अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे, नाही का? तर मग आपल्या मनात येणारे वाईट विचार आपण लगेच मनातून काढून टाकणं किती गरजेचं आहे! येशूने म्हटलं: “ज्या गोष्टी तोंडातून निघतात त्या माणसाच्या हृदयातून येतात.” (मत्त. १५:१८) आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे आपल्या बोलण्यावरून दिसून येतं. म्हणून या प्रश्‍नांवर विचार करा: ‘खरं बोलल्यामुळे मला काही त्रास होणार असेल, तरीसुद्धा मी खरं बोलायला तयार असतो का? एक विवाहित व्यक्‍ती म्हणून, माझ्या वागण्या-बोलण्यामुळे विरुद्धलिंगी व्यक्‍तीच्या मनात चुकीचे विचार येणार नाहीत याची मी काळजी घेतो का? माझ्या बोलण्यात मी अश्‍लील गोष्टींचा उल्लेख करायचं टाळतो का? कोणी चीड येण्यासारखं वागलं तरीसुद्धा मी त्यांच्याशी शांतपणे बोलतो का?’ या प्रश्‍नांवर विचार केल्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल. इतरांना टाकून बोलणं, खोटं बोलणं किंवा अश्‍लील विषयांवर बोलणं, यांसारख्या वाईट गोष्टी तुम्ही काढून टाकायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकायला जास्त सोपं जाईल. टेहळणी बुरूज२२.०३ ५ ¶१२-१४

सोमवार, २७ मार्च

जे सल्ला घेतात, ते बुद्धिमान असतात.—नीति. १३:१०.

कोणीतरी सल्ला देईपर्यंत वाट पाहत राहण्याऐवजी, जे स्वतःहून सल्ला मागतात ते चांगली आध्यात्मिक प्रगती करतात. म्हणून स्वतःहून इतरांकडे सल्ला मागा. अशा बऱ्‍याच परिस्थिती आहेत ज्यांमध्ये आपण इतरांकडे सल्ला मागू शकतो. जसं की, (१) समजा एखाद्या बहिणीने एका अनुभवी बहिणीला आपल्या बायबल अभ्यासाला बोलवलं असेल, तर ती आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत कुठे सुधारणा करता येईल याबद्दल तिला नंतर विचारू शकते. (२) एक तरुण बहीण जर एखादा ड्रेस खरेदी करत असेल, तर तो खरेदी करण्याआधी ती एखाद्या प्रौढ बहिणीला तिचं मत विचारू शकते. (३) एखादा भाऊ जर पहिल्यांदाच जाहीर भाषण देणार असेल, तर तो एका अनुभवी बांधवाला आधीच सांगू शकतो, की त्याने त्याचं भाषण ऐकल्यानंतर कुठे सुधारणा करायची ते त्याला सांगावं. अनेक वर्षांपासून भाषण देणारा भाऊसुद्धा अशा प्रकारे अनुभवी बांधवांकडून सल्ला घेऊ शकतो.—नीति. १९:२०. टेहळणी बुरूज२२.०२ १३ ¶१५-१७

मंगळवार, २८ मार्च

मी एकटा नाही, तर ज्याने मला पाठवलं तो पिता माझ्यासोबत आहे.—योहा. ८:१६.

यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो आपली चांगली काळजी घेतो. येशू पृथ्वीवर होता तेव्हा यहोवाने त्याच्याबद्दल असंच प्रेम आणि काळजी दाखवली. (योहा. ५:२०) त्याने येशूला आपला विश्‍वास मजबूत ठेवायला मदत केली, तो दुःखात असताना त्याचं सांत्वन केलं आणि रोजच्या जीवनात त्याला ज्या गोष्टींची गरज होती त्या पुरवल्या. तसंच, आपल्या मुलावर आपलं किती प्रेम आहे आणि आपण त्याच्यावर किती खूश आहोत हे यहोवाने आपल्या शब्दांतून व्यक्‍त केलं. (मत्त. ३:१६, १७) आपला प्रेमळ पिता नेहमी आपल्यासोबत असेल हे येशूला माहीत होतं. आणि म्हणून त्याला कधीच एकटं वाटलं नाही. येशूसारखंच आपणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे यहोवाचं प्रेम आणि काळजी अनुभवली आहे. जसं की, यहोवाने आपल्याला त्याच्याशी मैत्री करण्याची संधी दिली आहे. आणि प्रेमळ भाऊबहिणींच्या रूपात एक खूप मोठं कुटुंब दिलं आहे. हे भाऊबहीण आपल्याला आनंदी राहायला मदत करतात आणि आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला धीर देतात. (योहा. ६:४४) तसंच, आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्यासुद्धा तो आपल्याला पुरवत राहतो. इतकंच नाही, तर आपल्या रोजच्या गरजाही तो पूर्ण करतो. (मत्त. ६:३१, ३२) यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो याचा विचार केल्यावर त्याच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढतं. टेहळणी बुरूज२१.०९ २२ ¶८-९

बुधवार, २९ मार्च

जुनं व्यक्‍तिमत्त्व त्याच्या वाईट सवयींसोबत काढून टाका.—कलस्सै. ३:९.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू करण्याआधी तुमचं जीवन कसं होतं हे तुम्हाला आठवतं का? बऱ्‍याच जणांना आज ते आठवायलाही आवडत नाही. कारण आपल्यापैकी बहुतेक जणांचं व्यक्‍तिमत्त्व आणि विचार आधी जगातल्या लोकांसारखे होते. योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल जगाच्या विचारसरणीप्रमाणे आपण वागायचो. थोडक्यात आपण “कोणतीही आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय” असलेले लोक होतो. (इफिस. २:१२) पण तुम्ही बायबल अभ्यास करू लागला तेव्हा तुम्हाला समजलं, की स्वर्गात आपला एक पिता आहे, जो आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि यामुळे त्याचं मन आनंदित करण्याची आणि त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा एक भाग बनण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली. पण यासाठी तुम्हाला तुमच्या विचारसरणीत आणि वागण्या-बोलण्यात मोठमोठे बदल करावे लागतील, हे तुम्ही ओळखलं. तसंच, यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे जगायलाही तुम्हाला शिकून घ्यावं लागेल याची जाणीव तुम्हाला झाली. (इफिस. ५:३-५) यहोवा आपला निर्माणकर्ता आणि पिता असल्यामुळे त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनी कसं वागलं पाहिजे, हे ठरवण्याचा त्याला अधिकार आहे. आणि बाप्तिस्मा घेण्याआधी आपण आपलं “जुनं व्यक्‍तिमत्व त्याच्या वाईट सवयींसोबत काढून [टाकावं]”, अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. टेहळणी बुरूज२२.०३ २ ¶१-३

गुरुवार, ३० मार्च

माझी दुसरीही मेंढरं आहेत.—योहा. १०:१६.

दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली कदर आणि आपला आनंद व्यक्‍त करतात. स्मारकविधीच्या वेळी दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेल्या लोकांनासुद्धा आपल्या आशेवर मनन करायची संधी मिळते. स्मारकविधीचं भाषण ऐकण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. कारण हजार वर्षांच्या काळादरम्यान येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० जन विश्‍वासू मानवांसाठी काय करतील, हे स्मारकविधीच्या भाषणात सांगितलं जातं. आपला राजा येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली १,४४,००० जन पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर बागेत करायला मदत करतील. त्यासोबतच, देवाची आज्ञा मानणाऱ्‍या लोकांना ते परिपूर्ण व्हायला मदत करतील. त्यामुळे स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍या लाखो लोकांना बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील याची कल्पना करायची संधी मिळते. जसं की, यशया ३५:५, ६; ६५:२१-२३ आणि प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये दिलेल्या भविष्यवाण्या. आपल्या जवळच्या लोकांसोबत नवीन जगात असल्याची कल्पना केल्यामुळे भविष्याबद्दलची त्यांची आशा आणखी पक्की होते. आणि काहीही झालं तरी यहोवाची सेवा करत राहण्याचा त्यांचा निर्धार आणखी पक्का होतो.—मत्त. २४:१३; गलती. ६:९. टेहळणी बुरूज२२.०१ २१ ¶५-७

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) मत्तय २६:६-१३

शुक्रवार, ३१ मार्च

मनुष्याचा मुलगाही . . . बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.—मार्क १०:४५.

खंडणी म्हणजे नेमकं काय? आदामने जे गमावलं ते परत मिळवण्यासाठी येशूने आपल्या जीवनाची किंमत दिली. यालाच खंडणी म्हटलं आहे. (१ करिंथ. १५:२२) पण आपल्याला खंडणीची गरज का आहे? कारण न्यायाच्या बाबतीत यहोवाचं जे स्तर आहे त्याप्रमाणे जिवाबद्दल जीव द्यायची गरज होती. (निर्ग. २१:२३, २४) आदामने एक परिपूर्ण मानवी जीवन गमावलं होतं आणि ते परत मिळवण्यासाठी यहोवाच्या न्यायानुसार एका परिपूर्ण मानवी जीवनाची गरज होती. आणि त्यासाठीच येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. (रोम. ५:१७) म्हणूनच येशू त्या सर्वांसाठी “सर्वकाळचा पिता” बनतो जे त्याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात. (यश. ९:६; रोम. ३:२३, २४) येशू आपल्या जीवनाचं बलिदान द्यायला तयार होता, कारण त्याचं आपल्या पित्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. (योहा. १४:३१; १५:१३) या प्रेमापोटी त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली आणि शेवटपर्यंत विश्‍वासू राहिला. त्यामुळेच मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी यहोवाचा जो उद्देश होता तो पूर्ण होईल. टेहळणी बुरूज२१.०४ १४ ¶२-३

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २१:१-११, १४-१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा