वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bhs पृ. २०७-२२३
  • अंत्यटिपा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंत्यटिपा
  • बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या अतुल्य गुणांची कदर करायला शिकवा
    आमची राज्य सेवा—२००६
  • सेवाकार्यात देवाच्या वचनातील सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • देवाच्या सरकारच्या शासनाचा आरंभ
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • दानीएलाची भविष्यवाणी मशीहाच्या आगमनाविषयी भाकीत करते
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
bhs पृ. २०७-२२३

अंत्यटिपा

१ यहोवा

देवाचं नाव यहोवा आहे. ‘यहोवा’ याचा अर्थ, “जो व्हायला लावतो” असा असल्याचं समजलं जातं. तो सर्वसमर्थ देव आहे आणि त्यानेच सर्व काही निर्माण केलं आहे. त्याने ठरवलेली कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याची शक्‍ती त्याच्याजवळ आहे.

हिब्रू भाषेत देवाचं नाव चार अक्षरांत लिहिलं जायचं. इंग्रजीत ती चार अक्षरं YHWH किंवा JHVH ही आहेत. बायबलच्या मूळ हिब्रू लिखाणांत, देवाचं नाव जवळजवळ ७,००० वेळा आढळतं. संपूर्ण जगातले लोक यहोवाच्या नावाचा त्यांच्या भाषेत रूढ असलेल्या पद्धतीत उच्चार करतात.

▸ अध्या. १, परि. १५

२ बायबल “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे

बायबलचा लेखक देव असला तरी त्याने ते लिहिण्यासाठी मनुष्यांचा उपयोग केला. हे समजण्यासाठी या उदाहरणावर विचार करा. एका कंपनीचा मालक त्याच्या सेक्रेटरीला एक पत्र लिहायला सांगतो. मालकाने सेक्रेटरीला पत्र लिहायला सांगितलं असलं तरी, पत्रातला मजकूर मालकाचा असतो. तसंच, देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे माणसांना त्याचे विचार लिहिण्याची प्रेरणा दिली. त्याने असं वेगवेगळ्या मार्गांनी केलं. त्याने त्याचे विचार, दृष्टान्त किंवा स्वप्नांच्याद्वारे त्यांना लिहिण्यास प्रेरित केलं.

▸ अध्या. २, परि. ५

३ तत्त्वं

तत्त्वं म्हणजे बायबलच्या शिकवणी, ज्यांच्या आधारावर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. जसं की, “वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात,” या तत्त्वावरून आपण हे शिकतो, की आपण ज्या लोकांबरोबर राहतो त्यांचा आपल्यावर एकतर चांगला प्रभाव पडू शकतो किंवा वाईट. (१ करिंथकर १५:३३) “मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल,” या तत्त्वावरून आपण शिकतो, की आपण जसं वागतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात.—गलतीकर ६:७.

▸ अध्या. २, परि. १२

४ भविष्यवाणी

भविष्यवाणी म्हणजे देवाकडून आलेला संदेश. एखादी भविष्यवाणी देवाच्या इच्छेविषयी, एखाद्या नैतिक शिक्षणाविषयी, आज्ञेविषयी किंवा न्यायदंडाविषयी स्पष्टीकरण असू शकते. किंवा भविष्यात होणाऱ्‍या घटनांबद्दलचा संदेशदेखील असू शकते. बायबलमधल्या अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत.

▸ अध्या २, परि. १३

५ मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या

मसीहाबद्दल बायबलमध्ये असलेल्या अनेक भविष्यवाण्या येशूच्या बाबतीत पूर्ण झाल्या. “मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या” ही चौकट पाहा.

▸ अध्या २, परि. १७, तळटीप.

मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या

प्रसंग

भविष्यवाणी

पूर्णता

यहूदाच्या वंशात जन्म झाला

उत्पत्ति ४९:१०

लूक ३:२३-३३

कुमारिकेच्या पोटी जन्माला आला

यशया ७:१४

मत्तय १:१८-२५

राजा दावीदचा वंशज

यशया ९:७

मत्तय १:१, ६-१७

येशू आपला पुत्र असल्याचं यहोवाने घोषित केलं

स्तोत्र २:७

मत्तय ३:१७

येशू हा मसीहा आहे यावर पुष्कळ लोकांनी विश्‍वास ठेवला नाही

यशया ५३:१

योहान १२:३७, ३८

गाढवावर बसून यरुशलेममध्ये आला

जखऱ्‍या ९:९

मत्तय २१:१-९

जवळच्या मित्रानेच विश्‍वासघात केला

स्तोत्र ४१:९

योहान १३:१८, २१-३०

चांदीच्या ३० नाण्यांसाठी विश्‍वासघात केला

जखऱ्‍या ११:१२

मत्तय २६:१४-१६

दोष लावला तरी शांत होता

यशया ५३:७

मत्तय २७:११-१४

त्याच्या कपड्यांवर चिठ्ठ्या टाकल्या

स्तोत्र २२:१८

मत्तय २७:३५

वधस्तंभावर असताना लोकांनी थट्टा केली

स्तोत्र २२:७, ८

मत्तय २७:३९-४३

त्याचं एकही हाड मोडलं नाही

स्तोत्र ३४:२०

योहान १९:३३, ३६

श्रीमंतांबरोबर पुरण्यात आलं

यशया ५३:९

मत्तय २७:५७-६०

त्याचं पुनरुत्थान

स्तोत्र १६:१०

प्रेषितांची कार्ये २:२४, २७

पुनरुत्थान झाल्यावर स्वर्गात देवाच्या उजव्या हाताशी बसला

स्तोत्र ११०:१

प्रेषितांची कार्ये ७:५५, ५६

६ यहोवाचा पृथ्वीसाठी संकल्प

यहोवावर प्रेम करणाऱ्‍या मानवांसाठी त्याने या पृथ्वीला नंदनवन म्हणून निर्माण केलं होतं. त्याचा संकल्प बदललेला नाही. लवकरच, तो सर्व दुष्टता काढून टाकणार आहे आणि त्याच्या लोकांना सर्वकाळाचं जीवन देणार आहे.

▸ अध्या. ३, परि. १

७ दियाबल सैतान

सैतान हा देवाविरुद्ध बंडाळी सुरू करणारा देवदूत आहे. त्याला ‘सैतान’ म्हटलं आहे कारण तो यहोवाच्या विरोधात काम करतो. सैतान या शब्दाचा अर्थ “विरोधक” असा होतो. त्याला ‘दियाबल’ असंही म्हटलं जातं. दियाबल शब्दाचा अर्थ “निंदक” असा होतो. देवाबद्दल खोटं सांगून लोकांची फसवणूक केल्याबद्दल त्याला ‘दियाबल’ म्हणण्यात आलं.

▸ अध्या. ३, परि. ४

८ देवदूत

पृथ्वीची निर्मिती करायच्या खूप आधी यहोवाने देवदूतांची निर्मिती केली. त्यांना स्वर्गात राहण्यासाठी बनवण्यात आलं आहे. त्यांची संख्या अगणित आहे. (प्रकटीकरण ५:११) प्रत्येक देवदूताला नाव आहे, प्रत्येकाचं व्यक्‍तिमत्त्व वेगळं आहे. देवाची सेवा एकनिष्ठपणे करणारे हे नम्र देवदूत मानवांकडून उपासना स्वीकारत नाहीत. त्यांच्यात वेगवेगळे वर्ग आहेत आणि त्यांना वेगवेगळी काम नेमण्यात आली आहेत. त्यांची काही कामं म्हणजे, यहोवाच्या सिंहासनासमोर सेवा करणं, त्याचे संदेश पोहचवणं, पृथ्वीवरच्या त्याच्या सेवकांचं रक्षण करणं, त्यांना मार्गदर्शन देणं, त्याने दिलेले न्यायदंड बजावणं आणि प्रचार कार्याला सहकार्य देणं. (स्तोत्र ३४:७; प्रकटीकरण १४:६; २२:८, ९) भविष्यात ते येशूसोबत हर्मगिदोनच्या लढाईत लढणार आहेत.—प्रकटीकरण १६:१४, १६; १९:१४, १५.

▸ अध्या. ३, परि. ५; अध्या. १०, परि. १

९ पाप

‘पाप’ या शब्दाचा अर्थ, आपल्या मनात येणारी अशी कोणतीही भावना, विचार किंवा मग आपण करत असलेली अशी कोणतीही कृती जी यहोवाच्या इच्छेविरुद्ध आहे. पाप केल्यामुळे देवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडतो. आपल्या हातून पाप घडू नये म्हणून त्याने आपल्याला नियम व तत्त्वं दिली आहेत. यहोवाने आदाम आणि हव्वा यांची निर्मिती केली तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होतं. पण या दोघांनी देवाची आज्ञा मोडण्याची निवड केली तेव्हा ते पापी व अपरिपूर्ण झाले. पुढे ते म्हातारे होऊन मरण पावले. आपल्याला आदामकडून वारशाने पाप मिळालं असल्यामुळे आपणसुद्धा म्हातारे होऊन मरतो.

▸ अध्या. ३, परि. ७; अध्या. ५, परि. ३

१० हर्मगिदोन

सैतानाच्या जगाचा आणि सर्व दुष्टतेचा नाश करण्यासाठी ही देवाची लढाई आहे.

▸ अध्या. ३, परि. १३; अध्या. ८, परि. १८

११ देवाचं राज्य

यहोवाने स्वर्गात स्थापन केलेलं हे एक सरकार आहे. येशू ख्रिस्त या राज्याचा राजा आहे. भविष्यात यहोवा या राज्याद्वारे पृथ्वीवरची सर्व दुष्टता काढून टाकणार आहे. त्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या राज्याचं शासन असेल.

▸ अध्या. ३, परि. १४

१२ येशू ख्रिस्त

सर्वांची निर्मिती करण्याआधी यहोवाने येशूची निर्मिती केली. सर्व मानवांसाठी बलिदान देण्यासाठी यहोवाने त्याला पृथ्वीवर पाठवलं. लोकांनी त्याला ठार मारलं, पण यहोवाने त्याला पुन्हा जिवंत केलं. आता तो देवाच्या राज्याचा राजा म्हणून स्वर्गात राज्य करत आहे.

▸ अध्या. ४, परि. २

१३ ७० सप्तकांची भविष्यवाणी

मसीहा केव्हा प्रगट होईल याबद्दल बायबलमध्ये भविष्यवाणी केली होती. ६९ सप्तकांच्या शेवटी तो प्रगट होईल, असं भविष्यवाणीत म्हटलं होतं. इ.स.पू. ४५५ पासून इ.स.a २९ पर्यंत ही ६९ सप्तकं मोजली जातात.

पण ही ६९ सप्तकं, इ.स. २९ मध्येच समाप्त होतात, हे आपण खातरीने कसं सांगू शकतो? इ.स.पू. ४५५ या वर्षी ६९ सप्तकं सुरू झाली. या वर्षी, नहेम्या जेरुसलेममध्ये आला आणि त्याने शहराची पुनर्बांधणी सुरू केली. (दानीएल ९:२५; नहेम्या २:१, ५-८) “डझन” हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनात १२ ही संख्या येते, तसंच “सप्तक” हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनात ७ ही संख्या येते. बायबलमधल्या भविष्यवाण्यांमध्ये दिवसांची मोजणी एका “दिवसामागे एक वर्ष या हिशेबाने” केली जायची. (गणना १४:३४; यहेज्केल ४:६) तर, भविष्यवाणीतली सप्तकं सात दिवसांची नसून सात वर्षांची सप्तकं आहेत. दुसऱ्‍या शब्दांत, प्रत्येक सप्तक किंवा प्रत्येक आठवडा सात वर्षांचा होता; या हिशोबाने, ६९ सप्तकं ४८३ वर्षांची होती (६९ x ७). इ.स.पू. ४५५ पासून आपण जर ४८३ वर्षं मोजत गेलो तर आपण इ.स. २९ या वर्षापर्यंत येतो. याच वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला व त्याला मसीहा म्हणून नियुक्‍त करण्यात आलं—लूक ३:१, २, २१, २२.

याच भविष्यवाणीत आणखी एका सप्तकाविषयी म्हणजे आणखी सात वर्षांविषयी भाकीत केलं होतं. या सात वर्षांच्या काळात इ.स. ३३ साली मसीहाला ठार मारण्यात येणार होतं आणि इ.स. ३६ साली राज्याचा आनंदाचा संदेश फक्‍त यहूदी लोकांनाच नव्हे तर सर्व राष्ट्रांना सांगितला जाणार होता.—दानीएल ९:२४-२७.

▸ अध्या. ४, परि. ७

तक्‍ता: दानीएल अध्याय ९ मधील सत्तर सप्तकांची भविष्यवाणी मसीहाच्या येण्याबद्दल भाकीत करते

१४ त्रैक्याची खोटी शिकवण

बायबलमध्ये असं शिकवलं आहे की, यहोवा देव निर्माणकर्ता आहे आणि इतर सर्व गोष्टी निर्माण करण्याआधी त्याने येशूला निर्माण केलं. (कलस्सैकर १:१५, १६) येशू सर्वसमर्थ देव नाही. ‘मी देवाच्या बरोबरीचा आहे,’ असा त्याने कधीच दावा केला नाही. उलट त्याने म्हटले: “पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.” (योहान १४:२८; १ करिंथकर १५:२८) काही धर्मांत, त्रैक्याची म्हणजे पिता, पुत्र व पवित्र आत्मा तिन्ही मिळून एक आहेत अशी शिकवण दिली जाते. पण, बायबलमध्ये कुठेच “त्रैक्य” हा शब्द आढळत नाही. ही शिकवण खोटी आहे.

पवित्र आत्मा ही देवाची कार्यकारी शक्‍ती आहे. ती अदृश्‍य असली तरी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तिचा वापर करतो. ही शक्‍ती व्यक्‍ती नाही. जसं की, आरंभीचे ख्रिस्ती “पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.” तसंच, यहोवाने म्हटले: “मी माझा आत्मा सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन.”—प्रेषितांची कार्ये २:१-४, १७.

▸ अध्या. ४, परि. १२; अध्या. १५, परि. १७

१५ क्रॉस

खरे ख्रिस्ती देवाची उपासना करताना क्रॉसचा उपयोग का करत नाहीत?

  1. (१) खोट्या धर्मात फार पूर्वीपासून क्रॉसचा उपयोग केला जात आहे. प्राचीन काळात, निसर्ग उपासनेत आणि उपासनेच्या लैंगिक प्रथांमध्ये क्रॉसचा उपयोग केला जात असे. येशूच्या मृत्यूनंतरच्या ३०० वर्षांदरम्यान तरी ख्रिश्‍चनांनी उपासनेत क्रॉसचा उपयोग केला नाही. पण रोमी सम्राट कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्माचं चिन्ह म्हणून क्रॉसचा उपयोग केला. ख्रिस्ती धर्म आणखी प्रसिद्ध व्हावा या हेतूने या चिन्हाचा उपयोग केला जायचा. पण क्रॉसचा आणि येशू ख्रिस्ताचा काहीएक संबंध नाही. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ यात असं म्हटलं आहे: “येशू ख्रिस्ताच्या आधीच्या काळात आणि ख्रिस्ती नसलेल्या इतर अनेक संस्कृतींत क्रॉसचा उपयोग केला जात असल्याचा पुरावा आहे.”

  2. (२) येशूला क्रॉसवर मारण्यात आलं नाही. “क्रॉस” असं ज्या ग्रीक शब्दांचं भाषांतर केलं जातं त्या शब्दांचा मूळ अर्थ, “उभा खांब,” “लाकूड” किंवा “झाड” असा होतो. द कंपॅनियन बायबल यात असं म्हटलं आहे: “ग्रीक शास्त्रवचनांमध्ये [नव्या करारात] असा कुठलाही शब्द वापरण्यात आलेला नाही ज्यावरून, लाकडाचे दोन तुकडे असा अर्थ निघतो.” येशूला एका उभ्या खांबावर लटकवण्यात आलं होतं.

  3. (३) उपासनेत आपण मूर्तींचा किंवा प्रतिकांचा उपयोग करू नये, अशी यहोवाची इच्छा आहे.—निर्गम २०:४, ५; १ करिंथकर १०:१४.

▸ अध्या. ५, परि. १२

१६ स्मारकविधी

येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याची आज्ञा दिली. दर वर्षी निसान १४ रोजी ते हा सण साजरा करतात. इस्राएली लोक याच दिवशी वल्हांडणाचा सण साजरा करत असत. येशूच्या शरीराला चित्रित करणारी भाकर व रक्‍ताला चित्रित करणारा द्राक्षारस या प्रसंगी सर्वांमध्ये फिरवला जातो. येशूबरोबर स्वर्गात राज्य करणारे ही भाकर खातात व द्राक्षारस पितात. ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे ते भाकर व द्राक्षारस खात किंवा पीत नसले तरी, या स्मारकविधीला उपस्थित राहून या प्रसंगाबद्दल आदर दाखवतात.

▸ अध्या. ५, परि. २१

१७ जीव

ज्या हिब्रू आणि ग्रीक शब्दांचं भाषांतर “जीव” असं करण्यात आलं आहे, ते पुढील गोष्टींना सूचित करतात: (१) लोक, (२) प्राणी, किंवा (३) एखाद्या व्यक्‍तीचं किंवा प्राण्याचं जीवन. उदाहरणार्थ:

  • लोक. “नोहाच्या काळात . . . मोजकेच लोक, अर्थात आठ जण [“जीव,” तळटीप] पाण्यातून सुखरूप बचावले.” (१ पेत्र ३:२०) इथे दिलेला “जीव” हा शब्द लोकांना सूचित करतो. ते म्हणजे नोहा आणि त्याची पत्नी, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या पत्नी.

  • प्राणी. “मग देव बोलला, जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. मग देव बोलला; प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो; आणि तसे झाले.”—उत्पत्ति १:२०, २४.

  • एखाद्या व्यक्‍तीचं किंवा प्राण्याचं जीवन. यहोवाने मोशेला म्हटलं: “तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत.” (निर्गम ४:१९) जेव्हा येशू पृथ्वीवर होता, तो म्हणाला: “मीच चांगला मेंढपाळ आहे, जो चांगला मेंढपाळ तो आपला जीव मेंढरांसाठी देतो.”—योहान १०:११, पं.र.भा.

    शिवाय, “पूर्ण जिवाने” एखादी गोष्ट करणं असा उल्लेख जिथे आढळतो तिथे संपूर्ण शक्‍तीने, मनापासून किंवा जिवेभावे एखादी गोष्ट करणं असा अर्थ सूचित होतो. (मत्तय २२:३७; अनुवाद ६:५) काही ठिकाणी, ‘जीव’ या शब्दासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषेतले शब्द, एखाद्या मृत व्यक्‍तीसाठी किंवा प्रेतासाठीही वापरले आहेत.—गणना ६:६; हाग्गय २:१३.

▸ अध्या. ६, परि. ५; अध्या. १५, परि. १७

१८ आत्मा

ज्या हिब्रू आणि ग्रीक शब्दांचं भाषांतर “आत्मा” असं करण्यात आलं आहे त्यांचा वेगवेगळा अर्थ होऊ शकतो. पण ते नेहमीच अशा गोष्टींना सूचित करतात ज्या मानवाला दिसू शकत नाही जसं की वारा, किंवा मानवांचा अथवा प्राण्यांचा श्‍वास. हे शब्द आत्मिक व्यक्‍तींना आणि पवित्र आत्म्याला अर्थात देवाच्या क्रियाशील शक्‍तीलाही सूचित करू शकतात. मृत्यूनंतर मानवातला कोणताही भाग स्वतंत्रपणे जिवंत राहतो असं बायबल शिकवत नाही.—निर्गम ३५:२१; स्तोत्र १०४:२९; मत्तय १२:४३; लूक ११:१३.

▸ अध्या. ६, परि. ५; अध्या. १५, परि. १७

१९ गेहेन्‍ना

गेहेन्‍ना हे यरुशलेमजवळ असलेल्या एका दरीचं नाव होतं. या दरीत, सर्व कचरा जाळून नष्ट केला जायचा. येशूच्या काळात प्राण्यांना किंवा मनुष्यांना या दरीत टाकून त्यांना छळण्याचा किंवा जिवंत जाळण्याचा बायबलमध्ये कुठेही उल्लेख नाही. तेव्हा गेहेन्‍ना हे, मेलेल्या लोकांचा छळ करण्यासाठी किंवा त्यांना जिवंत जाळण्यासाठी असलेल्या अदृश्‍य जागेला सूचित करत नाही. येशू जेव्हा गेहेन्‍नात टाकलेल्या लोकांविषयी बोलत होता तेव्हा तो या लोकांच्या कायमच्या नाशाविषयी बोलत होता.—मत्तय ५:२२; १०:२८.

▸ अध्या. ७, परि. २०

२० प्रभूची प्रार्थना

आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवताना येशूने त्यांना या प्रार्थनेचा नमुना दिला. या प्रार्थनेला ‘आमच्या स्वर्गातील पित्या’ किंवा आदर्श प्रार्थनादेखील म्हणतात. येशूने आपल्याला अशा प्रकारे प्रार्थना करायला शिकवलं:

  • “तुझं नाव पवित्र मानलं जावो”

    यहोवाच्या नावावर लागलेला कलंक किंवा त्याच्याबद्दल पसरलेल्या खोट्या शिकवणी चुकीच्या ठराव्यात याबद्दल आपण प्रार्थना करतो. यामुळे स्वर्गातले व पृथ्वीवरचे सर्व जण देवाच्या नावाचा आदर व सन्मान करतील.

  • “तुझं राज्य येवो”

    देवाच्या सरकारने सैतानाच्या जगाचा नाश करावा, संपूर्ण पृथ्वीवर राज्य करायला सुरुवात करावी आणि पृथ्वीला नंदनवन बनवावं, याबद्दल आपण प्रार्थना करतो.

  • पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो

    पृथ्वीसाठी देवाचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी आपण प्रार्थना करतो, यामुळे आज्ञाधारक, परिपूर्ण मानव नंदनवनात सदासर्वकाळ राहतील. सुरुवातीला यहोवाचा मानवांसाठी हाच संकल्प होता.

▸ अध्या. ८, परि. २

२१ खंडणी

मानवांना पाप आणि मृत्यू यांपासून मुक्‍त करण्यासाठी यहोवाने खंडणीची व्यवस्था केली. पहिला मनुष्य आदाम याने गमावलेलं परिपूर्ण जीवन पुन्हा मिळवून देण्यासाठी व देवाबरोबरचा बिघडलेला नातेसंबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी खंडणी देण्यात आली. यहोवाने येशूला पृथ्वीवर यासाठी पाठवलं की त्याने सर्व पापी लोकांसाठी आपलं जीवन बलिदान करावं. येशूच्या बलिदानामुळे सर्व मानवांना सदासर्वकाळ जिवंत राहण्याची व पुन्हा परिपूर्ण होण्याची संधी मिळाली.

▸ अध्या. ८, परि. २१; अध्या. ९, परि. १३

२२ १९१४ हे वर्ष इतकं महत्त्वाचं का आहे?

दानीएल अध्याय ४ मधल्या भविष्यवाणीवरून आपण असं शिकतो, की १९१४ साली देव त्याचं राज्य स्थापन करणार होता.

भविष्यवाणी: यहोवाने राजा नबुखदनेस्सरला एक स्वप्न दाखवलं. हे स्वप्न भविष्यात होणाऱ्‍या घटनांबद्दलचं होतं. स्वप्नात त्याने पाहिलं, की एक मोठं झाड कापलं जातं. आणि ते सात वर्षं किंवा मूळ भाषेतल्या लेखात म्हटल्याप्रमाणे “सात काळ” वाढू नये म्हणून लोखंडाच्या व तांब्याच्या पट्ट्या त्याच्या बुंध्याभोवती घातल्या जातात. सात काळ संपल्यानंतर, हे झाड पुन्हा वाढणार होतं.—दानीएल ४:१, १०-१६.

या भविष्यवाणीचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? हे झाड देवाच्या शासनाला सूचित करतं. यहोवाने अनेक वर्षं यरुशलेममध्ये इस्राएल राष्ट्रावर राज्य करण्यासाठी राजे होऊ दिले. (१ इतिहास २९:२३) पण हे राजे त्याच्याशी एकनिष्ठ राहिले नाहीत आणि त्यांच्या राज्यसत्तेचा अंत झाला. इ.स.पू. ६०७ साली, यरुशलेमचा नाश करण्यात आला. ती, ‘सात काळांची’ सुरुवात होती. (२ राजे २५:१, ८-१०; यहेज्केल २१:२५-२७) “विदेश्‍यांकरता नियुक्‍त केलेले काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेमला विदेश्‍यांच्या पायांखाली तुडवलं जाईल,” असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा तो त्या ‘सात काळांबद्दल’ बोलत होता. (लूक २१:२४) याचा अर्थ, येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्या ‘सात काळांची’ समाप्ती झाली नाही. ‘सात काळांच्या’ समाप्तीला राजा नियुक्‍त करण्याचं वचन यहोवाने दिलं. हा नवीन राजा म्हणजे येशू पृथ्वीवर राहणाऱ्‍या देवाच्या लोकांवर सदासर्वकाळ आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे.—लूक १:३०-३३.

‘सात काळांचा’ अवधी: हा ‘सात काळांचा’ अवधी २,५२० वर्षांचा होता. आपण जर इ.स.पू. ६०७ पासून २,५२० वर्षं मोजायला सुरुवात केली तर १९१४ साली येतो. या वर्षी यहोवाने येशूला मसीहा आणि स्वर्गातल्या त्याच्या राज्याचा राजा म्हणून नियुक्‍त केलं.

पण आपल्याला २,५२० वर्षं कशी मिळतात? बायबलमध्ये म्हटलं आहे, की साडेतीन वर्षं किंवा काळ म्हणजे १,२६० दिवस. (प्रकटीकरण १२:६, १४) आणि “सात काळ” म्हणजे त्या साडेतीन काळाचे दुप्पट म्हणजे २,५२० दिवस. हे २,५२० दिवस, २,५२० वर्षांच्या बरोबरीचे आहेत कारण, बायबल भविष्यवाण्यांमध्ये दिवसांची मोजणी एका “दिवसामागे एक वर्ष या हिशेबाने” होते.—गणना १४:३४; यहेज्केल ४:६.

▸ अध्या. ८, परि. २३

नबुखदनेस्सरच्या स्वप्नाशी संबंधित असलेल्या तारखांचा व घटनांचा तक्‍ता

२३ आद्यदेवदूत मीखाएल

“आद्यदेवदूत” शब्दाचा अर्थ, “देवदूतांचा प्रमुख” असा होतो. बायबलमध्ये फक्‍त एकाच आद्यदेवदूताचा उल्लेख आढळतो आणि त्याचं नाव मीखाएल आहे.—दानीएल १२:१; यहूदा ९.

मीखाएल देवाच्या विश्‍वासू देवदूतांच्या सैन्याचा प्रमुख आहे. प्रकटीकरण १२:७ मध्ये म्हटलं आहे: “मीखाएल व त्याचे दूत अजगराविरुद्ध लढले.” प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं आहे, की देवाच्या सैन्याचा प्रमुख येशू आहे. तेव्हा, मीखाएल हे येशूचं दुसरं नाव आहे.—प्रकटीकरण १९:१४-१६.

▸ अध्या. ९, परि. ४

२४ शेवटचे दिवस

देवाचं राज्य सैतानाच्या जगाचा नाश करण्याआधी पृथ्वीवर ज्या मोठमोठ्या घटना घडतील त्या काळाला हा वाक्यांश सूचित करतो. ‘शेवटचे दिवस’ आणि ‘मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीचा काळ’ हे बायबलमधल्या भविष्याण्यांमध्ये एकाच कालावधीला सूचित करतात. (मत्तय २४:३, २७, ३७) १९१४ मध्ये देवाचं राज्य स्वर्गात स्थापन झालं तेव्हा या ‘शेवटच्या दिवसांची’ सुरुवात झाली आणि हर्मगिदोनात सैतानाच्या जगाचा नाश केला जाईल तेव्हा हे शेवटचे दिवस संपतील.—२ तीमथ्य ३:१; २ पेत्र ३:३.

▸ अध्या. ९, परि. ५

२५ पुनरुत्थान

एखाद्या मृत व्यक्‍तीला पुन्हा जिवंत करण्याला पुनरुत्थान म्हटलं जातं. बायबलमध्ये नऊ पुनरुत्थानांचा उल्लेख आहे. एलीया, अलीशा, येशू, पेत्र आणि पौल यांनी लोकांची पुनरुत्थानं केली. पण हे चमत्कार देवाच्या शक्‍तीमुळेच शक्य झाले. यहोवा “नीतिमान आणि अनीतिमान” लोकांचं पुनरुत्थान करण्याचं वचन देतो. (प्रेषितांची कार्ये २४:१५) बायबलमध्ये स्वर्गातल्या पुनरुत्थानाविषयी देखील सांगितलं आहे. येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी देवाने ज्यांना निवडलं आहे त्यांना स्वर्गात पुनरुत्थित केलं जातं.—योहान ५:२८, २९; ११:२५; फिलिप्पैकर ३:११; प्रकटीकरण २०:५, ६.

▸ अध्या. ९, परि. १३

२६ भुताटकी

भुताटकी म्हणजे, दुरात्म्यांबरोबर थेटपणे किंवा कोणाच्या तरी माध्यमाद्वारे जसं की एखाद्या मांत्रिकाद्वारे संपर्क साधण्याची प्रथा. जे लोक जादूटोणा करतात ते असं मानतात, की मानवांच्या शरीरातलं काहीतरी जिवंत राहतं ज्याला ‘आत्मा’ म्हटलं जातं आणि हे असे आत्मे शक्‍तिशाली भुतं बनतात. हे दुरात्मे लोकांना देवाची आज्ञा तोडायला लावतात. ज्योतिषशास्त्र, शकून पाहणे, जादू, चेटूक, अंधविश्‍वास, अलौकिक शक्‍तीचा उपयोग करणे या सर्व गोष्टींचा भुताटकीत समावेश होतो. अनेक पुस्तकांत, मासिकांत, जन्मकुंडल्यांमध्ये, चित्रपटांमध्ये, पोस्टरवर आणि गाण्यांमध्येही असं दाखवायचा प्रयत्न केला जातो, की दुरात्मे, जादूटोणा आणि अलौकिक शक्‍ती या सर्व गोष्टी हानीकारक नसून, मनोरंजक आहेत. अनेक अंत्यविधीच्या वेळी केल्या जाणाऱ्‍या प्रथा, जसे की मृतांसाठी दिले जाणारे बळी, अत्यंसंस्कारांचे सण, वार्षिक मृत्यू दिवस पाळणं, विधवेच्या प्रथा, मृतांसाठी केली जाणारी जागरणं या सर्व गोष्टींमध्ये दुरात्म्यांबरोबर संपर्क साधला जातो. दुरात्म्यांच्या शक्‍तीचा वापर करण्याआधी लोक अनेकदा नशा आणणाऱ्‍या पदार्थांचा वापर करतात.—गलतीकर ५:२०; प्रकटीकरण २१:८.

▸ अध्या. १०, परि. १०; अध्या. १६, परि. ४

२७ यहोवाचा राज्य करण्याचा अधिकार

यहोवा सर्वसमर्थ देव आहे आणि त्यानेच हे विश्‍व निर्माण केलं. (प्रकटीकरण १५:३) म्हणूनच तो सर्व गोष्टींचा मालक आहे आणि आपल्या निर्मितीवर राज्य करण्याचा संपूर्ण अधिकार त्याच्याजवळ आहे. (स्तोत्र २४:१; यशया ४०:२१-२३; प्रकटीकरण ४:११) त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याने नियम बनवले आहेत. इतरांना शासक म्हणून नियुक्‍त करण्याचा अधिकारदेखील यहोवाजवळ आहे. त्याच्यावर प्रेम करून व त्याच्या आज्ञा पाळून आपण त्याचा अधिकार मान्य करतो.—१ इतिहास २९:११.

▸ अध्या. ११, परि. १०

२८ गर्भपात

गर्भधारणा झाल्यानंतर, बाळ आईच्या शरीरातला केवळ एक अवयव म्हणून वाढत नसतं तर एक वेगळी व्यक्‍ती म्हणून वाढत असतं. गर्भात असलेल्या बाळाचं जीवन संपवण्यासाठी, गर्भपात हा मुद्दामहून केला जातो. हा एक अपघात किंवा मानवी शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया नसते.

▸ अध्या. १३, परि. ५

२९ रक्‍त संक्रमण

ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यात, संपूर्ण रक्‍त किंवा रक्‍ताच्या चार घटकांपैकी एक घटक; एखाद्याच्या शरीरातलं रक्‍त किंवा साठवून ठेवलेलं रक्‍त दुसऱ्‍याच्या शरीरात संक्रमित केलं जातं. प्लाझ्मा, लाल पेशी, पांढऱ्‍या पेशी आणि प्लेटलेट्‌स हे रक्‍ताचे चार मुख्य घटक आहेत.

▸ अध्या. १३, परि. १३

३० शिस्त

‘शिस्त’ या शब्दाचा अर्थ फक्‍त, “शिक्षा,” किंवा “दंड” असा होत नाही. त्याचा अर्थ, शिक्षण, बोध किंवा सुधारणूक असाही होतो. यहोवा जेव्हा एखाद्याला शिस्त लावतो तेव्हा तो कधीच त्याच्याशी अपमानास्पद किंवा क्रूरपणे वागत नाही. (नीतिसूत्रे ४:१, २) शिस्त लावण्याच्या बाबतीत यहोवाने पालकांसमोर उत्तम उदाहरण मांडलं आहे. एखाद्याला शिस्त लावण्याची त्याची पद्धत इतकी प्रभावी असते की, त्या व्यक्‍तीला ती शिस्त आवडू लागते. (नीतिसूत्रे २:१) यहोवाचं त्याच्या लोकांवर प्रेम आहे आणि तो त्यांना प्रशिक्षण देतो. त्याच्या प्रशिक्षणामुळे त्यांचे चुकीचे विचार सुधारतात व त्याला आवडत असलेल्या मार्गाने ते विचार करायला व वागायला शिकतात. मुलांना शिस्त लावताना पालकांनी हेदेखील समजावलं पाहिजे की त्यांनी आज्ञाधारक का असलं पाहिजे. त्यांना यहोवा आणि त्याचं वचन बायबल यांवर प्रेम करायला शिकवा आणि बायबलमधली तत्त्वं समजायला मदत करा.

▸ अध्या. १४, परि. १३

३१ दुरात्मे

दुरात्मे अदृश्‍य व दुष्ट आत्मिक प्राणी आहेत ज्यांच्याकडे अलौकिक शक्‍ती आहे. हे दुरात्मे दुष्ट देवदूत आहेत. देवाच्या आज्ञा तोडून त्यांनी स्वतःला त्याचे क्रूर शत्रू बनवलं. (उत्पत्ति ६:२; यहूदा ६) सैतानाने यहोवाविरुद्ध बंडाळी केल्यानंतर हे दुष्ट देवदूतही त्याला सामील झाले.—अनुवाद ३२:१७; लूक ८:३०; प्रेषितांची कार्ये १६:१६; याकोब २:१९.

▸ अध्या. १६, परि. ४

a ‘इ.स.पू.’ व ‘इ.स.’ या संक्षिप्त रूपांचा अर्थ, ‘इसवी सन पूर्व’ आणि ‘इसवी सन,’ असा होतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा