पाठ ४७
यहोवा एलीयाची हिंमत वाढवतो
बआलच्या संदेष्ट्यांसोबत जे घडलं ते ईजबेल राणीला समजलं. तिला खूप राग आला. तिने एलीयाकडे निरोप पाठवला: ‘बआलचे संदेष्टे जसे मेले, तसं तूही उद्या मरणार.’ हे ऐकून एलीया खूप घाबरला आणि वाळवंटात पळून गेला. त्याने यहोवाला प्रार्थना केली: ‘हे यहोवा, मी आणखीन सहन करू शकत नाही. मला मरण येऊ दे.’ एलीया खूप थकला होता. म्हणून तो एका झाडाखाली झोपून गेला.
एका देवदूताने येऊन त्याला उठवलं आणि प्रेमळपणे म्हटलं: ‘उठ आणि खाऊन घे.’ एलीया उठला आणि त्याने निखाऱ्यावर एक भाकर पाहिली. तिथे एक पाण्याचं भांडंही होतं. तो जेवला, पाणी प्यायला आणि परत झोपला. त्या देवदूताने त्याला परत उठवलं. तो एलीयाला म्हणाला: ‘तुला प्रवास करायचा आहे. म्हणून आणखीन थोडं खाऊन घे.’ मग एलीयाने आणखीन खाल्लं. त्यानंतर त्याने ४० दिवस आणि ४० रात्री प्रवास केला. शेवटी तो होरेब डोंगराजवळ पोचला. तिथे तो एका गुहेत झोपायला गेला. तेव्हा यहोवा त्याच्याशी बोलला. तो त्याला म्हणाला: ‘एलीया, तू इथे का आलास?’ एलीयाने उत्तर दिलं: ‘इस्राएली लोकांनी तुला दिलेलं वचन मोडलं आहे. त्यांनी तुझ्या वेदी नष्ट केल्या. तुझ्या संदेष्ट्यांनाही मारून टाकलं. आणि आता ते मलाही मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.’
यहोवाने एलीयाला म्हटलं: ‘बाहेर ये आणि डोंगरावर उभा राहा.’ तो अजून आतच होता तेव्हा जोराचा वारा गुहेच्या बाजूने वाहिला. मग, भूकंप झाला आणि आग दिसली. शेवटी एलीयाला एक मंद आवाज ऐकू आला. त्याने झग्याने आपलं तोंड झाकलं आणि तो गुहेतून बाहेर येऊन उभा राहिला. तो का पळून आला हे यहोवाने त्याला विचारलं. एलीया म्हणाला: ‘मी एकटाच उरलो आहे.’ पण यहोवा त्याला म्हणाला: ‘तू एकटा नाहीस. इस्राएलमध्ये आणखीन ७,००० लोक आहेत जे अजूनही माझी उपासना करतात. जा आणि तुझ्या जागी अलीशाला संदेष्टा म्हणून नियुक्त कर.’ यहोवाने जे सांगितलं ते करायला एलीया लगेच तिथून निघून गेला. एलीयासोबत जे घडलं त्यावरून तुला काही शिकायला मिळालं का? जर तूही एलीयासारखं यहोवाच्या इच्छेप्रमाणे केलंस, तर यहोवा तुलाही मदत करेल का? हो, तो नक्की तुझी मदत करेल. पण आता आपण परत, दुष्काळ पडला त्या काळात जाऊ. तेव्हा काय घडलं ते आपण पाहू.
“कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सर्व गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना व याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.” —फिलिप्पैकर ४:६