पाठ ३७
यहोवा शमुवेलशी बोलतो
महायाजक एलीला दोन मुलं होती. ती निवासमंडपात याजक होती. एकाचं नाव होतं हफनी आणि दुसऱ्याचं फिनहास. ते देवाचे नियम मोडायचे आणि लोकांशी खूप वाईट वागायचे. जेव्हा इस्राएली लोक यहोवासाठी बलिदान आणायचे, तेव्हा हफनी आणि फिनहास त्यातून सर्वात चांगलं मांस स्वतःसाठी काढून घ्यायचे. जेव्हा ही गोष्ट एलीला कळली, तेव्हा त्याने काहीच केलं नाही. पण यहोवा हे असंच चालू देणार होता का? याबद्दल तो काहीच करणार नव्हता का?
शमुवेल हा हफनी आणि फिनहासपेक्षा खूप लहान होता. असं असलं, तरी तो त्यांच्यासारखा वागला नाही. यामुळे यहोवाला शमुवेल आवडायचा. एकदा रात्री शमुवेल झोपला होता. तेव्हा कोणीतरी हाक मारत असल्याचं त्याला ऐकू आलं. तो उठला आणि पळत एलीकडे गेला. तो एलीला म्हणाला: ‘तुम्ही मला बोलवलं का?’ एली म्हणाला: ‘मी नाही बोलवलं तुला. जा, जाऊन झोप.’ शमुवेल परत झोपला. मग दुसऱ्यांदा परत तेच घडलं. पण तिसऱ्यांदा जेव्हा तसं घडलं, तेव्हा एलीला समजलं की खरंतर यहोवा शमुवेलला हाक मारत आहे. त्याने शमुवेलला सांगितलं, की त्याला परत हाक ऐकू आली तर त्याने असं बोलावं: ‘हो, बोल यहोवा. तुझा सेवक ऐकत आहे.’
शमुवेल परत झोपायला गेला. त्याला पुन्हा हाक ऐकू आली: ‘शमुवेल, शमुवेल!’ त्याने उत्तर दिलं: ‘हो यहोवा बोल. तुझा सेवक ऐकत आहे.’ यहोवाने शमुवेलला म्हटलं: ‘एलीला जाऊन सांग, की मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा करणार आहे. त्याची मुलं माझ्या निवासमंडपात वाईट गोष्टी करत आहेत. आणि हे माहीत असूनही त्याने काहीच केलेलं नाही.’ दुसऱ्या दिवशी सकाळी शमुवेलने नेहमीप्रमाणे निवासमंडपाचे दरवाजे उघडले. यहोवाने त्याला जे म्हटलं होतं, ते एलीला सांगायला तो घाबरत होता. पण एलीने त्याला बोलवलं आणि विचारलं: ‘माझ्या मुला, यहोवा तुला काय बोलला? मला सर्वकाही सांग.’ त्यामुळे शमुवेलने एलीला सर्वकाही सांगितलं.
शमुवेल मोठा होत गेला. यहोवा त्याला नेहमी मदत करत राहिला. तो यहोवाचा निवडलेला संदेष्टा आणि न्यायाधीश आहे, हे इस्राएल देशात सर्वांना माहीत होतं.
“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उपदेशक १२:१