अध्याय तीन
देवाचा मानवांसाठी काय संकल्प आहे?
१. देवाचा मानवांसाठी काय संकल्प होता?
मानवांसाठी देवाचा चांगला संकल्प होता. त्याने पहिला पुरुष आदाम व पहिली स्त्री हव्वा यांना एका सुंदर बागेत राहण्यासाठी बनवलं. आदाम व हव्वेला मुलं व्हावीत, त्यांनी संपूर्ण पृथ्वीला बागेसारखं सुंदर बनवावं आणि प्राण्यांची काळजी घ्यावी, अशी देवाची इच्छा होती.—उत्पत्ति १:२८; २:८, ९, १५; अंत्यटीप ६ पाहा.
२. (क) देव आपला संकल्प नक्की पूर्ण करेल, असं आपण का म्हणू शकतो? (ख) पृथ्वीवर कोण राहतील व ते किती काळ जगतील याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
२ पण आता पृथ्वी बागेसारखी सुंदर दिसत नाही. मग देवाचा संकल्प कधी पूर्णच होणार नाही का? यहोवा म्हणतो: “मी [जे] योजतो ते शेवटास नेतो.” (यशया ४६:९-११; ५५:११) म्हणजे, त्याचा संकल्प तो नक्की पूर्ण करणार आहे. हा संकल्प पूर्ण करण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही. यहोवा म्हणतो, की त्याने ही पृथ्वी “निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही.” (यशया ४५:१८) पृथ्वी लोकांनी भरावी, अशी त्याची इच्छा आहे. पण मग या पृथ्वीवर कोणी राहावं आणि त्यांनी किती काळ जगावं, याविषयी त्याची काय इच्छा आहे? बायबल म्हणते, “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४.
३. आज लोकांना आजारी पडताना आणि मरताना पाहून आपल्या मनात कोणते प्रश्न येऊ शकतात?
३ पण आज आपण पाहतो की, लोक आजारी पडतात आणि मरतात. जगात सगळीकडे लोक एकमेकांशी भांडताना दिसतात आणि एकमेकांचा जीवही घेतात. हा देवाचा संकल्प मुळीच नव्हता. देवाने तर आदाम आणि हव्वाला चांगली सुरुवात करून दिली होती, मग नेमकं काय झालं ज्यामुळे आजची परिस्थिती इतकी वाईट झाली? याचं उत्तर फक्त बायबलमध्येच दिलं आहे.
देवाचा शत्रू
४, ५. (क) एदेन बागेत हव्वाबरोबर सापाचा उपयोग करून खरंतर कोण बोलत होतं? (ख) एके काळी प्रामाणिक असलेला माणूस चोर कसा बनतो?
४ बायबलमध्ये सांगितलं आहे, की देवाचा एक शत्रू आहे ज्याला “दियाबल व सैतान” असं म्हटलं जातं. याच सैतानाने एदेन बागेत हव्वाबरोबर बोलण्यासाठी एका सापाचा उपयोग केला. (प्रकटीकरण १२:९; उत्पत्ति ३:१) जणू तो सापच तिच्याशी बोलत आहे, असं सैतानाने हव्वाला भासवलं.—अंत्यटीप ७ पाहा.
५ पण देवाने सैतानाला बनवलं का? नाही, मुळीच नाही! देवाने आदाम व हव्वा यांच्यासाठी पृथ्वी बनवली तेव्हा स्वर्गात अनेक देवदूत होते. त्यांपैकी एक देवदूत नंतर सैतान बनला. (ईयोब ३८:४, ७) पण हे कसं शक्य आहे? एक चोर जन्मापासूनच चोर असतो का? नक्कीच नाही. तो आधी एक प्रामाणिक माणूस असतो. पण त्याच्या मनात लोभ उत्पन्न होतो, जे आपलं नाही ते मिळवण्याची वाईट इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. मनातले हे वाईट विचार लगेच झटकून टाकण्याऐवजी, तो त्यांच्यावर विचार करत राहतो. हळूहळू हे वाईट विचार प्रबळ होत जातात. मग, त्याच्यासमोर जेव्हा चोरी करण्याची संधी येते तेव्हा तो चोरी करतो. अशा प्रकारे, एके काळी प्रामाणिक असलेला माणूस चोर बनतो.—याकोब १:१३-१५ वाचा; अंत्यटीप ८ पाहा.
६. एक देवदूत सैतान किंवा देवाचा शत्रू कसा बनला, हे समजावून सांगा.
६ सैतानाच्या बाबतीतही तेच घडलं. यहोवाने आदाम आणि हव्वाला बनवल्यानंतर त्यांना असा आशीर्वाद दिला: “बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति १:२७, २८) हे ऐकून सैतान झालेल्या देवदूताच्या मनात विचार आला: ‘या सर्वांनी जर माझी उपासना केली तर!’ हा वाईट विचार मनातून लगेच झटकून टाकण्याऐवजी तो त्याच्यावर सतत विचार करू लागला. तो जितका त्यावर विचार करत राहिला तितका त्याच्या मनात ती उपासना मिळवण्याचा लोभ वाढत गेला, जिच्यावर फक्त यहोवाचा हक्क आहे. म्हणून तो हव्वाशी खोटं बोलला आणि तिला फसवलं. (उत्पत्ति ३:१-५ वाचा.) त्याच्या या वाईट वागण्यामुळे तो सैतान म्हणजे देवाचा शत्रू बनला.
७. (क) आदाम आणि हव्वा का मेले? (ख) आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
७ यहोवाने आधीच सांगितलं होतं की फळ खाल्लं तर आदाम आणि हव्वा मरतील. तरीही त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि फळ खाल्लं. (उत्पत्ति २:१७; ३:६) असं करून त्यांनी यहोवाविरुद्ध पाप केलं आणि कालांतराने ते मरण पावले. (उत्पत्ति ३:१७-१९) आदाम व हव्वा यांची मुलं पापी असल्यामुळे तीही मेली. (रोमकर ५:१२ वाचा.) पण त्यांची मुलं पापी कशी झाली हे समजण्यासाठी आपण एका उदाहरणावर विचार करू या. समजा ब्रेडचा साचा एका बाजूने दबलेला असेल तर त्यात बनवलेले सर्व ब्रेड एका बाजूने दबलेलेच निघतील. आदामने देवाची आज्ञा मोडली म्हणून तो पापी झाला. आपणही आदामची मुलं असल्यामुळे आपणदेखील पापी झालो. म्हणूनच, आपण सर्व म्हातारे होतो आणि मरतो.—रोमकर ३:२३; अंत्यटीप ९ पाहा.
८, ९. (क) आदाम आणि हव्वा यांनी कशावर विश्वास ठेवावा, अशी सैतानाची इच्छा होती? (ख) यहोवाने लगेच या तिघा बंडखोरांचा नाश का केला नाही?
८ आदाम आणि हव्वाला देवाची आज्ञा मोडायला लावून सैतानाने एका बंडाळीची सुरुवात केली. सैतानाची अशी इच्छा होती की, आदाम आणि हव्वा यांनी यहोवा खोटा आहे; त्याची राज्य करायची पद्धत योग्य नाही; आणि मानवांचं भलं व्हावं असं त्याला मुळीच वाटत नाही, या चुकीच्या विचारांवर विश्वास ठेवावा. मानवांनी काय करावं आणि काय करू नये, हे देवाने त्यांना सांगण्याची गरज नाही; योग्य आणि अयोग्य काय हे आदाम व हव्वा स्वतः ठरवू शकतात असं सैतानाला म्हणायचं होतं. मग यहोवाने काय केलं? सैतान, आदाम आणि हव्वा या तिघांचा नाश करून तो ही बंडाळी मोडून काढू शकला असता. पण, जर यहोवाने असं केलं असतं तर सैतान खोटं बोलत आहे, हे सिद्ध झालं असतं का? मुळीच नाही.
९ त्यामुळे यहोवाने लगेच या तिघा बंडखोरांचा नाश केला नाही. त्याऐवजी त्याने मानवांच्या हाती राज्य कारभार सोपवून दिला. यावरून हे सिद्ध होणार होतं की सैतान खोटा आहे व मानवांचं भलं कशात आहे, हे यहोवाशिवाय दुसऱ्या कोणालाच माहीत नाही. याविषयी आपण ११ व्या अध्यायात सविस्तर शिकणार आहोत. पण आदाम आणि हव्वा यांनी योग्य निर्णय घेतला का? त्यांनी देवाची आज्ञा मोडून सैतानावर विश्वास ठेवायला हवा होता का? जरा विचार करा, आदाम आणि हव्वा यांना परिपूर्ण जीवन, राहण्यासाठी एक सुंदर घर आणि आवडेल असं काम कोणी दिलं होतं? यहोवाने की सैतानाने? सैतानाने त्यांच्यासाठी काही चांगलं केलं होतं का? तुम्ही त्यांच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं?
१०. आपल्यापैकी प्रत्येकाला कोणती निवड करायची आहे?
१० आज आपल्या सर्वांना एक निवड करायची आहे. या निवडीवर आपलं जीवन अवलंबून आहे. आपण एकतर सैतानाला आपला शासक म्हणून निवडू शकतो किंवा यहोवाला आपला शासक म्हणून निवडून सैतानाला खोटा सिद्ध करू शकतो. (स्तोत्र ७३:२८; नीतिसूत्रे २७:११ वाचा.) जगातले खूप कमी लोक देवाची आज्ञा मानतात. खरंतर, आज या जगावर देवाचं राज्य नाही? मग या जगाचा राजा कोण आहे?
जगावर कोणाचं राज्य आहे?
ही राज्यं सैतानाची नसती तर त्याने ती येशूला देऊ केली असती का?
११, १२. (क) सैतानाने येशूला राज्यं देऊ केली यावरून काय समजतं? (ख) सैतान जगावर राज्य करत आहे हे कोणत्या वचनांवरून कळतं?
११ जगावर खरंतर कोण राज्य करत आहे, हे येशूला माहीत होतं. एकदा सैतानाने “जगातली सर्व राज्ये व त्यांचे वैभव त्याला दाखवले. तो त्याला म्हणाला: ‘तू एकदा माझ्या पाया पडून माझी उपासना केलीस, तर हे सर्व मी तुला देईन.’” (मत्तय ४:८, ९; लूक ४:५, ६) ही राज्यं सैतानाची नसती तर त्याने ती येशूला देऊ केली असती का? यावरून कळतं की जगातली सर्व सरकारं सैतानाची आहेत.
१२ आता तुमच्या मनात प्रश्न येईल: ‘यहोवा सर्वसमर्थ देव आहे आणि त्यानेच हे सर्व काही निर्माण केलं, मग सैतान जगाचा शासक कसा काय झाला?’ (प्रकटीकरण ४:११) होय, यहोवाच सर्वसमर्थ देव आहे. पण, सैतान या “जगाचा अधिकारी” आहे, असं येशूनेच म्हटलं. (योहान १२:३१; १४:३०; १६:११) प्रेषित पौलने सैतानाला या ‘जगाच्या व्यवस्थेचा देव’ असं म्हटलं. (२ करिंथकर ४:३, ४) आणि प्रेषित योहाननेसुद्धा असं लिहिलं: “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.”—१ योहान ५:१९.
सैतानाच्या जगाचा नाश कसा होईल?
१३. आपल्याला नवीन जगाची गरज का आहे?
१३ आजचं जग दिवसेंदिवस भयानक होत चाललं आहे. युद्धं, भ्रष्टाचार, ढोंगीपणा, हिंसाचार सगळीकडे आहे. मानवांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना या समस्या काढून टाकणं शक्य नाही. पण देव लवकरच, “हर्मगिदोन” म्हटल्या जाणाऱ्या त्याच्या लढाईत या जगातल्या दुष्ट गोष्टी काढून टाकेल आणि या पृथ्वीला नंदनवन बनवेल. तेव्हा या पृथ्वीवर फक्त नीतिमान लोक राहतील.—प्रकटीकरण १६:१४-१६; अंत्यटीप १० पाहा.
१४. देवाने कोणाला आपल्या राज्याचा राजा म्हणून निवडलं आहे? हजारो वर्षांपूर्वी बायबलमध्ये येशूविषयी काय सांगण्यात आलं होतं?
१४ यहोवाने येशू ख्रिस्ताला आपल्या स्वर्गीय सरकारचा किंवा राज्याचा राजा म्हणून निवडलं आहे. हजारो वर्षांपूर्वी बायबलमध्ये असं म्हटलं होतं, की येशू “शांतीचा अधिपती” असेल आणि त्याच्या सरकारचा कधीच अंत होणार नाही. (यशया ९:६, ७) येशूने आपल्या शिष्यांना या राज्यासाठी अशी प्रार्थना करण्यास शिकवलं: “तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:१०) ८ व्या अध्यायात आपण जगातल्या सरकारांना काढून देव त्याचं राज्य कसं स्थापन करेल याविषयी आणखी शिकणार आहोत. (दानीएल २:४४ वाचा.) त्यानंतर देवाचं राज्य पृथ्वीला सुंदर बागेसारखं बनवेल.—अंत्यटीप ११ पाहा.
नवीन जग जवळ आलं आहे!
१५. ‘नवी पृथ्वी’ कोणाला सूचित करते?
१५ बायबलमध्ये असं सांगितलं आहे की, “आपण एका नव्या आकाशाची व नव्या पृथ्वीची वाट पाहत आहोत आणि तिथे न्यायनीती टिकून राहील.” (२ पेत्र ३:१३; यशया ६५:१७) बायबलमध्ये कधीकधी “पृथ्वी” हा शब्द पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना उद्देशून वापरण्यात आला आहे. (उत्पत्ति ११:१) नीतिमान ‘नवी पृथ्वी’ ही देवाची आज्ञा पाळणाऱ्या आणि त्याने आशीर्वाद दिलेल्या लोकांना सूचित करते.
१६. देवाच्या नवीन जगात राहणाऱ्यांना तो कोणती चांगली देणगी देणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
१६ देवाच्या नवीन जगात राहणाऱ्यांना “सर्वकाळाचं जीवन” मिळेल, असं येशूने वचन दिलं. (मार्क १०:३०) हे जीवन मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याचं उत्तर आपल्याला योहान ३:१६ आणि १७:३ या वचनांमध्ये मिळेल. (वाचा.) नंदनवन झालेल्या पृथ्वीवर जीवन कसं असेल याविषयी बायबलमध्ये काय म्हटलं आहे ते आता आपण पाहू या.
१७, १८. पृथ्वीवर शांती असेल आणि आपण सुरक्षित असू, असं आपण कशावरून म्हणतो?
१७ दुष्टता, युद्धं, गुन्हेगारी आणि हिंसाचार नाहीसा होईल. पृथ्वीवर एकही दुष्ट माणूस नसेल. (स्तोत्र ३७:१०, ११) देव सर्व “लढाया बंद” करेल. (स्तोत्र ४६:९; यशया २:४) देवावर प्रेम करणारे आणि त्याच्या आज्ञा पाळणारे लोकच या पृथ्वीवर असतील. सगळीकडे शांती असेल.—स्तोत्र ७२:७.
१८ यहोवाच्या लोकांना घाबरण्याचं कारण नसेल. बायबल लिहिण्यात आलं त्या काळात, इस्राएली लोक जोपर्यंत देवाच्या आज्ञा पाळत होते तोपर्यंत ते सुरक्षित होते. कारण यहोवा त्यांचं संरक्षण करत होता. (लेवीय २५:१८, १९) नंदनवनात आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नसेल, आपण सुरक्षित असू.—यशया ३२:१८ आणि मीखा ४:४ वाचा.
१९. देवाच्या नवीन जगात सर्वांसाठी भरपूर अन्न असेल, हे आपण खातरीने का म्हणतो?
१९ सर्वांसाठी भरपूर अन्न असेल. भूमीवर इतकं “पीक” असेल की ते “पर्वतांच्या शिखरांवर” डोलेल, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (स्तोत्र ७२:१६) यहोवाचा “आशीर्वाद” असल्यामुळे भूमी भरपूर पीक देईल.—स्तोत्र ६७:६.
२०. पृथ्वीचं नंदनवन होईल असं आपण का म्हणतो?
२० संपूर्ण पृथ्वीचं नंदनवन होईल. लोकांना राहण्यासाठी छान घरं असतील, सुंदर बागा असतील. (यशया ६५:२१-२४ आणि प्रकटीकरण ११:१८ वाचा.) पूर्ण पृथ्वी एदेन बागेसारखी सुंदर होईल. यहोवा नेहमी आपल्या सर्व गरजा पूर्ण करेल. बायबलमध्ये यहोवाबद्दल असं म्हटलं आहे: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करतोस.”—स्तोत्र १४५:१६.
२१. मानव आणि प्राणी यांच्यात शांती का असेल?
२१ मानव आणि प्राणी यांच्यात शांती असेल. प्राणी आपल्यावर हल्ला करणार नाहीत. लहान मुलं प्राण्यांबरोबर खेळताना घाबरणार नाहीत. जे प्राणी आज हिंसक आहेत अशा प्राण्यांसोबतही ते सहजपणे खेळतील.—यशया ११:६-९; ६५:२५ वाचा.
२२. आजारी असलेल्यांसाठी येशू काय करेल?
२२ कोणीच आजारी पडणार नाही. येशू पृथ्वीवर असताना त्याने पुष्कळ आजारी लोकांना बरं केलं. (मत्तय ९:३५; मार्क १:४०-४२; योहान ५:५-९) पण देवाच्या राज्याचा राजा म्हणून तो पृथ्वीवर सर्वांना बरं करेल. “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४; ३५:५, ६.
२३. मृत लोकांसाठी देव काय करेल?
२३ मृत लोक पुन्हा जिवंत होतील. मरण पावलेल्या कोट्यवधी लोकांना पुन्हा जिवंत करण्याचं वचन देव देतो. “नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे,” असं अभिवचन बायबलमध्ये दिलं आहे.—योहान ५:२८, २९ आणि प्रेषितांची कार्ये २४:१५ वाचा.
२४. नंदनवन झालेल्या पृथ्वीवर राहायला तुम्हाला कसं वाटेल?
२४ आपल्या सर्वांनाच आज एक निवड करायची आहे. आपण एकतर यहोवाविषयी शिकून त्याची सेवा करू शकतो, किंवा आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो. आपण जर यहोवाची सेवा करण्याची निवड केली, तर आपल्यासमोर एक आनंदी भविष्य आहे. एका व्यक्तीने येशूला म्हटलं की त्याच्या मृत्यूनंतर त्याने त्याची आठवण ठेवावी, तेव्हा येशूने त्याला वचन दिलं: “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.” (लूक २३:४३) तेव्हा, आपण येशू ख्रिस्ताबद्दल आणि देवाने दिलेली अभिवचनं तो कशी पूर्ण करणार आहे याबद्दल आणखी शिकून घेऊ या.