अध्याय बारा
तुम्ही देवाचे मित्र कसे बनू शकता?
१, २. यहोवाच्या काही मित्रांची नावं काय होती?
तुम्हाला कोणाबरोबर मैत्री करायला आवडेल? अशी व्यक्ती जी तुम्हाला आवडते. जिच्यासोबत तुमचं चांगलं जमतं आणि जी तुमच्यासोबत चांगलं जमवून घेते. अशी व्यक्ती जिचा स्वभाव दयाळू आहे आणि तिच्यामध्ये तुमच्या आवडीचे गुण आहेत.
२ यहोवा देव काही मानवांना आपले मित्र बनण्यास निवडतो. जसं की, अब्राहाम हा यहोवाच्या मित्रांपैकी एक होता. (यशया ४१:८; याकोब २:२३) यहोवाला दावीदसुद्धा आवडायचा. “दावीद हा मला माझ्या मनासारखा मनुष्य” आहे, असं तो त्याच्याविषयी म्हणाला. (प्रेषितांची कार्ये १३:२२) तसंच, संदेष्टा दानीएलसुद्धा यहोवाला “परमप्रिय” होता.—दानीएल ९:२३.
३. अब्राहाम, दावीद आणि दानीएल हे यहोवाचे मित्र का होते?
३ पण अब्राहाम, दावीद आणि दानीएल हे यहोवाचे मित्र का होते? “तू माझा शब्द ऐकला म्हणून” तू माझा मित्र आहेस, असं यहोवा एकदा अब्राहामला म्हणाला होता. (उत्पत्ति २२:१८) जे यहोवाची आज्ञा नम्रपणे पाळतात त्यांच्याशी यहोवा मैत्री करतो. एक संपूर्ण राष्ट्रदेखील यहोवाशी मैत्री करू शकतं. जसं की, त्याने इस्राएल राष्ट्राला म्हटलं होतं: “माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल.” (यिर्मया ७:२३) यावरून कळतं, की देवाचे मित्र बनण्याकरता आपण त्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे.
यहोवा आपल्या मित्रांचं रक्षण करतो
४, ५. यहोवा आपल्या मित्रांचं रक्षण कसं करतो?
४ बायबलमध्ये म्हटलं आहे की “जे कोणी [यहोवाशी] सात्विक चित्ताने वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.” (२ इतिहास १६:९) स्तोत्र ३२:८ मध्ये यहोवा त्याच्या मित्रांना असं वचन देतो: “मी तुला बोध करीन [समजबुद्धी देईन]; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”
५ एक शक्तिशाली शत्रू आहे जो आपल्याला यहोवाचे मित्र बनण्यापासून रोखतो. पण यहोवा आपलं रक्षण करतो. (स्तोत्र ५५:२२ वाचा.) आपण यहोवाचे मित्र असल्यामुळे आपण त्याची सेवा पूर्ण हृदयाने करतो. आपल्यावर कितीही संकटं आली तरी आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहतो. स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आपलादेखील असा भरवसा आहे, की यहोवा “माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.” (स्तोत्र १६:८; ६३:८) पण मग सैतान, आपल्या आणि यहोवाच्या मैत्रीच्या आड कसा येतो?
सैतानाचे आरोप
६. सैतानाने मानवांवर कोणते आरोप लावले?
६ अकराव्या अध्यायात आपण शिकलो की सैतानाने यहोवावर आरोप लावले होते. जसं की, यहोवा खोटं बोलतो, आदाम आणि हव्वा यांना बरोबर काय आणि चूक काय हे ठरवण्याचा अधिकार न देऊन त्याने त्यांच्यावर अन्याय केला आहे. बायबलमधल्या ईयोब नावाच्या पुस्तकात आपण वाचतो, की सैतानाने देवाशी मैत्री करू पाहणाऱ्या मानवांवरसुद्धा आरोप लावले आहेत. मानव यहोवावरच्या प्रेमामुळे नाही, तर त्याच्याकडून काहीतरी मिळतं म्हणून त्याची सेवा करतात, असा त्याने दावा केला. त्याने असाही दावा केला, की तो कोणाचीही एकनिष्ठा तोडू शकतो. पण ईयोब देवाशी कसा एकनिष्ठ राहिला आणि यहोवाने त्याचं रक्षण कसं केलं, ते आता आपण पाहू.
७, ८. (क) यहोवाला ईयोबविषयी कसं वाटत होतं? (ख) सैतान ईयोबविषयी काय म्हणाला?
७ पण ईयोब कोण होता? तो एक भला माणूस होता जो सुमारे ३,६०० वर्षांपूर्वी होऊन गेला. यहोवाने त्याच्याविषयी म्हटलं की, त्या वेळी पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीच चांगला माणूस नव्हता. तो देवाचा आदर करायचा आणि त्याला वाईट गोष्टींबद्दल घृणा होती. (ईयोब १:८) तो यहोवाचा खरा मित्र होता.
८ पण सैतानाने असा आरोप केला, की ईयोब यहोवाची सेवा स्वार्थापोटी करत होता. तो यहोवाला म्हणाला: “तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व यांभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धि पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल.”—ईयोब १:१०, ११.
९. यहोवाने सैतानाला काय करण्याची परवानगी दिली?
९ ईयोब स्वार्थासाठी यहोवाची सेवा करत होता, असा आरोप सैतानाने ईयोबवर केला. सैतानाने असाही दावा केला, की तो ईयोबला यहोवाची सेवा करण्यापासून रोखू शकतो. पण यहोवाला माहीत होतं, की सैतानाचा दावा खोटा आहे. तरीदेखील त्याने सैतानाला ईयोबची परीक्षा घेऊ दिली, कारण यामुळे हे सिद्ध झालं असतं की ईयोब यहोवावर प्रेम करत असल्यामुळेच त्याचा मित्र आहे.
सैतान ईयोबवर परीक्षा आणतो
१०. सैतानाने ईयोबवर कोणकोणत्या परीक्षा आणल्या आणि ईयोबची काय प्रतिक्रिया होती?
१० सुरुवातीला सैतानाने ईयोबच्या प्राण्यांची चोरी होऊ दिली आणि काहींचा नाश होऊ दिला. मग, त्याने ईयोबच्या बहुतेक नोकरांना ठार मारलं. ईयोबने सर्वकाही गमावलं. शेवटच्या हल्ल्यात सैतानाने एका वादळाद्वारे ईयोबच्या दहा मुलांना ठार मारलं. पण इतकं सर्व झाल्यावरही ईयोब यहोवाशी एकनिष्ठ राहिला आणि “या सर्व प्रसंगात ईयोबच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.”—ईयोब १:१२-१९, २२.
यहोवाने ईयोबला त्याच्या एकनिष्ठेचं प्रतिफळ दिलं
११. (क) सैतानाने आणखी कोणती परीक्षा आणली? (ख) ईयोबची प्रतिक्रिया काय होती?
११ सैतान इतक्यावरच थांबला नाही. तो यहोवाला म्हणाला: “तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल.” यहोवाने परवानगी दिल्यावर सैतानाने ईयोबला एका भयंकर आजाराने पीडित केलं. (ईयोब २:५, ७) याही परीक्षेत ईयोब यहोवाशी विश्वासू राहिला. तो म्हणाला: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन [माझी एकनिष्ठा] सोडणार नाही.”—ईयोब २७:५.
१२. सैतानाने लावलेले आरोप खोटे आहेत हे ईयोबने कसं सिद्ध केलं?
१२ सैतानाने आपल्यावर कोणते आरोप लावले आहेत आणि आपल्यावर इतकी संकटं का येत आहेत हे इयोबला माहीत नव्हतं. ही सर्व संकटं यहोवाकडून येत आहेत असं त्याला वाटलं. (ईयोब ६:४; १६:११-१४) असं असलं तरी, ईयोब यहोवाशी एकनिष्ठ राहिला. तो स्वार्थी नव्हता हे सिद्ध झालं. तो यहोवाचा मित्र होता कारण त्याचं यहोवावर प्रेम होतं. सैतानाचे सर्व आरोप खोटे ठरले!
१३. ईयोब एकनिष्ठ राहिल्यामुळे काय परिणाम झाला?
१३ स्वर्गात यहोवा आणि सैतान यांच्यात काय चर्चा झाली हे ईयोबला ठाऊक नसलं तरी, तो देवाशी एकनिष्ठ राहिला. सैतान दुष्ट आहे हे त्याने सिद्ध केलं. यहोवाने त्याचा मित्र इयोब याला त्याच्या एकनिष्ठेचं प्रतिफळ दिलं.—ईयोब ४२:१२-१७.
सैतान तुमच्यावर आरोप लावतो
१४, १५. सैतानाचा सर्वच स्त्री-पुरुषांवर कोणता आरोप आहे?
१४ ईयोबच्या जीवनात जे काही घडलं त्यावरून आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो. आजही सैतान आपल्यावर असा आरोप लावतो, की आपल्याला यहोवाकडून काही तरी मिळत असल्यामुळेच आपण त्याची सेवा करतो. ईयोब २:४ या वचनात सैतानाने असा दावा केला: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” दुसऱ्या शब्दांत त्याला असं म्हणायचं होतं, की फक्त ईयोबच नाही तर सर्वच स्त्री-पुरुष स्वार्थी आहेत. ईयोबला जाऊन शेकडो वर्षं झाल्यानंतरही सैतानाने यहोवाचा अपमान करायचं आणि त्याच्या सेवकांवर खोटे आरोप लावायचं थांबवलं नाही. म्हणूनच, नीतिसूत्रे २७:११ मध्ये म्हटलं आहे: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा [अपमान] करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”
१५ तुम्ही यहोवाच्या आज्ञांचं पालन करून व त्याचे एकनिष्ठ मित्र बनून सैतानाला खोटं ठरवू शकता. यहोवाचे मित्र बनण्याकरता जरी तुम्हाला जीवनात मोठमोठे बदल करावे लागले तरी यासारखा उत्तम निर्णय दुसरा कोणताच नसेल. हा एक गंभीर निर्णय आहे. कारण सैतानाने असा दावा केला आहे, की तुमच्यावर समस्या आल्या तर तुम्ही देवाला एकनिष्ठ राहणार नाही. तो आपली एकनिष्ठा तोडण्याचा प्रयत्न करतो. तो हे कसं करतो, ते पाहू या.
१६. (क) लोकांनी यहोवाची सेवा करू नये म्हणून सैतान कोणकोणत्या पद्धतींचा उपयोग करतो? (ख) तुम्ही यहोवाची सेवा करू नये म्हणून तो कोणते प्रयत्न करेल?
१६ देवाशी आपली मैत्री तोडण्यासाठी सैतान वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतो. “एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावे” हे तो शोधत असतो. (१ पेत्र ५:८) तुमच्या मित्रांनी, घरातल्या सदस्यांनी किंवा इतरांनी तुम्हाला बायबलचा अभ्यास करण्यापासून व जे योग्य आहे ते करण्यापासून रोखलं, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कदाचित तुमचा छळ होत आहे, असं तुम्हाला वाटेल.a (योहान १५:१९, २०) सैतान कधीकधी “तेजस्वी देवदूताचे” देखील सोंग घेतो आणि आपल्याला यहोवाची आज्ञा तोडण्यास भाग पाडू शकतो. (२ करिंथकर ११:१४) आपण यहोवाची सेवा करू नये म्हणून तो आणखी एका पद्धतीचा उपयोग करतो. ती म्हणजे आपण देवाची सेवा करण्याच्या लायक नाही, असा विचार करायला लावून तो आपल्याला निराश करतो.—नीतिसूत्रे २४:१०.
यहोवाच्या आज्ञांचं पालन करा
१७. आपण यहोवाच्या आज्ञांचं पालन का करतो?
१७ यहोवाच्या आज्ञांचं पालन करून आपण सिद्ध करतो, की सैतान खोटा आहे. कोणती गोष्ट आपल्याला आज्ञाधारक राहण्यास मदत करू शकेल? “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (अनुवाद ६:५) आपलं यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याच्या आज्ञा पाळतो. आपलं यहोवावरचं प्रेम जसजसं वाढत जाईल तसतसं त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करू. प्रेषित योहानने असं लिहिलं: “देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचे पालन करावे; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३.
१८, १९. (क) कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, असं यहोवा आपल्याला सांगतो? (ख) आपल्याला जमणार नाहीत अशा गोष्टींची अपेक्षा यहोवा करणार नाही, हे आपण कशावरून म्हणू शकतो?
१८ पण काही गोष्टी चुकीच्या आहेत असं यहोवा आपल्याला सांगतो. या गोष्टी कोणत्या आहेत ते, “यहोवा घृणा करत असलेल्या गोष्टींची घृणा करा” असं शीर्षक असलेल्या चौकटीत दिलं आहे. त्यातल्या काही गोष्टी कदाचित तुम्हाला सुरुवातीला चुकीच्या वाटणार नाहीत. पण, बायबलमधली वचनं वाचून त्यांवर जेव्हा तुम्ही विचारपूर्वक मनन कराल तेव्हा यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्यातच शहाणपण आहे, याची जाणीव तुम्हाला होईल. त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या जीवनात बदल करण्याची प्रेरणा मिळेल. कधीकधी असे बदल करणं सोपं नसेल. पण तुम्ही ते बदल केले तर तुम्ही यहोवाचे एकनिष्ठ मित्र बनू शकाल आणि तुम्हाला मनाची शांती व आनंद अनुभवता येईल. (यशया ४८:१७, १८) पण जीवनात हे बदल करणं शक्य आहे, असं आपण का म्हणू शकतो?
१९ आपल्याला जे जमणार नाही अशा गोष्टींची अपेक्षा यहोवा आपल्याकडून कधीच करणार नाही. (अनुवाद ३०:११-१४) तो आपला खरा मित्र आहे त्यामुळे तो आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. आपल्याला काय शक्य आहे, काय अशक्य आहे, हे तो जाणतो. (स्तोत्र १०३:१४) प्रेषित पौल आपल्याला असं उत्तेजन देतो: “देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही; तर, परीक्षेच्या वेळी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तो तयार करेल, जेणेकरून तुम्हाला ती सहन करता येईल.” (१ करिंथकर १०:१३) जे योग्य ते करण्याची शक्ती यहोवा आपल्याला नेहमी देईल, अशी आपण खातरी बाळगू शकतो. तुमच्यावर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी तो तुम्हाला “असाधारण सामर्थ्य” देईल. (२ करिंथकर ४:७) कठीण काळात पौलने यहोवाच्या मदतीचा अनुभव घेतल्यामुळे तो म्हणू शकला: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्ती मिळते.”—फिलिप्पैकर ४:१३.
देवाला आवडणाऱ्या गोष्टींवर प्रेम करायला शिका
२०. तुम्ही कोणत्या गुणांचं अनुकरण केलं पाहिजे व का?
२० यहोवाचे मित्र बनायचं असेल तर आपण त्याच्या नजरेत ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या करायचं थांबवलं पाहिजे. पण इतकंच करणं पुरेसं नाही. (रोमकर १२:९) देवाचे मित्र, त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर प्रेमही करतात. या गोष्टींचं वर्णन स्तोत्र १५:१-५ (वाचा.) या वचनांमध्ये केलं आहे. यहोवाचे मित्र त्याच्या गुणांचं अनुकरण करतात आणि “प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, आत्मसंयम,” हे गुण दाखवतात.—गलतीकर ५:२२, २३.
२१. देवाला आवडत असलेले गुण दाखवायला तुम्ही कसं शिकू शकता?
२१ वर सांगितलेले सुरेख गुण तुम्ही आपल्या जीवनात कसे दाखवू शकता? बायबलचं नियमित वाचन व अभ्यास करून, तुम्ही यहोवाला आवडत असलेल्या गोष्टींवर प्रेम करण्यास शिकू शकता. (यशया ३०:२०, २१) असं केल्याने यहोवावरचं तुमचं प्रेम वाढत राहील आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या आज्ञा आनंदाने पाळाल.
२२. तुम्ही जर यहोवाच्या आज्ञांचं पालन केलं तर तुम्हाला कोणतं प्रतिफळ मिळेल?
२२ तुमच्या जीवनात तुम्ही करत असलेले बदल यांची तुलना, जुने कपडे बदलून नवीन कपडे घालण्याशी करता येईल. बायबलमध्ये म्हटलं आहे, की तुम्ही “जुने व्यक्तिमत्त्व” काढून टाकलं पाहिजे आणि “नवीन व्यक्तिमत्त्व” धारण केलं पाहिजे. (कलस्सैकर ३:९, १०) जीवनात बदल करणं सोपं नसतं. तरीदेखील आपण हे बदल करून यहोवाच्या आज्ञांचं पालन करतो, तेव्हा तो आपल्याला मोठं प्रतिफळ देण्याचं वचन देतो. (स्तोत्र १९:११) तर, यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याची निवड करा आणि सैतान खोटा आहे हे सिद्ध करून दाखवा. यहोवाची सेवा भविष्यात मिळणाऱ्या प्रतिफळासाठी नाही, तर तुमचं त्याच्यावर निःस्वार्थ प्रेम आहे म्हणून करा. अशा प्रकारे तुम्ही यहोवाचे खरे मित्र बनू शकाल!
a तुम्हाला बायबलचा अभ्यास करण्यास रोखणाऱ्यांवर सैतानाचा प्रभाव आहे, असा याचा अर्थ होत नाही. सैतान या जगाच्या व्यवस्थेचा देव आहे आणि “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” त्यामुळे तुम्ही यहोवाची सेवा करताना लोक जेव्हा तुमचा विरोध करतात तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका.—२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९.